Prayaschitta - 18 in Marathi Fiction Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | प्रायश्चित्त - 18

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

प्रायश्चित्त - 18

सकाळी उठली म्हणण्यात अर्थ नव्हता. झोपलीच कुठे होती? पण बेडवरून उठली. केतकीचा डबा केला. तिला मधेच येऊन उठवून गेली. केतकीने शहाण्या मुलीसारखं पटापट आवरलं सगळं. शाल्मली ला ती गप्प गप्प आहे हे जाणवलं.

काल केतनला आपण किती मोठं लेक्चर दिलं नि आता आपणही तसंच वागतोय की. मग तिने केतकीचे केस विंचरून देताना तिला म्हटलं, “केतकी आता कांचनला घरी सोडतील तेव्हा तू पण जाशील घरी. मग आम्हाला खूप आठवण येईल तुझी. तू येशील ना आम्हाला भेटायला?”

केतकी काही कळायच्या आत मुसमुसून रडायलाच लागली. बिलगलीच तिला. “आंटी, डॅडला सांगून मला इथेच ठेऊन घेना. मी कसलाच त्रास नाही देणार तुला. मी सगळी मदत करेन. प्लीज सांग ना गं डॅडला.”

“बेटा, हे बघ, कांचन तुला किती मिस करेल घरी? आणि डॅड पण. त्यालाच तुझ्या मदतीची खूप गरज आहे आता. आणि मी श्रीशला घेऊन भेटायला येणारच आहे तुला अधून मधून हो की नाही?”

“मला नाही जायचय तिकडे.”

केतकी अगदी बारीक तोंड करून म्हणाली.

“हे बघ, सध्या ते राहू दे. आधी आपण आज मस्त सेलिब्रेट करू तुझा इथला दिवस. तुला काय आवडतं ते करू खायला.सांग बरं.”

“नकोय मला काही” फुरंगटून म्हणाली केतकी.

“बरं, नको तर राहीलं. मीच खाईन करून मग पिझा. तू आपली पोळी भाजीच खा.”

“अं.......काय गं आंटी?”

शाल्मली हसायला लागली मग.

“आणि दुसरं काय करूया? तुला मस्त ड्रेस आणूया का? तुला, कांचनला आणि श्रीशला सेम कलरचे, चालेल?” यावर मात्र केतकी ने जोरजोरात मान हलवली. चला एक कळी तर खुलली.

केतकी ला स्कूलबसला सोडून ती श्रीशला आईकडे सोडून आली. काल दिनेशने पाठवलेल्या काही गोष्टी तिला चेक करायच्या होत्या. त्या ती घेऊन बसली. पाहता पाहता बरेच मुद्दे निघाले. महत्वाचे आहेत. सांगायलाच हवेत लगेच म्हणून तिने दिनेशला फोन लावला तर तो क्लायंटकडे गेल्याचं कळलं. मग तिने प्रशांतला फोन ट्रान्सफर करायला सांगितलं. प्रशांत लाईनवर येताच तिने विचारलं “सर, दिनेश कुठल्या क्लायंटकडे गेलाय?”

“का गं? काय झालं? तो त्याच्या आधीच्या क्लायंटकडे गेलाय. शेवटचं पेमेंट द्यायला कटकट करत होते. मग हाच गेला.”

“ओह, ओके.”

“काय झालं?”

“नाही काही नाही. बोलेन मी नंतर त्याच्याशीच.”

“बरं, ठीक आहे.”

“शाल्मली , जरा वेळ काढू शकशील? मला बोलायचय तुझ्याशी. इट्स पर्सनल.”

“सर, ......”

“हे बघ शाल्मली, तुला एकदा मला भेटायला काहीच अडचण नसावी. हो ना? तितकं तू ओळखतेस मला? काय?”

“हो हो सर. तसं नव्हे पण ......सर आज दुपारी जमेल तुम्हाला?”

