Swash Aseparyat - 6 in Marathi Fiction Stories by Suraj Kamble books and stories PDF | श्वास असेपर्यंत - भाग ६

Featured Books
Categories
Share

श्वास असेपर्यंत - भाग ६






चित्राच्या बिमारीची बातमी ऐकून मी रडायला लागलो. तेव्हा बबन म्हणाला,

" अमर ,ही रडण्याची वेळ नाही. चित्रा तुझी आठवण काढत असल्याने तू लगेच माझ्यासोबत चल, असा तुझ्या आईने मला निरोप घेऊन पाठवला आहे."

" सोबतच गावात साथीच्या रोगाची लागण झाल्याने ,गावांत प्रत्येकाच्या घरची परिस्थिती जवळपास सारखीच आहे !!!"

आपल्या गावचा नामदेव त्याचा म्हातारा बाप हगवण लागल्याने पार कसातरी झाला होता, आणि मग काही दिवसांनी मरण पावला, बऱ्याच लोकांची प्रकृती जागेवर आली नाही.सरकारी डॉक्टर येऊन तपासणी करतात , काही गोळ्या ,इंजेक्शन देतात आणि चालली जातात.

बबन च्या या वाक्याने मनात अजून धास्ती भरली होती. शेवटी मी सरांना हकीकत सांगितल्यावर मी सुट्टीचा अर्ज टाकून बबन सोबत गावी येण्यासाठी निघालो..

गावाला जातांना तालुक्याच्या ठिकाणाहून खाजगी सेवा उपलब्ध होती. पण गावाच्या काही अंतरापर्यंत च ती सेवा होती. त्यानंतर पाच ते सहा किलोमीटर वर पायदळ गावी जावं लागतं असे. त्यामुळे सकाळी निघालेला व्यक्ती दिवस मावळेपर्यन्त घरी पोहोचत असायचा. घरी जाताना संध्याकाळ होणार हे नक्की झालं होतं. तसच गाडीत बसलो आणि चित्राच्या आठवणी रंगवत गावी येण्यास निघालो. बबन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे पण त्याच्या बोलण्याकडे माझं काही लक्ष लागत नव्हतं. मी आपला बाहेरील जग पाहत चित्राच्या आठवणीत खिन्न बसून होतो. .

छातीत सारखी धडधड व्हायला लागली होती. छातीचे ठोके एवढे जोराने वाढलेले होते की त्याचा वेग ही भिन्नच होता. त्याला कारण ही तसेच होते. गावातील आपबीती सांगितल्यावर चित्रासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा इतिहास - भूगोल आठवू लागला. ज्याप्रमाणे एखादा दिग्दर्शक आपला चित्रपट तयार करून थिएटर मध्ये लावत असतो व श्रोते तो चित्रपट पाहिल्यानंतर असेल तसा चित्रपटाला प्रतिसाद देतात कुठे इमोशनल होतात तर कुठे आनंदीत होऊन टाळ्या वाजवतात.. तशीच परिस्थिती सध्या माझ्यावर होती. चित्रासोबत घालवलेले सर्व क्षण तर कधी तिचा चेहरा सर्व आठवत होते. मी सारखे हात जोडत होतो, की चित्राला काही एक होऊ देऊ नको, त्या जवळच्या तुकड्याला काही झालं तर माझ्या आयुष्यात रंग उडणार नाही. शेवटी आमची गाडी थांबली.

गाडीमधून उतरलो तेव्हा जवळपास सायंकाळचे सहा वाजले होते. अजून गावी जाण्यासाठी चार ते पाच किमी पायदळ जावं लागणार होतं. सूर्य मावळतीला आला होता. त्याने आपली लालसर रंगाची वस्त्रे, किरणे सैल सोडली होती. पाखरांचा थवा आपल्या घरट्याकडे जातांना दिसत होता, काही दुकानदार आपल्या दुकानाची दिवाबत्ती करत होते तर काही बायका कामावरून येत होत्या तर काहींची या पावसाने वाताहत होऊन संसार उघड्यावर आले होते. जिकडे तिकडे चिखल झालेला होता. पक्की सडक नसल्याने चिखलातून पायी जावं लागेल . तशी पायात काही चप्पल नव्हतीच त्यामुळे पायी चालण्याच तेवढं काही वाटत नव्हतं. मी आणि बबन पायी चालायला लागलो.

