Bhishma in Marathi Mythological Stories by टाकबोरू books and stories PDF | भीष्म संक्षिप्त गाथा.

Featured Books
Categories
Share

भीष्म संक्षिप्त गाथा.

'भीष्म!'
पुर्वीचे देवव्रत आणि नंतरचे पितामह भीष्म हे महाभारतातील पात्र माझं सर्वाधिक आवडतं पात्र आहे. भीष्मांच्या भोवती इच्छामरणाच एक रहस्यमयी वलय आहे; पण या वलयांकित भीष्मांपेक्षा मानवी जीवनात जगण्याची मूल्ये पेरणारे भीष्म मला अधिक आवडतात.
काळाच्या ओघात पुराणात झालेली अतिशयोक्तीची व चमत्कारी प्रतापांची घुसळण, जमेल तितकी, दुर सारून मी पितामह भीष्म या पात्राचा (माझ्या बौद्धिक कुवतीनुसार) आढावा घेतो.


• जन्म : राजा शांतनू (पुर्वजन्मीचा महाभिष) देवसभेत बसले असता तिथे माता गंगा आली होती. सौंदर्यवती गंगेच्या मोहला राजा शांतनू बळी पडले आणि देवाकडून या दोघांनाही पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला. या शापामागे एक वरदान लपलेलं होतं. पृथ्वीवर या दोघांचा विवाह झाला तो एका अटीवर - 'तुम्ही मला माझ्या कोणत्याच कृतीचं कारण विचारायचं नाही. अन्यथा मी तुम्हाला सोडून जाईन!' ही गंगेने शांतनू राजाला घातलेली अट होती.
लवकरच त्यांना पुत्रही झाला; मात्र गंगेने या पुत्राला त्याच रात्री जलसमाधी दिली! कारण विचारलं असता 'गंगा सोडून जाईल' या भयाने राजा शांतनूने जाब विचारला नाही; पण ही मालिका येथे थांबणार नव्हती. पुढील सहा पुत्रांना गंगेने, पुत्र झालेल्या दिवशीच, जलसमाधी दिली! (ते सात पुत्र म्हणजे अष्टवसु होत.) गंगा आठव्या पुत्राला जलसमाधी देणार तोच राजा शांतनूचा संयम मोडला आणि त्यांनी त्या पुत्राला वाचवलं. हाच आठवा पुत्र म्हणजे 'देवव्रत'.

• बालपण : आठ पुत्रांना जलसमाधी दिल्याच कारण विचारून राजा शांतनूने अट मोडली म्हणून लहान देवव्रतासह गंगा राज्य सोडून निघाली. 'योग्य वेळ येताच पुन्हा देवव्रताला तुमच्या स्वाधीन करेन' गंगेचे हे वचन लवकर सत्यात उतरण्याची वाट राजा शांतनू पाहू लागला. ज्ञानमहर्षी बृहस्पतींच्या आश्रमात देवव्रताच शास्त्रांच शिक्षण सुरू झालं. बृहस्पतींच्या आश्रमातून शिक्षित देवव्रत निघाला व पुन्हा गंगेच्या कृपेने परशुरामांच्या छत्रछायेत रमू लागला. तिथेच परशुरामांनी देवव्रताला अस्त्रांच शिक्षण दिलं.
युद्धशालेतील हरेक प्रकारात निपूण होणाऱ्या देवव्रताला तिथेच शाल्व नावाचा मित्र मिळाला (सौभराष्ट्राचा राजकुमार). शिष्यत्व आणि मैत्री दोन्ही कसोट्या देवव्रताने लीलया पार केल्या. शेवटी परशुरामांच्या नजरेत देवव्रत सर्वविद्याविशारद झाला.

• तरूणपण : गंगेने वचन दिल्याप्रमाणे तरूण देवव्रत आणि राजा शांतनू या दोघांची भेट घडून आली. स्थितप्रज्ञ गंगा अजूनही तिच्या निर्णयावर ठाम होती. तिने देवव्रताला शांतनूच्या स्वाधीन केलं आणि तिच्या जीवनप्रवासाला निघून गेली. हस्तीनापूरात 'देवव्रत राजा होणार' ही काळ्या दगडावरची रेघ होती. चंद्रकलेप्रमाणे देवव्रताच तेज, शौर्य, धैर्य वाढतच होतं. एकदा शिकारीला गेलेले महाराज शांतनू येताना सत्यवतीच्या (मत्स्यगंधा) प्रेमात पडूनच माघारी आले. धीवरकन्या सत्यवतीला लग्नाआधीच पराशर ऋषींच्या (अनैच्छिक) सहवासात एक पुत्र झाला होता. तेच मोठेपणीचे महर्षी व्यास! राजा शांतनू आणि सत्यवतीच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन देवव्रत धीवरराज दाशराजांची भेट घेण्यासाठी निघाला.

