Victims - 17 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - १७

Featured Books
Categories
Share

बळी - १७

बळी १७
केदार अचानक् घाबरून ओरडू लागला आणि घेरी येऊन खाली कोसळला; हे बघून बोटीवर सगळेच घाबरले होते. बोट किना-याला लागली होती. त्याला तिथून सरळ हाॅस्पिटलमध्ये न्यायचं असं ठरलं.
"माझी गाडी येणार आहे! आपण लगेच त्याला घेऊन निघू! पण तू डाॅक्टरना फोन करून सगळं सांगून ठेव!" त्यांचा एक मित्र म्हणाला.
केदारला अॅडमिट केलं तेव्हाही तो बेशुद्धावस्थेत असंबद्ध बडबड करत होता. त्याला थोडा तापही होता.
डाॅक्टर पटेल आणि प्रमिलाबेन दोघंही तिथे गडबडीने आले होते. निशा नाइट ड्यूटी करत होती; तिला त्यांनी त्याला इंजेक्शन द्यायला सांगितलं.
"काळजी करण्याचं कारण नाही; त्याला थोडा मानसिक धक्का बसला आहे, मी त्याचा ताण कमी व्हावा, म्हणून इंजेक्शन दिलं आहे! काही वेळातच तो शुद्धीवर येईल!"डाॅक्टर म्हणाले.
"टी. व्हीवर जरी समुद्र दिसला-- लाटा उसळताना दिसल्या; की त्याला नेहमीच खूप भीती वाटत होती! मला वाटलं होतं; की मुलांबरोबर-- समवयस्कांबरोबर तो समुद्रावर फिरला तर त्याच्या मनातली भीती कमी होईल; म्हणून त्याला तुमच्याबरोबर पाठवला होता. त्याला एवढा त्रास होईल हे माहीत असतं, तर मी त्याला सहलीला जाण्याची परवानगी दिलीच नसती! माझ्याकडून मोठी चूक झाली!" प्रमिलाबेनच्या डोळ्यात हे बोलताना अश्रू आले होते.
"तुमचा विचार बरोबर होता! तो आमच्याबरोबर खूप खुष होता; पण आम्ही त्याला 'किनारा जवळ आलाय; लवकरच आपल्याला उतरायचं आहे' असं सांगायला गेलो; आणि बहुतेक काळोखामुळे तो आम्हाला दुसरेच कोणी समजला, आणि घाबरून ओरडायला लागला; आणि बेशुद्ध पडला. आम्हाला काय करावं, काही सुचेना; म्हणून तुम्हाला फोन केला!" शाम म्हणाला.
त्याच वेळी केदार अर्धवट ग्लानीत बडबडू लागला,
"कुठे नेताय तुम्ही मला? रंजना माझी वाट बघत असेल! दुकान अजून कसं मिळत नाही? टॅक्सी थांबव! मी खाली उतरतो! ---- मला सोडा-- समुद्र खवळलाय -- मला सोडा--"
"प्रमिलाबेन त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या,
"डोळे उघड केदार! जागा हो! तू आमच्याबरोबर आहेस! घाबरू नकोस!" प्रमिलाबेन म्हणाल्या.
केदारने डोळे उघडले.
"त्याने आजूबाजूला चिंतित चेह-याने उभ्या असलेल्या निशा, प्रमिलाबेन आणि इतरांना पाहिलं. आपण हाॅस्पिटलच्या काॅटवर आहोत; हे बघून तो म्हणाला,
"मला काय झालंय? इथे का आणलंय मला? "
"तुझी तब्येत बरी नव्हती -- अचानक् तुला चक्कर आली; म्हणून तुला इथे आणावं लागलं! घाबरू नकोस! शांत हो! आता तू ठीक आहेस!" बाजूला उभी असलेला शाम म्हणाला.
"शाम. -- संदीप! आज तर मी तुमच्याबरोबर रहाणार होतो! आणि मी आजारी आहे; हे माझ्या आईला नाही कळवलं? आईला आणि रंजनाला- माझ्या बायकोला कळलं; की दोघीही धावत येतील! कीर्ती आणि नकुलही माझी काळजी करत असतील!"
