अंधियारी गलियोमे मेरी,
आज कुछ हलचल हुई ।
तेरे आने की आहट क्यूँ,
आज इस दिल हो हुई ?
सगळं काही व्यवस्थित चाललं होतं आतापर्यंत, मग का माझ्या मनाने भूतकाळाची दारं ठोठावावी?? झालं गेलं गंगेला मिळालं हाच विचार करून, सगळं काही पाठीमागे सोडून अभयसोबत इथपर्यंत पोहोचली...छान चाललंय माझं, सुखी आहे माझ्या संसारात, मग का आज मन माझं हाताबाहेर जाण्याच धाडस करतंय काय माहीत?? मनाच्या बंद खोलीतून आज का त्याच आठवणी बाहेर पडू पाहत असतील??? असे कित्तीतरी विचार आज मनात धुमाकूळ घालत असताना, अचानक फोन ची मॅसेज टोन मात्र या विचारांना अजूनच हवा देत होती....त्या आवाजाला कंटाळून एकदाचा बघितलाच मोबाईल,
📱"hi..."
📱"कशी आहेस???"
📱"तुझा लास्ट सीन आताचाच दिसला, समाधान वाटलं की अजून नंबर बदलला नाहीस..."
📱"वेळ असल्यास रिप्लाय कर..."
📱"अपेक्षा आहे की ओळखलं असशीलचं नक्की..."
आणि धाड धाड त्याचे मॅसेजेस माझ्या मोबाईल मध्ये येऊन धडकले...विक्रम....हो, हा विक्रमचाच नंबर आहे, अगदी तोंडपाठ आहे मला, झोपेतही सांगू शकते...खरं तर मेसेज पाहून आनंद गगनात मावत नव्हता, सगळे कामं सोडून आज मनसोक्त बोलावं वाटत होतं, आणि हे स्वाभाविक होतं, पण जी सोनू काही महिन्याआधी मी विक्रमजवळ सोडून आली तिला आज बाहेर येण्याची परवानगी ही अभयची नैना देणारच नव्हती....पण त्याचे मॅसेजेस माझ्यापर्यंत पोहोचले आहेत याची खबर त्या दोन निळ्या रंगाच्या काड्यांनी त्याला दिली असेल त्यामुळे काहीतरी उत्तर द्यावं हा विचार केला....
"कोणीतरी आपली वाट पाहत असेल आणि त्याला आपली बातमी कळवावी, ही कर्टसी नसते ग लोकांना !...एकमेकांच्या भावनांची किंमत ठेवली तरच आपल्यातील माणूसपण जिवंत आहे हे समजावं, त्यामुळे ही कर्टसी पाळली पाहिजे..." हसू आलं स्वतःवरच की एवढं पूढे निघून आलोय आपण आयुष्यात पण तरीही त्याचे शब्दनशब्द आजही तसेच कानात घूमतात...त्याच्या याच कर्टसीचा विचार करून मी रिप्लाय दिला...
📱"Hi..." यापुढे खूप काही होतं बोलायला पण शब्द जुळत नव्हते, कदाचीत टाईप करून आपल्या भावना त्यात कैद करू अशी टेक्नोलॉजी अजून तरी विकसित झाली नाही....त्यामुळे त्या 'hi' वर मी थांबली...
📱"कॉल करू???" त्याचा थेट प्रश्न...दोन मिनिटं मी माझ्या थरथरणाऱ्या हातांना शांत होण्यास दिला...आणि,
📱"हो..." एवढचं टाईप केल्या गेलं.....आणि अगदी शून्य मिनिटांत फोन वाजला...माझ्या थरथरणाऱ्या हातून तो फोन पडणार त्याआधी मी कॉल रिसिव्ह केला....
"हॅलो..." आणि तो आवाज ऐकताच माझं मन पुन्हा रेल्वेच्या स्पीडने धावत सुटलं, इतके दिवस ज्या मेघांना मी डोळ्यात बंदीस्त केलं होतं आज मात्र ते नक्कीच बरसणार होते...माझ्या तोंडून शब्द ही निघत नव्हता...
"हॅलो...आवाज येतोय का??" मी बोलली नाही पण त्याच बोलणं सुरूच होत.. अचानक भानावर येत मी उत्तरादाखल बोलली,
"हं.. अम्म्म..हो येतोय आवाज..बोल ना.."
"कशी आहेस सोनू.... सॉरी..नैनिका..."
त्याच्या 'सोनू' ने माझं मन जे आभाळवर नेऊन ठेवलं होत, 'नैनिका'ने त्याला जमीनी वर आणलं...