अंधार पडल्यामुळे रस्त्यात असणारी कुत्री अंगावर येऊन भुंकत होती. रातकिडे चर्रर्रर ~~~चर्रर्रर आवाज करत होती. पावसाचे दिवस असल्याने काजवे त्या अंधाऱ्या रात्री चमकत होती, इकडून तिकडे फिरत होती. त्या सुनसान रस्त्यातून आम्ही दोघेही झपाझप चालत होतो. तसा अंधारापासून मी भीत असे पण आज चित्राच्या आठवणीने झपाट्याने पावले चालत होती. एकमेकांसोबत बोलणं तर कधींचंच बंद झालं होतं. बबन सुद्धा मुकाट्याने चालत होता. शेवटी गावाला जाणाऱ्या रस्त्यावर आलो. तशी अजून मनात भीती भरली. सगळीकडे पावसाने रिपरिप , चिखल,करून ठेवला होता, गाव जवळ येताच नाकाला वास येऊ लागला. प्रत्येकच गावाच्या शेवटी हागायला जाणारी गोदरी असल्याने इथे वास, आणि त्यावर जगणारी डुकरे इकडून तिकडे पळत होती ,काही व्यक्ती गोळक्याने पाऊस कधी जाईल, रोगराई कधी जाईल म्हणून चर्चा करत होती.

एवढ्या आयुष्यात गावची ती परिस्थिती मी पाहत होतो. कुणी म्हातारे बिमारीने खोंकत होते, व रस्त्यावरचं थुंकत होते, ते पाहून मनाला किळसवाणे वाटत होते, कुणी आपल्या पोरांना अंधार असल्यामुळे रस्त्यावर हागायला बसवत होती. शेवटी जड पावलांनी चालत घराच्या जवळ आलो आणि त्या वेळचा नजारा बघून मी पूर्ण घाबरून गेलो. छातीत अजून धडधड व्हायला लागली, घरांत काय चाललं याची काही कल्पना नव्हती, घरासमोर बाया माणसे जमली होती त्यामुळे घरात जाण्याचं माझं धाडस काही होत नव्हतं. जमा झालेली माणसे म्हातारे माणसे माझ्याकडे एकटक पाहू लागले आणि एकमेकांसोबत गोष्टी करू लागले, त्यामूळे मला काही याचा अंदाज येत नव्हता. मला वाटायचं मी काय यांच्यासाठी नवीन आहे काय??? जे आज मला अश्या वेगळ्या नजरेनी बघत आहेत????

इतक्यांत कुणीतरी एकाने" अमर " आला म्हणून आई - बाबाना जाऊन सांगितलं. तशी आई घरातून धावत बाहेर आली आणि येताच जोरजोरात रडायला लागली.

" अमर, आपली चित्रा आपल्याला सोडून गेली रे !!!"""

अन् परत रडायला लागली. बस्स !!!!! मी हे सर्व पाहून एकदम सुन्न झालो, आई काय बोलत आहे, काहीच समजत नव्हतं . एका जागेवर फक्त उभा होतो. आई तर सारखी रडत होती. बाबा बाहेर येऊन आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागले. पण ती तिचं रडणं काही थांबवणार नव्हतीचं. कारण तिने आपल्या पोटचा गोळा गमावला होता , तिच्या ममतेच्या झऱ्यावर काही वेगळी शक्ती येऊन तो झरा पराभूत करण्याचा प्रयत्न केला तो यश्वस्वी सुद्धा झालेला होता. तेवढ्यात मी भानावर आलो.ताडकन उठून घरात शिरलो, तर माझी बहिण चित्रा एका खाटेवर निपचित पडली होती. तिला देवांन माझ्यापासून कायमचं दूर केलं होतं.

मी आपला चित्राच्या पार्थिव शरीराजवळ बसून होतो. का ??? कुणास ठावूक !!!,पण माझ्या डोळ्यांतून अश्रू येत नव्हते. जीवनाचा एक अविभाज्य घटक मी कायमचा या महामारी मुळे गमावला होता. मी रडत नाही याचं सर्वांना आश्चर्य वाटत होतं पण मला काय झालं ते समजेना???? चित्रा नुसतीच झोपून आहे असं वाटतं होतं पण वास्तविकता अशी होती की, नियतीने माझ्या चित्राला कायमचं दूर केलं होतं ,या तिच्या भावाला मरताना एकदा सुद्धा पाहू शकली नाही.

