Ghost and Writer in Marathi Horror Stories by शशांक सुर्वे books and stories PDF | घोस्ट अँड रायटर

Featured Books
Categories
Share

घोस्ट अँड रायटर

#घोस्ट_अँड_रायटर

लेखन :- शशांक सुर्वे

"अहो सोडा डॉक्टरांचा हात ते फक्त चेकअप करत आहेत....."

प्रितीने राजेशचा हात पकडला होता...राजेशने हातात टॉर्च असलेला डॉक्टरचा हात घट्ट पकडला होता.....ह्या झटापटीत राजेशच्या शर्टाचे बटन तुटले होते राजेशच्या अंगावरचे ओरखड्याचे निशाण बघून डॉक्टर हैराण झाला.....राजेशची बायको प्रीती त्याचा हात पकडून ओढत होती......राजेश जोरात किंचाळत होता.....मानोसोपचार तज्ञ हातात छोटी टॉर्च घेऊन राजेशचे डोळे चेक करणार होता पण राजेशने त्याचा हात पकडला होता.....शेवटी डॉक्टरला दूर ढकलून राजेश ओरडला

"हा खुनी विक्रम आहे.....ह्याच्या अंगात सुनीताचे भूत आहे हा मला मारायला आला आहे"

राजेश किंचाळत होता....शेवटी दोन वार्डबॉय आले आणि त्यांनी राजेशला घट्ट पकडले....डॉक्टरांनी त्याला झोपेचे इंजेक्शन दिले आणि राजेश शांत झाला.....प्रीती प्रचंड घाबरली होती.....तिला राजेशची काळजी वाटत होती....राजेशची ही अवस्था बघून ती तिथेच बसून रडू लागली......नुकताच काही महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला होता पण त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली होती.......राजेश देशपांडे उर्फ...M राजेश....हे नाव अगदी काही काळातच लेखन क्षेत्रात फेमस झालं....अगदी अचानक..राजेशच्या भयकथा वाचायला लोक तुटून पडायचे.....पुस्तक छापण्याआधीच बुक झाले असायचे......इंटरनेटच्या जमान्यात एक वेगळीच लाट आली होती......M राजेश हे फक्त नावच बास होत.....त्याच्या भयकथा लोकांच्या अंगाचा थरकाप उडवणार्या होत्या..भाषाशैलीही वेगळी होती...पुस्तक...ऑडिओ बुक...वेबसिरीज....सगळीकडे M राजेश नाव गाजत होते....कथा अक्षरशः विकत होता तो.....त्यातल्या त्यात त्याची पुस्तके खूप प्रसिद्ध झाली होती "सरिता प्रकाशन" ह्या पुस्तक कंपनीशी राजेशने लाखो रुपयेचा करार केला होता.....तो आपल्या नवनवीन स्टोरी सरिता प्रकाशनला द्यायचा....राजेशच्या भयकथामुळे सरिता प्रकाशन काही महिन्यातच फेमस झाले......राजेश तश्या छोट्या कथाच लिहायचा.....एका पुस्तकात कमीत कमी 30 नवनवीन कथा असायच्या.....त्याने आपला वेगळा वाचकवर्ग निर्माण केला होता.....कधी त्याची स्टोरी प्राचीन काळातली असायची कधी आधुनिक....कधी भारतीय कधी अमेरिकन.....भयकथेत एकच रटाळपणा न आणता राजेशच्या लेखणीत नेहमीच विविधता असायची....आत्मे....सैतान....पिशाच्च आणि बऱ्याच भुताची त्याच्या कथेत रेलचेल असायची.....राजेशने आपल्या बरोबर असावे असे अनेक प्रकाशकांना वाटत होते..कारण सरिता प्रकाशनला राजेशने काही महिन्यातच श्रीमंत केले होते....दुसऱ्या प्रकाशकांनी राजेशला आपल्या बाजूने घेण्याचे प्रयत्नही केले होते पण राजेश सरिता प्रकाशनासाठी लिहायचा.....नुकत्याच त्याच्या स्टोरी वर बनलेल्या शॉर्ट फिल्म्सना राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते.....दर महिन्याला सगळीकडून त्याला पैसा येत होता.....अचानक झालेली राजेशची प्रगती बघून अनेक लेखक आवक झाले होते.....त्याच लिखाण अतिशय गूढ आणि भयानक असायचं

