काल खेळता खेळता माझा तीन वर्षांचा मुलगा पडला, थोडं लागलं त्याला...एक तर तो रडला की सगळं घर डोक्यावर घेतो याचं टेन्शन मला आणि त्यात त्याला लागलं हे वेगळं...मी त्याला समजवत असताना त्याच रडणं कमी झालं, अर्थात थांबलाच...अस तर छोट्या छोट्या गोष्टींवर हंबरडा फोडणारा हा आज का इतक्या लवकर शांत झाला मला याच आश्चर्य वाटत होतं...त्याला विचारलं की दुखत आहे का जास्त तर बोलतो, "मम्मा, दर्द हो रहा है, लेकिन मै गर्ल नही हूं रोने के लिये...मै स्ट्रॉंग बॉय हूं..." तो असं बोलल्यावर माझ्यातल्या आईला खूप कौतुक वाटलं की माझा एवडूसा चिमुरडा किती मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागला, आणि मी पण निरुपा रॉय स्टाईल माझ्या डोळ्यातील दोन थेंब पाणी पुसत "हाय मेरा बच्चा" म्हणत त्याची नजर काढली...माझ्यातल्या आईने तर त्याच कौतुक केलं, पण जेव्हा एक मुलगी होऊन विचार केला तेंव्हा वाटलं की काहीतरी चुकीचं बोलला तो...! मी नक्कीच काहीतरी चुकीचं शिकवलंय त्याला....खूप विचार करून लक्षात आलं मुद्दा काय आहे...
आपल्या कडे आपण मुलांना हेच शिकवतो की मुलांनी रडायचं नाही, रडणं हे फक्त मुलींचं शस्त्र आहे, मुलं तर जन्माला आल्यापासूनच बहादूर असतात, त्यांना काही त्रास होत नाही, दुःख होत नाही, जर तो रडला किंवा त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या तर ही त्याच्या साठी शरमेची बाब आहे..आणि हे सगळं मुलांच्या 'मॅचो' इमेज ला शोभत नाही...आणि त्यामुळेच आपण त्यांना हे शिकवत राहतो की 'मर्द हो दर्द नहीं होता..'..आणि हे त्यांच्या मनावर अश्या प्रकारे बिंबवलं जातं की ते पण स्वीकार करतात ही गोष्ट की भावना व्यक्त करणं हे कमजोरीच लक्षण आहे....
हीच गोष्ट मनात ठेवून ते मोठे होतात, जबाबदार पुरुष ही होतात पण फक्त भावना व्यक्त नाही करू शकत म्हणून कदाचित पाषाण होतात...सायकॉलॉजी म्हणते जर खुप काळ आपण आपल्या भावना दाबून ठेवल्या, व्यक्त नाही झालो तर त्याचा उद्रेक होतो...मग का उद्रेक कधी कधी चांगले परिणाम ही घडवून आणतो तर कधी विपरीत परिणाम ही होतात...तस तर बेसिक इमोशन हे मनुष्य जातीला निसर्गाने दिलेले वरदान आहे, पण जर सायकॉलॉजीच्या अनुषंगाने जर बघितलं तर राग, प्रेम, आनंद, मत्सर, दुःख, या सगळ्या भावना स्त्री आणि पुरुषांमध्ये समान बाबतीत निर्माण होत नाहीत किंवा जितक्या सहज स्त्रिया व्यक्त होतात तितक्या सहज पुरुष होतं नाही...आणि याच सगळ्यात मूळ कारण हे की त्यांची जडणघडण वेगळ्या पध्दतीने होते...आपल्या कडे हेच शिकवल्या जातं की पुरुष हे भावनिक, शारिरीक, मानसीक दृष्टीने कधीही बलवान असतात... आणि यामुळे होतं काय की फक्त लोकं काय म्हणतील किंवा समाज काय म्हणेल या ओझ्याखाली पुरुष कधीच व्यक्त होत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात होतात, त्यांना कितीही त्रास असेल तरी ते मनात दाबून ठेवतात, कालांतराने 'सायलेंट पेन' च्या नावाखाली सगळंच दाबत राहतात आणि स्वतःच मानसिक खच्चीकरण करत राहतात.....
आपण हे का समजून घेत नाही की फक्त मनातलं वादळ बाहेर निघू नये या दडपणाखाली ते जगत असतात...जे हे सहन करू शकतात ते संवेदनशील निघतात, आणि ज्यांना सहन होत नाही किंवा जिथे भावनांचा उद्रेक होतो ते लोकं वाईट कृत्य करतात...आणि यासाठी जबाबदार काय आहे तर लहानपणापासून जे आपण सांगत राहतो की मुलं रडत नसतात किंवा हे काम मुलींचं आहे...आणि ही जे असमानता निर्माण करतो त्यातूनच स्त्री पुरुष मतभेद सुरू होतात....
माझ्या आयुष्यात माझे बाबा, भाऊ, नवरा, मित्र प्रत्येकाने मला भरभरून प्रेम दिलंय, जीव ही लावला आहे पण कुठेतरी हे जाणवते की एक जबाबदार पुरुष म्हणून हे लोकं छोट्या छोट्या गोष्टी व्यक्त करायला टाळतात किंवा त्यांना असं वाटतं की जर त्यांनी त्यांचे टेन्शन सांगितले तर ते त्यांच्या जवळच्या लोकांसमोर कमजोर पडतील...
मला नेहमी वाटतं की एका मुलीची आई होण्यापेक्षा एका मुलाची आई होणं खूप कठीण काम !! ....आपण ज्या समाजव्यवस्थेत राहतो तिथे मुली कस राहायचं, ताण कसा सहन करायचा किंवा तो मनात ठेवून कस जगायचं हे आपणहून शिकून जातात...आणि कोणाविषयी आपल्या संवेदना कश्या दाखवायच्या हे मुलींना बरोबर कळतं, कारण आपली संस्कृती तशी आहे...याऊलट मुलांसाठी नियम वेगळे असतात, खूप छोट्या गोष्टी साठी ही तो मुलींपेक्षा कसा वेगळा हे सांगितले जाते...पण खरं तर मुलांना हे शिकवण गरजेचं असते की भावना जश्या मुलींना असतात तश्या मुलांनाही असतात...कधी जर त्या भावना प्रेमातून, आनंदातुन किंवा कधी डोळ्यावाटे बाहेर पडल्या तर त्यात काहीच गैर नाही...भावना व्यक्त करणं हे कमजोरीच नाही तर मनुष्यपणाचं लक्षण आहे...उगाच घरच्यांसमोर किंवा आपल्या लोकांसमोर 'स्ट्रॉंग' दाखवून हा 'सायलेंट पेन' सहन करणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे....
-----------------------------------------------------------------
समाप्त.