बित गये जो सारे वो,
मौसम पुराने लौटे है।
तेरे मेरे मुलाकात के,
किस्से अभिभी बाकी है।
लहानपणापासून 'दुनिया गोल है' हेच शिकलो आपण, म्हणजे कसं ना बघा, जे आपण मागे सोडून आलो आहेत, कधीतरी त्याच्या समोर जाऊन आपण धडकणारच हे नक्की असतं...चक्र आहे ते जीवनाचं..!! आता हे चक्र कधी आपल्या कर्माने पूर्ण करतो आपण, तर कधी आपलं नशीब हे खेळ खेळते... लहानपणी आजोबा एक गोष्ट सांगायचे, अजूनही लक्षात आहे, ज्या गोष्टीपासून किंवा व्यक्तीपासून आपण वारंवार लांब जात राहतो आणि तरीही कधी अनावधनाने तर कधी योगायोगाने तिथेच जाऊन धडकतो तेंव्हा समजावं हा संबंध सहजासहजी तुटणारा नाही...खूप वेळा आपण हे बोलून जातो की नशिबात असेल तर भेटेल पण काहीही प्रयत्न न करता किंवा विचार न करता जर तुम्हाला ते मिळत असेल तर ते खरंच तुमचं नशीब आहे...
तसं आज माझं नशीब माझ्यावरही मेहेरबानच आहे...अरे म्हणजे त्यात काही वादच नाही ना..!! काय बोलली होती ते मी मागच्यावेळी, हं.. सोन्याहून पिवळं..!! हो तसाच आहे संसार माझा...शांत, संयमी, हुशार, जीव लावणारा नवरा 'अभय'...नटखट कान्हासारखा माझ्या नाकात दम आणून सोडणारा, मला पळवणार माझा मुलगा..सगळं कसं एकदम 'हॅपी फॅमिली' टाईप्स...पण तरीही मनाचा तो कोपरा अजूनही पोकळ आहेच... नाही, नाही..!! मला त्याबद्दल दुःख वैगरे काही नाही, उलट आता तर मी असं समजते की त्या सुवर्ण आठवणी आहेत माझ्या आयुष्यातल्या...शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची चकाकी ही कमी होणार नाही आणि त्यांचा सुगंध ही नाही...पण आज 'दुनियेच्या या गोल चक्राची' अनुभूती मला होणार होती.. ज्याला मी मागे सोडून आली होती, त्याला धडकणार होतीच नव्याने...!!
सरकारने पुन्हा घरात बसण्याच्या आदेशाच्या आधी नम्रताला शॉपिंग ची अशी लहर आली की माझ्या शंभर वेळा मना करूनही मला तिच्यासोबत जावंच लागलं...आता ही मैत्री गोष्टच अशी आहे की ज्यात तुमची कमी अन तुमच्या मित्र मैत्रिणींचीच जास्त चालती असते, आणि त्यात नम्रता माझ्यासाठी काय आहे हे शब्दांत सांगणं अवघड...! त्यामुळे जावंच लागलं...अभय मला सोडायला मॉल पर्यंत आला आणि मला सोडून निरीक्षला घेऊन गेला...मी त्यांना बाय करत होती तेवढ्यात नम्रता मला कोपरखळी देत बोलली,
"वा..किती ते प्रेम..!! बायकोला सोडायला ही येतात लोकं, आणि तेही शॉपिंग साठी...मान गये बॉस..😜"
"जास्त नाटकं नको करू, तू काही ऑप्शन सोडला होता का बाकी..अभय ला यावच लागलं, आणि किती हट्टी आहेस तू, तुझे लाड सगळे पुरवते मी, अशी मैत्रीण भेटणार आहे का तुला शोधून...."
"हो माते, धन्यवाद... आता करायची का खरेदी सुरू.."
