Victims - 16 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - १६

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

बळी - १६

बळी - १६
अनामिक भीतीने केदारला ग्रासलं होतं. आता तर दिवसाही त्याला भास होत होते. त्याने डाॅक्टर श्रीकांतना याविषयी सांगितलं.
डाॅक्टर हसून म्हणाले,
"तुला कोणतेही भास होत नाहीत; तर बहुतेक तुला पूर्वयुष्यातले काही प्रसंग आठवू लागले आहेत! कोणती तरी भीती तुझ्या अंतर्मनाला भेडसावत आहे! पण शांत रहा! इथे तू पूर्णपणे सुरक्षित आहेस, घाबरण्याचं कारण नाही! आणि हे तुला स्वतःलाच ठामपणे सतत सांगत रहावं लागेल! तू लवकरच पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहेस! पण हाच कालावधी तुझी परीक्षा घेणार आहे; कारण तू दोन काळांच्या उंबरठ्यावर उभा आहेस! तुझ्या सुप्त अंतर्मनात ज्या आठवणी कोरल्या गेल्या आहेत; त्या आता तुझ्यासमोर येण्याचा प्रयत्न करत आहेत! तुला स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवावा लागेल! आणि मन भरकटणार नाही; याची काळजी घ्यावी लागेल. "
डाॅक्टरांच्या या सूचनेचं केदार काटेकोरपणे पालन करू लागला. हे फक्त भास आहेत असं तो स्वतःला समजावत होता. प्रयत्नपूर्वक मन शांत ठेवत होता.
निशा नेहमीप्रमाणे त्याच्या औषधपाण्याची काळजी घेत होती. त्याच्याशी खेळीमेळीने वागत होती; पण तिच्यामध्ये काहीतरी बदल केदारला जाणवत होता. तिच्या वागण्या-बोलण्यामध्ये त्याला काहीसा कोरडेपणा जाणवत होता. त्याचं लग्न झालेलं असण्याची शक्यता प्रमिलाबेननी बोलून दाखवल्यापासून ती प्रयत्नपूर्वक स्वतःच्या मनावर निर्बंध घालत होती. रजनीने वरवर कितीही दाखवलं, तरीही त्याचं मनही आपल्याकडे ओढ घेत आहे हे तिने ओळखलं होतं. पुढे जाऊन स्वत:च्या आणि त्याच्या आयुष्यात आपल्यामुळे कोणतीही गुंतागुंत तिला नको होती. मृगजळाच्या मागे धावायचं नाही; असं तिने स्वतःच्या मनाला बजावलं होतं.
*********
ठरल्याप्रमाणे शाम शनिवारी संध्याकाळी केदारला घेऊन गेला. त्याच्या सूचनांप्रमाणे क्लासची सगळी तयारी केली गेली. रविवारी संध्याकाळी उद्घाटन झाल्यावर फार थोडा वेळ त्याचं लेक्चर झालं. मुलांना काॅम्प्यूटरचे बेसिक नियम सांगताना त्याने मुलांना महत्वाची गोष्ट सांगितली; ती म्हणजे,
"काँम्प्यूटर कितीही मोठी कामे करत असला, तरी ह्या मशीनकडून काम करून घेणारा माणूसच असतो! जर त्या माणसाने काम प्रामाणिकपणे आणि हुशारीने करून घेतले तरच काॅम्प्यूटर काम नीट करतो, अन्यथा एखादी कमांड जरी हेतुपुरस्सर अथवा नजरचुकीने चुकीची दिली गेली, तर संपूर्ण काम चुकीचं होतं; आणि मशीनचं काम म्हणजे बरोबरच असणार, असा विश्वास ठेवून डोळे मिटून ग्राह्य धरलं जातं! यासाठी काॅम्प्यूटरवर काम करताना, विशेषत: कमांड देताना अत्यंत सजग राहून काम केले पाहिजे. शिवाय इथे प्रॅक्टिसला खूप महत्व आहे! जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल; तेवढी काॅम्प्यूटरची कार्यप्रणाली तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल."
त्या दिवशी त्याने मुलांना जवळ बसवून त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांची शाळा, अभ्यासाचे विषय, यांचा विषयी इयत्त्ता याविषयी माहिती घेतली. तिथल्या कार्यकर्त्यांना इयत्तांप्रमाणे मुलांच्या शनिवार आणि रविवारी एका तासाच्या दोन बॅचेस करायला सांगितल्या, म्हणजे शिकवायला सोपं होणार होतं, आणि मुलंही काही अडलं तर एकमेकांशी बोलू शकणार होती.
