टेक्निकल एनालिसिस: Chanakya Jr
© Chanakya Jr
'शेअर मार्केटचा गनिमी कावा' या पुस्तकाचे लेखक
प्रकाशक: स्व प्रकाशित
आवृत्ती: ऑगस्ट २०२१
Qora: msboriginal.quora.com | Blog: msboriginal.blogspot.com
www.youtube.com/c/MarathiShareBazar
हे साहित्य फक्त ई-बुक मध्ये उपलब्ध आहे
सदरील पुस्तकातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून त्याचे अनुकरण करणे ही वाचकांची वैयक्तिक निवड असेल. सदरील पुस्तकातील विचारांचे अनुकरण करावे असा लेखकाचा हेतु नाही किंवा लेखक तसे करण्यास प्रेरित करत नाही. वाचकांस शेअर बाजारात कुठल्याही प्रकरचा नफा किंवा तोटा यास लेखक जबाबदार असणार नाही. सदरील पुस्तकात बर्याच ठिकाणी आज्ञादर्शक शब्दांचा प्रयोग झाला आहे जसे की ‘करा’, ‘घ्या’, ‘विका’, सदरील पुस्तकातील अशा प्रकारचे बरेच शब्द हे लेखनाच्या दृष्टीकोणातून आज्ञादर्शक जरि असले तरी त्याचा अर्थ मुळात तसा घेऊ नये व त्याद्वारे लेखक स्वतःशीच आज्ञादर्शकपणे बोलत आहे असे समजावे. तसेच सदरील पुस्तकात वाचकांना उद्देशून वापरलेले शब्द (पुस्तकातील अनुक्रमणिका या पृष्ठा पासूनचे सर्व शब्द) हे लेखकाने स्वतःशीच उद्देशून वापरले आहेत असे समजावे. या पुस्तकातील सर्व विचार हे लेखकाने स्वतःच्या मनाशी केलेला संवाद आहे असे समजावे.
लेखक नोंदंनीकृत गुंतवणूक सल्लागार नाही.
टेक्निकल एनालिसिस कशासाठी ?
एखाद्या शेअर मध्ये कोणत्या वेळी प्रवेश करावा, कोणत्या वेळी व्यवहारातून बाहेर पडावे, कोणत्या वेळी व्यवहार टाळावा, शेअरची किंमत किती वर किंवा खाली जाऊ शकते, व्यवहारात किती रिस्क असू शकते व फायदा किती असू शकतो या बद्दलच्या श्यक्यता जाणून घेण्यासाठी टेक्निकल एनालिसिस महत्वाचे आहे. बर्याच वेळा आपले शेअरच्या किमतीचे वर किंवा खाली जाण्याबाबतचे अंदाज योग्य असतात परंतु केवळ चुकीच्या वेळी व्यवहारात प्रवेश केल्यामुळे किंवा त्यातून बाहेर पडल्यामुळे नुकसान होते. हे असे नुकसान कमी करण्याचे काम योग्य प्रकारे केलेले टेक्निकल एनालिसिस करू शकते.
शेअर बाजारात पाच हजारहून जास्त कंपन्या आहेत. मग आता या इतक्या कंपन्यापैकी नेमकं कोणत्या मोजक्या कंपन्यामध्ये खरेदीची किंवा विक्रीची संधी निर्माण झाली आहे हे एक एक कंपनीचे संपूर्ण विश्लेषण करून ओळखायचे झाल्यास एका कंपनीसाठी एक दिवस लागला असे मानले तर ५००० दिवस म्हणजे १३ वर्षाहून अधिक काळ लागेल ! मात्र ५००० जणांनी एकदम विश्लेषण केले तर एका दिवसात शक्य आहे. पण हे शेअर मार्केटचे ज्ञान असणारे ५००० लोक तुम्ही आणणार कुठून ? तुम्हाला एकट्यालाच हे विश्लेषण करावे लागणार आहे. म्हणून काही निवडक कंपन्या शोधण्यासाठी टेक्निकल व फंडामेंटल एनालिसिस उपयोगी येते. ५००० कंपन्याना फंडामेंटल एनालिसिसचे विविध निकष लावून तुम्ही त्या निकषांमध्ये बसणार्या काही कंपन्या फिल्टर करू शकता, मग त्यांना टेक्निकल एनालिसिसचे निकष लावून त्यापैकी नेमक्या अशा कंपन्या निवडू शकता ज्यात खरेदीची किंवा विक्रीची संधी निर्माण झाली आहे व तो व्यवहार एक चांगला नफा देऊ शकेल अशा कंपन्या निवडू शकता. किंवा याउलटही तुम्ही करू शकता, म्हणजे आधी टेक्निकल एनालिसिसचे निकष व मग फंडामेंटलचे निकष. मात्र टेक्निकल व फंडामेंटल हे दोन्ही एनालिसिस करूनच एखाद्या व्यवहारात प्रवेश करणे किंवा त्यातून बाहेर पडणे अधिक फायद्याचे किंवा कमी रिस्कचे ठरू शकते.