नम्रतासोबत खरेदी करणं म्हणजे मोठं काळीज घेऊन जावं लागतं.. फिरून फिरून माझे पाय दुखायला लागले, आणि मी तिच्यापुढे हात टेकले, म्हणजे जोडले की आता मी जास्त फिरू शकत नाही, त्यामुळे मी एकाच जागी बसते आणि तिला बोलली तोपर्यंत तू सगळे दुकानं लुटून आण...
मी बसायला जागा शोधतच होती आणि तेवढ्यात मागे वळली तर...
"ओहह, सॉरी..." आणि कोणाला तरी धडकता धडकता स्वतःला सावरत बोलली,
"इट्स ओके..काही हर..."
आणि काही बोलता बोलता तो समोरचा व्यक्ती मध्येच थांबला, मला ही काही सुचेना झालं, मास्क लावला असूनही डोळे ओळखीचे होते ते आणि त्या डोळ्यातल्या ओलाव्यात मला आजही माझंच चित्र दिसत होतं... अगदी पहिल्या भेटीत जसं माझं हृदय रेल्वेच्या स्पीडने पळत होतं, आजही तसंच होतं... माझ्यासमोर होता.."विक्रम..."
त्याला बघून दोन पाऊलं मागे घेतले, तिथून जाण्यासाठी, पण ते दोन पाऊलं खूपच जड गेले मला...पण तो तसाच आधीसारखा, जस काही झालंच नाही किंवा काही बदललंच नाही असं समजून बोलला,
"अग ये, चशमिश, मास्क तोंडाला लावला की डोळ्यांना..किती जोरात धडकलीस, माझ्या नाजूक जीवाला इतका भार, इतकं वजन सहन होते का??😜😂😂"
एक तर तो चुकीच्या ठिकाणी तरफडत होता, तो मला धडकला आणि मलाच वजनदार बोलला, आता मी काय त्याच ऐकून घेणाऱ्यातली नव्हती...
"गधड्या, तुझ्या नाजूक जीवाला बाहेर काढतो कशाला मग?? सरकार तर बोलते की 'आवश्यकता न होणे पर घर से बाहर ना निकले'..."
"वा रे वा शहाणी, माझं सोड, तू काय आवश्यक कामासाठी आलीस ते सांग..? सरकार बोलते म्हणे..हं..😏😏" खांदे उडवत तो बोलला,
"ये तू हे एक्स्प्रेशन असे नको देऊ हां, नाहीतर फटके खाशील.. सांगून देते.."
"हे..हे अशीच धमकी देत असता नेहमी तुम्ही लोकं, त्यामुळेच आम्ही विदर्भ वेगळा देत नाही.."
आणि पाच सेकंद एकमेकांना खुन्नस देऊन पाहिल्यांनंतर आमचे दाटून आलेले 'हंसी के फुंआरे' बाहेर पडले...मनसोक्त हसून झाल्यावर मात्र शांतता पसरली, पूर्ण मॉल मध्ये गजबज होती तरी आमच्या मधली शांतता त्या आवाजांवर वरचढ होती... ती शांतता भेदत पुन्हा तोच बोलला....
"अम्म्म...किती दिवसांनी..."
"हम्मम...." मी काही बोलत नाहीये, म्हणून पुन्हा ती शांतता भेदत तो बोलला,
"एकटीच आलीस?? अम्म्म... म्हणजे अभय पण असेल ना सोबत??"
"हो...म्हणजे नाही...तो मला सोडून निरीक्षला घेऊन गेला, मी नम्रतासोबत आली आहे..."
"ओहहह...."
"हम्मम...."
आता मात्र ही शांतता मला सहन होत नव्हती, तसं काही सुचतही नव्हतं बोलायला त्यामुळे तिथे थांबण्यापेक्षा मला तिथून जाणंच योग्य वाटलं... मी जायला निघाली तर तो बोलला,
"सोनू...किती दिवसांनी भेटलीस...अचानक...इतके दिवस काही कॉन्टॅक्ट पण नाही केला..."
