तमाशा
रविवार असल्याने आज गावचा बाजार होता. बबन बोरगांवकराच्या तमाशा मंडळाची गाडी सकाळपासूनच बाजारातून अनांउंसींग करत फिरत होती. तमाशा मंडळाच्या गाडीवर दोन-चार लावण्यवतींचे पोस्टर लावलेले होते. पोस्टरवरील पोरी अतिशय देखण्या दिसत होत्या. तमाशा आल्यामुळे आजूबाजूच्या खेडयातले लोकही तमाशाला थांबले होते. बऱ्याच जणांनी तमाशा पाहण्यासाठी बाजाराला आणलेले पैसे पूर्ण न उडवता, बचत केले होते. तमाशा आल्यानं सगळेजण आनंदात होते. दिवस मावळतीला आला, तसं सगळेजण लगबगीने दुकानं आवरु लागले. सगळयांना तमाशाची ओढ लागली होती. गबरु आणी पम्या दोघेही पम्याच्या रानातच झोपायला जात होते. त्यामुळे गबरुनी जेवण केलं आणी आईला रानात झोपायला चाललोय म्हणून सांगीतलं. पम्या चावडीवर गबरुची वाटच पाहत उभा होता. गावापासून तमाशा तीन-चार कि.मी. अंतरावर पम्याच्या वावरातच होता. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्यांची गाडी बंद पडली. तमाशा चालु झाला होता. गाण्यांचा, लावण्यांचा आवाज दूरवर कानावर येत होता. पम्या किकावर किका मारत होता. गबरुनं पाहिलं तर गाडीतलं तेल संपलं होतं.
तो पम्यावर खेकसलाच, “एवढा चिकटपणा का करतो रं? साधं त्याल पण ठिवीत नाही गाडीत.”
"आरं म्या बघीतलंच नाही रं." पम्या अपराध्यासारखं बोलला.
शेवटी दोघांनी गाडी ढकलत तमाशापर्यंत आणली.दोघेही घामाघुम झाले होते. आता परत जातानाची तजवीज करावी लागणार होती. तमाशाच्या फडाच्या बाजूला बऱ्याच तमाशा पहायला आलेल्या लोकांनी मोटारसायकली उभ्या केलेल्या होत्या. पम्यानं एक जणाच्या गाडीतून मोकळया बिस्लेरीच्या बाटलीत पेट्रोल काढून आपल्या गाडीत ओतले.
तमाशाच्या कमानीतून ते दोघे तिकीट न काढताच आत जाऊ लागले. दारावरल्या माणसानं त्या दोघांना अडवलं.
पम्या म्हणाला, “आरं आमच्याच वावरात हाई तुमचा तमाशा, चल जाऊ दी आत.”
आता वावराचा मालकच आलाय म्हणल्यावर त्याला अडवून कसं जमेल? त्या माणसाने दोघांना आतमध्ये सोडले. तमाशा हाऊसफुल झाला होता. काही लावण्या झाल्या तर काही बहारदार हिंदी गाण्यांवर नृत्य झाले. तमाशाला आलेले बरेच जण कोणी हातभट्टी तर कोणी देशी तर कोणी इंग्लीश दारु पिऊन आलेले होते. अंगामध्ये असणारी बाई आन् समोर नाचणारी बाई पाहून सगळेजण मधहोश झाले होते. अर्धी रात्र सरली होती. तरी तमाशाचा रंग काही उतरत नव्हता. प्रत्येकजण तमाशाच्या रंगात रंगून गेला होता. एखाद्या चांगल्या गाण्याला वन्स मोअर मिळत होता. बैजू पाटलाचा पप्पु आन् सर्जेराव सावकाराचा बाबु यांच्यात लावण्यवतींवर पैसे उधळण्याची स्पर्धा लागली होती. मधूनच ते आपली फर्माईश लावण्यासाठी विनंती करत होते. गबरु आणी पम्या पण इतरांप्रमाणेच तमाशाचा मनमुराद आनंद लुटत होते.