त्यातच त्याने अचानक थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं..."तो ब्रेक मानसिक शांततेसाठी घेत आहे" असं त्याने जाहीर केलं होतं.....लिखाणाला अल्पविराम लावला होता....तरीही त्याला मासिक मानधन मिळतच होतं....ह्या काळात वाचक वर्गाकडून त्याला खूप प्रतिसाद मिळत होता.....त्याने एक भयकथा लिहली होती 'शापित स्त्री" नावाची....ती त्याने एका शॉर्ट फिल्म कंपनीला विकली होती......त्यात त्याची ओळख त्याने लिहलेल्या एका शॉर्टफिल्ममध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीशी झाली.....प्रीती दिसायला खूप सुंदर होती....ती तशी बंगालची होती पण नाटक सिरीयल मध्ये छोटे छोटे रोल्स करून खुश होती.....त्यात राजेशने लिहलेल्या एका भयकथेवर एक शॉर्ट फिल्म बनली होती त्यात प्रितीने लीड रोल केला होता..प्रीतीच्या अभिनयाला पुरस्कार मिळाला त्याचे श्रेय तिने राजेशच्या लिखाणाला दिले होते.....तसेच "शापित स्त्री" ह्या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.....प्रीती आणि राजेश यांच्या भेटी वाढू लागल्या...काही काळ राजेश लिखाणापासून दूर राहिला...प्रीती बरोबर त्याचा वेळ अधिक जाऊ लागला...भेटी आतां लग्नाच्या गाठी झाल्या.....कोण कुठली प्रीती....तिला राजेशने आपली पत्नी बनवलं होत.....सगळा संसार सुखाचा सुरू होता.....त्या भयानक भयकथेच्या नरकातून प्रेमकथेच्या स्वर्गात राजेश आला होता.....त्याने काही प्रेमकथा पण लिहल्या होत्या....त्याने त्या प्रकाशकासमोर ठेवल्या....त्या कथा वाचून प्रकाशक हसला

"अरे राजेश अश्या पोत्याने प्रेमकथा पडून आहेत माझ्याजवळ....तू भयकथाच लिह बर....तुला तेच जमतंय....तुझे भयकथा विषय फार जबरदस्त असतात"

ही प्रतिक्रिया ऐकून राजेश जरा नाराज झाला पण प्रितीने त्याला धीर दिला.....त्याला भयकथा लिहण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता....त्या रस्त्याला राजेशला परत जायचं नव्हतं..प्रितीने त्याचे कारण विचारले तर तो काहीच बोलायचा नाही...पण झालं वेगळंच....काही दिवसानंतर राजेशला प्रचंड अस्वस्थ वाटू लागलं होतं....त्याचे सगळे कुटूंबीय गावाकडे होते....इकडे मोठ्या शहरात काळजी करणारी त्याची बायको प्रीती एकटीच होती......राजेश अचानक शांत शांत राहू लागला.....त्याने भुतांची साथ सोडली होती पण भयकथेबरोबर काही भुते त्याच्या डोक्यात शिरल्यासारखी त्याला त्रास देत होती.....कधी कधी तो झोपेतून ओरडत उठायचा.....प्रीतीच्या प्रेमळ स्पर्शानेही तो दचकायचा.....आपल्या आसपास कुणीतरी आहे असे त्याला भास होऊ लागले.....कधी कधी त्याने लिहलेल्या त्याच्या कथेतील एखादं पात्र त्याच्या समोर उभं आहे असं वाटून राजेश त्याच्याशी बोलायचा......कधी कधी जीवाची भीक मागत असायचा....प्रीती त्याला सावरत होती.....काही आठवड्यातच राजेश कमालीचा अशक्त झाला....त्याच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे आली......त्याची अनाठायी भीती झोपेतून ओरडत उठणे प्रीतीला अस्वस्थ करीत होते.....त्या दिवशी तिने राजेशला एका नावाजलेल्या मनोसोपचार तज्ञाकडे उपचाराला आणले होते.....तिथे सुद्धा राजेश कमालीचा अस्वस्थ झाला होता.....शेवटी त्याला झोपेचे इंजेक्शन देऊन शांत केले होते.....डॉक्टरसुद्धा चिंतेत होते....कारण काही आठवड्यात इतका त्रास होणे त्यांच्या कल्पनेच्या बाहेरचे होते.....प्रीती डॉक्टर संजीव ह्यांच्या समोर बसून रडत होती.....डॉक्टरांनी तिला धीर दिला

