पुढे चालू...
-----------------------------------------------------------------------
"लंचसाठी बाहेर जाऊया? की काही ऑर्डर करु?"
"मी लंचसाठी नसेन कदाचीत. ईन्स्टिट्युटला थोड काम आहे, वेळ आहेच तर तिथे जाऊन येईन म्हणते."
"ओके... थॅक्स. तू हे सगळ घेऊन इथे आली त्यासाठी, आय मीन बाबांच्या भेट वस्तू आणि ते पेपर्स वगैरे..."
"त्यांनी तसं बजावलच होत मला, स्वतः घेऊन जा म्हणून. तेव्हा मी म्हणाले होते, कुरिअर करते. बापरे! केवढे रागवले होते ते माझ्यावर. म्हणाले होते, 'अगं एवढ्या महत्वाच्या जपून ठेवलेल्या वस्तु आणि ते पेपर्स कुरिअर मध्ये गहाळ झाले तर? परत आणून देणार आहेस का! तू स्वतः जा आणि दे त्याला.' खर सांगायच तर, गारवानला माझ देखिल महत्वाच काम आहेच. दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. नाहीतर मी एवढ्या लांब येण कठीण, आणि बाबांची तेवढीच शेवटची इच्छा अपूर्ण रहायला नको."
बाबा हे म्हणायचे... असे रागवायचे... त्यांना हे आवडायच आणि हे नाही... वगैरे-वगैरे कितीतरी गोष्टी. तो प्रसंग अगदी समोर घडत असावा अश्या हावभावात मीरा बाबांच्या आठवणी सांगत होती.
"बाकी तिथे काय चालू आहे? सदाकाका वगैरे कोणी येतात का? " विषयांतर म्हणून राघवने सहजच प्रश्न केला.
"कोणीही येत नाही...कोणी जात नाही. एवढं मोठं घर सांभाळायला कोणीतरी पाहिजे ना, म्हणून भागिताईंना कामाला ठेवून घेतलू, आणि मी आहेच... दोघी असतो. बाबा होते तेव्हा त्यांच्या एकट्याच्याच आवाजाने घर नुसतं गजबजलेल असायच, आणि आता फक्त भयान शांतता... "
बोलता बोलता ती अचानक स्तब्ध झाली.
“मी निघते, ते सेशन चालू व्हायच्या आत पोहोचल पाहीजे, नाहीतर लेट होईल, एवढ्या लांबून येऊनही काही फायदा होणार नाही. आणि महत्वाच म्हणजे ते प्रॉपर्टी पेपर्स वगैरे वाचून घ्या. जमेल तसं सह्या सुद्ध्या करुन ठेवा. लवकरच परत जायला निघेन म्हणते, तेव्हा गडबड व्हायला नको ना म्हणून.” उसण हसू चेहर्यावर आणून ती तयारीला सुद्ध्या लागली होती. इकडे राघव परत विचारात पडला.
'ही लवकरच परत जाणार तर. थांबवलं तर थांबेल का? तिच्याशी खूप काही बोलायच आहे. सगळ्यात आधी सॉरी म्हणायच आहे. मी जे वागलो...ते चुकीचच होत, एक्सेप्ट कराव लागेल. सार सार काही एक्सेप्ट कराव लागेल. जमल तर तिला मुक्त कराव लागेल, किंवा तिच्या माझ्या नात्याला एक नवीन वळण द्यावं लागेल अर्थातच तिच्या इच्छेनुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. या सगळ्यामुळे तिच्या आयुष्याची झालेली फरपट आता पुरे.' काहीतरी मनाशी पक्क करुन तो ऊठला.
"मीरा मी ड्रॉप करतो तुला. रेडी झाली की सांग."
"थँक्स, पण मी एकटी जाऊ शकते." म्हणत मीराने पर्स आणि मोबाईल उचलला, पाहते तर समोर राघव. हातात गाडीची चावी घेऊन उभा... आता नाही किवा हो म्हणण्याचा प्रश्न उरला नाही. त्यामुळे काहीही न बोलता ती ही त्याच्या बरोबर निघाली.
*****
हातातल्या घड्याळाकडे पाहत पाहत राघवने तिसऱ्यांदा फोन डाईल केला होता.
"मीरा इट्स ११:३०... स्टील आय एम वेटिंग. यु आर लेट. "
"ते मला अजून लेट होईल बहुतेक. इकडे खुप पाऊस आहे. तुम्ही डिनर करून घ्या मी इथून काहीतरी खाऊन येते."
"मी येतो तिथे, तुला पीक करायला? मग बाहेर जेवून घेऊयात. लोकेशन पाठव. "
"नाही...नको... मी इथेच समोर आहे… येते मी. येते." पुसटसे कसेबसे दोन शब्द मीराच्या तोंडून बाहेर पडले.