" देव एवढा निर्दयी कसा असू शकतो ???? "
चित्राला तिच्या भावाला शेवटचं सुद्धा पाहता आलं नाही!!!! माझ्या मनात विचारांच वादळ निर्माण झालं होतं. मीच स्वतःला दोषी ठरवू लागलो. लवकर जर आलो असतो तर कदाचित चित्राला मी येण्याने बरं वाटलं असतं !!! पण आता सर्व व्यर्थ आहे. मरतांना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर दुःखी भाव नसून हास्यचं उमटून दिसत होते. कदाचित तिने मृत्यूला सहज स्वीकारले होते किंव्हा तिने जातांना देवाकडे मागणे केले असेल की, माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून माझा भाऊ अमर, आई - बाबा नेहमी आनंदित असू देत.

बाबा एका बाजूला गंभीर व दुःखी होऊन बसले होते. आई सारखी रडत होती. तिच्या शेजारीन बाया तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मी सुद्धा तिला शांत राहण्यासाठी विनवणी करत होतो. पण आईच्या दुःखाला आता काही सीमा उरली नव्हती. तिचं दुःख खूप मोठं होतं. आईने स्वतःच्या पोटी जन्माला घातलेले मुलं गमावून बसलं होतं. तिच्या रडण्यावर काही उपाय नव्हता. फक्त आपल्या मनातील दुःख ती सारखी रडून मोकळी करत होती. लगेच माझ्या मनात आता भीतीने घर करून टाकले. या जिवाला अग्नी देण्यात येईल , तिला सरणावर ठेवून तिच्या शरीराला नष्ट करण्यात येईल . जिने कधी गावाबाहेरची वेस ओलांडली नाही , कधी या जगाचा सामना केला नाही , जिच्या शरीराची अजून वाढ झाली नाही ,जिने वेदना , दुःख काय असतं ??? याची जाणीव पण झाली नाही तिला आता सरणावर ठेवून जाळणार !!!!!

जिने आपल्या भावाच्या हातावर रेशीम धागा बांधून भावाकडून संरक्षणाचे नुसते वचन घेतले होते किंवा जिने आपल्या आयुष्यात सतत आनंदचं आनंद पाहिला होता, आपली शाळा , आपल्या मैत्रिणी तिचे खेळ , आपले आई-वडील , आपले गाव , या पलीकडचा विचारसुद्धा कधी मनात आला नसेल अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांना अर्धवट ठेवून सगळ्यांपासून चित्रा कायमची दूर गेली होती . तिला या धगधगत्या आगीत टाकावे हे काही माझ्या मनाला पटत नव्हते. पण हा समाज मी विरोध केल्यानंतर माझ्या म्हणण्याला मान्य होईल का ????? असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते. कारण समाज म्हटलं की, मानव येणार आणि समाजात राहायचं असेल तर त्याच्या चालीरीती, प्रथा ,परंपरा ,आचार-विचार, संस्कृती सर्वांचाच विचार करणे गरजेचे आहे. मानवाचं जेंव्हा काही अस्तित्व उरत नसते ,तेंव्हा त्याला समाज आठवतो आणि समाजाला न जुमानता सर्व प्रथा, परंपरा यांना मोडून समोर जातो तेंव्हा त्याला समाजात " व्हीलन " ठरविल्या जाते किंवा " उग्रवादी " म्हणून म्हटले जाते. पण असो .......

आई आपली भान हरपून टेकून बसली होती. बाबा सर्व आवरा-आवर म्हणजे मुलीच्या शरीराला जास्त ठेवू नये, विलक्षण वाटतं म्हणून गावातील वडीलधाऱ्या व्यक्तींना, मित्रांना सर्व सांगत होते . वडिलांना दुःख तर झालं होतं !!!!पण , त्यांना सांगता येत नव्हतं आणि रडता पण येत नव्हतं . आज मात्र वडिलांनी आपली एकुलती एक मुलगी गमावली होती . बापाची काय भूमिका असते ते आज पार पाडत होते. त्यांच्या मनातील दुःखाचा सागर अजून किती खोल आहे ते समजणे माझ्यासारख्याला कठीण होते.