गबरुच्या आवडीच्या 'नटरंग' चित्रपटातील ‘जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा’ या सुंदर लावणीवर,तितकीच सुंदर लावण्यवती लावणी सादर करत होती. लावणीची अप्रतिम शब्द रचना, विलोभनीय संगीत आणी त्या सुंदरीची दिलखेचक अदा यामुळे गबरु बेभान होवून लावणीत तल्लीन झाला होता. तो शिट्टया वाजवत होता. संपूर्ण वातावरणच मदहोश झालं होतं. तितक्यात पम्या गबऱ्याच्या शर्टाला धरुन त्याला मागे ओढू लागला. गबऱ्यानं पम्याकडं पाहिलं. पम्याने डोळयानंच इशारा केला. गबऱ्यानं समोर पाहिलं, गबऱ्याचा बाप गबऱ्याच्या पुढेच बसला होता. लावणीच्या नादात गबऱ्या बापाच्याच खांद्यावर हात टाकून शिट्टया वाजवत होता. गबऱ्यानं बापाकडं पाहिलं, त्याच्या बापानं गबऱ्याकडं पाहिलं.तसा गबऱ्या उठून तडक पळत सुटला.
गबऱ्यानं पळता-पळता मागं पाहिलं, म्हातारं त्याच्या मागेच पळत होतं. गबऱ्या अजून जोर लावून पळु लागला. म्हातारं पण चांगलं जोरानं पळु लागलं. आता आपलं काही खरं नाही पकडल्यावर म्हातारं आपल्याला चांगलाच तुडवून काढणार म्हणून गबरु नेट लावून पळत होता. तेवढयात पळता-पळता अंधारात गबऱ्याचा पाय कशाला तरी अडकून गबऱ्या खाली पडला. तोवर म्हातारं जवळ आलं होतं, म्हातारं खवळन म्हणून लागलं नसतानाही गबऱ्या खुप लागल्याचं नाटक करुन आयोss आयोss असं मोठयानं लागला.
तेव्हा गबऱ्याचं म्हातारं म्हणालं, “एवढं पळायला काय झालं तुला? मी तमाशाला आलो होतो म्हणून घरी सांगु नको बघ.”
आता गबऱ्याच्या लक्षात आलं म्हातारं का पळत होतं ते. कारण गबऱ्याचं म्हातारं गबऱ्याच्या आजोबाला खुप भेत होतं. गबऱ्याचा आजोबा माळकरी माणूस होता. त्याला मटन,दारु आन् तमाशा अजिबात आवडत नव्हता. आणि गबऱ्याचा बाप हे सगळं करुन बसला होता. पण गबऱ्याच्या आजोबाला गबऱ्याचा बाप खुप भित होता.
गबऱ्या पण लगेच म्हणाला, “मी बी काय तमाशाला आलो नव्हतो. तुम्ही हाईत का म्हणूनच पाहायला आलो होतो.”
तेवढयात गबऱ्याचा बाप म्हणाला, “मी तुझा बापच हाय, तु मला शिकवु नकोस. मला चांगलंच माहिती तु कशाला आलता ते. तमाशा काही वाईट नाही. ती आपल्या महाराष्ट्राची लोककला आहे. पण काही लोकांनी उगचच तमाशाला बदनाम केलं आहे. आजकालच्या सिनेमांतील भडक दृश्यांपेक्षा आपली संस्कृती,आपली परंपरा जपणारा 'तमाशा' चांगलाच आहे.”
एवढे बोलून ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसायला लागले. एकमेकांचं नाव घरी न सांगण्याच्या अटीवर दोघेही तमाशाकडे परत आले. बाप-लेक तमाशाला सोबत आलेले पाहून पम्या दोघांकडेही आ वासून पाहतच राहिला.