• भीष्म : विवाह नियोजन भेटीत पोहोचलेल्या देवव्रताने दाशराजा समोर शांतनू राजाचा प्रस्ताव ठेवला. त्याचवेळी दाशराजाने देवव्रतासमोर दोन अटी ठेवल्या. या दोन अटींसाठी देवव्रताने दोन महाभीषण प्रतिज्ञा घेतल्या आणि देवव्रताचा भीष्म झाला! दाशराजांची पहिली अट - 'राजा शांतनूंच्या पश्चात सत्यवतीचा पुत्रच हस्तीनापूराच्या सिंहासनावर बसेल!' ही अट स्वीकारण्यासाठी भीष्मांनी राजसिंहासनाचा त्याग करून, सिंहासनावरील राजाचं दास्यत्व (सल्लागारपद) स्विकारलं!
दाशराजाची दुसरी शंका (अट) - 'भीष्मांनी सिंहासन त्यागलं तरी त्यांची मुले सिंहासन मागणारच. तेव्हा मग सत्यवतीच्या मुलांच राज्यरक्षण कोण करेल?' दाशराजांची ही शंका समुळ नष्ट व्हावी म्हणून भीष्मांनी तिथेच आजन्म ब्रम्हचर्यपालनाची प्रतिज्ञा घेतली! आता भीष्मांचा व त्यांच्या अस्तित्वात नसणाऱ्या मुलांचा धोका दूर झाला आणि राजा शांतनू व सत्यवतीचा विवाह झाला.

• अटळ भीष्मप्रतिज्ञा : भीष्मांनी घेतलेल्या प्रतिज्ञांना मान्यता देऊन दाशराजाने सत्यवती व राजा शांतनूच्या विवाहाला अनुमती दिली. या दोघांना लवकरच चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे दोन पुत्र झाले. सत्यवतीच्या आज्ञेने भीष्मांनी या दोघा राजपुत्रांना शस्त्र, अस्त्र विद्या शिकवली. काळ धावत गेला. राजा शांतनूला देवाज्ञा झाल्यानंतर भीष्मांच्या अधिपत्याखाली चित्रांगदाचा राज्याभिषेक झाला.
सत्तेच तेज बालवयातल्या चित्रांगदाला मानवलं नाही. आधीच हेकेखोर असणारा चित्रांगद राजा झाल्यावर मग्रूर ठरला. अहंकाराने वेढलेल्या चित्रांगदाची भीष्मांनी कानउघडणी केली तेव्हा चित्रांगदाने दिग्विजयाकरिता हस्तीनापूर सोडलं. विजयोन्माद मस्तकात भिनलेल्या चित्रांगदाला 'गंधर्वराजा चित्रांगदाने' यमसदनाला धाडलं. नंतर खुद्द दाशराजा आणि सत्यवतीचा आग्रह असूनही भीष्मांनी हस्तीनापूर न स्विकारता विचित्रवीर्याचा राज्याभिषेक केला. भीष्मांच्या दोन्ही प्रतिज्ञा अटळच राहिल्या!