प्रशांतला आश्चर्यच वाटलं. “हो तू म्हणशील तेव्हा आणि तिथे.”

“करते मी फोन.”

“गुड.”

तिनं भराभर कामं उरकली. श्रीशला घेऊन आली. शंतनूला फोन केला. “तू कुठे उतरला आहेस?”

“हॉटेल कोहीनूर”

“मी जरा ऑफिस मधे जाणार आहे. माझे बॉस प्रशांत, खूप मदत केली त्यांनी माझ्या कठीण काळात. लंचला ये म्हणाले. त्यांच्यासोबत जातेय. श्रीशला तुझ्याकडे सोडून जाईन. सांभाळशील?”

शंतनूच्या मनात हजारो निरनिराळ्या विचारांनी गर्दी केली.

‘शाल्मली माझ्या एकट्याकडे श्रीशला सोडायला तयार झाली. म्हणजे माझ्यावर अजूनही थोडा का होईना विश्वास आहे तिचा.’

‘हा बॉस आहे काय वयाचा?’ शंतनू, तुला तिला आनंदी पहायचय ना मग? बरीच मदत केलीय म्हणते म्हणजे चांगलाच असेल. हीच तुझी परीक्षा आहे. बघू पास होतोस की नापास. माझी शाल्मली ..... तिला दुसरा कोणी आवडायला लागलाय का?’

हजार उलट सुलट विचार.

“हॅलो......”

“ओह, सॉरी, हो हो, सांभाळेन ना, म्हणजे तू सांगशील ना काय करायचं ते?”

“हो सांगेन.”

“हे बघ मी तिकडेच येतो, तुम्हाला पिक करतो. तुला सोडून आम्ही हॉटेलवर येऊ. श्रीशची पण राईड होईल. बेबी सीट मधे बसेल ना?”

“हो केलीय दादा ने सवय.”

“मग ठीक आहे. किती वाजता?”

“अजून अर्ध्या तासाने ये.”

“ओके”

मग प्रशांतला तिने वेळ आणि जागा सांगितली.

शाल्मली कपाटासमोर उभी राहिली. अबोली रंगाची साडी काढली नेसायला. बऱ्याच दिवसांनी नेसली ती साडी. मॅचिंग कानातले घातले. मंद परफ्युम फवारला. स्वत:लाच आरशात पहाताना आश्चर्य वाटलं तिला. किती वेगळे दिसतोय आपण.

‘कुणासाठी चाललय हे शाल्मली?’ तिच्या मनाने जाब विचारला. ‘स्वत:साठी’‘ खोटं.’प्रशांतला अधिक मोहात पाडायचय तुला? की शंतनूला अधिक जळवायचय? स्त्री आहेस, तुझ्या मनातलं त्या बिचाऱ्या पुरूषांना नाही कळायचं पण मला माहीत आहे.’

स्वत:च्या छबीकडे एकटक पाहिलं तिने मग. जणू ‘माझ्यापासून नाही लपून राहणार तुझं काहीच’ असच म्हणत असावं तिला तिचं मन. मग हट्टालाच पेटल्यासारखं पोवळ्याच्या रंगाचं लिपस्टीक तिने ओठांवर फिरवलं. तिच्या या एका छोट्याश्या कृतिने तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं. मग कळत न कळत आय लायनर .... बस झालं.

आता कधीही शंतनू बेल वाजवेल. ५ मिनिटात वाजलीच बेल.

दार उघडताच शंतनू दारातच थबकला. नकळत श्वास खेचला त्याने वर. ‘ओह गॉड!’ आत्ता कळलं इतके दिवस काय वेगळं वाटत होतं. बुद्धीमान शाल्मली स्वत:ला त्या गबाळ्या वेशात लपवत होती.

ही अशी भेटणार त्या बॉसला? डोकं गरम झालं त्याचं.