आज बाबांना आपण कुणी पप्पा, तर कुणी वडील ,तर कुणी अण्णाजी, तर कुणी माझे बाबा अशा विविध शब्दांनी बोलत असलो तरी आपल्या मुलांना बाप काय असतो अजूनही समजलेला नाही, किंव्हा कधी समजणार पण नाही. मी सुद्धा बाबांच्या या क्षमतेला नुसता पाहत होतो. तेव्हा मी सुद्धा काही केले पाहिजे या भावनेने जागे होऊन मी बाबा कडे आपला विचार बोलून दाखवला की ,

" चित्राला, चित्राच्या कोमल शरीराला अग्नी द्यायचा नाही तर तिच्या या शरीराला माती द्यायची !!!"

बाबा या शब्दांवर काहीच बोलले नाही . ते गप्प राहिले तेंव्हा बाबांचे मित्र ज्यांना मी काका म्हणायचो , वैचारिक वृत्तीचे होते व त्यांना या प्रथा-परंपरा आवडत नसे. त्यांचे नाव रामदास काका असे मी म्हणत असे. त्यांना माझे हे शब्द कदाचित त्यांच्या कानावर पडले होते, तेव्हा काकांनी सरळ बाबांना प्रश्न केला ,
" काय विचार आहे तुमचा अंबादासराव???"

इतक्यात बाबांना अचानक धक्का बसला की, हा कसला रामदास विचारत आहे ????? यावर बाबांनी नकारार्थी मान हलवली व आपल्याला काहीच माहिती नाही अशा विचाराने,
" तुम्ही कशाबद्दल बोलत आहात मी काही समजलो नाही!!!!"

तेवढ्यात रामदास काकांनी म्हटले,
" अमर जे बोलला त्याबद्दल मी बोलत आहे "

" अहो त्याचं सोडा तो लहान आहे. त्याला या सामाजिक प्रश्नांचा , प्रथा परंपरा याची कुठेच जाणीव आहे तर तो काही बोलणार "
बाबांनी आपले म्हणणे दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला...

रामदास काका शांत होऊन बोलतात, अंबादासराव,
" अमर ने सुद्धा आपली लाडकी बहीण चित्रा गमावली आहे!!!"

" तुम्ही सुद्धा आपल्या पोटंचा गोळा कायमचा गमावला आहे "" तुम्ही असे कसे काय
म्हणू शकता ????

अमर ची बहीण त्याला सोडून गेली. त्याने तिला सांभाळण्यात कितीतरी वर्ष घालविले . जिल्हा कधी आपल्यापासून दूर होऊ दिले नाही . आज तीच बहिण चित्रा एवढ्या दूर निघून गेली . तिला शोधूनही सापडणे किंवा मिळणे कठीण आहे. त्याची हीच इच्छा आहे की,

" नाजूक फूल केव्हाचं देव घेऊन गेला आहे त्याला आता तरी चुरगाळून नका !!!!,
म्हणजेच तिच्या पार्थिव शरीराला अग्नी देण्यापेक्षा , त्या जीवाला माती द्या!!!
म्हणजे जळताना ज्या तिच्या नाजूक शरीराला वेदना होतील ,त्या पाहवल्या जाणार नाही याचं उद्देशाने अमर मातीचं द्या म्हणतो आहे!!!"

काकांच्या या शब्दांवर बाबांच्या डोळ्यांत अश्रू आले व काही न बोलताच सगळ्यांनी माझा निर्णय किंवा मत मान्य केले आणि तयारीला लागले. शेवटी सर्व विधी आटोपल्यानंतर चित्राच्या शरीराला जमिनीत पुरण्यात आले.

