Tu Hi re majha Mitwa - 31 in Marathi Love Stories by Harshada books and stories PDF | तू ही रे माझा मितवा - 31

Featured Books
Categories
Share

तू ही रे माझा मितवा - 31

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_३१

{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

रीमा तिच्या त्या लेटर्समध्ये गुंतून गेली .तिला खरंच वाटत नव्हतं तिची हट्टी, वेडी ऋतू इतका सॉरटेड विचार केव्हापासून करायला लागली ते?

उत्सुकतेने तिने पुढे वाचायला सुरुवात केली-

Date/day-- तुला मिस करतेय त्यातला random कुठलाही.

कबीर,

आज स्टोरीबोर्ड बनवतांना मला एक कॉन्सेप्ट अडला -

‘twilight mind’.

रिशीला त्याचा अपेक्षित असलेला अर्थ विचारला,तर त्याने खूप सोप्या शब्दांत समजावलं-

'एखादवेळी मनाची अशी स्टेट येते की त्यांच्या एका बाजूला स्वप्न असतं आणि दुसऱ्या बाजूला सत्य.त्या अधांतरी स्टेटमध्ये आपल्याला पूर्ण चॉईस असते काय हवं ते निवडायची आणि मग ती निवडच आपली डेस्टिनी बनते.'

कबीर मला वाटतं ही अवस्था,हे स्टेट ऑफ द माईंड मी अनुभवलंय आणि मी त्यात माझ्यासाठी स्वप्न चॉईस केलं..आणि आता तिच माझी डेस्टिनी आहे.

ह्या स्वप्नांच्या जगात फक्त आपल्या दोघांची पावलं एक एक करून पडत असतात.मी ती रिदम फक्त समजून घेते,मला आपल्या सावल्या फक्त दिसतात, मी त्यांची शांतता समजून घेते.पावलांना आणि सावल्यांना भाषा कुठे असते?

बघ! माझं हे असं सतत चालू असतं,तुला शोधायला निघते, स्वतःपासून सुरुवात करून मी स्वतःपर्यंतच येते.

कबीर ही ट्विलाइट माईंडची अस्वस्था तुझी पण होते का रे?

पुन्हा एक संध्याकाळ तुझ्या त्या थोड्या हेझल रंगाच्या डोळ्यांत मिसळून अंगभर लपेटून घ्यावी असं वाटतं...तुला देते का आवाज एक तरी संध्याकाळ?
नाही ना?

पक्क ठावूक आहे मला.

तरीही,
तुझीच-मी

_______________________________________________

Date/day- तुझ्यामाझ्या हातातून सुटलेल्या दिवसांपैकी असाच एक.

कबीर,

आपल्या आवडीचं काम असलं की थकवा जाणवत नाही म्हणतात ते खरं आहे.हा प्रोजेक्ट माझ्या करियरलाच नाही तर आयुष्याला देखील वेगळी दिशा देतोय.
रिशी आज म्हणाला ‘तुला कामात सतत बेस्ट देण्याचा नवीनच फितूर चढलाय.’
मी त्याला तेव्हा हसून टाळलं पण हा फितूर अजूनही पाठ सोडत नाहीये.
हो कामाचा एक फितूर,एक कैफ चढलाय आणि त्या धुंदीत राहणं आताश्या आवडू लागलंय कारण काही रंगीत आठवणी विसरायला त्याहून गर्द,कॉन्सनट्रेट धग हवीय आयुष्यात.

कबीर तू आयुष्यात येण्यापूर्वीचे काही प्रेशियश मोमेंट्स ज्यांना मला वाटत होतं एखाद्या अमुल्य हिऱ्याची झळाळी आहे ते निव्वळ काचेचे चमचमणारे तुकडे ठरले.
लहानपणी मी पानांवरचे दवं मोती समजून खूप वेळा जसेच्या तसे बोटावर उतरून घ्यायचा प्रयत्न करायची पण प्रत्येकवेळी त्याचं पाणी होऊन बोटं ओलसर व्हायची,तसचं काहीसं झालं.
त्यामुळे आता हा कामाचा फितूर मला जास्त आवडतोय.
यांत मी सगळं विसरते.
बाय द वे,तुझा फितूर काय आहे?
तुझं काम हे तुला सगळ्यात जास्त प्रिय आहे माहितीये पण अजूनही शांततेत एखादी बंदिश ऐकत स्वतःला विसरून जातोस का?
अजूनही एकटेपणाला सोबत म्हणून सिगरेट ओढतोस का?( मला नाही आवडत)
खूप काही बदललं असेल नाही ह्या सहा महिन्यात? कबीर मी आहे का रे तुझ्या आठवणीत अजूनही?
नाही म्हणजे तू मला आठवणीत ठेवावं हा माझा आग्रह नाहीचये मुळी, फक्त एखाद्या संध्याकाळी,एकटं असतांना माझी पुसटशी आठवण तरी असेल ना तुला?