"कीर्ती आणि नकुल कोण?" शाम विचरू लागला. त्याला आता कळलं होतं, की एवढे दिवस आपण शोध घेत असलेल्या गोष्टी केदारच्या तोंडून नकळत बाहेर पडत आहेत.
"कीर्ती आणि नकुल--- माझी धाकटी भावंडं! मी कधी त्यांच्याविषयी तुला सांगितलं नाही का? " केदार अविश्वासाने म्हणाला.
"आमच्याकडे तुझ्या आईचा नंबर नव्हता--- तू आता आराम कर! सकाळी कळवूया तुझ्या घरी!" संदीप काळजीपोटी त्याला समजावत म्हणाला.
"नाही-- नाही! मी नंबर सांगतो; तुम्ही लगेच आईला फोन लावा!" केदार हट्टी स्वरात म्हणाला.
त्याची ओळख मिळवण्याची हीच वेळ होती; हे जाणून प्रमिलाबेन अगदी सहज आवाजात म्हणाल्या,
"संदीप! तो म्हणतोय नं! नाव आणि नंबर लिहून घे!"
"मी लिहून घेते! काय नंबर आहे? निशा त्यांचा हेतू जाणून तत्परतेने म्हणाली.
केदारने नंबर सांगितला.
"तुझ्या आईचं नाव काय म्हणालास?" निशाने विचारलं.
मीरा-- आणि माझ्या पत्नीचं नाव रंजना! दोघीही घरीच असतात! केदारचा निरोप आहे; असं सांगा!" निशाची नजर चुकवत केदार म्हणाला. गेले काही दिवस दोघंही मनाने खूप जवळ आली होती; आणि आता तिला आपल्या पत्नीविषयी सांगताना त्याला संकोच वाटत होता. तो थोडा स्थिर होत होता; आणि परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. आपण रंजनाबरोबर कधी होतो--- आणि निशाबरोबर कधी होतो ---- कधी काय घडलं याविषयी त्याच्या बुद्धीचा गोंधळ उडाला होता.
" आम्ही तुझ्या घरी फोन लावतो! तू आता आराम कर!" प्रमिलाबेन मायेने म्हणाल्या.
औषधाच्या प्रभावामुळे केदारच्या डोळ्यांवर परत झापड येऊ लागली. तो शांत झोपी गेला.
"मी त्याच्याकडे लक्ष देईन! खूप रात्र झाली आहे ; तुम्ही घरी जा!" निशा प्रमिलाबेनकडे बघत म्हणाली.

"त्याच्या डोक्यात भूतकाळ आणि वर्तमानकाळाची सरमिसळ झाली आहे! यातून तो लवकरच बाहेर पडेल! आता त्याला त्याचं घर, पत्नी -- सगळं आठवू लागलंय; ही खूप चांगली गोष्ट झाली आहे! " तिथून बाहेर पडल्यावर डाॅक्टर म्हणाले.
" मी तो फोन लावून बघू नं? " बरोबर आहे कि नाही; याची खात्री करून घ्यावी लागेल! आणि फोन बरोबर असेल, तर त्याच्या आईला सगळी कल्पना देता येईल! बिचारी! गेले सहा महिने मुलाची वाट बघत असेल! किती आनंद होईल तिला!" प्रमिलाबेन म्हणाल्या.
"तू फक्त फोन लावून तो बरोबर आहे; याची खात्री करून घे --- पण त्यांच्याशी बोलू नकोस! आपल्याला सर्वप्रथम हे सगळं इन्स्पेक्टर ना सांगायला हवं! पुढे काय करायचं; हे तेच ठरवतील! केदारचं त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे; यात वाद नाही; पण त्याच्या कुटुंबियांनी त्याला शोधणं तर दूरच ; पण इतके दिवस साधी पोलीस कम्प्लेंटही केली नाही; हे विसरू नकोस. या मागे नक्की काय आहे हे पहावं लागेल! आपलं डाॅक्टर म्हणून कर्तव्य आता संपलं आहे! यापुढचं काम पोलीसांनाच करायचं आहे! उद्या डाॅक्टर श्रीकांतना आणि इन्स्पेक्टरनाही बोलावून घेऊ. ते त्याला बोलतं करतील आणि पुढची ट्रीटमेंटही ठरवतील!" डाॅक्टर म्हणाले.
