Mother's letter to son .. in Marathi Short Stories by Vrushali Gaikwad books and stories PDF | आईचे मुलाला पत्र..

Featured Books
Categories
Share

आईचे मुलाला पत्र..

प्रिय सोनु...

खरंतर मी तुला सोनु बोलते ते ही कदाचित तुला आवडत नसेल.. पण असुदे.. तु कितीही मोठा झाला तरी माझ्यासाठी तु कायम सोनुच असणार आहेस. कसा आहेस तु??? प्रिया कशी आहे ?? आणि आपला कियु आता बोलायला लागला असेल ना तो??? माझी कितीही इच्छा झाली तरी आज मी त्याला बघु शकत नाही... मला माहीत नाही का?? पण आपल्या या घरात मला अजिबात करमत नाही, जिथे मी माझा संपुर्ण संसार आनंदात आणि हसत जगली, त्याच घरात आज मला श्वास घेता येत नाही. घुसमटल्या सारखं होतंय.. कदाचीत तुझी खुप सवय झाली असावी या घराला. तुला खरंच वाटत नाही का आईला भेटायला जावं?? तुला एक सांगु मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की माझा एकुलता एक मुलगा ज्याला मी बाबा आणि आई दोघांचिही माया दिली तो मला एकटीला सोडुन जाईल..
खरं सांगु तु जेव्हा प्रियासोबत लग्न केलं तेव्हा मी खुप खुश होती, ज्या घरात आपण दोघेच राहत होतो तिथे मला एक मैत्रिण, मुलगी मिळणार होती. आमच्या दोघींचे विचार कदाचीत जुळले नसतील. तिच्याकडुन भाजीत मिठ जास्त गेला म्हणुन मी तिला ओरडली पण तिने तुझी आई तिला ओरडली म्हणुन तुला जाऊन सांगितलं. पण तु विचार कर ना..?? तिची आई आज तिला ओरडली तर ती कोणाकडे तक्रार करेल का? कारण ती आई तिचीच आहे.. मला मनापासुन तिने आपलंच केलं नाही.. आणी माझं पण चुकलंच म्हणा तु माझा एकुलता एक मुलगा म्हणुन प्रियासोबत तु जास्त फ्री राहीलास की मला वाटायचं माझा मुलगा बायकोच्या मुठीत जाईल म्हणुन मी पण राहुन राहुन तुला प्रियाबद्दल काही ना काही सांगायची?? पण मला माफ कर .. जमलंच तर..तु आणि प्रिया दोघेही परत या आपल्या घरी..
तुला एक सांगु .. तु जेव्हा लहान होता ना.. तेव्हा तुला कोणी बोललं तरी मला आवडत नसायचं.. तुला आठवत असेल तुला एकदा शाळेतल्या बाईंनी मारलं होतं म्हणुन मी तुझी शाळा बदलली कारण माझ्या बाळाला त्रास नको.. तुझं जेव्हा काही चुकायचं ना तर मी लोकांना खोटं सांगायची माझ्याकडुन चुकुन झालं म्हणुन.. तु एकदा शाळेत जातावेळी खड्ड्यात पडला होता आणि तुझ्या पायाला खुप लागलेलं पण तेव्हाही मी तुला बरं वाटेपर्यंत एक अन्नाच घास ही खाल्ला नव्हता. मला तुझ्याशिवाय जगावं लागेल असा कधी विचारही केला नाही रे... मान्य आहे प्रिया तुझी बायको आहे, तुला तिची काळजी आहे. ती तिचे आईवडील सोडुन तुझ्यासाठी आली आहे पण नवरा म्हणुन बाळा तुझा पण हक्क आहेच ना, बायको चुकलीच तर तिला समजावुन सांगायचं..
कसं आहे ना?? आज ती बोलली तुझी आई आणि माझं पटत नाही म्हणुन तु तिचा विचार करुन लांब गेलास पण तु एकदाही आईचा विचार नाही केला. ज्या आईने तुझ्यासाठी आयुष्यभर जुळवुन घेतले. जिने तु तिच्या अंगावर उलटी केली म्हणुन तुला सांभाळून घेतले, जिने तु मुलांसोबत भांडण केले ते सांभाळून घेतले, ज्या आईने तु दिलेले प्रत्येक दुःख सांभाळून घेतले. ज्या आईने तुझी प्रत्येक चुक सांभाळून घेतली. त्या आईला आज तु सांभाळून नाही का घेऊ शकत??? तु तुझ्या बायकोसमोर आईला सांभाळून नाही का घेऊ शकत. आज तु आईला सांभाळून घेतलं असतं तर बरं वाटलं असतं... तु एकदा प्रियाला विचार तिच्या आई बाबांसोबत तु संबंध तोडायला सांगितले तर तिला कसं वाटेल. मला हे ही माहित आहे. ती तिच्या आई बाबांसोबत संबंध कधीच तोडणार नाही पण ती तुला तिच्यापासुन त्यांच्यासाठी नक्कीच दुर करेल.
प्रियाला तिच्या आई बाबांनी दिलेल्या प्रेमाची आणि त्याच्या भावनांची जाणिव आहे. ती कोणाचेही ऐकुन त्यांना सोडणारच नाही कारण तिला माहित आहे तिच्या आई बाबांना तिच्या शिवाय दुसरं कोणिच नाही.. बरं झालं असतं तुलाही आज माझी जाणिव झाली असती. मला सुन म्हणुन जरी प्रियाचा राग येत असेल तरी आज एक मुलगी म्हणुन तिचा अभिमान वाटतोय. पण तु नवरा म्हणुन जरी योग्य असलास तरी माझा मुलगा आहेस म्हणुन मला तुझी लाज वाटते..
आणी हो.. मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. म्हणुन मी आता तु आणि बायकोपासुन स्वतःला दुर नेणार आहे. तुला माझी अडचण कधीच होणार नाही.

तुझी आणि प्रियाची काळजी घे, कियुला माझ्याकडून एक पप्पी घे..