‘शंतनू , आवर स्वत:ला. परीक्षेत पास व्हायचय तुला. मुलाला आणि निदान शाल्मलीच्या विश्वासाला जिंकायचय ना? मग शांत रहा. हेच तुझं प्रायश्चित्त आहे.’

मग त्याने जाणीवपूर्वक लक्ष श्रीशकडे वळवले. “याला भूक वगैरे लागली तर? काय देऊ?”

“हॉट चॉकलेट आवडीने पितो. काही बिस्किटस् आणि फळांच्या फोडी आहेत डब्यात, फक्त घाईने कोंबतो तसं करू नाही द्यायचं. हाताने एक एक फोड भरवायची. हात स्वच्छ धुवून भरवायचं.”

“येस मॅम”

“चला राजे, आता आपण मज्जा करायची.”

“काही खेळणी पण आहेत बॅगेत. कान खाजवत नाही इकडे लक्ष ठेव. तसं नाहीच खाजवत तो पण तरीही.”

“हो, नक्की. तू निश्चिंत पणे जा. काही काळजी नको करूस. मी व्यवस्थित सांभाळेन त्याला. फक्त तुझी आठवण काढून रडला तरच....”

“मग मला फोन कर”

‘तुझी माझी दोघांचीही परीक्षा रे बाबा श्रीश!’ मनातल्या मनात शंतनू म्हणाला.

तिघे निघाले. शाल्मलीने जिथे सांगितले तिथे त्याने गाडी थांबवली. क्षणार्धात जवळपासच्या सर्व तरूण पुरुषांचं स्कॅनींग झालं. पण शाल्मलीला अपील होईल असा कोणी दिसला नाही याला. ‘वा भले, म्हणजे शाल्मलीला वाट पहायला लावणारा आहे की काय? बॉस झाला म्हणून काय झालं?’

आता तिथे अधिक थांबणं बरं दिसलं नसतं. तरी “श्रीश चला जायचं का आपण की थांबायचं?’ असं म्हणून झालंच त्याचं.

“नाही निघा तुम्ही.” शाल्मलीने म्हटलं तसं गाडी वळवली शंतनूने.

शाल्मली आत शिरली. कोपऱ्यातल्या टेबल वर प्रशांत बसला होता. ती गेली तिथे. त्याची नजर वर गेली नि पाहतच राहिला तो. उठून तिचं स्वागत करण्याचं भानही नाही राहिलं त्याला.

‘ओह माय माय......’

मग अचानक जाग आल्यासारखा तो ऊठून ऊभा राहिला. शाल्मली बसली समोर.

“बराच वेळ वाट पहायला लागली का सर?”

“एवढं सुंदर माणूस येणार असतं तेव्हा अशी थोडी वाट पहावीच शाल्मली.”

“थॅंक यू सर,”ती किंचित हसली.

“हा कायापालट कसा?”

“ही नॉर्मल शाल्मली आहे सर. तुम्ही ऑफिस मधे पाहायचात ती जाणीवपूर्वक केलेली वेशभूषा होती.”

“हं, हं! इन्टरेस्टींग.”

“मग आज नाही कराविशी वाटली ती वेशभूषा?”

“नाही सर, तुम्हाला चांगली ओळखते मी आता. माझ्या हितचिंतकांबरोबर त्या वेशभूषेची गरज नाही.”

“हं, गुड.”

“आता या शुभचिंतकाला अधिक काही होण्याची इच्छा आहे हे माहितच आहे तुला. त्यात काय अडचण आहे हे सांगण्याचा प्रयत्न कर. तोपर्यंत मी काही स्टार्टरस, सूप वगैरे मागवतो.”

ती गप्पच बसली. ऑर्डर देऊन झाल्यावर त्याने परत मोर्चा तिच्याकडे वळवला.

