Guptdhan in Marathi Horror Stories by संदिप खुरुद books and stories PDF | गुप्तधन

Featured Books
Categories
Share

गुप्तधन

गुप्तधन

मरीबा ठरल्याप्रमाणे रात्री बारा वाजता उठला. आपण कोठे चाललो आहोत, याबाबत घरातील लोकांनाही थांगपत्ता लागु नये, यासाठी त्याने लेकरं आणी बायको झोपले आहेत का? याचा कानोसा घेतला. आपल्या छातीवर ठेवलेला बायकोचा हात त्याने अलगद बाजूला केला. ती काही हालचाल करते का? याचा त्याने पुन्हा एकदा कानोसा घेतला. तिची कसलीच हालचाल जाणवली नाही. दिवसभरात रानात काम केल्यामुळे तिला गाढ झोप लागली होती. मरीबाने आवाज होवु न देता हळूच दरवाजाची कडी काढली. व्हरांडयात ठेवलेला कंदील घेवून तो बाहेर पडला.

सगळीकडे किर्र अंधार होता. गावातील डी.पी.जळून आठ दिवस झाले होते. तरी अजून दुरुस्त केलेली नव्हती. त्यामुळे सगळा गाव अंधाराने कवेत घेतला होता.बाबु गारदी हातात लोखंडी पार घेवून मारोतीच्या पाराजवळ मरीबाची वाट पाहतच थांबला होता. आलेला व्यक्ती मरीबाच आहे, यांचा अंदाज आल्यावर लिंबाच्या झाडाच्या खोडामागे लपलेला बाबु बाहेर आला.

“मर्दा, किती येळ वाट पाहायची तुझी? कवाधरनं उभा हाय म्या हिथं.” असं बाबु हळु आवाजात पण तावातच बोलला.

तसं मरीबा म्हणाला, “आरं काय सांगावं, बारकं पोरगं सदाच उठून रडत होतं, त्याला झोपी घालुस्तर मालकीणबी जागीच, जवा समदं निवांत झालं, तवाच निघलो भाईर, बरं चल आता आधीच उशीर झालाया.”

बाबु “हो,हो चल.”,असं म्हणून पुढे निघाला. मरीबापण त्याच्या सोबत झपाझप पावलं टाकत होंडया माळाकडे निघाला.

गावापासून दोन कि.मी.अंतरावर दक्षिणेला ‘होंडामाळ’ होता. काही दिवसांपासून लोक त्याला ‘भुताचा माळ’ पण म्हणु लागले होते. कारण काही दिवसांपासून गावातील काही लोकांना अमावस्येला तेथे भुतं नाचताना दिसली होती. काहींना लांबूनच आगीचे टेंभे दिसले होते. तर काहींनी कर्कश आवाज ऐकले होते. म्हणून गावातील लोक त्या माळाकडे जाण्यास भित होते.

तीन दिवसांपुर्वी बाबु आणी मरीबा विहीरीवरील काम आटोपून घराकडे निघाले होते, तेव्हा त्यांना त्या भुताच्या माळावर सावकार आणी त्याचे चार गडी खड्डा बुजताना दिसले होते. तो माळ सावकाराच्या मालकीचाच होता. बाबु आणी मरीबाला तेथे थांबलेलं पाहून सावकार चांगलाच खेकसला होता. दुसऱ्या दिवशी कामाला जाताना त्यांना खड्डा बुजलेल्या जागेवर सोन्याची पाच ग्रॅमची अंगठी सापडली होती. तेव्हाच बाबुच्या लक्षात आलं होतं, सावकार या जागेवर नक्कीच काहीतरी काळे धन पुरुन ठेवतोय. तसेच लोक इकडे येऊ नयेत म्हणून त्यानेच इकडे भुतं आहेत, अशी अफवा पसरवली आहे. नक्की त्याचेच गडी लोकांना भिती दाखवतात. कारण दहा दिवसांपुर्वीच इंदर गोबरेच्या तक्रारीवरुन शहारातल्या मोठया अधिकाऱ्यांनी सावकाराच्या वाडयावर धाड टाकली होती. तेव्हा सावकाराने दोन नंबर धंद्यामध्ये मिळालेले सगळे काळे धन आधीच कोठेतरी लपवले होते. त्यामुळे ते अधिकारी मोकळया हाताने परत गेले होते. सावकाराने नक्कीच काळे धन भुताच्या माळावर पुरले होते, याची बाबुला पूर्ण खात्री होती, त्याबाबत त्याने मरीबालाही पटवून दिले होते. म्हणूनच आज ते दोघेही भुताच्या माळाकडे निघाले होते.

