सॅम कालचे रिपोर्टस स्टडी करत होता. तेवढ्यात त्याच्या मित्राचा फोन आला.
“अरे मी पाठवलेले रिपोर्टस पाहिलेस का? “
“नाही रे, बोललो आपण पण मिळाले नाहीत मला?”
“काय सांगतोस? मेल चेक कर”
“नाही आले रे, परत पाठव. थांब मी तुला टेस्ट मेल पाठवतो त्यावरच ॲटॅच कर”
“बरं, पण मित्रा, जरा लगेच पाहशील का? पोराचा बाप मित्रय माझा, मागे लागलाय केव्हाचा.”
“पाठव लगेच मी बघून सांगतो आजच”
“धन्यवाद दोस्ता. हं आलीय टेस्ट मेल. लगेच पाठवतो.”
“ओके.”
मेल लगेचच आली. ॲटॅचमेंटस पहाताना काहीतरी ओळखीचं वाटलं सॅमला. मग लक्षात आलं हे तर श्रीशचे रिपोर्टस. परत नीट चेक केले. हॉस्पिटलही तेच, तारखाही, बेबी कोड नं ही तोच. शंकाच उरली नाही. त्याने ताबडतोब मित्राला फोन केला, त्याला म्हणाला, “पाहिले रिपोर्टस, पण हे वर्षापूर्वीचे, आता परत करावे लागतील, घेऊन यायला सांग.”
“सांगतो, पण प्रथमदर्शनी काय वाटतंय ? क्युअरेबल आहे?”
“हो हे रिपोर्टस पाहून तरी वाटतंय की होईल करेक्शन.”
“गुड, धन्यवाद दोस्ता.तुझा देतो नंबर, तो बोलेल.”
“ओके”
“बाय”
“बाय”
सॅम ला एकदा वाटलं शामला कळवावं हे. पण मग वाटलं, नको, आधी फोन तर येऊ दे.
________
आज शाल्मली खूप खुशीत होती. कंपनीने तिचे लोन सॅंक्शन केले होतेच शिवाय खास शस्त्रक्रियेच्या वेळेस पूर्ण एक महिन्याची पगारी रजा पण दिली होती. तुमच्या कठोर परिश्रमांचा कंपनीतील यशात मोठा वाटा आहे आणि तुमच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी कंपनी काही करू शकत असेल तर कंपनीला आनंदच वाटेल असं एक लेटरही तिला पाठवण्यात आले होते.
श्रीश च्या शस्त्रक्रियेपूर्वीच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्या होत्या आणि त्याच्या शस्त्रक्रियेला सर्व तज्ञांनी हिरवा कंदील दाखवला होता.
आता फक्त शस्त्रक्रियेची पूर्वतयारी आणि शस्त्रक्रिया एवढ्याच गोष्टी बाकी होत्या. उद्याच काही महत्वाच्या सूचना देण्यासाठी आणि शस्त्रक्रियेच्या ठाम निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तिला आणि श्रीश ला हॉस्पिटल मधे दाखल व्हायचे होते.
आज ऑफिसमधील सर्व कामं संपवून तात्पुरता चार्ज दिनेश ला देऊन तिला निघायचे होते. त्या प्रमाणे ती भराभर, दिनेशसाठी सूचनांचा मेल लिहीत होती.
केबीनच्या दारावर टकटक झाली आणि पाठोपाठ प्रशांत आणि दिनेश आत आले. ती उठत होती, प्रशांतने तिला बसण्याची खूण केली.
दोघे येऊन बसताच प्रशांत म्हणाला, “दिनेश, शाल्मली कडून सध्याची तिच्याकडची प्रोजेक्टस तू हॅंडल करणार आहेस. तेव्हा ती सगळी नीट समजाऊन घे. धीस इज ए वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी टू प्रुव्ह युवरसेल्फ.”
“येस सर, आय विल डू माय बेस्ट”
“गुड!”
“शाल्मली, तुझ्या बाजूने सगळी तयारी झालीय? शक्यतो पहिले काही दिवस तरी तुला फोन करून डिस्टर्ब करावं लागू नये अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे.”
“हो सर, मी सगळे डिटेल्स, रेफरन्सेस वगैरे ची एक मेलच दिनेश ला पाठवतेय, तुम्हाला कॉपी मार्क करतेय. क्लायंटसनाही वेल इन ॲडव्हान्स इंटीमेशन पाठवलीय. गेल्या दोन आठवड्यापासून दिनेशला सगळ्या कॉरस्पॉण्डन्स मधे इन्व्हॉल्व्ह केलय. त्यामुळे ही इज वेल अवेअर अबाऊट ऑल द प्रोजेक्टस. आय ॲम शुअर एव्हरीथींग विल बी डन ॲज पर द प्लॅन.”
“गुड, गुड.”