"हे बघा प्रीती....मी काही औषधे लिहून दिली आहेत....ती वेळेवर द्या.....आणि हो त्यांच्या कथेतील ती भयानक पात्रं त्यांच्यावर हावी झाली आहेत अस वाटत आहे.....कधी कधी माणूस एखाद्या गोष्टीत स्वतःला झोकून देतो आणि त्या कलेचा एक भाग बनतो तस काहीसं झालं आहे राजेश ह्यांच्या बाबतीत....थोडे दिवस त्यांना भयकथा लिहणे बंद करायला सांगा आणि चेंज म्हणून कुठे तरी शहरापासून दूर थंड हवेच्या ठिकाणी रहायला जा.....राजेश ह्यांची खूप काळजी वाटते....मी सुद्धा त्यांचा मोठा फॅन आहे....फक्त तुम्ही औषधं चुकवू नका"

प्रितीने सगळी औषधं खरेदी केली आणि सरिता प्रकाशनाचे मालक श्री राजीव ह्यांना कॉल करून सगळी हकीकत सांगितली......राजीव ह्यांना राजेशची काळजी वाटू लागली....कारण त्याच्या जीवावर त्यांनी अमाप पैसा उभा केला होता....राजेश लवकरात लवकर बरा होऊन कामाला लागावा अस त्यांना वाटू लागलं....त्यांनी प्रीतीला रामपूर जवळच्या आपल्या फार्महाऊस वर जाऊन काही दिवस राहण्याचा सल्ला दिला.....प्रीतीलाही तो सल्ला योग्य वाटला....रामपूरच्या डोंगररांगा मध्ये उंच ठिकाणी सरिता प्रकाशनचे मालक राजीव ह्यांनी आपल्या प्रकाशनाच्या पुस्तकांच्यासाठी लिहणार्या मोठ्या लेखकांना विश्रांती मिळावी म्हणून काही खास लोकांच्यासाठी तो फार्म हाऊस बनवला होता.....पावसाळा असल्याने ह्या घडीला तिथे कुणीही नव्हतं......प्रितीने दुसऱ्याच दिवशी राजेशला बरोबर घेतलं आणि स्वतः कार ड्राइव्ह करू लागली.....इकडे राजेशची प्रकृती बिघडत होती...त्याला अजूनही भूतांचे भास होत होते....कधी कधी प्रीती सुद्धा भयानक दिसायची.....पण प्रीती त्याला सावरत होती....वेळोवेळी औषध देत होती.....पण अचानक धक्यात गेलेला राजेश अजून अशक्त होत होता.....गाडीत असताना त्याने आपल्या तोंडात आपल्या खिशातील रुमालाचा बोळा कोंबला होता.....त्याला काहीतरी सांगायचे होते पण तो स्वतःला थांबवत होता....अखेर ते दोघे रामपूरचा घाट पार करून त्या फार्महाऊस वर आले अगदी प्रशस्त मोठा बंगला होता....खालच्या गावातला एक वृद्ध माणूस देखरेखीला ठेवला होता ते दोघे तिथे पोहोचताच तो समान घेण्यासाठी कार कडे धावला.....त्याला बघताच राजेश किंचाळला

"आबासाहेब.....तू त्या हौशीला मारलंस ना 1956 साली....हा तूच आहेस तो.....बघ ती तुला धडा शिकवणार आहे......पळून जा इथून"

हे ऐकताच देखरेख करणारा माणूस गोंधळला......प्रितीने त्याच्या हातातून समान काढून घेतले....राजेशची स्तिथी गंभीर होती.....प्रीतीला दोघात कुणीही नको होतं

"काका एक काम करा....आम्ही इथे दोघेच राहणार आहोत....तुम्ही काही काळ विश्रांती घ्या....गरज लागली तर बोलवू आम्ही"

तसा तो वृद्ध खुश झाला

"बाईसाहेब माझं घर इथं खालीच आहे.....खालच्या गावचा आहे मी....पण ह्या बंगल्याची देखभाल करण्यात दिवस जातोय बघा.....तुम्ही रहा आरामात... मी जरा माझ्या गावाकडं जाऊन येतो....काही लागलं तर ह्यो माझा नंबर"