फंडामेंटल एनालिसिसच्या तुम्हाला हव्या असणार्या निकषांच्या आधारे कंपन्या फिल्टर करण्यासाठी तुम्ही सर्व कंपन्यांचा डाटा एक्सेल फाइलमध्ये टाकून तेथून फिल्टर करू शकता. मात्र कुठल्या कंपनीचा चार्ट पॅटर्न कसा बनला आहे हे फिल्टर करणे कठीण काम आहे तरी इंटरनेटवर काही वेबसाइट या प्रकारचे चार्ट बेस्ड फिल्टर उपलब्ध करून देतात त्याची माहिती मिळवली तर हे एनालिसिस करणे अधिक सोपे व कमी वेळात होईल त्याचबरोबर फंडामेंटल एनालिसिससाठीही अशाप्रकारचे फिल्टर इंटरनेटवर उपलब्ध आहेत, त्याबद्दलची माहिती आपण पुढे सविस्तर घेऊया.
चार्ट चे प्रकार
टेक्निकल एनालिसिस हे मुख्यतः शेअरच्या किंमतीचा चार्ट पाहून केले जाते. भूतकाळामध्ये अमका-तमका चार्टचा पॅटर्न तयार झाला तर जे झाले होते तशाच प्रकारचा चार्ट पॅटर्न पुन्हा तयार झाला तर त्याच्या मिळतेजुळते भविष्यकाळात घडू शकते हा या एनालिसिसचा आधार असतो. जसे भूतकाळात झाले तसेच किंवा मिळतेजुळते भविष्यकाळात घडते ही काही जादू आहे का ? नाही ! जादू नाहीच ! हे असे घडते ते माणसाच्या न बदललेल्या स्वभावामुळे ! चार्टचा पॅटर्न खाली घसरताना दिसला की सगळे शेअर धडाधड विकायला काढायचे, वर सरकताना दिसला की भरमसाठ खरेदी करायची या माणसाच्या स्वभावामुळे जे भूतकाळात घडले ते पुन्हा पुन्हा घडते. मी एकदा माझ्या पाळीव मांजरला शिकवलं की एक म्हटलं की नाच, दोन म्हटलं की उड्या मार आणि तो ते शिकला, नंतर त्या मांजरणे गावातील सगळ्या मांजरांना हे शिकवलं, आता कोणीही एक म्हटलं की सगळी मांजरं नाचतात व दोन म्हटलं की उड्या मारतात ! असो, विविध कालावधीसाठी शेअरची किंमत दाखवणार्या चार्टचे अनेक प्रकार सध्या उपलब्ध आहेत आता त्याची माहिती आपण पाहूया.
१. लाइन चार्ट: शेअरची विविध कालावधीची किंमत ही एका लाइनने जोडलेली असते व त्यातून चढ-उतार दाखवणारी एक लाइन अशा चार्टवर दिसते. ही लाइन फक्त क्लोसिंग प्राइस दर्शविते, एखाद्या वेळेची लो किंवा हाय प्राइस यावरून कळू शकत नाही.
२. बार चार्ट: एक उभी रेष व तिच्या माथ्याशी एका बाजूला आडवी रेषा व पायथ्याशी एका बाजूला आडवी रेषा असा एक बार तयार होतो. विविध कालावधीसाठी असे अनेक बार तयार होतात व चार्ट वर दिसतात. डाव्या बाजूची आडवी रेषा ही ओपन प्राइस तर उजव्या बाजूची आडवी रेषा की क्लोज प्राइस दाखवते. एखाद्या कालावधीसाठी किंमत पडणे व वधारणे या दोन्ही घटनांसाठी वेगवेगळ्या रंगाचा बार तयार होतो. किंमत वधारली हे दाखवणार्या बार ला 'बुलीश बार (bullish bar)' तर किंमत पडली हे दाखवणार्या बार ला 'बेयरीश बार (bearish bar)' असे म्हणतात. ओपनिंग प्राइस, क्लोसिंग प्राइस, लो, हाय ही सर्व माहिती बारवरुन कळते.