"मी ठीक...तू?"
"मी पण ठीक..." दोन मिनिटं कमालीची शांतता....दोन्हीकडेही खूप काही होतं बोलायला पण आज शब्दांची जुळवाजुळव होतं नव्हती....
"बाकी..???" काहीतरी बोलायचं म्हणून बोलली मी...
"अम्म्म..अग ते सांगायचंच राहील बघ..."
"काय???"
"काल मी पनवेल ला जाऊन आलो, कान्हा च्या मंदिरात....आणि हो, ती नदी वाहते बघ जिथे ते छोटंसं गार्डन आहे...तिथे ही गेलो होतो..." आणि अचानक बोलता बोलता त्याचा आवाज जड झाला, मला जाणीव होती, त्याला मला काय सुचवायचं होतं....
"एकटाच गेला होतास??"
"नाही....तुझ्या आठवणी होत्या ना सोबत...नेहमीच असतात, एकटा नसतोच मी कधी...मी तर..."
मला कळत होतं त्याला काय बोलायचंय पण आता 'त्या' वळणावर आमच्यासाठी काहीही उरलं नव्हतं आणि त्याला काही अर्थही नव्हता.....स्वतःला सावरत आणि त्याच वाक्य अर्ध्यातच कापत मी बोलली,
"अरे...ऐक ना, ते...तुझे शोज कसे सुरू आहेत....गाण्यासाठी वेळ मिळतो की नाही सध्या??"
मी उगाच माझ्या भावनांना बांध घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सपशेल फेल झाली....
"हा हा हा विषय कसा बदलावा हे तुझ्याकडून शिकावं... anyway.. गाणं वैगरे सगळं बंद केलंय, कारण विचारू नको, तुला माहितीये ते...."
आता त्याच्या या बोलण्यावर माझ्याकडे मात्र उत्तर नव्हतं,
"अरे, ऐक ना...मला जरा कामं...."
"हो हो माहितीये, तुला कामं आहेत, खूप बिझी असतेस, आता नाही बोलू शकत त्यामुळे फोन ठेवायचा आहे...वैगरे वैगरे.... एवढं तर अजूनही ओळखतो मी तुला की जेंव्हा तुला भरून येतं तेंव्हा अश्या फालतू पळवाटा शोधतेस..."
"विक्रम....प्लिज..."
"बरं..., तू ठीक आहेस, सुखी आहेस, याचा आनंद जास्त आहे मला, मी बोललो होतो ना अभयपेक्षा चांगला जीवनसाथी तुला मिळूच शकला नसता म्हणून...."
"एक ऐकशील माझं..?"
"बोल ना, फॉर्मलिटी नको करू..."
"मला यानंतर फोन किंवा मॅसेज नको करू....आता नाही....कधीच नाही..."
"चलो...आपका ये हुकूम भी मान लिया...अजून काही आज्ञा आमच्यासाठी तुमची?"
त्याचा एक आवंढा गिळत तो बोलला, पण आज मला कमजोर पडायचं नव्हतं...
"काळजी घे स्वतःची....कामावर लक्ष दे, तुझे ध्येय विसरू नको, आणि.."
"बस बस बस...एवढ्या काळजीने सूचना देणार कोणी नाही ग आता त्यामुळे सवय नाही राहिली, कामाच बोलशील तर कामं तर मी तेंव्हाही करायचो, आताही करतोच ध्येय गाठण्यासाठी, तो व्यवहाराचा भाग झाला ना! राहिला प्रश्न काळजी घेण्याचा तर आता मनाला सवय झाली आहे की सगळं काही असूनही मी एकटा आहे, त्यामुळे काळजी तर घ्यावीच लागेल...."
"विक्रम..."
"काय, बोल ना...."
"काही नाही.....बाय.."
अश्याप्रकारे आज विक्रम माझ्या आयुष्यात आणि माझ्या फोन मध्येही ब्लॉक लिस्ट मध्ये गेला...त्याच्याशी इतकं कठोर वागताना मी मधून शंभर मरण भोगले आहेत, पण ज्या वादळातून बाहेर पडून आम्ही स्वतःला आणि आमच्या संसाराला सावरलं आहे, ते अबाधित ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं होतं...खरं तर आता सगळं वातावरण निवळल्यावर आमची मैत्री कधितरी हाय हॅलो करण्यासाठी किंवा सणवाराला एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच होती...पण अश्या छोट्या छोट्या लाटा आपल्याला कधी समुद्राच्या बुडाशी नेतील याचा नेम नाही आणि मग परतीचे मार्ग बंद होतात, बुडल्याशिवाय पर्याय उरत नाही...आणि यातूनच मला विक्रमला वाचवायच होतं आणि त्यासाठी हे करणं गरजेचं होतं...