एक चिट्ठीत आपला नंबर देऊन तो वृद्ध निघून गेला....त्या घरात आता प्रीती आणि राजेश दोघेच होते.....प्रीतीला राजेशची चिंता होती....ती त्याला वेळोवेळी औषध द्यायची....बाहेर त्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला न्यायची.....पण राजेशच्या प्रकृती मध्ये सुधार होत नव्हता....त्याला भूतांचे भयानक भास व्हायचे.....त्याने अन्नपाणी सोडलं होतं....प्रीती त्याला वेळेवर औषध देत होती......पण राजेश अजून अशक्त होत होता.....शेवटी त्याची ही दयनीय अवस्था बघून तिने डॉक्टरांना फोन लावला.....फोनवर ती हुंदक्यांनी दाटून आली होती

"डॉक्टर हे बरे होईनात हो.....अन्नपाणी सोडलं आहे....तुमची औषध देत आहे तरी त्यांना भास होत आहेत मला काही सुचत नाहीय....plz काहीतरी करा"

"मिसेस प्रीती....शांत व्ह्या....तुम्ही त्यांना ताबडतोब घेऊन या माझ्याकडे.....मी परत चेक करतो"

प्रितीने डोळे पुसले.....तिने परवाची अपॉइंटमेंट घेतली.....बाजूच्या खोलीतून काहीतरी आवाज येत होता तिने मोबाईल बंद केला आणि आत गेली......बेडरूम मध्ये बेड वर राजेश झोपला होता.....हलक्या आवाजात काहीतरी बडबडत होता....प्रीती त्याच्या जवळ गेली.......तिने एका चमच्यामध्ये लिक्विड औषध घेतलं आणि राजेशच्या तोंडात घातलं.....राजेश खूप अशक्त झाला होता....डोळे बरेच आत गेले होते...गालही बसले होते....त्याने एकनजर प्रीतिकडे बघितले

"मोहिनीला बोलवून घेतलं आहे मी.....शेवटचं भेटीन म्हणतोय.....ती आता इथे येईल....खूप वाईट आहे ती......मला तुझ्याजवळ बघून चिडेल ती...तू इथून जा प्रीती.....निघून जा प्रीती"

प्रीतीला काही समजेना...राजेशची भाषा बदलली होती......तो काहीपण विचित्र बोलत होता...पण हे रोजचं होत......प्रितीने नेहमीप्रमाणे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.....प्रितीने त्याच्या पायाखाली पडलेली चादर राजेशच्या अंगावर ओढली...तिने त्याच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला

"झोपा निवांत.....कुणीही येणार नाही .....मी आहे ना इथे"

औषधात गुंगी होती....काही क्षणात राजेश झोपी गेला... प्रीती बाहेरच्या हॉल मध्ये आली.....तिने आपल्या कॉन्टॅक्ट मधील एका नंबर वर कॉल केला

"मिस्टर सावंत....मी तुमचं काम केलं आहे....तुम्ही विदेशातून आणलेले ते औषध मी राजेशला रोज देत आहे...मी सगळे डोस त्याला दिले आहेत....आता काही दिवसांनी तो वेडा होईल.."

"अरे वाह प्रीती.....मस्त काम केलेस तू......तुझी रक्कम तुला मिळेल....आता राजेश वेडा झाला म्हंटल्यावर पुन्हा आमच्या प्रकाशनामधील पुस्तकांना मागणी वाढेल......खूप हवेत उडत होता साला"

प्रितीने आपला मोबाईल चेक केला......तिला तिच्या कामाचे पैसे ट्रान्सफर झाले होते..प्रीती जाम खुश झाली...ती धावत आपल्या पर्स जवळ गेली आणि त्यातून एक सिगरेट घेऊन मस्त निसर्गाकडे बघत ओढू लागली.....राजेशच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज तिला येत होता पण त्याकडे तिचं लक्ष नव्हतं......ती बंगल्याच्या पार्क मध्ये असलेल्या झोपाळ्यावर मस्त झोके घेत सिगरेट ओढत होती......राजेशची किंचाळी तिला ऐकू येत होती....पण राजेश आता तिच्या कामाचा नव्हता...कारण त्याला तिने आयुष्यातून उठवलं होत....त्याला एकदा वेड्याच्या दवाखान्यात पोहोचवलं की त्याच्या पैशावर मज्जा मारायचा विचार करून प्रीती खुश होत होती.....अचानक काच फुटल्याचा आवाज तिला आला......तिने मागे वळून बंगल्याकडे बघितले....बंगल्याच्या काचा आणि दारे झाडाची पाने फडफड करावीत तशी हालत होती.....वारे एकदम संथ वाहत होते तरी एखाद्या मोठ्या वादळासारखी दारे खिडक्या वाजत होत्या.....प्रीती जागेवरून उठली......बंगल्यातुन कुणीतरी तिच्या दिशेने येत होतं..डोक्यावरचे लांब केस चेहऱ्यावर आल्यामुळे चेहरा दिसत नव्हता......तिने आपले केस मागे घेतले.....तशी ती प्रीतीच्या समोर आली.....खूपच सुंदर दिसत होती....तिची नखे लांबलचक आणि तीक्ष्ण होती....ती नखे बघून प्रीती घाबरली