“आणि मी फोनवर कायम अव्हायलेबल असेनच. पहिले तीन दिवसच क्रुशियल आहेत. त्यानंतर एक आठवड्याने मी पार्शली का होईना घरून काम बघायला सुरू करू शकेन असं मला वाटतं.”
“फाईन देन. ऑल द बेस्ट! आम्ही सगळे कधीही काही लागलं तरी आहोत. कंपनीच्या लोकांचा ब्लड ग्रुपचा डेटा आहे. आपल्या मेडिकल ऑफिसरशी बोलून ठेव.”
“ब्लडसाठी घरचेच लोक मिळालेत सर. माझा भाऊ, आणि त्याचे दोन मित्र त्या दिवशी हॉस्पिटल मधे येऊन ब्लड देऊन जातील.”
“सो, एव्हरीथींग इज रेडी?”
“येस सर!”
———-
शाल्मली तिची आणि श्रीशची बॅग तयार करण्यात गुंतली होती तेव्हा घरचे सगळेच आले. आईने काही कोरडा खाऊ आणला होता. अमेय ने श्रीशसाठी मिकी चे ग्रिटींग कार्ड बनवले होते आणि त्यावर अमेय आणि अनुजकडून असे लहान भावाचे नावही लिहीले होते. “मी येतो म्हणतो तुझ्याबरोबर उद्या,” बाबा परत म्हणाले. “बाबा, उद्या काहीच करायचं नाहीय. उगीच अवघडून बसून राहावं लागेल. परवा या सकाळी तुम्ही दादा बरोबर.” “हो, आणि मी दुपारचा डबा घेऊन येईन. वहिनी म्हणाली.” “अगं, खरंतर तडतड करत नकोच येऊ म्हणते मी. कॅंटीन मधे सगळं हायजेनिक आणि चांगलं मिळतं. त्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी या दोघी. श्रीश पण जरा हुशारीत आला असेल तोपर्यंत. त्याला काही खायला द्या म्हणाले तर तसा फोन करेन मी.” “बरं बाई, तू म्हणशील तसं,” आई म्हणाली. लेकीचा दुसऱ्याला कमीत कमी त्रास व्हावा असा प्रयत्न तिला कौतुकास्पद वाटला.
“बाकी सगळी तयारी झाली?”
“हो बाबा!”
————
शंतनूला मित्राने कळवताक्षणी त्याने सॅमचा नंबर फिरवला. रिपोर्टस बद्दल सांगताच सॅम म्हणाला घेऊन या बाळाला. शंतनू म्हणाला “सध्या मी नाही येऊ शकत, पण बाळाला त्याची आई घेऊन येईल अशी व्यवस्था करतो. तुमची एक मदत हवी होती पण.”
“कोणती?”
“हे बाळ ऐकू बोलू शकेल त्यासाठी वाट्टेल तो खर्च येऊ दे. मी तो देईन पण बाळाच्या आईला हे कळू देऊ नका. तिला चालणार नाही.”
“का?”
“डॉक्टर ते फोनवर नाही सांगू शकत मी. प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेन.”
सॅम विचारात पडला. आतापर्यंत जो काही शंतनू बद्दलचा त्याचा ग्रह होता त्यात हे त्याचं बोलणं बसत नव्हतं.
“ठीक आहे. पण तपासण्या झाल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही.”
“हो, तपासण्या करण्यासाठी बाळ तुमच्या हॉस्पिटलमधे लवकरात लवकर पोहोचेल असा प्रयत्न करतो मी.”
“गुड”
सॅम ने त्याला मुद्दामच काही सांगितले नाही. शामला ते आवडणार नाही असं वाटलं त्याला.त्यानंतर शंतनू शाल्मली ला फोन करत होता आणि ती कट करत होती. तिला या शस्त्रक्रियेपर्यंत कोणतीच नकारात्मक भावना नको होती.
तिने घरीही कोणालाच काही सांगितले नव्हते तिच्या आणि शंतनूच्या, किंवा सासू सासऱ्यांच्या फोनवरील संभाषणाबद्दल. झाला तेवढा आई वडिलांना त्रास खूप झाला असंच वाटत होतं तिला. शंतनू मात्र दिवसें दिवस अस्वस्थ होत होता. शेवटी त्याने प्रत्यक्षच जाऊन भेटायचे ठरवले.
———
सकाळी शाल्मली श्रीश ला घेऊन हॉस्पिटल मधे पोहोचली. निघताना आईने देवापुढे निरांजन लावले. श्रीशला अंगारा लावला. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. “आई, काळजी करू नकोस. मी सर्व खातरजमा करून घेतलीय. शिवाय सॅम करणाराय ऑपरेशन. त्यामुळे काही काळजी नाही.”
“हो हो, सगळं सुरळीत होईल.” दादाने टॅक्सी बोलावली. सगळे खालपर्यंत पोहोचवायला आले.
