यासगळ्यात आपण शंतनूला बोलावलय भेटायला हे विसरूनच गेली ती.
मग फोन वाजला तिचा दुपारी.
“मी खाली आलोय. वर सोडत नाहीत मला” म्हणाला.
ती म्हणाली “थांब तिथेच.”
मग तिने रिसेप्शनिस्टला फोन केला आणि म्हणाली “आत्ता विजिटींग अवर्स आहेत ना? मग त्या माणसाला विजिटींग पास द्या.”
रिसेपशनिस्ट म्हणाली “नक्की ना मॅम? सेक्युरिटीला पाठवू का बरोबर?”
“नको, त्याची गरज नाही, पण हा एकदाच, परत नाही द्यायचा कधीच.”
“ओके मॅम”
शंतनू वर आला. दारावर टकटक झाली. तिने दार उघडलं.
शंतनू आत आला. बराच वेळ श्रीशकडे पाहत राहिला .
शाल्मलीच मग म्हणाली “ तू का आता परत परत येतो आहेस आमच्या आयुष्यात?”
शंतनू पाहत राहिला तिच्याकडे.
मग म्हणाला, “तू निघून गेलीस आणि उध्वस्त झालो मी. रात्रंदिवस नशेत राहू लागलो. जवळ जवळ वर्षभर असंच आयुष्य वाहवत गेलं. मग अचानक तुझ्याच आठवणींनी हात देऊन वर काढलं. दारू सुटली. परत कामाला सुरवात केली ऑफिसमधे. सगळ्या गोष्टी मार्गी लावायच्या ठरवल्या. माझ्या मित्राने या डॉक्टरचा नंबर दिला. मला वाटलं या मुलाची .....श्रीशची ट्रीटमेंट मी केली तर काही अंशी तू माफ करशील मला. माझ्या हे लक्षातच येत नव्हतं तेव्हाही की अजूनही मी फक्त माझाच विचार करत होतो. एकदा मूक बधीर मुलांची स्कूलबस शेजारी येऊन थांबली सिग्नलला, त्यांना बघून परत आक्रसलो मी जागच्या जागी. जाणवलं मला की मी नाही हॅंडल करू शकत हे काहीच. हे माहीत असूनही की हा आजार अनुवंशिकतेने माझ्याकडूनच श्रीशला मिळाला असण्याची शक्यताही जास्तच. नालायक माणूस आहे मी. तुझं दुर्दैव की तू माझ्याशी लग्न केलस. मला माणूस बनवण्याचा प्रयत्न केलास.”
शाल्मली चा चेहरा पाषाण झाला होता.
“माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलस अजूनही.....“का आला आहेस आता?” तिचा स्वर अचानक टीपेला गेला. शंतनू दचकलाच एकदम.
मग हळू हळू बोलू लागला.
“तू या ट्रीटमेंटचा खर्च मला करू दिलास तर माझी गिल्ट जरा तरी कमी होईल. नुसती ट्रीटमेंट नाही श्रीशचा पुढचा सगळा खर्च शिक्षणाचा, सगळाच मला करू दे. प्लीज. मी एकदम रक्कम देत जाईन परस्पर बॅंकेत. परत तुला तोंडही दाखवणार नाही.”
शाल्मली ने डोळे मिटले क्षणभर. मग हसली जोरात. भीषण हास्य होतं ते.शंतनू आश्चर्याने पाहू लागला.
“अजूनही तू खरा आरसा नाहीच पाहिलास. किती अलगद या गिल्टमधून बाहेर पडू पहातो आहेस? तुझा अहं सुखावण्याचा हा अजून एक उजळ माथ्याचा मार्ग. कर्तव्य केल्याचं समाधान हवय तुला. पैसे दिलेस की तो बारीकसा सल जो जरा कुठे टोचू पहातोय आत, त्यालाही बोथट करू पहातो आहेस? वा! छान! का? कारण माझी ओढाताण माहित आहे तुला. मी पैसे घेऊन आयुष्य सोपं करू पाहेन असं वाटतंय तुला? बरोबर ना!”
“मला प्रायश्चित्त हवय गं!”
“प्रायश्चित्त?”
खदखदून विकट हसली आता मात्र शाल्मली.