• पराक्रमी भीष्म : विचित्रवीर्याचा राज्याभिषेक झाला अगदी त्याच वेळी काशीराजाने त्याच्या तिन्ही कन्या - अंबा, अंबिका व अंबालिका - स्वयंवरास उभ्या केल्या. विचित्रवीर्याच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन भीष्म निघणार होते; पण काशीराजाने हस्तीनापूराला निमंत्रणच धाडलं नव्हतं! हस्तीनापूराचा अपमान उरात घेऊनच भीष्म स्वयंवरास पोहचले आणि राक्षसविवाहाला अनुसरून त्यांनी तिन्ही राजकन्यांच अपहरण केलं. स्वयंवरात जमलेल्या महावीरांनी भीष्मांचा रस्ता अडवला आणि विवाहमंडपाची रणभूमी झाली. भीष्मांनी एकहाती सगळ्यांनाच पराभवाची चव चाखायला लावली.
तिथेच बालपणीच्या मित्राशी, राजा शाल्वाशी, त्यांना लढाव लागलं - शाल्वाचा पराभव झाला! हस्तीनापूरात आल्यावर अंबेने गौप्यस्फोट केला. शाल्व आणि अंबा प्रेम बंधनात जखडले गेलेले होते. मित्राचा विश्वासघात केल्याच्या भावनेत भीष्मांनी अंबेला परत सन्मानाने शाल्वाकडे पाठवलं. परंतू अपमानित झालेल्या शाल्वाने अंबेला नाकरलं. तेव्हा 'भीष्मवध' हा एकच ध्यास अंबेने घेतला!

• गुरूशिष्य : शाल्वाने नाकारल्याच खापर भीष्मांच्या माथी फोडूनच अंबा निघाली. तिने पुन्हा कोणतीच वाट स्विकारली नाही. वना-वनातून भटकणारी अंबा त्राण संपून भोवळ येऊन कोसळली. वनातल्या शैखावत्य ऋषींच्या शिष्यांनी अंबेला आश्रमात आणलं. तिथेच तिला परशुराम भेटले. अंबेची कर्मकहानी ऐकून परशुरामांनी भीष्माला बोलावून अंबेचा स्विकार करण्याची आज्ञा दिली. भीष्मांनी नम्रपणे ही आज्ञा नाकारली आणि गुरूशिष्यातील महाभयान युद्धाची ठिणगी पडली.
रणभूमीवर एकीकडे एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेले परशुराम दुसरीकडे त्यांचा शिष्य भीष्म! युद्धाआधी भीष्मांनी गुरूचे चरणस्पर्शून आशिर्वाद ही मागितला, साक्षात माता गंगा सुद्धा भीष्मांच मन वळवू शकल्या नाहीत! युद्धाचा समेट होत नव्हता. गुरूंनी गुरूपण दाखवून भीष्माला जेरीस आणलं तेव्हा अंतीमक्षणी भीष्मांनी प्रस्वापास्त्र सोडण्याची तयारी केली आणि या अस्त्राच्या भयानेच इतर ऋषींनी युद्ध थांबवल! या युद्धात भीष्मांचा विजय झाला! परशुरामांनी प्रयत्न करूनही भीष्मप्रतिज्ञा अटळ राहिली.
(याच अंबेने नंतर तपश्चर्येच्या बळावर, भीष्म वधासाठी, अग्नीसमर्पण केलं. याज्ञसेनी समवेत यज्ञातून आलेला शिखंडी म्हणजेच पुर्वजन्मीची अंबा!)

• प्रतिज्ञामय : परशुरामांसमवेत झालेल्या युद्धाचा निकाल भीष्मांच्या बाजूने लागला असला तरी दैवात काही वेगळीच अक्षरे होती. राजयक्ष्मा विचित्रवीर्याचा प्राण घेऊनच शांत झाला! तोवर अंबिका व अंबालिका दोघींचा विवाह विचित्रवीर्यासोबत झालेला होता. दोन विधवा सुना, एक अडीग पुत्र आणि रिक्त सिंहासन . . . शास्त्रातील वचनांचा आधार घेऊन सत्यवतीने भीष्मांना अंबिका व अंबालिका यांना पुत्रप्राप्तीसाठी सहवास देण्यास सुचवलं. तेव्हा भीष्मांनी महर्षी व्यासांना बोलावण पाठवलं. सत्यवतीचा भूतकाळ माहिती असूनही भीष्मांनी दोन प्रतिज्ञा घेतल्या होत्या! मग सत्यवतीने महर्षी व्यासांना आज्ञा दिली.
'वर्षभरानंतर मी अंबिकेला व अंबालिकेला पुत्र प्रदान करेन' व्यासांनी म्हणनं स्पष्ट केलं; पण तोवर सिंहासन रिक्त राहील या भितीने सत्यवतीने व्यासांना तातडीने पुत्रप्रदानाची आज्ञा दिली. शेवटी भीष्मांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या अंबिका व अंबालिका व्यासांना पाहून भयभीत झाल्या! अंबिकेला धृतराष्ट्र, अंबालिकेला पांडू आणि (अंबिकेने व्यासांना घाबरून शालंकृत करून धाडलेल्या) दासीला विदूर हे तिन पुत्र व्यासांनी प्रदान केले.