मग काहीसा गंभीर होत प्रशांत म्हणाला, “शाल्मली मी पुढच्या महिन्यात वयाची ३५ पूर्ण करेन. माझ्या आयुष्यात अगदीच काही स्त्रिया आल्या नाहीत असं नाही. पण आयुष्याची जोडीदारीण म्हणून कोणीच वाटली नाही. आई वडील लहानपणीच गेले. लांबच्या आत्याने होस्टेलवर ठेवले. तिथेच लहानाचा मोठा झालो. सगळीच नाती फक्त आणि फक्त देवाण घेवाणीवर चालतात असाच अनुभव होता. मी नोकरीत आल्यावर मात्र मी हे स्वत:पुरतं बदललं. मिळणारा पैसा, हुद्दा आणि काम यांचं गणित घालत बसलो नाही. भरपूर मेहनत केली. कंपनी स्वत:चीच असल्यासारखं जीव तोडून काम केलं. त्याचा मोबदला न मागताही मिळत गेला. हाताखालच्या माणसानाही हे शिकवण्याचा सतत प्रयत्न केला. मित्र भरपूर मिळाले. नाव हुद्दे आपोआपच चालत आले. मग इथे आल्यावर तू भेटलीस आणि आपल्यासारखच आतून स्वयंप्रेरित होऊन कोणीतरी काम करतंय हे पाहून प्रचंड आनंद झाला. असं वाटलं ही नक्की आपल्याला समजून घेऊ शकेल. आपली बौद्धिक, मानसिक सर्वच पातळ्यावर तार जुळेल. मग श्रीश बद्दल कळलं. तुझ्याविषयीचा आदर प्रचंड दुणावला. तुला माझं तुझ्याजवळ खेचलं जाणं कळतंय आणि तरीही तू प्रतिसाद देत नाहीस हे लक्षात येऊनही मी माझ्या भावना लपवून ठेवायचा प्रयत्नही केला नाही. पण मग तू स्पष्टच बोलून या गोष्टी पुढे जाऊ शकत नाहीत म्हणालीस. श्रीशच्या शस्त्रक्रियेचा ताण होता तुझ्यावर. आता तू त्यातून बाहेर आली असावीस असा कयास आहे. निदान मला कारण तरी कळू दे.”

शाल्मली काही बोलणार तेवढ्यात ऑर्डर आली. वेटर गेल्यावर शाल्मली म्हणाली

“सर, माझं लग्न झालय. मला एक मुलगा आहे. आणि मी आणि माझा नवरा एकमेकांपासून विभक्त झालो आहोत हे तुम्ही जाणताच. आम्ही का विभक्त झालो ती एक मोठी स्टोरी आहे. पण ते महत्वाचं नाही. एखादी स्त्री जेव्हा लग्न करते ना तेव्हा ती सर्वस्व देते त्या नात्यासाठी, घरासाठी. आणि नातं तुटलं तर ती पुन्हा कधीच पूर्वी सारखी जोडली जात नाही. काहीतरी तिच्यात तुटलेलंच राहतं. नोकरी आणि लग्न यात हा एक फार मोठा फरक आहे.

तुमच्या सारख्या माणसाला कोणीही हसत हसत हो म्हणेल. खरतर शहाणी असेन तर मी ही म्हणायला हवं. पण मलाच फक्त कल्पना आहे की हे किती एका बाजूला झुकणारं नातं होईल.

सध्या श्रीश, ही माझी सर्वप्रथम प्राथमिकता आहे. मग माझी नोकरी. त्यानंतर बाकीचं. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात तिसऱ्या क्रमांकावर स्थान असणं हे काही चांगलं लक्षण नाही पुरूषाच्या दृष्टीने.

प्रत्येक लग्नात स्त्री पुरूष दोघही ही शिडी उतरतात पण तेव्हा ते त्यांच्याच मुलांना प्राथमिकता देण्यासाठी असतं. आणि पूर्वी दोघांनीही एकमेकांच्या आयुष्यात प्रथम स्थान अनुभवलेलं असतं.