गडद अंधार असला, तरी रोजचीच वाट असल्याने ते दोघेही आवाज न करता, कानोसा घेत, सावध पावलं टाकत त्या माळाकडे निघाले होते. दोघेही मनातून खुप भ्याले होते. पण तसं न दाखवता ते दोघेही एकमेकांना धीर देत गुप्तधनाच्या लालसेने आपला जीव धोक्यात घालून भुताच्या माळाकडे निघाले होते. वाटेत कदमाची वस्ती लागत होती. कदमाच्या वस्तीवर वाघ्या नावाचं एक कडक कुत्रं होतं. या दोघांची चाहूल लागताच, ते कुत्रं झाडाच्या आड दबा धरून बसलं. मरीबा आधीच भ्याला होता. आज पर्यंत त्याला एकदाही कुत्रं चावलेलं नव्हतं. त्याला कुत्र्याची जास्तच भिती वाटत होती. अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. मरीबाला माहीत होतं, कदमाच्या वस्तीवरील कुत्रं भुंकत नाही. दबा धरून बसतं, आणी अचानक येवून चावतं.

मरीबा दबक्या आवाजात बाबुला म्हणाला, “आरं, कदमाची वस्ती जवळ आलीया, कुत्रं दबा धरून बसलेलं असंल, जरा कंदील लावु का?”

बाबु म्हणाला,“आरं, येडा का खुळा तु? उजेडात आपल्याला कोणी बघीतलं तर?”

बाबुचं बोलणं खरच होतं, त्यामुळे मरीबा शांत राहिला. मरीबा भितभितच एक-एक पाऊल पुढे टाकु लागला. कदमाच्या गोठयाजवळ येताच, मरीबा मोठमोठयानं ओरडु लागला. अंधार असल्यामुळे बाबुला काहीच दिसेना. मरीबा कशामुळे ओरडतोय? हे ही त्याच्या लक्षात येईना.

मरीबाला काहीच सांगता येईना. तो नुसता “आयो, आयो” म्हणून ओरडत होता. वाघ्यानं पाठीमागून मरीबाच्या पृष्ठभागाचा चावा घेतला होता. मरीबाच्या हातातील कंदीलही खाली पडला होता. वाघ्याचे सुळे दात त्याच्या मांसल भागात आरपार घुसले होते. मरीबा वेदनेने तळमळत होता. पुढचं काहीच दिसत नव्हतं. बाबु गांगारुन गेला होता. मरीबा मोठयाने विव्हळत होता. तितक्यात बाबुच्या लक्षात आलं, त्याच्या खिशात काडीपेटी होती. त्याने काडीपेटी काढून काडी ओढली,त्याला उताना पडलेला मरीबा आणी त्याच्या पार्श्वभागाचा चावा घेत असलेला वाघ्या कुत्रा दिसला. बाबुने हातातल्या पहारेचा जोराचा दणका वाघ्याच्या मानावर ठेवून दिला. कुत्रं आधीच दणकट होतं. ते जास्तच चवताळलं, ते आणखी जोर लावून चावा घेऊ लागलं. तसा मरीबा आणखी जोरजोरानं ओरडु लागला. आता पेटवलेली काडी विझली होती. बाबुला समोरचं काहीच दिसत नव्हतं. तो जोरजोराने पहारीचे रट्टे मारु लागला. एक रट्टा वाघ्याच्या टाळक्यात बसला. त्याने मरीबाचा धरलेला पार्श्वभाग सोडला, ते तेथून पळालं. पण इकडे बाबुला काहीच दिसलं नव्हतं. तो दात खावून मरीबाच्याच पार्श्वभागावर रट्टे मारत होता. आणी मरीबा मोठ-मोठयाने ओरडत होता. कुत्रं लांब जावून भुंकु लागलं. तेव्हा कुत्रं पळून गेल्याचं बाबूच्या लक्षात आलं. तोवर कदमाचा गोरख जागा झाला. बाबुने मरीबाला उठवलं. चालण्याचंही आवसान नसताना मरीबा बळेच त्याच्या बरोबर पळाला. वाघ्याला चांगलाच रट्टा बसल्यामुळे कुत्रं त्यांच्यामागे पळालं नाही. गोरख कदमाने बाहेर येऊन पाहिले. त्याला कोणीच दिसले नाही. उलट झोपमोड केली म्हणून त्यानेही वाघ्याच्या पेकाटात एक लाथ घातली. आणी शिव्या देत तो झोपायला गेला.

भुताचा माळ जवळ आला, आता दोघांच्या अंगाला घाम फुटला. मरीबा तर आधीच वेदनेने अर्धमेला झाला होता. आता खरंच भुत आलं, तरी पळायला त्याच्यामध्ये आवसान नव्हतं. सावकार आणी त्याच्या गडयांनी खड्डा बुजलेली जागा या दोघांनी दिवसा पाहिली होती. बाबु ने काडी पेटवली. नेमकी ती जागा लक्षात येईना. खुप शोधल्यावर त्यांना ती जागा सापडली. मरीबा नावाप्रमाणे मेल्यासारखा झाला होता. त्या प्रसंगातून तो आणखी सावरला नव्हता. तो बाबुला म्हणाला, “पुन्हा येऊ कधी तरी, आता उशीरबी लई झालाय चल.”