पुढच्या आठवड्यात शनिवारी क्लास व्यवस्थित पार पडला. नवीन काॅम्प्यूटर इन्स्ट्रक्टर मुलांना खूपच आवडले. त्यांची कठीण गोष्टी सोप्या करून सांगण्याची पद्धत तर खूपच आवडली. बरीचशी मुलं मराठी मिडियममध्ये शिकणारी होती, पण त्यांची आकलनशक्ती खुपच चांगली होती. मुलांना शिकवताना केदारला वेगळाच आनंद मिळत होता. त्यावेळेपुरते त्याच्या मनावरचे सगळे ताण दूर झाले होते.
दुस-या दिवशी वरच्या वर्गातल्या मुलांचा तास होता, पण त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही, हे केदारला स्पष्ट दिसत होतं. त्यांचे एकमेकांना इशारे चालले होते. सारखं घड्याळाकडे लक्ष जात होतं. शेवटी न राहवून केदारने त्याविषयी विचारलं. एक मुलगा म्हणाला,
" सर! गेल्या महिन्यातच आम्ही आजच्या दिवशी समुद्र- सफरीचा बेत केला होता; क्लासचं नंतर ठरलं! सहाच्या नंतर गेलो, तर खूप उशीर होईल! प्लीज! आजच्या दिवस लवकर सोडाल का?"
"पण तुम्हाला मुलांना सोडायला आई-वडील तयार कसे झाले? मी जरा तुमच्या शाम काकांशी बोलतो!" केदार काळजीने म्हणाला. त्याने शामला फोन केला.
"ती मुलं एकटी नाही जाणार! आम्ही दोघे तिघे त्यांच्याबरोबर जाणार आहोत! ज्याची लाँच घेऊन जाणार आहोत; तोही बरोबर आहे! आज पौर्णिमा आहे! खूप सुंदर वातावरण असेल! रजनी! -- तू सुद्धा चल आमच्याबरोबर ! तू आलास तर आणखी मजा येईल! येतोस का? मी तुला विचारायला थोड्या वेळाने येणारच होतो!" शाम म्हणाला.
"पण तुम्हाला परत यायला रात्र होईल! प्रमिला मॅडम उगाच घाबरून जातील! तुम्ही जा! मी नाही येऊ शकत! तू आज मला सोडायला नको येऊ; मी टॅक्सी करून घरी जाईन! " केदार म्हणाला.
"त्यांची काळजी तू करू नकोस! मी त्यांना फोन करून सांगतो! तू आमच्याबरोबर समुद्रावर जातोयस ह्याचा त्यांना आनंदच होईल!" शाम म्हणाला.
"मीच त्यांना फोन करून त्यांची परमिशन घेतो!" केदार म्हणाला.
त्याने फोन केला तेव्हा त्या म्हणाल्या,
"खूप दिवसांनी असा बाहेर जातोयस! खूप मजा कर; पण जर जास्त उशीर झाला, तर शामच्या घरी झोप, आणि सकाळी ये! उगाच रात्रीच्या वेळी त्याला येरझा-या नकोत!"
"माझं जेवण करू नका असं शांता मावशींना सांगा! इथे शामने जेवणाची व्यवस्था केलेली आहे!" केदार म्हणाला.
"रजनी! रात्रीच्या वेळी जातोयस! काळजी घे!"
प्रमिलाबेनना तो रात्री समुद्रावर जातोय; हे ऐकून खरोखरच काळजी वाटत होती. त्याच्या नजरेसमोर येत होता सी- फेसवर रात्रीच्या वेळी पहिल्यांदा पाहिलेलेला, रक्तबंबाळ अवस्थेत असहाय पडलेला रजनीकांत!
********
आठ-दहा मुलं आणि चार तरूण सहाच्या सुमारास लाँचवर चढले. मुलं खूप खुश होती. हसत होती- गाणी म्हणत होती -- विनोद करत होती जणू काही समुद्राचा वारा त्यांच्या कानात शिरला होता. सरांची सगळे विशेष सरबराई ठेवत होते. आजचा तो सन्माननीय पाहुणा होता. शेवटी केदारने त्यांना सागितलं,
" तुम्ही मला अशी वेगळी वागणूक दिली; तर या ट्रिपची सगळी मजा निघून जाईल! तुम्ही मला तुमच्यातलाच एक समजा! हा काही क्लास नाही! आणि इथे हा शाम, संदीप माझे मित्र आहेत! तुम्हीही आज माझे मित्र बना! हा सोनेरी समुद्र-- त्यावर डुलणारी ही लाँच --- ही सुंदर हवा ---आपण सगळे एन्जॉय करूया!"
थोड्या वेळाने भरतीच्या लाटांवर होडी हेलकावे घेऊ लागली. सगळे कठड्यावर लाटा बघायला जमले!
