Poet Asahya - 1 in Marathi Comedy stories by टाकबोरू books and stories PDF | कवी असह्य. - 1

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

कवी असह्य. - 1

कवी असह्य व माझा संबंध तसा जुनाच. ऋणानुबंध प्रकारात मोडतील असे आमचे संबंध मुळीच नाहीत. आज मात्र अचानकच कवी असह्यांच्या ओघवत्या वाणीतून आमच्या नात्यातील प्रेम, प्लास्टिकच्या पिशवीने गटार तुंबून वहाव तसं, वहात होतं. देवावरचा विश्वास उडून मी नास्तिक व्हायला कैक प्रसंगांचा हातभार असला तरी 'कवी असह्यांशी ओळख' हा त्यातला एक महत्त्वाचा प्रसंग. दिवसाची सुरुवात—मी हिच्यापेक्षा अमळच लवकर उठल्याने—शांततेत झाली होती. कुठूनतरी दूधात माशी शिंकावी, दूधात विरजन पडावे किंवा दुध उकळताना दूध फुटावे असंच काहीसे कवी असह्य आल्याने झालेलं होतं. घड्याळाकडे मी पुन्हा एकदा निर्विकारपणे पाहिलं. जे घड्याळ माझ्याकडे दररोज सर्कशीतल्या रिंगमास्टर प्रमाणे पाहत असतं त्याच घड्याळाचा चेहरा आज मला मलूल वाटला! त्याची जरब आज जाणवली नाही. साडेआठ उलटून गेले तरीही मी आज घरीच होतो—अर्थातच सुट्टीचा दिवस. याच सुट्टीच्या दिवसाचं औचित्य साधून असह्यांनी माझ्या घरी धाड टाकली होती. भीड रेटत असती तर मी केव्हाच कवी असह्यांना घराबाहेर रेटल असतं! कोत्या मनाचा माणूस मी, माझा स्वभाव मला खटकला.

वयाची पस्तिशी उलटली की केस विरळ होत जातात, पोट मेंदूचं न ऐकता स्वतःचच खरं करू लागतं आणि दाढीचे खुंट एका रात्रीत दुपटीने वाढू लागतात. याच बदलांसमवेत आणखीही एक बदल मानवी आयुष्यात घडतो माणूस शांततेच महत्त्व जाणू लागतो! या बदलाला मी चांगलाच सरावलो असल्याने हिला न उठवता मी स्वयंपाकघराकडे वळालो. 'वळालो' हे विशेषण इथे फक्कड जमले आहे. दहा बाय बाराच्या खोलीत कुठेही जायचं असेल तर फक्त वळावं लागतं! मी स्वयंपाक घराकडे वळालो. खाली वाकून सिलेंडरचा दट्टया फिरवला व उठताना गुडघ्याच हाड काटकन मोडलं. मी दचकून हिच्याकडे पाहिलं, तिच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहून ती झोपेत असल्याची खात्री पटल्यावर मी पुन्हा शेगडीकडे वळालो. व्यायाम सुरू करण्याचा एक अभद्र विचारही माझ्या मनाला शिवून गेला! 'शिव-शिव-शिव' मी दोन्ही हातांचे पंजे आलटून-पालटून दोन्ही गालांवर, हळू आवाजात, चापट्या मारून घेतल्या. शेगडीवर पातेल चढवलं आणि तांब्या रिकामा केला. थोडासा वेळ जाईपर्यंत (मनातल्या मनात) शिट्टी वाजवली व कोमट पाणी तांब्यात घेतलं. पाणी पिल्यावर निसर्गाच्या कृपेने माझ्या अंगात विजेची चपळाई आली! मी पटकन बादली उचलली, चावी घेतली आणि शौचालयाकडे—वयाला लाजवेल अशा वेगात—धाव घेतली. शौचालयाला टाळं बघूनच निम्मा हलका झाल्याची भावना त्वरितच आली; पण नेमक त्या दळभद्री टाळ्याच्या कळसुत्री, नशिबाच्या चाकांसारख्या, उलट्याच फिरल्या! कुलूप उघडता उघडेना. शेवटी एकदाचा मी आत, जीव भांड्यात आणि टाकाऊ पदार्थ बाहेर! सकाळी-सकाळी शौचालय उघडं सापडणं हा देवाचा शुभसंकेतच आहे. जर खात्री नसेल तर आमच्या शेजारची खोली भाडेतत्वावर देणे आहेच!