३. कॅन्डलस्टिक चार्ट: एक चौकोनी डब्बा व त्याच्या मध्यात वरच्या बाजूला एक उभी रेषा किंवा खालच्या बाजूला एक उभी रेषा किंवा दोन्ही बाजूला उभ्या रेषा किंवा फक्त चौकोनी डब्बा अशा प्रकारची आकृती कॅन्डलची बनते. शेअरची किंमत एखाद्या कालावधीसाठी जितकी वर किंवा खाली जाईल तितक्या अंतराच्या उंचीची ही कॅन्डल बनते. विविध कालावधीसाठी अश्या अनेक कॅन्डल तयार होतात व चार्ट वर दिसतात. एखाद्या कालावधीसाठी किंमत पडणे व वधारणे या दोन्ही घटनांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या कॅन्डल तयार होतात. साधारणतः किंमत वधारली असेल तर हिरवी कॅन्डल व पडली असेल तर लाल कॅन्डल तयार होते. तुम्ही चार्टच्या सेट्टिंगमध्ये जाऊन तुम्हाला हवा तो रंग कॅन्डलसाठी निवडू शकता. कॅन्डलचे रंग असे निवडावे की तुम्हाला अगदी सहज कोणती कॅन्डल कशी बनली आहे हे दिसले पाहिजे. किंमत वधारली हे दाखवणार्या कॅन्डल ला 'बुलीश कॅन्डल (bullish candle)' तर किंमत पडली हे दाखवणार्या कॅन्डल ला 'बेयरीश कॅन्डल (bearish candle)' असे म्हणतात. कॅन्डलच्या मधल्या चौकोनी डब्याच्या भागाला तिची 'बॉडी (body)' म्हणतात. तर या बॉडीच्या माथ्यावर व पायथ्याशी ज्या उभ्या रेषा बनतात त्यांना तिची 'शाडो (shadow)' किंवा 'विक (wick)' म्हणतात. माथ्यावरच्या शाडोला 'अपर शाडो (upper shadow)' तर पायथ्याखालील शाडोला 'लोवर शाडो (lower shadow)' म्हणतात. ओपनिंग प्राइस, क्लोसिंग प्राइस, लो, हाय ही सर्व माहिती कॅन्डलवरुन कळते. कॅन्डल चार्ट हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा चार्ट आहे. याचेही नंतर दोन-तीन प्रकार पडले परंतु सर्रास वापरला जाणारा साधा म्हणजे 'जपानी कॅन्डलस्टिक चार्ट' टेक्निकल एनालिसिससाठी वापरला जातो. आपण याच चार्टमध्ये तयार होणार्या विविध कॅन्डल व पॅटर्नविषयी माहिती घेणार आहोत. खालील इमेजमध्ये मी बुलीश कॅन्डलसाठी पांढरा रंग वापरला आहे ज्यामुळे मला ती ओळखणे खूप सोयिस्कर होते.
कॅन्डलस्टिकचा उपयोग शेअर बाजारपूर्वी १८व्या शतकापासून जपान मध्ये होत असे. तेथील तांदळाचा व्यापार करणार्या एका व्यापार्याने तांदळाचे वर्षभरातील भाव कसे-कसे बदलतात हे दर्शवण्यासाठी कॅन्डलस्टिक रेखाटली व नंतर जपानचे इतर व्यापारीसुद्धा अशाप्रकारे विविध वस्तूंचे भाव रेखाटू लागले. १९८० पर्यन्त जपान सोडून इतर देशांना याचा थांगपत्ताही नव्हता. १९८० मध्ये एका अमेरिकन ट्रेडरने आपल्या पुस्तकातून ही कॅन्डलस्टिक व हा चार्ट जगासमोर आणला. तेव्हापासून जगतील सर्वच शेअर बाजारामध्ये शेअरच्या किंमतीचे चढ-उतार दाखवण्यासाठी या चार्टचा सर्रास वापर होतो. कॅन्डलस्टिक ही मुळात जपानी असल्याने तिच्या संबंधी येणारे शब्दही जपानी आहेत व त्यामुळे आपल्याला ते थोडेसे विचित्र वाटू शकतात.
क्रमशः पुढील भागात....