तो मुलांकडे गेला. श्रीशला कडेवर घेतलं. बहुधा त्याच्या कडेवर बसल्यावर श्रीशला खूप उंचावर बसल्यासारखं वाटत असावं. मज्जा वाटत असावी.
केतकीला त्याने शाळेबद्दल विचारलं. आंटीला त्रास नको देऊस म्हणाला.
नर्स म्हणाली डॉक्टर आलेत बोलावलय तुम्हाला. मग श्रीशला घेऊन निघाली. केतकीला जाताना हाक मारेन म्हणाली.
सॅम वाटच पाहत होता त्याच्या केबीन बाहेर तिची. चेहरा लहान मुलासारखा उजळलेला. पटकन तिला आत नेलं. तिथे मी बसलेली. फोटोपेक्षाही कितीतरी सुंदर. नितळ कांत, बोलके डोळे, हसरी जिवणी. एखाद्या चित्रकाराने मन लावून जसं एखादं चित्र परिपूर्ण करावं तशी. तिलाही शाल्मली ऐकून माहित असावी. जुनी ओळख असल्याप्रमाणे मिठी मारली तिने. मागून सॅमला छान आहे अशी खूण केली शाल्मलीने. तो हसला.
मग कॉफी बरोबर गप्पा झाल्या. नक्षत्रासारखी ‘मी’ पाहून आई बाबांचा होता नव्हता विरोधही मावळला होता. याच हॉस्पिटल मधे ‘मी’ जॉईन होणार होती अर्थात सॅमच्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे रितसर लग्न करूनच.
सॅम प्रचंड खुशीत होता. शाल्मलीला ते पाहून मनापासून आनंद झाला.
——-
दुसरे दिवशी श्रीशला आईकडे सोडून ती हॉस्पिटलला आली. फिजीओ टॉप फ्लोअरला होतं. तडक तिथेच गेली. केतन बसला होता बाहेर चेअरवर . हिला पहाताच उठून उभा राहिला.
“थॅंक्स!”
“इट्स ओके”
मग ती तो बसला होता त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली.
“केतकी गेल्या काही दिवसात बरीच स्ट्रेस मधून गेली असावी असं एकंदर मला दिसलं. कांचनचा अपघात अलिकडचा, पण मला असं वाटलं की तिच्या आईच्या मृत्यूचाही तिच्यावर बराच परिणाम झालाय.”
केतन चा चेहरा एकदम ताठरला.
“कधी .... गेल्या त्या?”
“सहा महिने झाले”
“केतकी कुठेतरी तिला त्यासाठी जबाबदार मानते असं वाटलं मला. म्हणजे तिला वाटतंय की ती आईला भेटायला गेली, तिने आईचा हात धरला आणि लगेच ती गेली असं काहीसं.”
केतन आश्चर्याने पाहत राहिला.
“तुम्हीही तिच्यावर रागावले आहात, विशेषकरून आई गेल्यापासून असा तिचा समज आहे.”
केतन नव्यानेच सगळं पाहत असल्यासारखा त्याचा चेहरा झाला.
“मला कल्पना आहे केतकीचे बाबा, त्यांच्या आईचं जाणं, दोन लहान मुलींची एकदम जबाबदारी अंगावर येणं, परत तुमची नोकरी वगैरे, माणूस हडबडून जातो. पण केतकी काय किंवा कांचन, अतिशय संस्कारक्षम वयात आहेत. विचार तयार होताना अनुभव मुळाशी असतात. येणारे विचार पडताळून पहायला हे अनुभव वापरतो मेंदू नकळत. अनुभव कोणत्या ना कोणत्या भावनांना जन्म देतात आणि मग आनंददायी भावना देणारे अनुभव चांगले आणि दु:खदायक वाईट असा सरळ साधा हिशेब या नाजूक मेंदूंनी घातला तर त्यात त्यांचा काय दोष? त्यातूनच एक विचारशक्ती तयार होते. जी पुढे कायमची मेंदूला धरून राहते.
तुम्ही ज्या आजीआजोबांकडे तिला ठेवत होता त्यांचीही वागणूक फारशी चांगली नसावी तिच्याबरोबर.
गेले जवळपास १५ दिवस सतत केतकी माझ्यासोबत आहे आणि ती एक अत्यंत समजुतदार, प्रेमळ मुलगी आहे हे मी खात्रीने म्हणू शकते.