बाबुला मरीबाने काम केले नाही तरी त्याच्या सोबतीची गरज होती. तो म्हणाला, “आता तोंडाशी आलेला घास घालवायचा का? तु काही करु नको नुसता बसून रहा.”

बाबुने ती जागा खांदायला सुरुवात केली. त्या निर्जन माळावर फक्त जमिनीत पार खुपसल्याचा खण-खण असा आवाज येत होता. सगळीकडे भयाण शांतता पसरली होती.

तेवढयात वाऱ्याची झुळुक येवून गेली. त्याबरोबर झाडांच्या पाणाचा सळसळाट कानी आला. त्या आवाजाने झाडावर बसलेला कोणतातरी पक्षी कर्कश ओरडु लागला. आता कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नव्हतं. मरीबा जीव मुठीत धरून बसला होता. आता जर काही संकट आलं तर त्याला पळणंही शक्य नव्हतं. वेदनेनं त्याचा जीव कासावीस होत होता. तरीही तो दम धरून बसला होता. त्याचंही गुप्तधनाकडे लक्ष लागलं होतं.

पहाटेचे चार वाजत आले होते. थंडगार वारं अंगाला झोंबत होतं. तरीही बाबुचे सर्वांग घामानं भिजलं होतं. मांडी इतका खड्डा खोल झाला तरीही अजून गुप्तधन सापडलं नव्हतं. जसजसा वेळ चालला तसतसे ते दोघेही बेचैन होवु लागले. आता अंधार सरून सुर्य उगवायला थोडाच अवधी राहिला होता. बाबु नेटाने जोर लावून खड्डा खणत होता. मरीबाचा जीव खाली वर होत होता. त्यांना उजडायच्या आत घर गाठायचं होतं. इथेच उजाडलं, तर घरी जाणं अवघड होतं.

मरीबा म्हणाला, “बाबु, चल आता कडुसं पडाया लागलं बघ.”

बाबु म्हणाला, “आता एवढी मेहनत वाया घालायची का? थांब थोडं.”

एवढे बोलून तो आणखी आवेशाने पार जमिनीत खोसु लागला. आणी अचानक पार कशात तरी आरपार घुसल्याचं त्याला जाणवलं.

त्याला आनंद झाला. तो मरीबाला म्हणाला,

“मरीबा, बहुतेक गठुडं गावलं बघ.”

मरीबापण त्या खड्डयाकडे सरकून बसला.त्याच्या वेदना नाहीशा झाल्या. गुप्तधन पाहण्यासाठी त्याच्या मनात कुतुहल निर्माण झालं.

बाबुने काडी पेटवली, तेव्हा त्यांना भयानक दृश्य दिसलं. पार कोणाच्यातरी मस्तकात आरपार घुसली होती. दोघांची छाती लोहाराच्या भात्यागत धपापु लागली. त्यांचे हातपाय थरथरु लागले. त्यांचे डोके सुन्न झाले. थोड्या वेळाने ते भानावर आले. त्यांनी निरखून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं. ते इंदर गोबरेचं प्रेत होतं. ज्याने काही दिवसापुर्वीच सावकाराची तक्रार केली होती. तोच इंदर गेल्या चार दिवसांपासून गावातून बेपत्ता होता. बाबुच्या आणी मरीबाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. सावकारानंच इंदरला संपवलं होतं.

बाबु म्हणाला, “आता हेव खड्डा बुजावा लागंल बघ.नाहीतर खुनाचा आळ आपल्यावरच यायचा.”

मरीबा म्हणाला, “उगाच मी तुझ्या नादी लागलो बघ.”

बाबु म्हणाला, “मला एकटयालाचं गुप्तधन नव्हतं पाहिजे.”

मरीबालाही त्याची चूक लक्षात आली. तो काही न बोलताच खड्डा बुजू लागला.दोघांनी नेटानं खड्डा बुजवला. आता उजडायला थोडाच अवधी राहिला होता. त्यांच्या सुदैवाने हिवाळयाचे दिवस असल्याने साडे-पाच वाजत आले होते तरी अजून अंधारच होता. दोघेही उर फुटुस्तर घराकडे पळत सुटले. आपापल्या घरी जावून कोणाला काही कळायच्या आत गुपचूप निजले.

आता त्या दोघांनाही कळून चुकलं होतं. भुताच्या माळावर गुप्तधन पुरण्याचं नाही, तर जे लोक सावकाराच्या विरोधात जातात. त्यांना मारून पुरण्याचं ठिकाण आहे. आता आपण जर कोणाला काही सांगीतलं, तर सावकार आपल्याला पण तेथेच पुरेल. या भितीनं ते दोघेही तोंड बंद ठेवून शांत बसले.