समुद्राचं उसळणारं पाणी बघून शाम म्हणाला,
"आज पौर्णिमा आहे; समुद्राला भरती असणारच! त्यासाठीच तर ही समुद्रावरची सफर ठरवली आहे! थोड्या वेळाने बघा; निसर्गाचं किती अलौकिक रूप पहायला मिळेल!
पण केदार आता अस्वस्थ होऊ लागला होता. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला,
"पण या लाटा वाढल्या तर? मला तर विचारानेच भीती वाटतेय! मी आत जाऊन बसतो!"
"आपण सगळेच आत बसूया! संदीप! ते वेफर्स - समोसे --- चहा सगळं बाहेर काढ! मुलं क्लासमधून परस्पर आली आहेत! त्यांना भूक लागली असेल!"
सगळ्यांनी गरम समोसे आणि इतर खाद्यपदार्थांचा मनसोक्त समाचार घेतला.
संध्याकाळ सरून रात्र कधी झाली हे कोणालाच कळलं नाही. शामने हाक मारून सगळ्यांना कठड्यावर बोलावलं.
"पौर्णिमेच्या दिवशीचं समुद्राचं हेच रूप मला खोल समुद्रातून बघायचं होतं; म्हणून आजची सफर मी ठरवली, आणि तुम्ही सगळे आत बसून काय करताय? बघा ! ही थंड हवा-- हा उचंबळणारा चांदीचा रस आणि त्यावर डुलणारी आपली बोट! जादूच्या गोष्टीतल्या जगात गेल्यासारखं नाही वाटत तुम्हाला? आपण थोडा वेळ इथेच वेळ घालवूया! नाहीतरी थोड्या वेळाने परत फिरावं लागणार आहे!" तो म्हणाला.
"शामकाका! आपण आणखी थोडा वेळ फिरूया नं! अगदी आताच निघालोय असं वाटतंय!" मुलं म्हणाली.
"एवढाच वेळ आपल्याला परत जाताना लागणार आहे! तुमचे आई-बाबा फार रात्र झाली तर काळजी करतील! थोड्याच वेळात आपण परत फिरणार आहोत!" शाम म्हणाला.
थोड्याच वेळात बोट परत फिरली. आता सगळ्यांना घरचे वेध लागले होते. मुलं आत जाऊन थोडी मजा- मस्ती करू लागली. खायला काही शिल्लक आहे का-- ते शोधू लागली! मोठे सामानाची आवरा -आवर करू लागले! केदार मात्र तिथेच उभा राहून कानावरून सणसण करत जाणा-या वा-याने धुंद होऊन उभा होता. त्याला खूप मोकळं वाटत होतं. खुलं वातावरण-- मुलांचं हसणं-- तरूणांचे जोक्स -- तो खुप दिवसांनी अनुभवत होता. त्याचं मन पिसासारखं हलकं झालं होतं. कदाचित् मुलांच्या सानिध्यामुळे आणि उत्साही वातावरणामुळे असेल-- पण आता त्याला समुद्राच्या लाटांची भिती वाटत नव्हती!
आता बोट मागे फिरली होती. पुर्वेकडे उगवलेलं ठसठशीत चंद्रबिंब त्याला दिसू लागलं. हे चंद्रबिंब --- फेसाळणारा समुद्र -- मी कधीतरी बघितलाय-- अगदी जवळून--- पण कधी? तो आता हळूहळू स्वप्नांच्या दुनियेत जाऊ लागला. --- समोर वरळी सी लिंक दिसू लागला! लांब रस्त्यावर -- सी लिंकवर गाड्या पळत होत्या! ---
"हे सगळं मी कधीतरी पाहिलंय! पण कधी?" केदार विचार करत होता.
तेवढ्यात मागून दोन सावल्या आल्या! एकाने त्याचा दंड पकडला आणि दुस-याने खांद्यावर हात ठेवला!
केदार मोठमोठ्याने ओरडू लागला; "मला मारू नका! समुद्रात ढकलू नका! वाचवा! मला वाचवा कोणी तरी!"
आणि तो चक्कर येऊन खाली पडला.
सगळेजण धावत आले. त्याच्या बाजूला उभे असलेले शाम आणि संदीप हबकून गेले होते. ते म्हणाले,
"आम्ही रजनीला सांगायला आलो होतो; की किनारा जवळ आलाय! थोड्याच वेळात आपण बोटीतून उतरणार आहोत; आत चल!--- पण खांद्यावर हात ठेवताच तो ओरडू लागला आणि बेशुद्ध पडला! इतका का घाबरला? --- काही कळत नाही! आता प्रमिलाबेनना काय सांगू?"
******** contd. -- part 17.