अशा तणावाखाली मुलं कधी खोटं बोलायला शिकतात, कधी मतलबी होतात, कधी हेव्यापोटी लहान भावंडांशी वाईट वागतात. पण मुळात शुद्ध मनाची असल्यामुळे केतकीमधे हे बदल नाही झाले हे सुदैवच! पण तिचा आत्मविश्वास कुठेतरी मार खातोय. तुम्ही ओरडाल म्हणून बऱ्याच गोष्टी ती तुम्हाला सांगायलाच जात नाही. जसं तिची ट्रीप गेली पण त्याची बरीच तयारी होती, तुम्हाला वेळ नसेल, मग तुम्ही चिडाल, या कारणाने तिने सांगितलच नाही तुम्हाला. एका आनंददायी अनुभवाला मुकली ती त्यामुळे. ही कांचनच्या अपघातापूर्वीची गोष्ट. ती डोक्याने हुशार असूनही म्हणावे तेवढे मार्कस् मिळत नाहीत तिला, कारण एकाग्रता कमी पडतेय तिची.”
केतन ने अस्वस्थतेने केसातून हात फिरवला.
मी तुम्हाला हे नुसते प्रश्न सांगत नाही. मला योग्य वाटणारी, सहज शक्य असणारे काही मार्गही सांगणार आहे.बघा तुम्हाला पटतात का.तुम्ही नोकरी करता की व्यवसाय? “
“व्यवसाय आहे. बराचसा घरून करता येतो. फायनान्शियल कंसल्टींग करतो मी. माणसं आहेत हाताखाली. पण मला सतत मार्केटवर, इतर काही गोष्टींवर, सरकारी धोरणांवर लक्ष ठेऊन रहावं लागतं. डोक्यात सतत तेच असतं. सुलेखा, केतकीची आई होती तेव्हा मी पूर्ण बुडलो होतो कामात. सतत बाहेरच असायचो. मला वाटायचं मी माझ्या कुटुंबासाठी काम करतोय, त्यांना सुखासमाधानाने राहता यावं म्हणून आटापिटा करतोय. जगातली सर्व सुखं त्यांना मिळावित म्हणून मी सतत नवनव्या योजना आखत होतो पैसे कमावण्याच्या. आलेला सर्व पैसा सुलेखाच्या हाती आणून सुपूर्द करत होतो. प्रत्येक सणाला, महत्वाच्या दिवसांना तिने भरपूर खरेदी करावी तिच्यासाठी, मुलींसाठी म्हणून आग्रही असायचो. पण अचानक भ्रमाचा भोपळा फुटला माझ्या. ते पुरेसं नव्हतं हे फार उशीरा लक्षात आलं माझ्या.” बोलता बोलता केतन एकदम ब्रेक लागावा तसा थांबला.
गप्पच बसला मग.
“काय झालं होतं त्याना? केतकीच्या आईला? कशाने गेल्या?”
केतनने नुसतीच मान हलवली. काही काळ शांततेत गेला. मग एकदम म्हणाला “मीच मारली तिला असंच म्हणावं लागेल कदाचित!”
शाल्मली दचकलीच एकदम.
मग म्हणाला, “माझ्या या व्यवसायात भरपूर पैसे कमावण्याच्या इच्छेपायी सुलेखाला हवा तसा वेळ, लक्ष नव्हतो देत मी. सगळ्या घरादाराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर सोडून मी व्यवसायात बुडून गेलो. तिला खूप एकटेपण आलं असावं. तेवढ्यात तिचा परदेशी असणारा मित्र परत आला. दोघांच्या भेटीगाठी झाल्या. सुरवातीला एकदोन वेळा मिळूनच भेटलो. पण मग मला नसायचा वेळ मग ते दोघे भेटत. त्याचा घटस्फोट झाला होता. हळू हळू ती गुंतत गेली जास्तच. मला कळलंच नाही. एकदा अचानक फाईल विसरली म्हणून मधेच घरी आलो तर बेडरूम मधे दोघं.....” मी वेडाच व्हायचा बाकी राहीलो. तसाच घराबाहेर पडलो. आठ दिवस भटकलो नुसता वेड्यासारखा. मग बसून विचार केला. शांतपणे घरी आलो. आयुष्य पहिल्यासारखं सुरू केलं. तो विषयच काढला नाही. जसं काही घडलंच नाही असा वागू लागलो. फक्त सुलेखाला स्पर्श नाही केला कधीच. ती नजर चुकवायला लागली. प्रचंड अपराध्यासारखी मुद्रा असायची. पण तिच्याशी या विषयावर संवाद नाही