"क.....क......कोण तुम्ही??....आणि इथे काय करताय"

तशी ती जोरजोरात हसू लागली

"मला सांग तू राजेशच्या आयुष्यात काय करत आहेस....मला माहित आहे तुझा हेतू काय आहे.....माझ्या राजेशला वेडा करून आयुष्यातून उठवणार आहात ना तुम्ही लोक"

हे शब्द ऐकून प्रीती गोंधळली.....ती मागे मागे सरकू लागली

"हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय...मी बायको आहे राजेशची....तुम्ही जा इथून नाहीतर मी पोलिसांना बोलवीन"

ती अगदी प्रीतीच्या समोर येऊन उभी राहिली

"एकदा वचन घेऊन राजेशपासून दूर राहिली मी....पण आता नाही....तो माझाच आहे...मीच स्वीकारलं आहे त्याला...तुम्ही त्याला खूप त्रास दिला आहे....मी सोडणार नाही कुणाला"

अस बोलून तिने एकनजर प्रीतिकडे बघितलं....तिचे डोळे हिरवेगार झाले..प्रीती सुद्धा त्या हिरव्या डोळ्यात एकटक बघू लागली....प्रीती स्वतःला तिच्या डोळ्यात हरवून घेत होती.....तिचे हिरवेगार मायावी डोळे प्रीतीला संमोहित करत होते.....स्तब्ध झालेल्या प्रीतीला बघून ती म्हणाली

"दूर हो माझ्या राजेशच्या आयुष्यातून"

तशी प्रीती मागे वळून सरळ चालू लागली.....काही अंतर चालल्यावर खोल दरीत दिशेनाशी झाली......गर्द झाडीतून आणि खोल दरीतून प्रीतीची शेवटची किंचाळी बाहेर पडली आणि ती सुंदर स्त्री परत राजेशच्या खोलीकडे चालू लागली......राजेशने तिच्याकडे बघितलं ती सुंदर स्त्री आता आपल्या मूळ रुपात होती.....पांढरे केस....कुबड आलेली पाठ...एक सुळा दात बाहेर आलेला....तिच्या खोलीत येण्याने प्रचंड दुर्गंधी सुटली....ती राजेश जवळ येऊन बसली.....राजेशच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता

"म.....म......मोहिनी"

"ओहहह राजेश त्या लोकांनी काय हाल केलं तुझं मी नसताना.....पण घाबरू नको मी आलीय ना आता....तुला दिलेल्या वचनाप्रमाणे तुझ्या एका हाकेवर आली मी......कळली का माझी किंमत....चेटकीण आयुष्यात नको म्हणत होतास....पण बघ त्या तू जवळ केलेल्या माणसानीं काय हालत केलीय तुझी"

अस बोलून तिने आपला सुरकुत्या पडलेला हात राजेशच्या छातीवर ठेवला....आणि डोळे बंद करून काही पुटपटू लागली.....अचानक राजेश तडफडू लागला....त्याने आपलं डोकं धरलं....तो जोरात ओरडत होता ....त्याला अचानक जोराची उलटी झाली.....प्रीती देत असलेलं विष त्याच्या पोटातून आणि डोक्यातून बाहेर पडलं....सगळी फरशी त्या औषधाने काळी झाली होती......राजेशला अचानक फ्रेश वाटू लागलं....काही दिवस जड जड वाटणारे त्याचे डोके हलके वाटू लागले.....त्याने समोर बघितलं समोर प्रीती बसली होती

"ह्याच गोऱ्या पोरीसाठी मला तुझ्या आयुष्यातून वचन देऊन बाहेर काढलं होतंस ना....बघ आता"

मोहिनीने प्रीतीचे रूप धारण केले होते.....राजेश अंथरुणावरून उठून बसला.....प्रीतीचे शरीर धारण केलेल्या मोहिनीने त्याचा शर्ट काढला आणि घट्ट मिठी मारली......काहीसा विचार करून आपले लांब असलेले हात राजेशने मोहिनी भोवती गुंडाळले.....राजेशच्या अंगावर आणि पाठीवर सगळीकडे ओरबडल्याच्या खुना होत्या....त्या खडबडीत झालेल्या पाठीवर मोहिनी प्रेमाने हात फिरवू लागली.....तीचे ओठ राजेशच्या कानाजवळ आले आणि मादक आवाजात

