चित्राच्या जाण्याने एक फार मोठा बदल आमच्या आयुष्यात झाला होता. आईच्या तब्येती मध्ये घसरण होत होती . बाबा जरी वरून खंबीर वाटत असले तरी, आतून पूर्णत: तुटून गेले होते. का नाही तुटणार हो ???? स्वतःच्या हातांनी वाढविलेला तो पोटचा गोळा , या नियतीच्या चक्रात अडकून पडला आणि त्यांच्यापासून हिरावून घेतला गेला . त्यातच भर म्हणून बायकोही , त्या लेकीच्या दुःखात खंगत चालली होती . सोबत भरीला भर म्हणून पावसाची सारखी हजेरी. जिकडे - तिकडे हाहाकार... आता जगावं कसं या सर्व गोष्टींचा विचार घरातील कर्त्या पुरुषाला येतचं असतो. शेवटी तो बाप होता, बायकोचा नवरा होता, वंशाचा दिवा जरी मी सही सलामत असलो तरी वंशाची पणती ही कधीच विझून गेली होती.
आईची काळजी मी घेत होतो. चित्राच्या जाण्याच्या या मानसिक धक्क्यातून आईला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो . जे झालं ते झालं, निसर्गाच्या समोर आणि नियतीपुढे आपलं काही चालत नाही . आई मात्र फक्त तेवढ्यापुरतीच शांत बसायची आणि मग चित्रा डोळ्यासमोर आली की सारखं रडत बसायची. मलाही खूप रडावस वाटायचं , पण आईची तब्येत पुन्हा खराब होऊ नये म्हणून, मी माझे अश्रू आंतल्या आंत मध्ये तेवढ्यापुरते दाबून ठेवायचो आणि एकट्यात असल्यावर रडत बसायचो .
चित्रा जाऊन आज दोन महिने झाले होते. आईची तब्येत आता बऱ्यापैकी झाली होती. बाबा आपल्या नेहमीच्या कामावर जात असायचे .चित्रा जाण्याने यंदा घरच्या शेतीकडे लक्ष नसल्याने , तिच्यात टाकलेले बी या पावसाने वाया गेले होते त्यामुळे ती अशीच पडीक जमीन म्हणून राहिली . मी आपल्या आईच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचो आणि एकटाच राहत असायचो.
एक दिवस आई मला म्हणाली,
" अरे अमर , किती दिवस तू माझ्यासाठी इथेच थांबणार आहे ????"
" दोन महिने झाले , तुझं यंदाचा मेटरीक चं वर्ष असून, तू इथे थांबू नये, तुला आता निघायला हवं !!!""
अगं आई, " काही होणार नाही!!! पण तू तुझी काळजी घेणार नाही, मला माहिती आहे !!! त्यामुळे तू जोपर्यंत चांगली होत नाही, तोपर्यंत मी तुला सोडून कुठेही जाणार नाही " ,
लागलीच मी बोलून गेलो .
अरे बाळा , " तू माझी बाबांची काळजी नको करू!!!!!
" आम्ही आहोत चांगले. यांमधून बाहेर पडणारचं आहे. "
पण तुझा एकदाचा अभ्यास गेला, तर तो भरून काढता येणार नाही , आणि आता आमची स्वप्न पुर्ण करणारा तूच राहिला आमच्या सोबतीला!!! "
असं म्हणतात आईच्या डोळ्यात अश्रू तरळले.
तशी माझी मुळांत आई बाबां ला सोडून जायची इच्छा तर नव्हती, पण बाबांनी समजावून सांगितल्या मुळे नाईलाजाने मला वसतिगृहासाठी निघावे लागले.
त्या अगोदर मला जाण्यासाठी पैसे हवे होते ते बाबांनी पाटलांकडून मागून घेतले होते. शेवटी आई बाबांच्या पाया पडून मी वसतिगृहात जाण्यासाठी निघालो. गावातील माझे मित्र कैलास, बबन , रमेश यांना सांगितले की , आई बाबांकडे लक्ष द्या . काही अडचण असली की ,.काही निरोप असला की मला कळवायला या . शेवटी मी भरल्या डोळ्यांनी सगळ्यांचा निरोप घेऊन तालुक्याच्या ठिकाणी वसतीगृहात पोहोचलो .