ब्रह्मांडातील कोणतीतरी सुप्तशक्ती आज नक्कीच माझ्या पाठीशी होती. कारण, मी परत आलो तेव्हा सुद्धा ही झोपलेलीच होती! मनाच्या खात्रीसाठी मी एकदा सुरक्षित अंतरावरून श्वासही तपासला—चालू होता! आमची ही उठण्यासाठी सहसा सातचा आकडा पार करत नाही. प्रेमाने तिला 'काय झालं? बरं वाटत नाही का?' असा प्रश्न विचारावासा वाटला. तेवढ्यातच—अज्ञात दैवी शक्तीच्या कृपेने—मी अद्याप ब्रश केलेला नसल्याचं माझ्या लक्षात आलं. मी मोरीकडे वळालो.
ब्रश तोंडात कोंबला. उजव्या हाताने ब्रश ची धुरा सांभाळली तेव्हा डाव्या हाताला सुद्धा स्वतःचा जिवंतपणा दाखवण्याची हुक्की आली. त्यांने मेंदूला न विचारताच 'सर्व' अवयव व्यवस्थित असल्याची चाचपणी केली! तोंड विसळून झाल्यावर मी ड्रमातून बादली उपसली, एक मग पाणी पुन्हा ड्रमात रितं केलं. तेवढाच पर्यावरणाला हातभार! आरशात दाढीचे खुंट मलातर ठिकठाक वाटले— याचा सरळसरळ अर्थ हिला ते ठिकठाक वाटणार नव्हते! मी ब्रश च्या भात्यातला फावडा उचलला. त्याचं ब्लेड पाच दिवसांपूर्वीच बदलले असल्याची नोंद कॅलेंडर मधे होतीच! 'अजून दोन दिवस सहज जाईल', या विचाराने मी फावड्याने गाल नांगरले.
हवेत किंचितसा दमटपणा दाटू लागला होता, त्यात सूर्याने यायला उशीर केलेला, याहून मोठं सुख म्हणजे ती अजूनही केस पिंजारलेल्या अवस्थेत गाढ झोपलेली होती. गाणं गुणगुणण्याची अतीव इच्छा साबणाच्या फेसाबरोबर धुवून टाकली व मी तयार झालो. पावसाळ्यात खटाखट वाळलेली हांडरप्यांट घालायला मिळणे हा सुद्धा दैवीसंकेतच! आरशासमोर उभा राहून मी 'सौंदर्यात भर पाडता येईल का?' याचा विचार करू लागलो.
शेजारी ठेवलेली पॅराशुट उचलली—रिकामी होती! शेगडी पेटवून मी पॅराशुट आगीवर भाजली तेव्हा लक्षात आलं की पावसाळ्यात तेल आळतच नाही. शेवटचा पर्याय म्हणून ती बुदली उलटी करून तळहातावर दाबली व प्रेशर लावल अर्थातच बुदलीवर! तेव्हा चमत्कार झाला व टाळू ओली होण्यापूरतं खोबरेल भसकन बाहेर आलं. मनातल्या मनात (व नटीच्या आवाजात) उडे जब-जब जुल्फे तेरी . . . म्हणत मी शिल्लक असलेल्या केसांचा केशसंभार नीट केला.
सगळं आवरुन मी झाकपाक झालो तेव्हा साडेसात वाजत आले होते. आता मात्र मला, निदान माझ्या पोटाला तरी, हिची सक्त गरज होती. हिच्या अंगावरची चादर उचलून सरळ घडी करायला घेण्याचा मूर्खपणा मी केला नाही. अनुभवातून शहाण होणं जमतं मला! मी दुरूनच तिला हलवलं.