“याला प्रायश्चित्त म्हणतोस तू? शंतनू, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं. मला हे कबूल करण्यात कोणतीही लाज वाटत नाही. चुकीच्या ठिकाणी केलं एवढंच, पण म्हणून त्याची किम्मत कमी नाही होत. आणि जर माझं प्रेम खरंय तर त्याला अनुसरूनच वागेन मी.तुझी ही शेवटची इच्छाही पूर्ण करेन मी. पैसे देण्याची नव्हे. प्रायश्चित्त घेण्याची. हा जो सल मनात निर्माण झालाय ना तुझ्या,तो जन्मभर सलू दे उरी. कदाचित त्याने अजून थोडं माणूसपण येईल तुझ्यात. मलम नकोच लावूस यावर.जन्मभर या चुकीचं, श्रीशवरच्या अन्यायाचं दु:ख मुरत जाऊ दे आत आत. मग जरा अधिक माणूसपण उतरेल तुझ्यात. उद्या तू दुसरं लग्न करशील.... नाही करच तू.... एकटं आयुष्य काढण्याची धमक तुझ्यात नाही. तुला नॉर्मल मुलंही होतील कदाचित. व्हावीतच नॉर्मल. श्रीशसारखं आयुष्य नकोच यायला कुणाच्या वाटेला. तो मूकबधीर जन्मला म्हणून नव्हे, ते बदलल्यातच जमा आहे आता, पण तुझ्यासारख्या पळपुट्या माणसाच्या पोटी असं स्पेशालिटी घेऊन जन्माला येण्याचं दुर्दैव नकोच परत कुणाच्या वाट्याला.
तुझ्या नॉर्मल मुलांना पाहताना, त्यांना मिरवताना तो सल तुला सतत टोचून अधिक माणूसपण उतरेल तुझ्यात. हे खरं प्रायश्चित्त असेल तुझ्या साठी.”
शंतनू पाहतच राहीला. शाल्मलीचा शब्द नि शब्द पटत होता त्याला. चिरतही जात होता आतपर्यंत.
शाल्मली पुढे म्हणाली, “मी केलं असतं, पण सध्या या गडबडीत मला वेळ नाही व्हायचा. तेव्हा तूच वकिलाला भेटून घटस्फोटाचे कागदपत्र तयार करवून घे. मी लगेच सह्या करेन. तुला या बंधनातून मोकळं झाल्याशिवाय नवं नातं नाही जोडता येणार.तुझं प्रामाणिक पणे सर्व सांगणं आवडलं. ये तू आता.”
“तुला जराही वाईट नाही वाटणार हे नातं तोडताना?”
शाल्मलीच्या भुवया कपाळात गेल्या पार
“नातं???”
पुढे काहीच बोलू शकला नाही शंतनू.
“यावस तू आता. परत न भेटलास तर उत्तम,मी ही माणूस आहे, माझ्याही सहनशिलतेला मर्यादा आहेत. विसरू नकोस.”
“पण तू हा एवढा खर्च?”
“कंपनीने लोन दिलय”
“तुला ते फेडायला खूप मोठा हप्ता...”
“करेन मी मॅनेज”
“तू पैसे घे, मला प्रायश्चित्त म्हणून दुसरी अट घाल काहीही.”
“शंतनू, तू ये आता. मला अधिक नाही काहीच बोलायचय.”
“मी जातो. पण तू परत विचार करावास. मला प्रायश्चित्त घ्यायला लावण्याच्या नादात तू स्वत:ला आणि श्रीशलाही शिक्षा देते आहेस.”
“मलाही प्रायश्चित्त घेणं गरजेचच आहे, चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल. श्रीशला काही कमी पडू देणार नाही मी. तू यावस आता.”
शंतनू पडलेल्या खांद्यांनी आणि चेहऱ्याने बाहेर पडला.
शाल्मली दमून गेली होती शारिरीक आणि मानसिक श्रमांनी. बसलीच ती, तो गेल्यावर.
पण लगेचच दारावर टकटक झाली आणि दार किलकिलं होऊन केतकीचं डोकं हळूच डोकावलं.
शाल्मली पटकन उठली आणि तिने दार उघडलं. केतकी चटकन आत येऊन तिला बिलगलीच. शाल्मलीनेही तिला जवळ घेतली. मग पटकन म्हणाली “अगं, तू कशी आलीस वर? बाबाना सांगून आली आहेस ना? ते शोधत बसतील नाहीतर.” केतकी ने दारातून बाहेर वळून पाहिले. केतकीचा बाबा होता उभा. मग शाल्मलीचं लक्ष गेलं त्याच्याकडे. तो आत डोकावला. “केतकी ऐकेचना. हट्ट धरून बसली. तुम्हाला त्रास नाही ना होणार? थोड्या वेळाने येतो मी न्यायला. खाली कांचन जवळ थांबायला हवं मला. कृशियल आहेत पुढचे काही तास. म्हणालात तर आत्ताच नेतो मी तिला.”
