शेअर मार्केटचा गनिमी कावा
शेअर मार्केटचा गनिमी कावा: Chanakya Jr
© Chanakya Jr
प्रकाशक: स्व प्रकाशित
आवृत्ती: एप्रिल २०२१
Qora: msboriginal.quora.com | Blog: msboriginal.blogspot.com
हे साहित्य फक्त ई-बुक मध्ये उपलब्ध आहे
----------------------------------------------------------------------
सदरील पुस्तकातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून त्याचे अनुकरण करणे ही वाचकांची वैयक्तिक निवड असेल. सदरील पुस्तकातील विचारांचे अनुकरण करावे असा लेखकाचा हेतु नाही किंवा लेखक तसे करण्यास प्रेरित करत नाही. वाचकांस शेअर बाजारात कुठल्याही प्रकरचा नफा किंवा तोटा यास लेखक जबाबदार असणार नाही. सदरील पुस्तकात बर्याच ठिकाणी आज्ञादर्शक शब्दांचा प्रयोग झाला आहे जसे की ‘करा’, ‘घ्या’, ‘विका’, सदरील पुस्तकातील अशा प्रकारचे बरेच शब्द हे लेखनाच्या दृष्टीकोणातून आज्ञादर्शक जरि असले तरी त्याचा अर्थ मुळात तसा घेऊ नये व त्याद्वारे लेखक स्वतःशीच आज्ञादर्शकपणे बोलत आहे असे समजावे. तसेच सदरील पुस्तकात वाचकांना उद्देशून वापरलेले शब्द (पुस्तकातील अनुक्रमणिका या पृष्ठा पासूनचे सर्व शब्द) हे लेखकाने स्वतःशीच उद्देशून वापरले आहेत असे समजावे. या पुस्तकातील सर्व विचार हे लेखकाने स्वतःच्या मनाशी केलेला संवाद आहे असे समजावे.
लेखक नोंदंनीकृत गुंतवणूक सल्लागार नाही.
------------------------------------------------------------------------
अनुक्रमणिका
शेअर बाजारात का उतरावे?
वस्तूची/शेअरची किंमत म्हणजे नेमकं कशाची किंमत?
स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक ची निवड
वेळ व कष्ट
गुंतवणूक किती करावी?
सोन्याचं अंडं देणारी कोंबडी
गनिमी कावा – पद्धत १
गनिमी कावा – पद्धत २
गनिमी कावा – पद्धत ३
ससा व कासव
मार्केटचे वागणे
फंडामेंटल एनालिसिस
टेक्निकल एनालिसिस
मार्केटचे ट्रेंड
ऑप्शन ट्रेडिंग
फ्युचर ट्रेडिंग
करन्सी ट्रेडिंग
शेअर मार्केट कोर्स
लेखकाचे मनोगत
म्युचुअल फंड सही है?
ड्रीम ११: स्वप्नांचा बिझनेस
GST मधील छुपी लूट
-------------------------------------------------------------------------
शेअर बाजारात का उतरावे?