आणि खर म्हटलं तर आता हाव नाही रे विक्रम तुझ्या सहवासाची...माझ्या ओंजळीत मावणार नाही एवढं काही देऊन गेलास तू मला...आठवणींचा प्राजक्त भलेही आज सुकून गेला असेल पण त्याचा सुगंध मात्र सुतभर ही कमी झाला नाही...पण हे सगळं असताना अजूनही एकच वाटत आपण भेटलोच नसतो तर?? मी तुझा कार्यक्रम बघायला आलीच नसती तर??? किंवा अगदी पहिल्यावेळी तू फोन केला होता तो उचललाच नसता तर??? किती चांगलं झालं असत ना रे ...! आज असं, माझी लढाई मी एकटी लढते याच दुःख नसतं मला, किंवा कोणीतरी माझा सखा होता पण आज जेंव्हा खरच आयुष्य जगण्यासाठी मला त्याची गरज आहे तेंव्हाच तो नाही याच शल्य राहिलं नसतं...
पण असो....ज्या वागण्याला तू नियतीचं नाव देऊन माझ्यापासून लांब गेला होतास त्याच नियतीने आज तुला भाग पाडले का मला फोन करायला??? मी भोळी आहे विक्रम, पण एवढीही नाही की तुझं वागणं मला कळणार नाही....आज तुला अगदी अनावर झालं असेल तेंव्हा ही सोनू आठवली ना तुला...आणि मी तुझ्या आठवणीत ज्या यातना भोगल्या त्याच काय??? आणि जेंव्हा मी सगळं काही नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे आणि कदाचित त्यात थोडीशी यशस्वी ही झाली आहे तेंव्हा तू असा प्रकटलास?? तुझ्या त्या नियतीने दिलेल्या सगळ्या जखमा आज माझ्या भरून निघत आहे त्यामुळे तुझी ही कोरडी फुंकर काही कामाला येणार नाही माझ्या... एक सांगते विक्रम...मी एकदा त्यातून बाहेर निघाली आहे, आता ती शक्ती मी पुन्हा नाही आणू शकत रे....माहीत आहे मला, मी अर्धवट आहे तुझविना, पण ह्या अर्धत्वालाच पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहे...नको अवघड करू माझ्यासाठी... आणि तुझ्यासाठी ही..!
जे आहे ते खूप सोन्याहून पिवळ आहे हे मान्य आहे मला, पण एक गोष्ट सांगू माझ्यातून तू कधीच गेला नाहीस रे...!
उगाच ते किशोरवयीन किंवा कॉलेजला जाणाऱ्या कोवळ्या मुलींसारखी प्रेमभंग झाला म्हणून रडत बसू नये एवढी 'मॅच्युरिटी' नक्कीच आहे माझ्यात....प्रत्येक नात्याचा एक प्रवास असतो अस मला वाटतं, कदाचित आपल्या नात्याचा प्रवास इथेच संपला असावा...पण तरीही खूप वेळा जेंव्हा एकटी असते, जेंव्हा माझा धैर्य सुटत जातो मी अजूनही तुझ्याशी बोलते, तूला कळत असेल नसेल माहीत नाही, पण तुझा हा बोलणारा मौन मला समाधान देतो... शब्दांपलीकडच्या प्रदेशात तुझ्यासोबत फिरून यायला आता जमायला लागलंय, आता पुन्हा आयुष्यात येऊन मला बोलकं करू नको... आता खरंच नाही जमायचं रे तुझ्यातून बाहेर येणं मला...मग हे फोनमध्ये ब्लॉक केलं म्हणून काय झालं?? मनात तर नाही ना केलं....बरोबर केलं ना रे मी...??
*************************
हो सोनू...एकदम बरोबर केलंस बघ...तू कधी काही चुकीचं करणार नाही किंवा चुकीचा निर्णय घेणार नाहीस याची खात्री आहे मला राणी...! पण ज्या विक्रमचा आवाज ऐकायला एवढी आतुर असायची तू आज त्याला बोलायला दोन मिनिटं ही जड जातात का ग तुला??? खर तर या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे पण तरीही अपेक्षा होती की आज मनमोकळा संवाद होईल तुझ्याशी...पण ठीक आहे जेवढं बोललीस तेही काही कमी नाही माझ्यासाठी, तुझ्या त्या तुटक बोलण्यातूनही हेच जाणवलं की आजही हा विक्रम आहे तुझ्यात कुठेतरी, त्याच समाधान जास्त आहे....अगदी मनभर नाही मिळालं तरी तू दिलेल्या कणभरात ही माझा आनंद गगनात मावेनासा झालाय...!