त्यातून श्रीश समोर आणि पर्यायाने माझासमोर सध्या मोठं आव्हान आहे त्याला ऐकू येणं आणि पुढे जाऊन त्याला बोलतं करणं. मिळणारा प्रत्येक मोकळा क्षण मला कदाचित यासाठीच वापरावा लागेल. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचारही करायला माझ्याकडे वेळ नसेल. मग नवं नातं हा ठार वेडेपणा नाही का होणार? आज तुम्हाला माझ्याबद्दल वाटणारं आकर्षण उद्या माझा वेळ तरी नक्कीच मागेल. नेमका तोच नसेल माझ्याकडे द्यायला. आयुष्याच्या अशा टप्प्यावर मी उभी आहे की नोकरी सोडण्याचा विचार परत कधीच करू शकणार नाही. मी देवाचे आभार मानते की आपण भावनिक दृष्ट्या नाही गुंतलो एकमेकांत. जे काही आहे ते वैचारिक पातळीवर आहे. आकर्षणाला समजावणं सोपं असतं. भावनेला नाही.

तुमचं माझ्या आयुष्यात येणं हे माझं सुदैव होतं सर. मी खूप शिकले तुमच्याकडून आणि शिकतही राहीन. तुमची पदोपदी झालेली मदत माझ्यासाठी किती महत्वाची होती, आहे हे तुम्ही जाणताच. आपण उत्तम सहकारी आहोतच. पण ते तसंच राहो.

कारण, देण्यासाठी माझ्याकडे सध्या एकही क्षण मोकळा नाही. म्हणूनच मी घाईने भेटायचं ठरवलं. पुढच्या आठवड्यात चित्र स्पष्ट होईल. श्रीशला ऐकू येईल की नाही हे ठरेल. आलं तर सगळा मोकळा वेळ त्याला बोलतं करण्यासाठी वापरावा लागेल. मला तो अगदी नॉर्मल बोलताना पाहायचाय. नाही ऐकू आलं तर अधिक मोठं आव्हान असेल. पण दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचारही करायला वेळ नसेल माझ्याकडे, बरोबर ना? तुम्ही स्वत:साठी योग्य साथीदार शोधा. ती तुम्हाला मिळावी यासाठी माझ्या शुभेच्छा सर!”

प्रशांत बराच वेळ विचार करत राहिला. शाल्मलीचं बोलणं त्या कॉर्पोरेट किंगला न कळतं तरच नवल. प्राथमिकतेचा तिचा मुद्दा निर्विवाद होता.

एक स्त्री असून, ती हा निर्णय घेऊ शकत होती याचाच अर्थ ती ना त्याच्याकडे आकर्षित होती ना भावनिक रित्या गुंतली होती.

मग हळू हळू त्याच्या लक्षात आलं तो ही फक्त आकर्षित होता. प्रेमभावना नव्हती त्यात. असती तर प्राथमिकता पहिली की तिसरी हा मुद्दा गौण ठरला असता.

मग दोघांनी सूप, स्टार्टर्स वरच आवरतं घ्यायचं ठरवलं.

“डेझर्ट?”

“नाही नको, श्रीशला सोडून आलेय. जेवढं लवकर निघेन तेवढं बरं.”

“हं!”

“सी यु इन द ऑफिस सून.”

“येस सर!”

निघाले दोघं.

“तुला ड्रॉप करू का घरी?”

“अं नको, मला हॉटेल कोहीनूर मधे जायचय.”

“ओह ओके.”

‘श्रीश चं कारण सांगून लवकर निघणारी आता हॉटेल मधे काय करतेय, असा प्रश्न आला त्याच्या मनात, पण तो गप्प राहिला.

ती ही काही बोलली नाही. मग ऑफिसचेच काही विषय निघत राहिले.

तिला ड्रॉप करून त्याने गाडी ऑफिसकडे वळवली.

सध्या तरी त्याची तीच प्राथमिकता होती. मग त्याला जाणवलं, त्याचं काम ही त्याची कायमच प्राथमिकता राहणार होती.

——-