“नाही, नाही, राहू देत तिला. आणि मला यायचच आहे श्रीशला घेऊन ओटी मधे, येईल केतकी माझ्याबरोबर तेव्हाच.”
“थॅंक यू”
इतकं मनापासून आलं ते “थॅंक यू”.
शाल्मलीला प्रथमच जाणवलं किती गरज आहे मदतीची या माणसाला.
मग तो गेला नि क्षणात परत आला. “तुमचा मुलगा? कसा आहे?”
“बरा आहे आता.”
मग तो गेला.
तोपर्यंत केतकी आत येऊन श्रीशला न्याहाळत होती. बॅंडेज बघून जरा भेदरली होती. मग शाल्मलीने तिला शस्त्रक्रिया, मग नंतर काय काय करायचय वगैरे सोपं करून सांगितलं.
“आंटी, मग मी श्री...श असं म्हटलं की तो वळून बघेल का गं माझ्याकडे?”
“हो बेटा. लगेच नाही कदाचित, पण काही दिवसांनतर जेव्हा त्याला आवाज ओळखू येतील, तुझा आवाज कळेल, तेव्हा बघेल.”
“आंटी,तो मला केतकी ताई म्हणून केव्हा हाक मारेल गं ?” शाल्मली खळखळून हसली. एकीकडे त्या बालीश प्रश्नाची तिला गंमतही वाटली, आणि त्यातली सकारात्मकता तिला एकदम स्पर्शून गेली. हसता हसताच तिचे डोळे पाणावले.
“हो गं, बोलता यायला लागलं की केतकी ताईंना केतकी ताईच म्हणायला शिकवू बरं आपण त्याला.”
केतकी खुद्कन हसली मग.
“कांची मला लाडात असली की ताई म्हणते आणि चिडली की तायडे, तायडुटले काही पण म्हणते.”
“डॅड रडतो सारखा. कांचन बरी होणार ना गं?” काही वेळाने केतकी म्हणाली.
शाल्मलीला पोटात गलबललं एकदम. “हो बेटा, होईल बरी ती. तू बाप्पाला प्रार्थना करतेस ना? मी पण करतेय. बाप्पा करेल तिला बरं”
“डॅड पण हल्ली बाप्पासमोर रडतो. पूर्वी कधीच बाप्पाकडे यायचा नाही.”
शाल्मली पाहत राहिली. ‘काय आणि कसं शिकवायचं या लहान मुलांना? आपणच स्वत:च्या मनगटावर, कष्टावर विश्वास ठेवा वगैरे सांगायचं, नि अशा असहाय्य परिस्थितीत त्या परमशक्तीला शरण जात वेगळ्याच वाटेवर न्यायचं यांना. यातला योग्य समतोल शिकवता येईल आपल्याला या नव्या पिढीला? आपल्याला जमलाय हा समतोल? नशीब नावाचं काहीतरी आहेच की दडी मारून बसलेलं मनाच्या तळाशी. त्याचं काय करायचं? अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या लाटा, नि त्यावर अविरत हेलकावणारे आपण.’
श्रीशच्या हसण्याने शाल्मली भानावर आली. तो मधे केव्हातरी जागा झाला असावा आणि केतकीला पाहून खूश होऊन हसत होता. केतकी टुणकर उडी मारून श्रीशजवळ गेली. शाल्मलीने त्याला प्रथम बाथरूम मधे नेऊन आणलं. मग दोघाना ज्युस दिला प्यायला.
घड्याळ पाहिलं. नर्सला बोलावून श्रीशचा वरण भात द्यायला सांगितला. कॅंटीन मधून दोघींसाठी खायला मागवलं. मस्त मजेत खाऊ पिऊ झाला. झोप झाल्यामुळे, वेदना कमी झाल्यामुळे किंवा केतकी आल्यामुळे श्रीश परत पूर्ववत हसऱ्या मोडमधे आला होता.
मग केतकीने बेडवर बसूनच काही रंगीत तबकड्यांचे वेगवेगळे आकार बनवण्याचे गेम त्याच्याबरोबर खेळले. काही वेळाने तिघे खाली उतरले. शाल्मली आधी केतकीला घेऊन आयसीयू जवळ गेली. केतकीचा बाबा बसला होता शुन्यात नजर लावून . “आंटी मी तुझ्याबरोबरच येते ना.” केतकी बारीक तोंड करून म्हणाली.
“अगं, ओटी मधे तुला सोडणार नाहीत ना. तू जरा तुझ्या डॅडजवळ बस बरं. तो पण एकटाच आहे ना. जा. मग परत वर जाताना तुला भेटून जाईन मी.”
“प्रॅामिस?”
“येस, प्रॅामिस!”