"बरं वाटत नाहीये का?" मी म्हणालो तसं तिने उठून पटकन डोळे किलकिले करून घड्याळात पाहिलं आणि दचकून गादीवरच टणकण उडाली. त्याचक्षणी मी घड्याळ असाव असं मला वाटलं. कारण, आमची ही घड्याळाला घाबरली म्हणजे घड्याळ अचाटच आहे!
दरवेळी प्रमाणे चूक माझीच होती, हे मला मागाहून कळालं! हिला लवकर उठवलं तर 'का उठवलं?' आणि जर उशिरा उठवल तर 'का उठवलं नाही?' या दोन्ही प्रश्नांनी माझा एकट्याचा मूर्खपणा उघडकीस येतो. ही उठून आरशाकडे वळली तेव्हा मी सुज्ञपणाने चादरीची घडी घातली! केस व्यवस्थित करून हिने माझ्यावर शाब्दिक तोफगोळा फेकण्याची क्रिया विनासायास चालू ठेवली; पण आजचा दिवस असा खास होता की मला या 'कौतुकाचं' काहीच वाटलं नाही! माणूस चांगला दिसतो हे त्याला कळालं की भलताच आत्मविश्वास येतो.
"पाणी भरून आणू का?" मी हिची परवानगी मागितली. तेव्हाच शेजारणीची कमरेवर हंडा घेतलेली कमनीय आकृती माझ्या नजरेसमोर चमकली. बहुदा हिला माझ्या तोंडावरून याचा सुगावा लागला असावा. त्या बाबतीत आमची वाली खूप पुढे आहे!
"काही नको पाणी-बिनी! एवढी काळजी असती तर सकाळीच लवकर उठवलं असतं मला." शेवटच वाक्य जरा दरडावून म्हणाली. नाष्टा पोटात जाईपर्यंत तिला ब्र शब्दही न काढण्याची प्रतिज्ञा मी मनातल्या मनात घेतली. नाष्टा झाल्यानंतर सुद्धा प्रतिज्ञा अबाधित ठेवण्याची नवीन कल्पना सुचली—मी लगेच मंजूर केली!
'आमची पोरं हिशोबाला लय पक्की आहे बर का.' असं सासरेबुवांनी आधीच मला सांगून ठेवलं होतं. का बजावून ठेवलं होतं माहीत नाही! काहीही असलं तरी त्यांच (हे एकच) वाक्य पुरेपूर खरं निघालं. आमची ही सकाळचे पोहे किंवा दिवसभराच जेवण बनवताना असा काही हिशोब लावते की भिक्षा मागायला कोणी याचक दारात आला तरी त्याला ताज बनवून द्याव लागेल! साहजिकच माझ्या एकट्याच्या नावचे पोहे कढईत उपड्या ताटाखाली माझी वाट पाहत होते. मी गुणगुणतच ताट घुमवलं, त्याच ताटात मी उलताण्याने पोहे खेचणार तेवढ्यात हिचा आवाज आला.
"या भाऊजी, कसं काय येणं केलतं? ते . . . आहेत की घरातच."
मी संधी ओळखून पटकन बाहेर आलो. आमची वाली आणि शेजारीण निवांत गप्पा मारत होत्या. ही पटकन आवरून पोहे बनवून आता गप्पांमध्ये दंग झालेली. घड्याळात आठ वाजलेले. आलेल्या पाहुण्याच्या निमित्ताने मगाची हंडा कमरेवर घेतलेली कमनीय आकृती दिसेल म्हणून मी थेट उंबऱ्यात पवित्रा घेतला; पण हिने बरोबर दरवाजाला पाठमोर थांबून पुढचा 'व्य्हू ब्लॉक' केला होता! तेव्हाच मला तिथे उत्पन्न झालेली कवी असह्यांची आकृती दिसली. मला क्षणातच लख्ख पडलेला सूर्यप्रकाश गायब होऊन शिरवळ पडल्याचा भास झाला! मी पटकन येऊन कढईवर ताट उपडं झाकलं.