वसतिगृहात जाताच सर्व मित्रांनी एवढे दिवस न येण्याचे कारण विचारले. शाळेत रोज हजर असणारा अमर शाळेतून तब्बल दोन महिने गैरहजर होता याचं सर्वांना आश्चर्य वाटत होत. शाळेतील सर्व शिक्षक न येण्याचे कारण विचारत होते??? जाधव सर आवडीचे आणि मायेचे शिक्षक असल्याने झालेली घटना मी त्यांना सांगितली.त्यावर जाधव सर धीराचे शब्द देत म्हणतात,
" बघ अमर आपण काळाच्या समोर आणि निसर्गावर , त्यातून येणाऱ्या विपदावर मात करू शकत नाही. जे व्हायचं ते होतचं असते .
" तू शाळेत यायचा नाही म्हणून आम्हांला काळजी वाटू लागली . तू राहतो त्या वसतिगृहात तुझी चौकशी केली,
तेंव्हा फक्त तू गावाला गेलांय एवढचं माहिती पडलं!!!"
" येईल चार-पाच दिवसांत म्हणून आम्ही जास्त चौकशी केली नाही. पंधरा दिवस झाले तरी तू आला नाही,म्हणून शाळेतून तुला पत्रही पाठविण्यात आले. कदाचित तुला ते पत्र मिळालं नसेल," असे जाधव सर सांगत होते ."
मी आता फक्त शरीराने जरी तिथे होतो पण मन मात्र घराकडेचं राहिलं होतं.
" बघ अमर, यंदाचे तुझें मॅट्रिक चं वर्ष आहे आणि आता तुला इथून अभ्यासात मागे पडता येणार नाही. झालं ते सर्व धक्कादायक होतं , पण तुझ्या आई-बाबांसाठी तुला अभ्यासात लक्ष घालावे लागेल. मग दहावी पास झाल्यावर कोणतीही कारकुनाची किंव्हा इतर नोकरी करू शकतो . पण ते तुझं ध्येय नसायला हवं असं मी समजतो !!!"
जाधव सर नम्रपणे मला समजावून सांगत होते .
मी फक्त ऐकत होतो .
" शेवटी आता अभ्यासाकडे लक्ष घाल आणि जे झालं ते विसरून जा. "
एवढेच म्हणत सर निघून गेले.
वसतिगृहात माझा जवळचा मित्र आनंद त्याला या प्रकाराविषयी माहिती नव्हतं ,पण वसतिगृहातील मित्रांकडून त्याला ती माहिती झाली. त्यानेही सांत्वन केले. आनंदने मला या धक्क्यातून बाहेर काढण्यास बरीच मदत केली. शेवटी मी आणि तो नियमित शाळेत जाऊ लागलो. नियमित अभ्यास करू लागलो. परीक्षेची तारीख जवळ जवळ येतात पटापट उजळणी करत होतो . काही अभ्यासात अडचणी आल्या तर सर्व शिक्षक मदत करत होते. मध्येच घरची आठवण यायची . " आई कशी असणार ????बाबा कसे असणार???? शेती पडीक जमीन असल्यामुळे घर खर्च कसा चालत असणार ????" मला दोन वेळचं पोटभर जेवण मिळते, त्यांना ते मिळत असेल की नाही ????? या विचाराने मन सुन्न होऊन जात असे.
कधी कधी चित्राच्या आठवणीने डोळ्यांत अश्रू धारा लागत असे. मग तो पूर्ण दिवस अभ्यासात लक्ष लागत नसे. आनंदला मात्र ही गोष्ट लगेच समजून जायची. कारण हा अमर फक्त आनंदच कळला होता. मैत्री काय असते ती शिकलो त्या आनंद कडूनच...
एकदाची परीक्षेची तारीख जवळ येऊन ठेपली. पहिला पेपर मराठीचा होता . आतापर्यंत शाळेतील परीक्षा या शाळेत होत असायच्या. आता मात्र सोडवलेला पेपर दुसरा कुणीतरी , दुसऱ्या शाळेचे शिक्षक तपासणार होते. त्यांना दिलेले उत्तर आवडले तर गुण मिळतील अन्यथा त्यात कमी गुण मिळणार. याची धास्ती मनात थोडीफार भरली होती . असे करता करता एक - एक पेपर करत एकदाची सर्व परीक्षा संपली.