महाराष्ट्रातील युवक अज्ञानामुळे/भीतीमुळे ज्यापासून लांब पळत राहिले तीच गोष्ट येणाऱ्या काळात आपल्या सारख्या सामान्य माणसाला भविष्यातील गरजा भागवण्या इतपत पैसा मिळवून देऊ शकते. आपण दररोजच्या जीवनात आपल्याला लागणाऱ्या वस्तू खरेदी करतो, त्या वस्तू कुठल्यातरी कंपनीने तयार केलेल्या असतात हे तर आपल्याला माहीतच आहे. मग या कंपन्या आपल्या कडून प्रॉफिट कमावतात व दिवसेंदिवस त्यांची संपत्ती वाढतच आहे.... सामान्य माणूस फक्त उपभोक्ता झाला आहे... त्याच्याच खिशाला झळ बसते. जोपर्यंत तो कंपनीचा प्रॉफिट परत आपल्या खिशात येणार नाही तोपर्यंत आपण आपसात एकमेकांचेच खिशे कापत राहणार. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यामुळे ज्या कंपनीत गुंतवले आहेत ती कंपनी वर्षाला नफ्याचा हिस्सा आपल्याला देते, कंपनीचा शेअर भाव वाढत जातो तो एक फायदा, कंपनी तिच्या प्रॉडक्ट्स वर तुम्हाला डिस्काउंट ऑफर् करते तोही फायदाच शिवाय बिझनेस बद्दल प्रचंड ज्ञान आपण घेऊ लागतो हा एक फायदा ! त्यामुळे शेअर बाजारात मुबलक ज्ञान घेऊन गुंतवणूक केल्यास आपले आयुष्य आहे त्या परिस्थितीत आणखी सुखकर होऊ शकते व वर्षानुवर्षे चांगल्या कंपनीत शेअर होल्ड करून ठेवला तर काही वर्षानंतर नफ्याचा हिस्सा इतका मोठा असणार आहे की आपल्या येणाऱ्या पिढ्या आधी पासूनच श्रीमंत असतील ! अर्थव्यवस्था समजून घेणे हे काय अवघड काम नाही, पण लोकांसमोर मांडताना उगाच ती अवघड करून ठेवली आहे. त्यास कारण असे असू शकते की सामान्य लोकांना ती कळू न देऊन त्यांच्याकडून पैसा लुटणे निरंतर चालू रहावे. आपण सामान्य लोक कसे लुटले जातो याची माहिती आपण पुढे घेऊच. याचा पैसा त्याच्या खिशात व त्याचा पैसा याच्या खिशात...बस्स...हीच आहे अर्थव्यवस्था. जो व्यक्ति इतरांचा पैसा आपल्या खिशात ओढण्यात किंवा इतरांना वेगवेगळी प्रलोभणे देऊन त्यांच्या खिशातून पैसे बाहेर काढण्यात जास्त यशस्वी होतो तो श्रीमंत असतो व जो इतरांच्या खिशातून पैसे काढण्याचा विचारच करत नाही तो गरीब ! काही लोकांनी तर कायदेच बनवले आहेत की तुम्ही कितीही गरीब असाल तरी त्यांचा हफ्ता द्यायलाच पाहिजे. जवळपास प्रत्येक वेळी पैसा खर्च करताना आपण हा हफ्ता भरत असतो तो ही अगदी अठरा ते अठ्ठावीस टक्के इतका प्रचंड ! आता ते लोक कोण तुम्हाला सांगायची गरज नाही. त्या हफ्त्याच्या बदल्यात ते लोक किती प्रेमळ वागतात याची कल्पना तुम्हाला असेलच. असो. ते लोक कधीतरी सुधारतील अशी अपेक्षा. नोकरी करून इतरांच्या खिशातून पैसा बाहेर काढणे शक्य आहे काय? तुम्हाला कामावर ठेवणारा मालक हा त्याचे काम व कष्ट वाचावे म्हणून तुम्हाला नाईलाजास्तव पगार देतो आणि तो तुमच्याकडून काम करवून स्वतः नफा कमावत असतो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकून लगेच नोकरी सोडण्याचा विचार करू नका. अहो सगळेच मालक होऊ शकत नाहीत हेही तितकेच खरे आहे. तुम्ही जरी मालक झालात तरी कोणीतरी तुम्हाला नोकर म्हणून हवा असणारच आहे. कारण एकट्याने उद्योग चालत नसतो, असो. म्हणण्याचा उद्देश एवढाच की काहीतरी वस्तु किंवा सेवा विकून आपण जास्तीत जास्त पैसा लोकांच्या खिशातून बाहेर काढू शकतो. तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर हाच विचार करा की अशी कोणती वस्तु किंवा सेवा विकल्याने लोक खिशातून पैसा काढायला तयार होतील. आता आपण जरी उद्योजग नसलो तरी जे लोक उद्योजग आहेत ते तर लोकांच्या खिशातून प्रचंड पैसे बाहेर काढतच आहेत. मग शेअर बाजार त्या पैशातील काही हिस्सा आपल्या खिशात आणन्याची एक संधी आपल्याला देतो. आपल्याला फक्त लोकं कुठे पैसे मोकळ्या हातांनी सोडत आहेत ते शोधून त्या कंपनीत गुंतवणूक करावी लागेल म्हणजेच कुणाचा धंदा चांगला चालतोय व पुढेही चालत राहील ते शोधावं लागेल. आता हे थोडं कठीण आहे म्हणून आपल्याला यावर उपाय शोधायचा आहे त्यातील काही उपाय पुढे पाहणार आहोतच. शेअर बाजारात का उतरायचं याचं उत्तर तुम्हाला यावरून समजलं असेलच.