राहुल। , ( कहानी ऐकणारा )
" या हाताने तिला मी जमिनीत पुरले रे!!!!!!!!!"
मी तिला वाचवू शकलो नाही . मला नेमकं त्याचं दिवशी काय झालं होतं की माहिती नाही, पण मी चित्रा गेली त्या दिवशी डोळ्यांतून एकदा ही अश्रू गाळला नाही.. नाही तर माझ्यासारखा हळव्या मनाचा, कोमल हृदय असणारा मी , त्याच दिवशी कसा दगडासारखा दगड झालो होतो , पण मी उभ्या आयुष्यात फक्त चित्राच्या आठवणीतच राहत आलो आणि नेहमी तिच्यासाठीचं अश्रू गाळत आलो. माझ्या आयुष्यात चित्रासारखं कुणी भेटलं नाही...आई बाबा सोडले तर कधी कुणी माझ्यावर जीव लावला नाही. मी चित्राचा चेहरा क्षणभरही विसरलेलो नाही. वाईट एवढेच वाटते की माझ्यासारख्याला, मला देवाने अजून जिवंत का ठेवले आहे . चित्राच्या वाट्याची दुःख देवाने मला दिली असती . तिला मिळालेल्या मृत्यूशय्येवर मला विराजमान होता आलं असतं तर बर झालं असतं. पण नियतीसमोर कुणाचाचं टिकाव लागतं नसतो, जन्माला येणारा प्रत्येक जीव
शेवटी मातीतचं मिळतो....


एकदाचा तो भयावह दिवस संपला. रात्र झाली आणि सर्व झोपी गेले . आम्हां तिघांनाही क्षणभर ही झोप आली नाही. शेवटी विचारात सकाळ झाली. ती गेली तेव्हा असं वाटत होतं की वेळ पुर्णतः थांबला आहे. गतीला कुणीतरी विरोध करतो आहे त्यामुळे वेळेचे काटे एकाच जाग्यावर थांबून आहे असं वाटत होतं. भयावह दिवस म्हणण्यापेक्षा दुःखद दिवस होता माझ्यासाठी आणि माझ्या आईबाबांसाठी . जिने आपल्या प्रेमाने पूर्ण वाढ केली आणि अर्धवट सोडून गेली त्या माझ्या आईची माया काय म्हणत असणार ?????
बाबांनी तिला शिकून मोठं करावं, तिचं लग्न चांगल्या मुलांशी लावून तिचा संसार सुखाने चालावा अशी मनोमन इच्छा बाळगली असणार!!! त्यांना काय वाटत असणार. मी ज्यांने आयुष्यात कधीही असा विचार विचार केला नाही तो एकाएकी असा दिवस यावा, एवढा भयावह दिवस यावा त्या पेक्षा दुसरं दुर्दैव काय असेल !!!!

कारण चित्रा म्हणजे आमच्या घरातील एक नाजूक फूल होतं. जितकं प्रेम द्या , तितकचं ते प्रफुल्लित होतं . पण चित्राच्या मार्गात असणाऱ्या काट्यांना ती लढाई देण्यास समर्थ ठरली नाही म्हणून ती आपल्याला सोडून गेली. घराला घरपण म्हणून वाटणारी शोभा कायमची सोडून गेली.

नियतीने डाव साधला ,
एका नाजूक फुलांचा जीव घेतला ,
घेऊन गेली माया मायची ,
चुरडून गेली स्वप्न बाबांची ,
कितीतरी निष्ठूर असते ही नियती,
एका भावाची बहीण घेऊन गेली ,
शोभा घराची घेऊन गेली .....

असे एक - एक दिवस मोठ्या कठीण परिस्थितीतून जात होते. आई तर पूर्णतः खचून गेली होती. सारखी रडत राहायची. जेवण पण करत नसायची. कुणाशी बोलत पण नव्हती .
म्हणायची , " मला एकट राहू द्या "
बाबा तिला सारखे समजावत असायचे, पण आई ऐकायला तयारचं नव्हती .मी सारखे तिच्या जवळच असायचो. तिला जेवण घ्यायचो, पण ती आपल्याचं विश्वात जगत होती. तिने आपल्या पोटचा गोळा गमावला होता. आईची परिस्थिती बघून मनात विचार यायचे की, आता आपण आई सोबतच राहायचं. तिला एकट ठेवायचं नाही .

इथून जमलं तर अभ्यास करायचा आणि यंदाचं मॅट्रिक्स पास व्हायचं.
नंतर जमलं तर शिकायचं नाही तर शिक्षण सोडून आई-बाबांसोबत राहायचं. पण मनात लगेच दुसरे विचार यायचे की , आपल्याला शिकून मोठं व्हायचं . आई-वडिलांना जो आत्ता त्रास सहन होत आहे, त्यांना पुढीलआयुष्यात सुखाने तो घास खाऊ द्यावे पण आईच्या परिस्थिती पुढे या दुय्यम बाबी होत्या. म्हणून आई सोबतचं राहायचा विचार केला...

क्रमशः.....