कबीर, आता हे असं आयुष्यभर तुझं प्रेम गृहीत धरून तुला रोज unposted letter लिह्ण्याचं हे जे वेडं आहे,त्याला काय नाव देऊ?

फितूर की madness!!

तुझीच-मी

------------------------------------------------------------------------------

Date/Day- मृगजळ वाटणाऱ्या दिवसांपैकी एक!

“मृगजळ” ...सराब..मिराज !!

आपला प्रॉब्लेम काय असतो माहितीये?
आपल्याला भास आभासांचा खेळ जास्त आवडतो,जवळचा वाटतो.
जोपर्यंत ह्या मृगजळाची ओढ असते त्याचं आभासी असणं, delusion काहीच दिसत नाही मग एका क्षणी हा आभासी पडदा हटतो आणि दूरपर्यंत पसरलेलं रखरखीत वास्तव समोर येतं.
आज पुणे सोडून जवळपास पाच महिने होताय आणि ह्या पाच महिन्यांनतर मी वेदला पाहिलं.जेव्हा मी इमोशनल गुंता सोडवू शकले नाही तेव्हा मी इकडे येण्याचा निर्णय घेतला.
I actually ran away from all that mess .नंतर काही दिवसांनी जेव्हा तो रेवासोबत मूव्ह ऑन होणार होता तेव्हाही तो बोलला माझ्याशी.
खरतर इतकं सोप्प नसतं पहिल्यांदा अनुभवलेलं प्रेम विसरणं, त्याच्यासाठीही ते सोप्प नसावं पण त्याचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या लिखाणावर आहे आणि त्यामुळे कदाचित त्याला ते जमलं असावं पण आज रेवा,जय आणि वेद तिघं मिळून मला भेटायला आलेले.
जयला मला सॉरी म्हणायचं होतं.खूप ऑकवर्ड सिच्युएशन होती ती. वेदने त्याची मितवा कादंबरी पूर्ण केली आणि ती पब्लिश करायच्या अगोदर माझ्याकडून एक एनओसी फॉर्म त्याला साईन करून हवा होता. त्याला वाटलं असेल मी त्याच्या रायटिंग कंटेंटवर हरकत घेऊ शकते.मला ड्राफ्ट दिला त्याने वाचायला.वाचून मग सही कर म्हटला,मी ड्राफ्ट आणि सही केलेला फॉर्म त्याला लागलीच दिला.जे मी जगलेय त्याचाच ड्राफ्ट का वाचायचा आणि जे काही काल्पनिक असेल त्याच्याशी माझा संबंध नाही.

मी इतक्या सहजपणे सही केली याचं रेवा न जयला खूप आश्चर्य वाटलेलं दिसलं.असही त्यांचा माझ्यावर कधीच विश्वास नव्हता.

Anyway,वेद कॉपीराईटर म्हणून खूप साऱ्या ब्रान्डच्या प्रोडक्टवर काम करतोय हे ऐकून छान वाटलं.तो तेवढा talented आहेच.

वेद......!!
माझं आयुष्य व्यापलं होतं ह्या शब्दाने.
त्याच्या त्या गोड डिंपल,त्या डिंपलहूनही त्याचं गोड रोमांटिक बोलणं,त्याच्या सोबतचे प्रेशियस मोमेंट्स..हे सगळं विसरणं न त्याला शक्य आहे न मला पण त्या आठवणींना आता शब्दांचा वास येतोय.
ते सगळे प्रसंग माझ्यासकट पुस्तकांच्या पानात जाऊन बसताय, हसताय माझ्यावर.
तो माझ्याजवळ जरी आला तरी मी ब्लश व्हायचे, ती माझ्या गालांवर चढणारी लाली माझ्या नकळत कागदावर उतरवली गेली. माझं त्याच्यासाठी पझेसिव्ह होण्यात,त्याच्या तोंडून ‘I love you’ ऐकण्याच्या बैचेनीने कादंबरीची पानं भरली जात होती. वेद तुझं प्रेम खोटं नव्हतं पण मी प्रेमच्या शोधात नव्हते रे वेद, मला प्रेमातल्या त्या ट्रस्टची ओढ होती जी नात्याला परिपूर्ण बनवते.
तू तुझ्या कथेला आकार देतांना मला सतत विस्कटलेलं ठेवलंस.

वेद त्या रात्री कबीरसोबत नसता तर? असो..!