खर तर काही ठरवून, प्लॅन करून अस आपल्यात काहीच झालं नाही, एक प्रवाह होता आणि त्यात वाहत गेलो दोघेही... मला आठवते जेंव्हा पहिल्यांदा तुला फोन केला होता सरिता समजून, आणि रागावलो होतो मी, किती भांबावून गेली होतीस तू....आणि जेंव्हा तुझा आवाज ऐकला तेंव्हा मनात कुठेतरी एक सुखद लहर उठून गेली...तो एक रॉन्ग नंबर मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात राईट व्यक्ती देऊन गेला...मग हळूहळू संपर्क वाढत गेला, आधी रिकाम्या वेळात एकमेकांना हाय हॅलो करता करता कधी एकमेकांसाठी रिकामा वेळ शोधू लागलो हे कळलंच नाही... माझ्या प्रत्येक कवितेला, गाण्याला तू दिलेला साद माझ्यात नवा हुरूप निर्माण करू लागली, आणि तुझं बोलणं, प्रत्येक गोष्ट समजून घेणं, कोणतीही अडचण सोप्पी करून सांगणं, मला तुझ्या अजून जवळ घेऊन येत होतं...
आपलं नातं काय आहे याचे कयास मी कधीच बांधले नाही, आणि त्याला नाव देण्याच्या भानगडीत तर अजिबात मला पडायचं नव्हतं...निनावीच होतं, पण मधुर होतं, नात्यातल्या ओलाव्यात गोडवा होता...अगदी तुझ्यासारखा गोड...! आणि हो, हे फ्लर्ट नाही आहे बर का! तू खरंच गोड आहेस....पण तुझ्या आयुष्यात हा गोडवा मी चिरंतर ठेवू शकलो नाही, याच दुःख मात्र आयुष्याभर उराशी कवटाळून ठेवायचं आहे...
आपली पहिली भेट आठवते तुला?? किती तो पाऊस, आणि त्या पावसात तू निळ्या सलवार मध्ये काय खुलून दिसत होतीस, अस वाटत होतं आभाळ पांघरूण आली आहेस माझ्या वर प्रेमाचा वर्षाव करायला....तू नेहमीच मला तुझ्या प्रेमात, तुझ्या आपुलकीत चिंब केलयस ग..! मीच कमी पडलो...तुझ्या आणि अभयच्या नात्यात मला कधीच कटुता निर्माण करायची नव्हती सोनू...पण तुला सावरता सावरता मीच घसरलो...तुला कधी सांगितलं नाही, पण मला अभयचा खूप हेवा वाटायचा, इर्षा ही होती थोडीफार की त्याच्याजवळ तू आहेस....पण आज नाही वाटत...माहीत आहे का??? कारण तू मला जे, काही दिवसांत दिल आहेस ना त्याची सर आयुष्यभराच्या प्रेमाला येणार नाही....खूप वेळा काही काम नसतांना ही तुझ्या ऑफिस जवळ यायचो आणि तुला अस दाखवायचो की काहीतरी कामाने आलोय...खर तर तुला एक नजर पहायची तीव्र इच्छा मला तस करण्यास भाग पाडायची...तुला मी इतकं डोळ्यांत सामावून घेतलंय की आता तुला प्रत्यक्षात पाहिलं नाही पाहिलं तरी काही वाटत नाही...मी मनात काहीतरी विचार करून ठेवावा आणि तू ते बोलून जावं, इतकं घट्ट नातं होतं... आजही आहे माझ्यासाठी...