श्रीश टॅक्सीत बसल्यावर जामच खूश झाला. उड्या मारून मारून हाताने अमेय आणि अनुज कडे झेपावू लागला. त्यांना आत बोलावू लागला. त्याच्या त्या निरागस खेळाने सगळ्यांनाच क्षणात हळवं केलं. ओठांवर हसू नि डोळ्यात आसू अशी सर्वांचीच परिस्थिती झाली.
टॅक्सी हलली. श्रीश खिडकीतून बाहेर पहाण्यात रमला.
शाल्मली ला अचानक एकदम दडपण आलं. ‘आपला निर्णय बरोबर ठरेल ना? माझं बाळ ऐकू बोलू लागेल ना?’ स्त्री चिवटपणे अनेक समस्यांना झेलते, त्यातून मार्गही काढते, पण एखाद्या कमकुवत क्षणी तिला कोणाची तरी साथ हवीशी वाटते.
शाल्मलीला मात्र त्या कमकुवत क्षणाला शरण जाणं मान्य नव्हतं. तिने परत परत मनाला बजावलं. ‘ही लढाई तुझी एकटीची आहे. तुला एकटीलाच ती लढायची आहे. जन्माचा साथीदार म्हणून ज्याची निवड केलीस ती चुकली. पण म्हणून कमकुवत क्षणाची गरज म्हणून परत साथ शोधू नकोस. मदत अशीच घे जी न्याय्य असेल आणि ज्याची परतफेड होऊ शकेल. कोणतंही नातं गरजेवर बेतलेलं असू नये कधीच, नातं जोडायचं तर बरोबरीने आनंद देता घेता यावा.’
शाल्मली दचकलीच. हे कुठे निघाले विचार माझे.
मग तिने आपले मन श्रीशकडे वळवले. तो जाम खुशीत होता. पाहता पाहता हॉस्पिटल आलंच.
शाल्मली हॉस्पिटल मधे पोहोचली तेव्हा रिसेप्शन मधे बरीच गर्दी होती. सकाळीच ज्या शस्त्रक्रिया व्हायच्या होत्या, होत होत्या ते सर्व नातेवाईक दाटीवाटीने बसले होते.
कोणी अस्वस्थ फेऱ्या घालत होते तर कोणी जपाची माळ ओढत डोळे मिटून बसले होते. एखादीचा धीर खचत होता तर बाकी गोतावळा तिला धीर देत होता. कोणी एखाद्याला थोडं खाऊन घेण्याचा आग्रह करत होतं, तर कोणी पैशाची बंडलं कामी येतील ठेव म्हणत हातात कोंबत होतं. एकंदरच माणुसकी आपलं साजिरं रुप लेवून, ममतेने वावरत होती. शाल्मली तिच्या बॅग्ज आणि श्रीशला घेऊन रिसेप्शनजवळ पोहोचली. बॅग्ज पायाजवळ ठेवत तिने रिसेप्शनिस्टला फाईल दिली.
“मॅम, बसून घ्या. पेपर्स रेडी झाले की आवाज देते. रुम बुक करून ठेवलीय तुमच्यासाठी डॉक्टर समीरनी कालच.”
शाल्मली तिथेच एका खुर्चीवर बसली. श्रीश मांडीवरच होता. शेजारी एक सात -आठ वर्षांची मुलगी बसली होती. तिचा हात खुर्चीच्या हातावर होता. श्रीश ने तो धरला. त्या मुलीलाही गम्मत वाटली. तिने श्रीश च्या गालाला हात लावला तसा तो खुदकन हसला. ती मुलगीही हसली. त्या दोघांना बघून शाल्मलीही हसली. श्रीशची आणि त्या मुलीची लगेच गट्टी जमली. श्रीश सुळकन शाल्मलीच्या मांडीवरून उतरला आणि त्या मुलीच्या खुर्चीजवळ जाऊन तिच्याशी खेळू लागला. दोघेही हसू लागले. ती मुलगी एकटीच बसलेली दिसली. तिला काही विचारावं तेवढ्यात रिसेप्शनिस्टने आवाज दिला. शाल्मलीने सवयीने श्रीशला उचलले आणि ती काऊंटरजवळ गेली. रिसेप्शनिस्टने तिला काही पेपर्स वर वाचून सही करायला सांगितले. श्रीशला त्या मुलीशी खेळायचं होतं, तो उसळ्या मारू लागला आणि खाली उतरून त्या मुलीकडे गेला. शाल्मली ने वळून पाहिले तर दोघे तिथेच खेळत होते. मग तिने पेपर्स वाचायला सुरवात केली. एक एक करत सह्याही करू लागली. एका पेपरवर शस्त्रक्रियेच्या विवेचनात दोन्ही कान असं लिहीलं होतं. तिला तर एकाच कानाची शस्त्रक्रिया करण्याचं बोलणं झालेलं आणि त्याचाच खर्च बराच होणार असल्याचं आठवत होतं. तिने रिसेप्शनिस्टला तसं विचारताच ती म्हणाली की “डॉक्टर समीरनीच पेपर्स कसे तयार करायचे ते सांगितले. तुम्ही त्यांच्याशीच बोला, पण ते आत्ता ओटी मधे असतील. दुपारनंतरच भेटतील.”