वसतिगृह आता सोडावे लागणार म्हणून ,सर्व मुलं आपल्या सामानाची आवराआवर करीत होते . मी सुद्धा आता गावी आई-बाबा कडे जाणार होतो . आनंदही त्याच्या घरी जाणार . पुन्हा दोघांची भेट होईल की नाही ही एक मनात धास्ती होती. कारण यापुढे सर्वांच्या आयुष्यात त्या वाटा बदलणार होत्या . कुणी आर्ट, कुणी कॉमर्स,कुणी विज्ञान शाखा घेऊन पुढील शिक्षण घेणार होते. पण आनंद आणि मी पूर्वी ठरवलं की आपण समोरचं शिक्षण एकत्र घ्यायचं आणि कला शाखेत प्रवेश घ्यायचा . माझे आई-बाबा तर या विषयावर काही म्हणणार नाही . एवढेच म्हणतील की लागत असेल तर, घरची परिस्थिती पाहून कोणती तरी नोकरी कर. पण ते सहजासहजी म्हणणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती . शेवटी गळाभेट करत , भरल्या डोळ्याने आनंद चा निरोप घेतला. काही थोडे वसतिगृहाकडून भत्ता मिळत असायचा, तो काही खर्च होत नसे,ते पैसे घेतले आणि बाबांसाठी रबरी चपला आणि आई साठी एक साडी घेतली . ती पसंत येईल की नाही ????? हा धाक होता . पण मुलांनी आणलेली वस्तू आपल्या आईला आवडणार नाही असं क्वचितच घडत असेल शेवटी मी आपल्या गावी पोहोचलो.
घरी पोहोचताचं आईने जवळ घेत, गालाला हात लावून एक कपाळाची पप्पी घेतली. बाबा कामावरून यायचे होते. आईने गरमागरम भाकरी थापल्या आणि घरी वांग्याचा खुला ( वांगे वाळवून केलेल्या फोडी ) होत्या , त्याची भाजी केली. जेवण करत असताना बाबांनी परीक्षेची सर्व विचारपूस केली. जरी त्यांना शिक्षणातीळ एवढं कळत नसलं तरी आपल्या समाजात देव मानून म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणामुळेच मोठे झाले. पूर्ण विश्वास त्याची किर्ती आहे . त्यामुळे आपल्या एकुलत्या एका मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे हीच त्यांची अपेक्षा होती .
मी सर्व पेपर व्यवस्थित गेले, म्हणून सांगितलं आणि तालुक्यावरून आणलेली ती साडी आणि बाबांसाठी आणलेली रबरी चप्पल दिली . तेंव्हा आईला दिलेली साडी आणि तिच्या चेहऱ्यावर चित्रा गेल्यानंतर चा आनंद , तिचा तो आनंदाने प्रफुल्लित झालेला चेहरा , आजही डोळ्यासमोरून आठवला की गालावर स्मित हास्य निर्माण करून जातो . आईने ती साडी मग बरीच वर्षे टिकवून ठेवली. ती मी आणलेल्या साडीला कमी नेसायची. मग मी म्हणायचो आई , " तुला माझी आणलेली साडी बहुतेक आवडली नसणार ???? म्हणून तू घालतांना कधी दिसत नाही ????
" ते तुला नाही कळायचं !!!!! मी का घालत नाही तर!!! याचा अर्थ असा आहे की, ती साडी मला खूप जास्त आवडली . विशेष म्हणजे तुझ्या होस्टेल च्या भेटलेल्या पैशांमधून ती आणलेली आहे. ती अजून जास्त काळ टिकावी म्हणून मी अंगावर जास्त घालत नाही. "
असं गणित आहे त्या मागचं म्हणायचं.
" घालेल न बरेच दिवस तिला. बाबांनी घेऊन दिलेल्या साड्या जुन्या झाल्या की , मग घालत जाईल!!!!!
तेव्हा कुठे मला आईचं प्रेम कसं असतं म्हणून कळलं...
" आई तुझ्या प्रेमाला
माझा लाख- लाख प्रणाम
तूच जन्मोजन्मी आई मिळो,
हीच हवी मला देवाकडून जुबान...."
क्रमशः ........