तो असं बोलल्यावर मात्र थांबायची इच्छा झालीच माझी, कोणी आपल्यावर हक्क दाखवला तर आपण त्याच्यावर त्याच्यापेक्षा जास्त हक्क गाजवतो, हा स्वभाव आहे मनुष्याचा... कोणी आपल्याला इतकं महत्त्व देतं हेच खूप सुखावणार असतं...मी बोलली,
"मी नाही केला कॉन्टॅक्ट...तू पण तर गायब होताच ना, तू तरी कुठे केला...तुला तर कुठे आठवण आहे माझी"
"खरंच सोनू??? इतकी विसरभोळी असशील वाटलं नव्हतं...तुझी आठवण येत नाही असा एकही दिवस नसतो माझा आणि आता तर तुला आठवत राहणं म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग झाला आहे..मागे एकदा कॉल केला होता मी हिम्मत करून , काय बोलली तू, की माझ्यामुळे तू डिस्टर्ब होतेस...मग कोणत्या अधिकाराने मी बोलायचं?? आणि माझ्यामुळे तू डिस्टर्ब होशील हे मला खरंच आवडणार आहे का??"
"हो...होतेच मी डिस्टर्ब.. कारण तुला माहितीये...."
"एकतर स्वतःच सगळे बंधनं लादायचे, स्वतः ब्लॉक करायचं आणि स्वतःच तक्रार करायची..."
"मी का तक्रार करू तुला?? कोण आहेस तू माझा?"
"बरं..अशीच भांडणार आहेस का आता?? तुझा ज्वालामुखी अजून तापायच्या आधी एक कॉल्डकॉफी घेऊयात, थोडी शांत होशील...."
तसं तर कधी भेटणार नाही, बोलणार नाही असे अनेक वचनांनी आम्ही एकमेकांना बांधलं होतं, पण असं अकस्मात पुढे आल्यावर काय करायचं याचा विचार केला नव्हता...आपण कधी कधी स्वतःला, आपल्या मनाला इतकं बांधून ठेवतो, इतकं नियंत्रित करतो की मन नावाची काही गोष्ट आहे आणि त्यात आपल्या भावना राहतात हे विसरून जातो...पण आपल्याला हे कळत नाही की भावना दाबल्याने मरत नसतात, त्या तेवढ्याच उफाळून बाहेर येतात, स्प्रिंग सारख्या..!! त्यामुळे स्वतःला थोडी मोकळीक देणंही गरजेचं आहे...विक्रम सोबत पुन्हा तीच कॉल्डकॉफी घेऊन माझ्या तप्त भावना खरंच शांत झाल्या...
"हं.. आता बोल, कशी आहेस, अभयराव कसे आहेत, माझा फ्रेंड कसा आहे??"
"एकदम छान...आणि तू, दिशा, बेबी, कसे सगळे?"
"आम्ही पण मस्त, खरं तर दिशासाठी शॉपिंग करायची होती...थोडं सरप्राईझ, तिला चांगलं वाटेल म्हणून..."
"अरे वा, छान... करावं असं कधी नवऱ्याने, चांगलं वाटतं बायकोला..."
"हो..ते तर तुझ्या चेहऱ्यावरून झळकत आहेच की अश्या गोष्टी अभय कडून बऱ्याचदा मिळत असतील...आनंदी वाटत आहेस, त्यामुळे मला समाधान वाटत आहे..."
"मला सरप्राईझ मिळतात म्हणून मी आनंदी नाहीये विक्रम, पण त्याला माझ्यात जो आनंद मिळतो त्यासाठी मी आनंदी आहे... आणि मला खात्री आहे की असाच आनंद तू दिशाला देण्याचा प्रयत्न करत असशील...हो ना??"
माझ्या अश्या बोलण्यावर त्याने फक्त स्मित केलं...
"हसतोयेस काय??? मी बोलली ते बरोबर आहे ना..?"
"शंभर टक्के बरोबर.. पण अभय सोबत राहून तुझा छोटा मेंदू बराच समजदार झालंय पण..😂😂"
"नालायका...प्रत्येक वेळी मजाक..हां??"