• अवहेलना : धृतराष्ट्राने स्वेच्छेने राज्य नाकारलं आणि पांडु राजा हस्तीनापूर सम्राट झाला. नियती खेळ दाखवतच होती. दिग्विजयावरून परतलेला पांडु राजा शिकारीसाठी वनात गेलेला तेथुन माघारी आला तो किंदम ऋषींचा शाप घेऊनच. नंतर पांडुने सर्वसंगपरित्याग घेतला. कुंतीला दुर्वास ऋषींच्या कृपेने चार पुत्र झाले (एक लग्नाआधीचा सुर्यपुत्र कर्ण) युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन याच वरदानाने माद्रीला दोन पुत्र झाले नकुल आणि सहदेव. तिथेच वनात माद्री वर भाळून पांडु राजा शापाचा धनी झाला, पांडु राजासमवेत माद्री सती गेली. कुंती पांडवांसमवेत हस्तीनापूरात आली.
धृतराष्ट्राचे कौरव तोवर सिंहासनाचे अनभिषिक्त सम्राट ठरलेले होते. सिंहासनावर अधिकार गाजवण्याखातर खडाजंगी पेटली आणि भीष्माज्ञा नाकारून सर्वांनीच भीष्मांची अवहेलना सुरू केली.

• पराभव : कुरूकुलाच संरक्षण करण्यासाठी झटत असणाऱ्या भीष्मांचा पराभव झाला कित्येक वेळा! खांडवप्रस्थ पांडवांच्या वाट्याला आलं - भीष्म शांत, पांडवांच इंद्रप्रस्थ हिसकावलं गेलं (यात दोष युधिष्ठिराचा सुद्धा होता!) - भीष्म शांत, द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा साक्षीदार होणं हा भीष्मांचा सर्वात मोठा पराजय होता, त्यानंतर तेरा वर्षांनी पांडवांना अटीनुसार राज्य नाकारलं गेलं - भीष्म शांतच! भीष्मांनी विरोध केला खरा; पण या विरोधाची दखल कौरवांनी घेतली नाही.

• एक प्रेम गाथा : 'चुकीच्या पक्षात लढतोय' हे माहिती असूनही तिथेच लढत राहणे, कशासाठी, तर फक्त घेतलेल्या एका प्रतिज्ञेसाठी? भीष्मांचा आडमुठेपणा त्यांना सिंहासन सोडू देत नव्हता. तिथेच आणखी तीन जीव याच यातना भोगत होते. सुर्यपुत्र कर्ण, विदूर आणि विकर्ण (द्रौपदी वस्त्रहरणाच्या विरोधात वाचा फोडणारा एकमेव वीर!) कर्ण आणि भीष्म या वीरांची एक अनोखी प्रेम गाथा, वीर गाथा आहे. महाभारतातील ही दोन्ही पात्रे सर्वकाही करण्याची क्षमता बाळगून असताना देखील काहीच करू शकत नव्हते!
एकाला प्रतिज्ञेपायी तर दुसर्‍याला मैत्रीपायी हतबलता आलेली. कर्णाला युद्धातून हटवता यावं यासाठी भीष्मांनी हरेक प्रयत्न केले - व्यर्थ. सत्य जाणूनही भीष्मांनी कर्णाचा 'मी सुतपुत्राच्या नेतृत्वाखाली सोडाच सोबतही लढणार नाही' असा अपमान केला. कर्णाने या अपमानाचा स्विकार करून युद्धातून माघार घेतली; पण फक्त भीष्म शरपंजरी पोहोचेपर्यंतच!

• अंत : युद्धात पांडवसेनेला जर्जर करणाऱ्या योद्ध्याचा शेवट या प्रतिज्ञेनिष्ठेपायीच झाला. द्रौपदीला दिलेल्या 'सौभाग्यवती भव' वरामुळे पांडव वाचले (कान्हाच राजकारण!) आणि 'मी बालक, स्री व षंढावर शस्त्र उचलणार नाही' या प्रतिज्ञेमुळे शिखंडीच्या मागे लपून अर्जुनाला भीष्मांवर बाण सोडता आले. (कान्हाच राजकारण!) कृष्णाची शस्त्र त्यागाची प्रतिज्ञा मोडायला लावणारा पराक्रमी वीर अंतीम क्षणी शरपंजरी मरणयातना भोगत होता . . . एका पर्वाचा अंत निकट होता . . .