वस्तूची/शेअरची किंमत म्हणजे नेमकं कशाची किंमत?
आपण दुकानातून एखादा बिस्किटचा पुडा आणतो आणि त्याची काही किंमत दुकानदाराला देतो. समजा ती किंमत ५ रुपये आहे. आता असे गृहीत धरू की तुमचे नाव A आहे. दुकानदार हा B आहे. तो ज्या मोठ्या दुकानदाराकडून ती वस्तु विकत घेतो तो C आहे. तो मोठा दुकानदार ज्या कंपनीतून ती वस्तु विकत घेतो ती D आहे. समजा ते बिस्किट गव्हाच्या पिठापासून बनले आहे. ते पीठ ज्या गव्हापसून बनले आहे ते एका शेतकर्याने त्या कंपनीला विकले होते व समजा तो शेतकरी E आहे. A, B, C, D, E पैकी प्रत्येकजण त्याला आलेल्या खर्चावर काही नफ्याचा टक्का जोडूनच ती वस्तू पुढे विकतो. (शेअर बाजार हा अपवाद सोडला तर शक्यतो कोणी घाट्याचा सौदा करत नाही) आता हे विकणे म्हणजे नेमकं काय? विकणे म्हणजेच त्या वस्तूचा मालकी हक्क खरेदी करणार्या व्यक्तिला देणे ! मग आपण पैसे त्या वस्तूला देतो की तिच्यावर आपला मालकी हक्क सांगनार्याला? मालकी हक्क सांगनार्यालाच आपण पैसे देतो ! म्हणजे वस्तूची किंमत ही मुळात त्या वस्तूच्या मालकी हक्काची किंमत असते हे आपल्याला वरील उदाहरणावरून समजले. म्हणजे गव्हाचा मालकी हक्क E ने D ला दिला, D ने त्यापासून बिस्किट बनवले व तयार बिस्किटच्या पुड्याचा मालकी हक्क C ला विकला, C ने B ला, व B ने A ला म्हणजेच तुम्हाला ! अशा प्रकारे प्रत्येक वस्तूच्या बाबतीत घडते. वस्तू स्वतः कधीच किंमत मागत नाही, तर त्या वस्तूवर मालकी हक्क सांगून ती विकणारा त्या वस्तूची किंमत मागतो. समजा, तुम्हाला रस्त्यावर एक तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली तर मग ती अंगठी तुम्हाला ४० ते ५० हजार रुपये मागते काय? नाहीच ! ती एक निर्जीव वस्तू आहे. यावरून असे कळते की सजीव पैसे मागतात मग यातही समजा तुम्हाला रस्त्यावर कोणाची मालकी नसलेली गाय दिसली व तुम्ही तिचे एक लीटर दूध काढले तर ती गाय तुम्हाला ४० ते ५० रुपये मागते काय? नाहीच ! म्हणजे सजीवातही फक्त माणूसच मालकी हक्काचे पैसे मागतो (वस्तूचा मालकी हक्क दान केला असेल तर ते या विधानाला अपवाद आहे). या सर्व उदाहरणांवरून वस्तूची किंमत म्हणजे नेमकं कशाची किंमत हे तुम्हाला कळाले असेलच. याच प्रकारे एखाद्या कंपनीच्या एका शेअरची किंमत ही त्या संपूर्ण कंपनीच्या काही टक्के मालकी हक्काची किंमत असते.