********
दुस-या दिवशी सकाळी केदारची तब्येत खूपच सुधारली होती. ताप उतरला होता आणि तो शांत झाला होता. प्रमिलाबेन त्याला त्यांच्या बंगल्यावर घेऊन गेल्या. जाताना केदार त्यांना विचारत होता,
" मॅडम! मी माझ्या घरी गेलो, तर नाही का चालणार? माझी आई खूप घाबरली असेल! माझी वाट बघत असेल! "
" तिकडे नंतर जाऊ! आता तुझ्याशी बोलायला डाॅक्टर श्रीकांत येणार आहेत; ते काही ट्रीटमेंट सांगतात ते बघू! तुझ्या आईला आम्ही फोन करून सांगितलंय; की तू आमच्याबरोबर आहेस!" डाॅक्टर म्हणाले. त्यांना खोटं बोलायला आवडत नव्हतं, पण नाइलाज होता.
बंगल्यावर डाॅक्टर श्रीकांत होतेच; पण इन्सपेक्टर दिवाकर आणि दोन पोलीससुद्धा होते.
पोलिसांना बघून केदार थोडा घाबरून विचारू लागला,
"इथे पोलीस कशाला आले आहेत? काय झालंय? तुम्ही काय लपवताय माझ्यापासून?" तो विचारू लागला.
"तू घाबरण्यासारखं काहीही झालेलं नाही ; सगळं सांगतो तुला! आम्ही सगळे तुझ्या हिताचा विचार करतोय!" डाॅ. श्रीकांत म्हणाले.
" अगोदर आपण सगळे हा गरमा-गरम- चहा पिऊया!" प्रमिलाबेन हसत म्हणाल्या.
चहा पिताना केदारकडे दुर्लक्ष करत सगळेजण इतर विषयांवर बोलत होते. त्यांना वातावरण हलकं करून केदारच्या मनावरचा ताण कमी करायचा होता; पण केदारची उत्सुकता मात्र आता शिगेला पोहोचली होती. पोलिसांना पाहिल्यावर काहीतरी गंभीर बाब आहे; याची कल्पना त्याला आली होती.
"हं! बोला आता!" लवकर लवकर चहा संपवून कप बाजूला ठेवत तो म्हणाला.
"केदार आज किती तारीख आहे; तुला माहीत आहे?" श्रीकांत आता मूळ मुद्दयावर आले होते. ते हसत होते; पण स्वर गंभीर होता.
"हा नोव्हेंबर महिना चालू आहे नं?" केदारला म्हणाला.
श्रीकांतनी कॅलेंडरकडे त्याच्या समोर ठेवलं.
"केदार! नोव्हेंबर नाही; आता मे महिना चालू आहे! जरा कॅलेंडर बघ; म्हणजे तुला कळेल!" ते म्हणाले. केदारच्या डोक्याला ताण न देता त्याला सत्य परिस्थितीत आणणं सोपं नव्हतं!
"हे कसं शक्य आहे! २० नोव्हेंबरला माझं लग्न झालं. त्याला एक आठवडा झाला! काल मी प्रथमच रंजनाला घेऊन तिच्या बहिणीकडे जायला बाहेर पडलो! ----- नाही--- काहीतरी घोळ आहे--- काल तर मी शामबरोबर समुद्रावर सहलीला गेलो होतो--- माझा असा गोंधळ का होतोय? मला काही कळेनासं झालंय!" केदार आता डोकं धरून बसला होता.
आपलं डोकं बधिर होतंय असं त्याला वाटत होतं. तो विचार करत होता,
"मी नक्की कुठे होतो? सहा महिने मी आईपासून -- माझ्या घरापासून दूर आहे? हे कसं शक्य आहे? डाॅक्टर नक्की खरं बोलतायत; की सगळे मिळून माझी मस्करी करतायत? --- नाही! ही एवढी मोठी माणसं -- इन्सपेक्टर - डाॅक्टर - माझ्यावर आईप्रमाणे माया करणा-या प्रमिलाबेन माझी मस्करी का करतील? हे काहीतरी मोठं प्रकरण आहे."
******* contd.- Part- 18.