तू आणि अभय महाबळेश्वरला गेला होता चार दिवस, मी सांगू नाही शकत की ते चार दिवस मला चार वर्षांसारखे वाटले...पण तू त्याच्या सोबत आनंदी होतीस हे तुझ्या बोलण्यातून कळाल मला, त्यामुळे माझ्या भावनांना आवर घातला मी...तू बोलतेस की मी तुला अभय समजवून दिला पण खरं तर हे आहे की तू मला दिशा दिलीस सोनू... काहीतरी जादू तुझ्या बोलण्यात नक्कीच होती आणि म्हणूनच तुझं सगळं ऐकत गेलो... दिशा आणि माझं नातं म्हणजे एक अग्रीमेंट होत जे तिच्या आणि माझ्या घरच्यांनी केला होता...तरी मी प्रयत्न केले तिच्या जवळ जाण्याचे पण तिने मला मात्र कायम दूरच ठेवलं...खूप वेळा तिला विचारलंही काय अडचण आहे पण तीच 'अस काही नाही' हे उत्तर ठरलेलं असायचं....खूप उत्साहात मी तिला माझ्या कविता, माझी गाणी ऐकवायचे पण एक स्मितहास्या पलीकडे तिची प्रतिक्रिया नसायची...कधी ऑफिसच काही सांगायला गेलो की 'हम्म' हे उत्तर ठरलेल असायचं....मग स्वतःला कामात गुंतवून घेतलं, स्वतःचे छंद पूर्ण करण्यात वेळ घालवला आणि त्यातच 'नैनिका' नावाची मंद वाऱ्याची झुळूक मला स्पर्शून गेली आणि माझ्यातला 'विक्रम' मी नव्याने ओळखायला लागलो...
सगळं काही ठीक सुरू होतं, पण एक दिवस होत्याच नव्हतं झालं, आणि तुझ्या व अभयच्या मधात मी आलो...ज्यादिवशी तुझा त्रास बघितला, मला माझीच लाज वाटली, माझा स्वार्थीपणा मला छळायला लागला, मग विचार केला तुझ्या आयुष्यात राहून जर मी तुझ्या दुखाच कारण बनत असेन तर तुझ्यापासून लांब गेलेलंच बरं...शपथ सांगतो, खूप पळालो तुझ्यापासून पण तुला विसरू नाही शकलो, आणि मग अचानक एक दिवस तू हॉस्पिटलमध्ये दिसली, तुला पाहण्याचा मोह आवरला नाही मला...तुझ्या आणि अभयच्या संसारात 'निरीक्ष' नावाचं फुल उमललय याचा खूप आनंद झाला, तू थोडीशी भरली होतीस, तुला खरच जाडी म्हणायची इच्छा होती, पण तुझा 'ज्वालामुखी' किती खतरनाक असतो याची जाणीव होती मला त्यामुळे ते दु:साहस मी केलं नाही..., अजून एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली की मी एवढे दिवस तुझ्यापासून नाही, तर स्वतःपासून पळत होतो....जसा मी स्वतःपासून वेगळा नाही होऊ शकत तस तूला कस दूर करू शकतो मी??
तू वचन घेतलं होतंस की आपण कधीही भेटायचं नाही, पण आज मी ते वचन तोडलं आणि तुला फोन केलाच, मला वाटलं तू थोडी चिडशील, रागवशील आणि होइल सगळं नीट जस नेहमी होत आलंय, पण आता तू शांत दिसारखी आहेस तुझ्या संसारात, पण त्या शांततेत किती वादळ घोंगावत असेल हे कळतं मला...प्रत्येक वेळी तू चिडायची माझ्यावर आणि मला ब्लॉक करून 'बाय फॉरेव्हर' करायची...आणि अगदी दुसऱ्या तासलाच 'नालायका बोलायचं नाही का' म्हणून तोंड फुगवून बसायची..मजा यायची, लाड यायचा तुला मनवताना...पण आता अस काहीही होणार नाहीये याची जाणीव आहे मला... तू खरच मला फॉरेव्हर साठी ब्लॉक केलयेस ग ...!
आणि हो, कोरडी फुंकर मरायला नव्हतो आलो मी...पण असो, तू सुखी आहेस यामुळे तू मला कितीही शिव्या घातल्या किंवा काहीही बोललीस तरी हसून सगळं पचवून घेईल मी....
तुझं सामर्थ्य किती आहे हे तू स्वतः सिध्द केलयेस सोनू त्यामुळे कोणतीच लढाई लढताना तुला या विक्रमची गरज भासणार नाही याची खात्री आहे मला...आणि तुला कधी विक्रमची गरज पडू ही नये हीच प्रार्थना करेल मी रोज...तुझ्यासाठी देवाने अभयला पाठवलं आहे, आणि त्यापेक्षा मोठा आधार अजून कोण हवंय ग तुला??? आणि तू माझ्यासाठी सोनू होतीस आणि सोनूच राहणार आहेस...नैनिका तू फक्त अभयची आहेस...त्यामुळे माझ्या मनातली सोनू कोण्या नैनिकाने ब्लॉक केलं म्हणून थोडीच ती दूर जाणार आहे...कधीच नाही....सरतेशेवटी, नैनिका तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे हेच विक्रमच मत आहे...
------------------------------------------------------
समाप्त.