शेअर बाजारातील मजेशीर गोष्ट अशी की कंपनी तिचे शेअर IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर वेळी एकवेळ विकून टाकते. व पुढे आपण लोक आपसांत ते शेअर विकत-खरेदी करत बसतो. हे समजून घेण्यासाठी उदाहरण पाहू. समजा रेडा नावाची एक कंपनी आहे. जिचा मी मालक आहे. रेडा चार लिटर दुधाचे उत्पादन करते व वार्षिक हजार रुपये लिटर प्रमाणे चार हजार रु. इतके तिचे वार्षिक उत्पन्न आहे. दूध देणारी एकच म्हैस माझ्या कंपनीकडे आहे व तिची किंमत दहा हजार रुपये आहे. म्हणजे रेडाची एकूण संपत्ती १४ हजार रुपये. मग मला आणखी दहा हजार रुपये हवे आहेत ज्यामुळे मी आणखी एक म्हैस विकत घेऊ शकेन. म्हणून मग मी एक रुपया प्रती शेअर प्रमाणे दहा हजार शेअर पब्लिकला IPO काढून विकून टाकले व चार हजार शेअर स्वतः जवळ ठेवले. अशाप्रकारे १४ हजाराच्या संपत्तीचे मालकी हक्कांमध्ये वितरण झाले . आता मी दहा हजार शेअर विकल्याने माझ्याकडे दहा हजार रुपये आले व त्याची एक नवीन म्हैस विकत घेतली. आता ती म्हैस चार लिटर दूध देऊ लागली यामुळे माझा वार्षिक धंदा आणखी चार हजारणे वाढला व आता रेडाची एकूण संपत्ति दोन म्हशी दहा हजार प्रमाणे व आठ हजार दुधाचे वार्षिक उत्पादन म्हणजे अठ्ठावीस हजार झाली यामुळे लोकं जाम खुश झाली की धंदा वाढत आहे व त्यामुळे रेडाच्या शेअरची किंमतसुद्धा दुप्पट झाली (लोकांनीच केली). पण लोकांना अजून वाटू लागलं की मी झालेल्या नफ्यातून आजून म्हशी आणेन म्हणून त्यांनी शेअरची किंमत चार रूपायावर नेऊन ठेवली. इथे मी माझ्याकडील एकही शेअर विकला नाही, लोकच आपसात त्यांच्याकडील दहा हजार शेअर खरेदी-विक्री करत बसले. मी आपला निवांत धंदा करत बसलो अन लोक शेअरची किंमत वर वर नेत राहिले. अशाप्रकारे किंमत काही वर्षात २० रुपये झाली अन माझ्याकडील चार हजार शेअरचे बाजार भावाने ८० हजार रुपये झाले. म्हणजे मी धंद्यासाठी पैसे पब्लिककडूनच घेतले, मी माझा धंदा वाढवला, नफ्याचा सर्वाधिक हिस्साही मीच खातोय अन माझ्या चार हजारच्या गुंतवणुकीचे ८० हजार झाले ! तुम्ही बाजारात पहाल तर तुम्ही बघून थक्क व्हाल की लोकांनी जिथे एखाद्या कंपनीच्या संपत्ती प्रमाणे शेअरची किंमत शंभर रुपये असायला हवी तिथे ती दोन हजारावर नेऊन ठेवली आहे ! बहुतेक सर्वच कंपन्याच्या बाबतीत तुम्हाला हीच गोष्ट दिसेल. ही एक गम्मतच आहे ! जगातील सर्व धनदांडगे लोक असेच श्रीमंत झाले आहेत. त्यांची श्रीमंती बँकेतील पैशामुळे नाही तर त्यांच्याकडील असलेल्या शेअरच्या किंमतीच्या रूपात मोजली जाते. अर्थात ते त्या संपूर्ण संपत्तीचा कधीच उपभोग घेऊ शकत नाहीत. केवळ कागदोपत्रीच काय ती श्रीमंती. पण हे लोक एक शक्कल लढवतात, बँकेत शेअर गहाण ठेऊन पैसे घेतात व नंतर शेअरची किंमत पडली की बँक बुडाली तर बुडाली ! ही पण एक गंम्मतच आहे...