साधला. बाकी रुटीन नॉर्मल. असे सहा महीने गेले. खंगली ती. मी अधिकच कामात गुंतवून घेतलं स्वत:ला. एक दिवस काही कामाने गाडी घेऊन बाहेर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकने उडवली. हॉस्पिटल मधे पोहोचलो तेव्हा शेवटच्या घटका मोजत होती. एकच वाक्य बोलली “मला क्षमा करा” बस. केतकी आत आली, तिने दुसरा हात हातात घेतला नि तिने डोळे मिटले. मी बोलायला हवं होतं तिच्याशी. भांडलो असतो तरी चाललं असतं पण हा असा ताण नको होता द्यायला मी. मला वाटलं विषयच नको तो. पण असं नसतं हे फार नंतर कळलं गोष्टी हाताबाहेर गेल्यावर. तिचीही संपूर्ण चूक नव्हती. माझीही होती. मुळात मी एकटेपणा दिला तिला. पुढचे सहा महिने अचानक दोन मुलींची जबाबदारी पेलवताना त्रेधा उडाली. आयुष्यावरचं नियंत्रणच सुटलं. आभाळच फाटल्यासारखं झालं. कुठे कुठे म्हणून लक्ष द्यावं कळेना. व्यवसाय मार खातोय तर खाऊ दे असा विचार करत होतो. पण मग कांचनचा अपघात झाला. तो ही माझ्याच निष्काळजीपणामुळे. हात धरेन अशा विश्वासाने उडी मारली तिने पण निसटला माझ्या हातून.आणि आता तुम्ही जे सांगताय ते ऐकून तर जमिनच हादरलीय माझ्या पायाखालची.”
केतन उठून फेऱ्या मारू लागला. मग परत बसला.
“तुम्हाला हे सगळं का सांगितलं? माहीत नाही. कदाचित पूर्ण अनोळखी माणसासमोर मन मोकळं करायला सोपं जातं का? सुलेखालाही कोणी भेटलं असतं असं तर बरं झालं असतं कदाचित.”बराच वेळ कोणीच काही बोललं नाही.
मग शाल्मली म्हणाली, “केतकीचे बाबा, जे घडून गेलं त्याला कोणीच काही करू शकत नाही. केतकी कांचनला यातलं कधीच काही कळणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही घरून काम करताय ही एक उत्तम गोष्ट आहे. जेव्हा मुली घरी असतील तेव्हा त्यांना पूर्ण वेळ द्या. म्हणजे पूर्ण लक्ष त्यांना द्या. त्या काय सांगताहेत नीट ऐका. सतत संवाद होऊ दे. तुमचं मत सांगा. रात्री झोपण्या पूर्वी चा काही वेळ नक्की त्यांच्याबरोबर घालवा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. त्यांच्या आईची त्यांना खूप आठवण येते तशी ती तुम्हालाही येते हे कळू द्या त्यांना. हा मुद्दाच तुम्हा तिघांना बांधून ठेवेल, मला खात्री आहे. तुमचं खूप प्रेम आहे हे कळू दे त्यांना. कधीकधी प्रेम कृतीतून दिसावं, कधी शब्दांनी बोलून सांगावं. कधी स्पर्शाने पोहोचवावं. नुसतं मनी ठेऊ नये बंदिस्त करून. मी जरा स्पष्टच बोलतेय, पण धोका जाणवला म्हणून बोलले.”
“तुम्हाला धन्यवाद कसे द्यावेत हेच कळत नाही मला. एक विनंती आहे. महिन्यातून एखाद वेळी केतकीशी बोलाल? मला माझी मुलगी परत हवीय आणि तुम्हीच माझी मदत करू शकाल.”
शाल्मली हसून म्हणाली “आनंदाने बोलेन. वरचेवर बोलेन आणि तुम्हाला तुमची प्रगती ही सांगेन.”
“तुमच्या बरोबर बोलल्यावर माझेही डोळे उघडले काही प्रमाणात. मलाही ताबडतोब एक फोन करायचाय. निघते मी. पुढच्या आठवड्यात श्रीशचं इंम्प्लांट ॲक्टीव्हेट करणार आहेत. मला माझी लकी चार्म केतकी हवीय तिथे. तुम्हाला जमणार नाही यायला कांचन मुळे, पण मी घेऊन जाईन तिला तुमच्या घरून. चालेल?”
“नक्की पाठवेन. मला दिवस वेळ कळवा.”