"मीरा बाहेर पाऊस आहे. निघालोच मी, लोकेशन पाठव." म्हणत राघवने फोन ठेवला आणि तो तडक निघाला. मीराचा फोनवरचा आवाज अगदी हळवा आणि कापरा आला होता. त्या वरुन त्याने ओळखले होते की, काहीतरी प्रॉब्लेम आहे.
आता त्याला लोकेशनची वाट पाहण्याची सुद्ध्या उसंत नव्हती. पाच-एक मिनिटे गाडी चालवली नसेल एवढ्यात करकचून लावलेल्या ब्रेकने गाडी जागच्या जागी उभी केली होती. हेड लाईट आणि कर्कश हॉर्नच्या आवाजाने गाडीसमोरच उभी असलेली मीराही कावरीबावरी झाली. तिच्यापेक्षा जास्त शॉकमध्ये असलेला राघव गाडीमधून विजेच्या वेगाने तिच्या दिशेने पळत सुटला.
"मीरा वॉट हॅपन्ड?"
तिचा तो व्हाईट ड्रेस पार भिजून गेला होता. हातातली एवढीशी पर्स सुद्धा तिचाने व्यवस्थित सांभाळता येईना. नीटसं उभही राहण्याची ताकद नव्हती. राघवला काहीही समजेनास झालं. दोन मिनिट तर तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतच राहिला. तिची नजर मात्र तिच... तिच्यासारखीच आरपार भिजलेली आणि अगदी खाली झुकलेली.
"काय झाल मीरा? " एव्हाना राघवच लक्ष तिच्या पायाकडे गेल होत आणि तुटलेल्या चप्पलचा बंद बर्याच गोष्टी सांगून गेला. तश्याच अवस्थेच बराच वेळ चालत राहील्याने बोटाला इजा होऊन त्यातून थोड रक्त ही येत होतं.
"मी सेशन संपल्यावर निघाले तेव्हा अचानक पावसाला सुरुवात झाली. जवळपास टॅक्सी वगैरे काही सुद्धा न्हवते. त्यामध्येच माझी सॅन्डल तुटली त्यामुळे भिजले. पण... पण ठिक आहे मी. " एवढा वेळ आठवून-आठवून ठेवलेल एक वाक्य त्याचं थरथरत्या आवाजात मीरा कसबस बोलून गेली होती.
अजुनही खालीच झुकलेली तिची नजर मात्र खरं-खॊटं सार काही न बोलताच सांगत होती. तिची हनुवटी आपल्या दोन्ही हाताने वरती करत पावसा एवढ्याच थंडगार नजरेने राघवने पुन्हा एकदा प्रश्न केला.
"मीरा! सॅन्डल तुटली म्हणून भिजली? का खुप वेळ भिजत होती म्हणून सॅन्डल तुटली? "
पण तिची ती अव्यक्त नजर त्याला सहन झाली नसावी. त्याने लगेच आपली मान दुसरीकडे वळवली. आत्तापर्यंत बरसणाऱ्या रिमझिम पावसाने तो ही पार चिंब झाला होता, पण पहिल्यांदाच तिच्या डोळ्यातला तो असंख्य भावनांचा केविलवाणा पाऊस पाहून आज तो पार गारठला. नेहमीप्रमाणेच अबोल असूनही आज ती नजर बरच काही सांगून गेली.
काही क्षण असेच निघून गेले असावे, शेवटी काहीही न बोलता मीराने चालण्यासाठी असफल धडपड केली, पण पायाच्या बोटाला बर्यापैकी लागल्याने तिला धडसे चालता येईना. गाडीचा हेड लाईट चालू असल्याने काळ्याकुट्ट अंधारातही ही गोष्ट राघवच्या लक्षात यायला वेळ लागली नाही.
"ओके.... वेट." म्हणत त्याने तिला तशीच आपल्या दोन्ही हातांवर अलगदपणे उचलून चालायला सुरुवात केली.
'आतापर्यंत फक्त स्वप्नातच ज्याच्या जवळ जाता आलं होत. तो प्रत्यक्षात आपल्या एवढ्या जवळ असणे, हे ही जणू स्वप्नवत वाटणारी ती.... आणि स्वतःच्याच बायकोच्या नजरेला नजर देण्याची हिम्मत एकवटू न शकलेला तो... दोघांचीही त्या बेभान पावसात भिजलेली नजर… एक अव्यक्त जुनीच कहानी घेऊन आली होती पण पुन्हा नव्याने.'
क्रमश
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन.
{https://siddhic.blogspot.com}