स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉकची निवड
सध्या शेअर मार्केट मध्ये NSE व BSE ला जवळपास ४००० पेक्षा अधिक कंपन्या नोंदवलेल्या आहेत. मग या ४००० पैकी कुठल्या कंपनीत गुंतवणूक करायची हे ठरवायचे असल्यास एक सोपी पद्धत वापरा. तुम्हाला तर माहीतच असेल की NIFTY व SENSEX या निर्देशांकांमध्ये मोजक्या ५० ते ६० कंपन्या गृहीत धरल्या जातात, या मोजक्याच कंपन्या त्या निर्देशांकांमध्ये आहेत कारण त्या सर्वोत्तम कंपन्या आहेत. तेव्हा याच ५० ते ६० कंपन्यांमधून एका वेळी कुठल्यातरी २ – ४ स्टॉक ची निवड तुम्हाला करायची आहे. हो फक्त २ ते ४ कारण तुम्हाला या २ ते ४ कंपन्या बाबत संपूर्ण माहिती व बातम्या यांवर नेहमी लक्ष ठेवता येईल. रोज रोज नवीन स्टॉक मध्ये गुंतवणूक करत गेलात तर रोज नव्या कंपनीची माहिती काढण्यात तुमचा प्रचंड वेळ जाईल आणि काही दिवसांनी तुम्हाला कंपन्या बाबत ची माहिती, बातम्या शोधण्याचा कंटाळा येईल. त्यामुळे एका वेळी मोजक्याच २ ते ४ कंपन्या ची संपूर्ण माहिती मिळवा ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल व कंपनी बाबत तुम्ही नेहमीच अपडेट रहाल. शक्यतो ज्या कंपनीचा सेल्स व प्रॉफिट मागील पाच वर्षांपासून सतत वाढत आहे, ज्यांच्यावर कर्ज नाही अशा कंपनीची निवड केली तर लॉस होण्याचा चान्स अजून कमी होईल.
काही वेळा तुम्ही सिलेक्ट केलेला एखादा स्टॉक परफोर्म करणे बंद करेल म्हणजे त्याच्या किमतीत नेहमीच अगदीच थोडासा बदल होत असेल तर अशा वेळी तो स्टॉक सोडून दूसर्या नवीन स्टॉक मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.
जो स्टॉक दररोज १ टक्का पेक्षा कमी ने अधिक/वजा होतो व त्याची किम्मत नेहमीच आहे त्या किमतीच्या भोवतीच अडकून पडते असा स्टॉक श्यक्यतो इंट्रा डे ट्रेडिंगसाठी टाळावा, कारण अशा स्टॉक मध्ये ट्रेडिंग केल्याने फायदा कमी व ब्रोकरेज आणि टॅक्सेस मधेच पैसे जास्त जातात.
वेळ व कष्ट
वेळ ही गोष्ट गुंतवणुकीच्या क्षेत्रात सर्वाधिक महत्वाची आहे. वेळ व्यर्थ घालवणार्या गुंतवणुकी पासून आपण दहा हात लांबच राहिले पाहिजे. शेअर मार्केट मध्ये वेळ वाया घालवणारी गुंतवणुकीची पद्धत म्हणजे “ इंट्रा डे ट्रेडिंग ”. होय ऐकून आश्चर्य वाटले असेल तुम्हाला, पण हे मी अनुभवातून सांगतो आहे. इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये तुम्ही पाच-सात पट वेगाने पैसे कमावता हे खरे आहे पण त्याच्या पेक्षा अधिक वेगाने पैसे गमावता हे ही तितकेच खरे आहे. इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये व्यवहार करून हजारात एक जण यशस्वी होतो आणि तो ही असा माणूस यशस्वी होतो ज्याचा अभ्यास प्रचंड आहे व जो ट्रेडिंग शिवाय इतर कुठलाच उद्योग करत नाही. शेअर मार्केट मधील गुंतवणुकीतून प्रचंड श्रीमंत झालेल्या व्यक्तींच्या गोष्टी आपण ऐकत असतो, जे पण लोक आज यातून यशस्वी आहेत ते सर्व “लॉन्ग टर्म इन्वेस्ट्मेंट” मुळेच श्रीमंत झाले आहेत. त्यामुळे इंट्रा डे ट्रेडिंग टाळा आणि ते का टाळावे हे मी तुम्हाला पटवून देतो.
समजा १०० रु. किमतीचे १० शेअर इंट्रा डे पद्धतीने मला १०० रु ला मिळाले. आणि त्या दिवशी तो शेअर २ टक्क्यांनी वाढला म्हणजे २ रु. ने वाढला आणि मी सर्व शेअर १०२ या किमतीला विकून टाकले. वर वर पाहता मला प्रत्येक शेअर मागे २ रु नफा झाला, म्हणजे १० शेअरचे २० रुपये. आता आपण यातून ब्रोकरेज व सेबी चे टॅक्सेस वजा करू.