"बघ बरं, किती समाधान वाटलं मला शिव्या ऐकून..तुझ्या तोंडून शिवी ही कौतुकच वाटते बघ...😜"
"फ्लर्ट करत..." आणि माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो बोलला,
"हो, फ्लर्टचं आहे हा, आणि मी करणार, करणार करणार."
"😀😀नाही सुधारणार तू..."
"कधीच नाही...पण एक सांगू सोनू, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आनंदी पाहणं जेवढं गरजेचं असते ना, तेवढंच महत्त्वाच हे असते की जो आपल्यावर प्रेम करतो त्याला सुख देणं...आणि यामुळेच तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय..."
विक्रमला काय बोलायचं होतं ते मला चांगल्याने कळलं,
"हो विक्रम..त्यामुळेच तर आपण कठीण मार्ग निवडला ना...चल मला जावं लागेल, नम्रता शोधत असेल मला.."
"हो, हो..तिला जर तू माझ्यासोबत दिसली तर माझा तर जीव घेईलच ती, तुलाही सोडणार नाही😜😜,"
"😊😊 सख्खे मित्र असतातच असे रे..शिव्या देतील, रागावतील पण आपल्याला त्रास होऊ देणार नाही कोणताही...तू पण तर किती काय केलंस माझ्यासाठी.."
मी नकळतपणे बोलून गेली...
"चला म्हणजे, मित्राचा दर्जा अजूनही बाकी आहे..."
"मी निघते..." मी नजर चोरत बोलली, पण मी जायच्या आधीच विक्रम माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि माझ्या नजरेला नजर देत बोलला,
"सोनू...अगदी काही न ठरवता, आपण प्रत्येक वेळी योगायोगाने एकमेकांच्या आयुष्यात येत गेलो..काही प्लॅनिंग नव्हती, तरीही वेळोवेळी नशिबाने आपली भेट घडवतच आणली...गरज म्हणून हे नातं कधीच नव्हतं सोनू त्यामुळे त्यात हिशोब, व्यवहार नव्हता..आजही नाहीच....त्यामुळे आता तू माझ्या मेल ला रिप्लाय नाही दिलं, मला ब्लॉक केलं, माझ्याशी सगळे कॉन्टॅक्ट तोडले तरी मला फरक पडत नाही.. कारण मला विश्वास आहे, मी काहीही अपेक्षा न करता देवाने माझ्या आयुष्यात तुला आणलं तर आता यापुढे ही तोच बघून घेईल...आज मी तुला वचन देतो की यापुढे मी तुला कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करणार नाही, कारण मला माहीत आहे, जेंव्हा वेळ येईल तेंव्हा नशीब आपली भेट घडवूनच आणेल...."
हे सगळं बोलतांना विक्रमने पापणी ही हलवली नाही, इतका विश्वास त्याच्या डोळ्यात, इतकी निडरता त्याच्या प्रत्येक शब्दांत होती...
मी पण फुडकोर्ट मधून नम्रताच्या दिशेने निघाली...खरं तर विक्रमची वाट पाहणं मी कधीच सोडून दिलं होतं, अपेक्षा ही नव्हती त्याची काही, कारण त्याच्याप्रमाणे मलाही माझ्या नशिबावर विश्वास बसत होता...जे नाते फक्त सुख देण्यासाठी बनलेले असतात ते कधीच तुटत नाही, मग ती व्यक्ती सोबत असो किंवा नसो...बरोबर बोलला विक्रम, हे नातं गरज म्हणून नव्हतंच त्यामुळे याचं ओझं वाटलं नाही आणि म्हणूनच तर एवढे वचणं देऊनही ती वेळ येतेच की आम्ही एकमेकांसमोर येऊन थांबतो आणि थोड्या वेळेसाठी का होईना त्या वचनांची बंधनं झुगारतो...हाच विचार करत मी नम्रता जवळ पोहचली...
"झाली ग बाई खरेदी... तू काय घेतलंस?" नम्रता ने विचारलं...