जातांना एकट्यात गाठून मला रेवाने अगदी भरलेल्या डोळ्यांनी एक रिक्वेस्ट केली-
‘प्लीज जमलं तर मुंबईब्रांचला ट्रान्स्फर मागून घे,एका महिन्यात तुझा प्रोजेक्ट संपेल तू परत पुण्याला येणार,जर वेद.....”
ती पुढे बोलू शकली नाही,पण मला समजलं तिला काय म्हणायचं होतं ते.
खरंच,प्रेम माणसाला insecure करतं. मी त्यावेळी काहीच बोलले नाही,काही सुचलंच नाही.खरतर तिला असुरक्षित वाटण्याचं काहीच कारण नाहीये.त्यांच्या प्रेमाला मैत्रीचं strong foundation आहे.
मिकाने मागे सिंगापूरला एक वर्षाची advance advertising इटर्नशिप आहे ती करणार का म्हणून विचारलं होतं,मला वाटतं त्यासाठी ‘हो’ म्हणायची वेळ आलीय.
खरच,time is the best solution असं म्हणतात ते काही खोटं नाही.
वेद खूप स्टेबल आणि कंटेंट वाटला नव्याने गवसलेल्या प्रेमामुळे की मितवा मिराकी पब्लिश करतेय ह्या आनंदामुळे माहित नाही पण त्याला त्याचा मार्ग सापडलाय ही आनंदाची गोष्ट आणि मी ?

मी मझ्याच भावनांच्या,विचारांच्या धुक्यात चाचपडतेय,मांजा तुटलेल्या पतंगासारखी हेलकावे खात वारा नेईल तिकडे वाहत जातेय,destiny !!
मी माझ्यासाठी निवडलेली डेस्टिनी.

बाकी जगाच्या पाठीवर मी कुठेही गेली तरी ह्या डायरीच्या पानांमधून तर तू जवळ असशील ना कबीर?

माझीच नसलेली,
मी
________________________________________________

Date/Day- तुला कधीच कळला नाही असा कुठलाही.

कबीर,

ज्या गोष्टीपासून आपण दूर पळण्याचा प्रयत्न करतो, ती का पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येत असते?
कबीर मी खूप प्रयत्न करते स्वतःला सावरून ठेवायचा पण काही क्षण माझ्या हातात नसतात रे.
आज ध्यानीमनी नसतांना “सहेला रे”ऐकलं.
मी पुन्हा एकदा स्वतःला हरवून बसले.
हा एक शब्द माझ्या आयुष्यातलं ‘पर्पल ड्रीम ’ आहे.खूप सेरेन तरीही घुसमट करणारं.
असे कितीसे क्षण आहेत माझ्याकडे तुझ्या आठवणींचे?
अगदी थोडे,म्हटले तर काहीच नाही पण ‘सहेला रे’ म्हटलं की ते क्षण अमर्याद होतात.गोठून जातात.
तू आणि मी भेटलोच का? हा प्रश्न मी वैतागून त्यादरम्यान हजारदा स्वतःला विचारला असेल पण आज मी खूप sure आहे, कुठेतरी अस्ताव्यस्त भरकटत असलेल्या माझ्या आयुष्याला माझं अवखळ वळण न बदलवता स्वतःसोबत वाहवत घेऊन जाण्यासाठी तू आलास मला दिशा सापडते तोपर्यंत निघूनही गेलास.
कबीर मी म्हणतेय,स्वतःला रोज दटावतेय की तुझ्याशिवाय राहण्याची शिक्षा हेच सगळ्या चुकांवरचं प्रायश्चित्त आहे पण एखादा असा दिवस येतो आणि मोठ्या मुश्किलीने जोडलेल्या संयमाचे तुकडे विखरून जातात.तू आठवतोस रे,खूप जास्त आठवतोस.
तुला डोळे भरून पाहण्याआधीच तू निघून गेलास.
मला तुझी सोबत हवी होती कबीर.एकदाच सांग अनोळखी मुलीसाठी इतकी काळजी,जवळीक उगीच वाटली तुला?
त्या संध्याकाळी तुझे ओठ जे बोलले त्यात जगाला माहित असलेलं i love you, miss you वालं प्रेम नव्हतं पण प्रेमापेक्षाही खूप जास्त,मी ज्याच्या शोधात होते तो नात्यांमधला ‘सुकून’, विश्वास होता.
मला तू माझ्या आयुष्यात हवाय कबीर,आता धावत पळत तुझ्याकडे यावं,तुला घट्ट मिठी मारून खूप खूप रडावं वाटतंय,पण,पण ...हा पण खूप त्रासदायक आहे आयुष्यात.

बाहेर बीनमोसमाचा बेसुमार पाऊस कोसळतोय,सगळं शहर चिंब भिजलय, मला उन्हाची आठवण येतेय!

सगळी झाडं पावसात शांत उभी आहे, मला गुलबक्षीच्या फुलांची आठवण येतेय.!

मध्यरात्र झालीय,मला चांदण्यांची आठवण येतेय.

खूप एकटं वाटतंय कबीर,मला तुझी आठवण येतेय,खूप येतेय.

तुझीच-मी

#क्रमशः

Copyright©2019 हर्षदा

All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.

💬
मी आताचे सगळे पार्ट स्वतःला ह्या काल्पनिक पत्रांपासून वेगळे ठेऊनच लिहले,त्यात गुंतवून घेतलं नाही पण आज राहवलं गेलं नाही,ह्या कल्पनेतील पत्रांसाठी डोळे उगाच भरून येताय....!!