संपूर्ण समीक्षा वाचून इथपर्यंत आलात म्हणून तमचं अभिनंदन! चारोळीत भीष्म लिहून संपवावे हा विचार सकाळीच केला; पण आज पुन्हा भीष्म वाचावे ही ब्रम्हांडाचीच इच्छा होती! युद्धानंतर भीष्म सुर्य उत्तरायणात जाईपर्यंत बाणांच्या शय्येवरच पहुडले होते. शरीरातील दक्षिण भागातील (कमरेखालचा भाग) प्राण उत्तरेकडून (मस्तक) निघावा यासाठी हे कष्ट! असो या शास्त्रीय माहितीवर पुन्हा कधीतरी!
भीष्म ही व्यक्ती, व्यक्तीरेखा, पात्र माझ सर्वात आवडतं आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. प्रतिज्ञेच निष्ठेने पालन हा त्यातील एक पैलू आहे. बाकी त्यागाच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे भीष्म. सर्वांना जपताजपता स्वत उघड्यावर आलेला हा महावीर! भीष्म-कर्ण ही वीरगाथा सुद्धा मी भविष्यात कधीतरी मांडेनच.
चारदोन पुस्तके वाचून मी भीष्म मांडले. यातूनच इतक काही मिळालय की अजून वाचलं नाही तरी आयुष्य कटेल; पण मी वाचणार आहे! थोडीशी नैतिकता, थोडसं धैर्य आणि मर्यादा शिकवून जाणारे भीष्म आणि त्यांना विस्मरणात घालवणारे आपण हा जादुई विरोधाभास आहे. कोण एक व्यक्ती जिवंतपणी ठोकलेल्या चार खिळ्यांचे दाह सहन करतो ते आपल्याला अविश्वसनीय वाटतं. याउलट भीष्म शरांवर झोपले याबाबत आपण अविश्वासाचा दृष्टीकोन बाळगतो(?)
आयुष्याच्या अंतसमयी, युद्ध समाप्ती नंतर, भीष्मांनी धर्मराजाला धर्म शिकवला! पौराणिक पात्रे वाचून भागत नाही तर तिथून काहीतरी उचलावं लागतं, जीवनात अनुभवाव लागतं, असो. असेच चुरशीचे प्रश्न दररोज मिळतील इतक आपलं भाग्य कुठलं?
थोडसं पुरूषी मानसिकतेविषयी बोलूयात. 'प्राण जाये पर वचन न जाये' असा विचार करणारी पुरूषी मानसिकता जीवनात लवचिकता येऊ देत नाही - मग भले कितीही त्रास होवो! भीष्मांनी घेतलेल्या प्रतिज्ञा कधीच मोडीत काढल्या असत्या तर महाभारत घडलच नसतं. भीष्मांनी ब्रम्हचर्यपालनाची प्रतिज्ञा घेण्याची गरज नव्हती, थोडासा अंहभावना दुखावली म्हणून स्वयंवरातून तिघींना आणायला नको होतं, व्यासांऐवजी स्वत पुत्र प्रदान करायला हवे होते; पण मग मुळ प्रश्न उठतो 'प्रतिज्ञे पासून ढळणारा भीष्म अजरामर झाला असता का?'
ही अडेलतट्टू पुरूषी मानसिकता फक्त भीष्मांमधे नव्हती. कर्ण, दुर्योधन इतकच काय तर युधिष्ठिरात ही होती. पुरूषी मानसिकतेला बळी पडून स्वतःच नुकसान करून घेणारे वीर भरपूर सापडतात, अगदी आजही. त्यातून काहीतरी शिकून जीवनात थोडीशी लवचिकता आणण्यातच शहाणपण आहे!

धन्य तो देवव्रत, धन्य ते भीष्म!


[ कोणत्याही जात, धर्म किंवा व्यक्तीला दुखावण्याचा हेतू नाही. जर असं काही आढळल तर आधीच माफी मागतोय, क्षमस्व — आपलाच रंगारी ]