"काही नाही ग, मला काही आवडलंच नाही..."
"हम्मम.. कॉफी तरी आवडली असेल ना??"
नम्रता मला एक तिरकस नजर देत बोलली...आता मी तिला काही उत्तर द्यावं याआधी तीच बोलली,
"नैना, जेंव्हापासून तो तुझ्या आयुष्यातुन गेला आहे, मी तुला जितकं बदलताना पाहिलं आहे, तेवढंच अभयलाही तुझ्यासाठी बदलताना पाहिलं आहे..त्यामुळे मला विश्वास आहे की अभयला दुःख होईल असं तू काहीही करणार नाहीस..."
"बापरे.!!आज ही डाकू फुलनदेवी चक्क शब्दसुमने झाडत आहे...😂😂"
"तुझी तर ना...चल नवऱ्याला फोन कर तुझ्या, गाडी आण म्हणा, एवढं सामान हातात नाही धरू शकत आता मी...."
अभयला फोन केल्यावर पंधरा मिनिटात तो आला..नम्रताच्या शॉपिंग बॅग्स बघून तिची आणि अभयची थट्टा मस्करी सुरू होती पण मी मात्र वेगळ्याच विश्वात होती...एकवेळ अशी होती की जेंव्हा अचानक विक्रम निघून गेला आणि मला वाटलं माझं विश्वचं संपलं... पण ते प्रेम काय कामाचं जे तुम्हाला लोकांपासून दूर करत असेल, त्यामुळे मी आणि विक्रम एकमेकांपासून दूर झालो, आपल्या लोकांच्या जवळ राहता यावं म्हणून... आणि त्यात आम्ही यशस्वी ही झालो...त्यावेळी वाटलं होतं की खूप कठीण असणार आणि होतं ही, पण आज कळलं की आमचा निर्णय योग्य होता...
नम्रताला घरी सोडल्यावर आम्ही घरी येत असताना अभय ने गाडी थांबवली आणि मला बोलला,
"नम्रताने चांगला कस काढला असेल तुझा, आणि तू सकाळपासून काही जेवलीही नव्हती, चल आज बाहेरच काही खाऊन घेऊ.. तुझ्या आवडीचं..."
आम्ही जाऊन बसलो हॉटेलमध्ये, पण अभयचं सगळं लक्ष माझ्याकडे होत, मी थकली आहे का, मला पाणी हवंय का, मला काय खायचं आहे...वैगरे वैगरे...त्याला पाहून मनात एकच आलं...'सुख नक्की हेच असावं'...
विक्रम बरोबर बोलला, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आनंदी पाहणं ही इच्छा असते आपली पण जो आपल्यावर प्रेम करतो त्याला आनंदी ठेवणं हे आपलं परम कर्तव्य असलं पाहिजे...मी आणि विक्रम आमचे कर्तव्य बरोबर आणि प्रामाणिक पणे निभावत होतो...एक गोष्ट तर नक्कीच आहे, ज्याला प्रेम काय आहे हे कळलं त्याला कर्तव्य ही कळतात आणि दुसर्यांना आनंदी कसं ठेवावं हे पण कळतंच... शेवटी एक गोष्ट मी पण मान्य केलीच आहे की प्रेम तुमच्या आयुष्यात अविभाज्य घटक असू शकतो पण प्रेम म्हणजे आयुष्य नव्हे...
माझ्या आणि विक्रमची कहाणी संपली होती असं मी म्हणत नाही कारण 'दुनिया गोल है' आणि यानुसार नशिबाने काय लिहून ठेवलं आहे हे आम्ही सांगू शकत नव्हतो...त्यामुळे काहीही अपेक्षा न ठेवता, विक्रम भेटेल की नाही अशी कोणतीही आशा न बाळगता आज मी माझ्या संसारात सुखी आहे...विक्रमचा चेहरा धूसर जरी झाला असला तरी त्याची सावली नक्कीच सोबत आहे...
------------------------------------------------------------
समाप्त.