“पण त्यांच्याशी बोलणं झाल्याशिवाय मी सही नाही करू शकत यावर. खरंतर हे पेपर्स बदलावेच लागतील तुम्हाला.”
“काही हरकत नाही मॅम, हा एक पेपर मी वेगळा मार्क करून ठेवते. तुमचं डॉक्टरांशी बोलणं झाल्यावरच तुम्ही सही करा. ॲडमिशन प्रोसेस करून घेऊ. ही सही उद्याच्या ऑपरेशन पूर्वी मात्र आठवणीने करा.”
एवढं बोलून ती वळली, तेवढ्यात एक बराच उंच माणूस श्रीशला उचलून तरातरा तिच्या दिशेने येताना दिसला. मागोमाग ती मगाची हसरी पण आता रडवेली झालेली मुलगी.
“तुमचाय ना हा मुलगा?” कर्कश पणे तो ओरडला. शाल्मली दचकलीच एकदम. “लक्ष कुठय मग? आत्ता त्या जिन्याच्या बारमधून खाली आपटला असता” शाल्मलीने दचकून जिन्याकडे बघितलं. नकळत श्रीशला घ्यायला हात पुढे झाले. पण त्या माणसाने श्रीशला दिले नाही तिच्याकडे. “कशाला जन्माला घालतो आपण मुलं? नीट लक्ष ठेव त्याच्यावर. नाहीतर रडशील जन्मभर माझ्यासारखी. ती माझी पोर, नाही सांभाळू शकलो गच्चीवर, आता .....” अचानक ओरडता ओरडता हुंदका फुटला त्या माणसाच्या घशातून. “आता झुंजतेय जीवन मरणाची लढाई! विश्वासाने दिला होता तिने हात माझ्या हातात. पण मी नाही धरला धड!”रडत रडत तारस्वरात ओरडत तो बोलत होता. मधेच आवाज फाटला त्याचा. सगळेच वळून बघायला लागले या दोघांकडे. मग अचानक सावध होत झरकन वळून निघून गेला तो श्रीशला तिच्या हाती देऊन. ती मुलगी अधिकच रडवेली होत तो गेला त्या दिशेने जायला वळली पण तो दिसेनासा झाला होता. ती रडायलाच लागली मग.
हे सगळं इतकं क्षणार्धात घडलं की नक्की घडलं की नाही असंच क्षणभर वाटलं शाल्मलीला. पण मग तिने त्या मुलीला बसवलं आपल्या शेजारी. पाणी दिलं. ती प्याली थोडसं. मग डोळे पुसत म्हणाली “सॉरी आंटी, आम्ही जिन्यात खेळत होतो पायऱ्यांवर उड्या मारून. मी त्याचा हात धरला होता वर चढताना पण तो हात सोडवून एकदम कडेला गेला. मी अरे अरे करत ओरडले पण त्याने बघितलंच नाही माझ्याकडे. डॅडने पटकन मागून येऊन पकडला .....नाहीतर..... !”
“हं! नाव काय तुझं?”
“केतकी.”
“केतकी,हा श्रीश. मी शाल्मली. श्रीश ला ऐकू येत नाही. त्यामुळे तू मारलेली हाक त्याला कळलीच नाही.”
केतकी ने अविश्वासाने वळून श्रीशकडे आणि मग शाल्मलीकडे पाहिलं.
“कानाचं ऑपरेशन करायलाच आणलय मी त्याला इथे.” मग तिने दोघांचे हात सॅनिटायझरने साफ करून क्रीम बिस्किटस् दिली दोघांनाही. केतकी आधी जरा घुटमळली, मग घेतलं तिने बिस्किट. शाल्मली वरवर शांतपणे बोलत होती पण प्रचंड भेदरली होती. सारखी तिची नजर जिन्याकडे जात होती. ‘खरंच त्या माणसाने धरले नसते तर?’
तेवढ्यात दारातून “केतकी” असा करडा स्वर ऐकू आला आणि केतकी धडपडत उठली आणि त्या माणसाकडे गेली. त्याने केतकीचा हात धरला आणि तो तरातरा दरवाजाच्या बाहेर पडला. केतकी वळून या दोघांकडे पाहत होती. मग दोघे दिसेनाशी झाली. श्रीश हात करकरून केतकी ला बोलावत राहिला.