"तुला त्रास द्यायचा माझा मुळीच हेतू नसतो रे....मी तुला 2 वर्षांपूर्वी जोडीदार म्हणून निवडले आहे....माझ्या आयुष्यातला तू 556 वा जोडीदार आहेस......तुझे वय झाले की परत मी जोडीदार बदलीन.....हे चालूच राहणार आहे....ठराविक पुरुषाच्या सहवासाने माझी ताकत वाढते आणि मी तरुण राहते....आणि ह्या काळातला तो ठराविक पुरुष तू आहेस....."

अस बोलून तिने आपली तीक्ष्ण नखे राजेशच्या पाठीत रुतवली.....त्या खडबडीत पाठीवरून परत त्याच्या पाठीवर ओरखडे बसू लागले त्यातून हलकं रक्त येऊ लागलं...राजेशला ह्या सगळ्याची सवय झाली होती..राजेशचे डोळे बंद झाले....काही वेळाने त्याने आपले डोळे उघडले आणि मोहीनीला घट्ट मिठी मारून तो तिच्यामध्ये हरवून गेला......खूप दिवसांनी त्यांचा प्रणय रंगात आला होता.....रात्र गेली.....सकाळी जेव्हा राजेशला जाग आली तेव्हा त्याने समोर बघितलं.....मोहिनी अजून तरुण आणि तेजस्वी दिसत होती....त्याच्या पाठीला वेदना होत होत्या.....मोहिनी त्याच्या जवळ आली आणि त्याच्या जखमेवर मलम लावू लागली......राजेशने तिचा हात हाती घेतला

तो तिच्याकडे प्रेमाने बघत होता...जेव्हा त्याने प्रीतिकडे पहिल्यांदा बघितले होते त्यापेक्षाही आताची प्रीती सुंदर दिसत होती

"खूप मोठी चूक झाली माझ्या हातून....तुला दूर करायला नको होतं मी....पण एक अनामिक भीती माझ्या मनात होती...मी साधा माणूस आणि तू चेटकीण....असो माझी चूक मला कळली आहे मोहिनी अशीच राहशील का माझी बायको म्हणून....?"

मोहिनी हसली....

"मला काही हकरत नाही....मी आता हे रूप स्वीकारले आहे....तू म्हणजे माझा जोडीदार म्हणजे तू जोपर्यंत माझ्या इच्छा पुरवेल तोपर्यंत मी म्हातारी होणार नाही....अशीच राहीन जशी आता दिसते....चालेल का तुला??"

राजेशने तिला जवळ ओढले आणि होकारार्थी मान डोलावली.....त्याच्या नजरेचा इशारा मोहीनी समजून चुकली होती

"ओहहह तर लेखक महाशयांना नरकातील गोष्ट ऐकायची आहे तर....."

राजेशने हलकीची मान हलवून होकार दिला....तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला

"इंग्लड मध्ये 1870 मध्ये फिलिप म्हणून एक लोहार होता....त्याला काळा जादू मध्ये खूपच इंटरेस्ट होता......आणि.................................."

त्या एकाच दिवशी राजेशने ती पूर्ण कथा ऐकून घेतली......प्रेमाने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले....आणि मोबाईल काढला आणि सरिता प्रकाशनाचे मालक राजीव ह्यांना कॉल केला

"मिस्टर राजीव.....मी आता बरा झालो आहे....आणि भयकथा लिहायच्या विचारात आहे....येस येस....आय एम फाईन...प्रीती सुद्धा आहे माझ्या बरोबर...तिनेच मला समजावलं आणि मी परत लिहण्याचा निर्णय घेतला..ह्यावेळी माझी पहिली कथा 1870 मध्ये इंग्लडमधील फिलिप नावाच्या लोहाराची असेल कस तो काळ्या जादूच्या आहारी जातो.....चेटकीनी बरोबर राहतो वैगेरे......हो हो लगेच लिहायला घेतो......माझ्या फॅन्सना कळवा.....मी परत भयकथा लिहत आहे ते ही अगदी कायमचं.......
(कथा समाप्त)

✍️लेखन -- शशांक सुर्वे