ब्रोकरेज साधारणपणे गुंतवणुकीच्या ०.०२% किंवा १० रु ते २० रु प्रत्येक व्यवहार यापैकी जे कमी असेल ते असते, काही ब्रोकर ब्रोकरेज घेत ही नाहीत आज-काल. त्यामुळे ब्रोकरेज चा फारसा काही फरक पडत नाही पण दिवसातून सारखं सारखं व्यवहार केल्यावर ब्रोकरेज मध्ये आपली बरीच रक्कम गमावते. आपण असे ग्रहित धरू की तुम्ही दिवसातून एकदाच खरेदी व विक्री चा व्यवहार करता त्यामुळे ब्रोकरेज चार्ज आपण निव्वळ नफा क्यालकयूलेट करताना दोन व्यवहारा करिता घेऊ.
सेबी चे टॅक्सेस व इतर सर्व चार्ज साधारणपणे गुंतवणुकीच्या ०.२५% ते ०.३५% प्रती व्यवहार (हे टॅक्सेस, चार्ज वेळोवेळी कमी-जास्त होत राहतात) इतके असतात. म्हणजे एक खरेदी व एक विक्री चा व्यवहार असे दोन व्यवहार झाले व त्याचे ०.३५% प्रमाणे ०.७% टॅक्सेस-चार्जेस झाले (इंट्रा डे साठी). आपण १००० रु चे शेअर इंट्रा डे पद्धतीने १०० रु ला मिळवले पण टॅक्सेस-चार्जेस हे १००० या किमतीवरच म्हणजे शेअर च्या मूळ किमतीवरच लागतात त्यामुळे १००० चे ०.७% = ७ रुपये आपल्या खात्यातून वजा झाले. म्हणजे निव्वळ नफा = २० - ७ = १३ रु इतका झाला.
आता दुसर्या दिवशी मी परत १००० रु चे शेअर इंट्रा डे पद्धतीने १०० रु ला मिळवले पण आज शेअर ची किम्मत १ रु ने कमी झाली त्यामुळे मला वर वर पाहता प्रत्येक शेअर मागे १ रु याप्रमाणे १० रु तोटा झाला. आता यात ०.७% टॅक्सेस-चार्जेस ची भर पडली म्हणजे ७ रु आजून वजा झाले. म्हणजे निव्वळ तोटा १७ रु झाला.
कालचा नफा= १३ रु, आजचा तोटा= १७ रु म्हणजे २ दिवसात तुम्ही ४ रु गमावले. काल २ रु प्रती शेअर नफा झाला होता, आज फक्त १ रु प्रती शेअर तोटा झाला तरी तुमचा २ दिवसाचा संपूर्ण व्यवहार ४ टक्क्यांनी तोट्यात गेला ! म्हणजे तुमचे दोन दिवसाचे बौद्धिक कष्ट व वेळ वाया गेला. हो इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये हे असेच होते आठवड्यातले ४ दिवस तुम्ही नफ्यात असता पण एक दिवस असा फटका बसतो की आठवडाभरानंतरही तुम्ही आहे त्याच परिस्थितीत परत येता, वेळ व कष्ट व्यर्थ जाते.
डेलिवेरी ट्रेडिंग मध्ये जरी शेअरची किम्मत कमी झाली तरी आपण तो होल्ड करून किम्मत वर जाण्याची वाट तरी पाहू शकतो पण इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये तुम्हाला त्याच दिवशी व्यवहार पूर्ण करावा लागतो त्यामुळे इंट्रा डे ट्रेडिंग म्हणजे एकच चान्स असलेला व्हिडिओ गेम खेळल्या सारखं आहे, झाली तर झाली लेवल फिनिश, नाही तर गेम ओवर !
यापुढील संपूर्ण पुस्तक आपण Amazon वर वाचू शकता. तुम्ही शेअर बाजारात आहात पण काय करावे कळत नसेल तर हे पुस्तक मेग्दर्शक ठरू शकते. आपला अमूल्य वेळ या साहित्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! तुमचे रेटिंग अवश्य द्या यामुळे हे पुस्तक जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल.
उर्वरित पुस्तक वाचण्यासाठी Chanakya Jr किंवा Share Market cha Ganimi kava असे सर्च केले तरी हे पुस्तक amazon वर सहज मिळून जाईल.