"येऊ का आत?" असह्यांनी विचारलं.
'नको!' माझे ओठ या उच्चारात हलले परंतू आवाज मात्र "या, या स्वागत आहे" असाच निघाला!
कवी असह्य ऐन पंचविशीतला माणूस. म्हणावं तर नशिबाने त्याला सगळं काही दिलेलं होतं. दिसायला कोरीव, शरीरयष्टी जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही, शरीर काटक बांध्याच, उंची साधारण पाच-नऊच्या आसपास असावी, वेंधळेपणा नव्हता, अखडू वृत्ती नव्हती, केस मला हेवा वाटावा इतके वाढलेले, मिशीचा पत्ता अर्धा कट झालेला व दाढीचा एकच मोठा भाग फक्त हनुवटीवर लोंबत होता. कांड्या न दिसणारा चकचकीत चष्मा होता, आवाजात लाघवीपणा होता.
देव कोणालाच परिपूर्ण बनवत नाही इतकं सगळं देऊन देवाने त्यांना आणखी एक वरदान(?) दिलं कवीपणाचं!
"काय काम काढलत?" चहा-पाण्याला माझीच मारामार असल्याने मी सरळ मुद्द्याला हात घातला. नमनाला घडाभर घालवण्याइतका वेळ होताच कुठे?
"काही नाही आपलं सहजच." असह्य हसतच म्हणाले. शेवटी बराच वेळ घरावर नजरशोध घेऊन असह्य बोलते झाले. "ते तुम्ही लेखन करता असं कळालं."
"कोण? मी? हे तुमचं काहीतरीच!" मी ठळकपणे बोलून गेलो. तरी मनातून मी भेदरलो होतो. आपण दोन फुटकळ शब्दांचे वाली आहोत याबाबत ह्याला कसं काय कळालं?
"खोट सांगू नका." कवी असह्य हसत-हसत बोलत होते का बोलता-बोलता हसत होते, ओळखता येणार नव्हतं. "मला माहितीये तुम्ही आता डिजिटल लेखक म्हणून बरेच प्रसिद्ध झाला आहात! वाचकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलय! तुमची चर्चा आभासी आसमंतातून वाचकांच्या वास्तवी जीवनात बरसू लागलीये! सगळीकडे फक्त तुम्हीच!"
संवाद पुरेसे लक्षात नसल्याने थोडीशी स्तुती येऊ शकते, हे मी निर्विवादपणे मान्य करतो; पण खरोखर आज कवी असह्य मला अस्मान ठेंगण दाखवून देत होते. कोणीतरी स्तुती करू लागलं की मला भीती वाटते. भीड न रेटणारा मी हुरळलो की मग तर समोरच्याच्या कामाला होकार दिल्याशिवाय राहवत नाही. माझिया मनाची बात असह्यांनी जाणली होती का काय? हे देवच जाणतो.
"नाही ओ कशाचं काय? वेळी-अवेळी मनात शब्दांचा पूर आला की त्यात सोडतो कागदाची होडी करून . . . निघतात पाने लिखाणाने भिजून!"
"वाह, वाह . . . " कवी असह्य उगाचच म्हणाले.
इकडे हवापाण्याच्या निरर्थक गप्पा वाढत निघालेल्या होत्या तिकडे कढईतले पोहे हळूहळू वातड होत होते. वन बाय टू हा प्रकार चायनीज गाड्यांवर शोभून दिसतो, घरी नाही! कसंबसं पोटातल्या कावळ्यांना मी थोडावेळ आपापसात गप्पा मारायला सांगून गाळात हात घातला.
"बोला कवी महाशय, खरं कारण बोला, आज कसं काय येणं केलत?"
तसं मग असह्यांनी त्यांच्या छाटीतुन एक बाड काढली. (फर्स्ट कॉपी) कोल्हापुरी व हातात महंता सारखी छाटी सोबतच तंग पायजमा व नेहरू सदरा याशिवाय कवीला कवी म्हणने हा कायद्याने गुन्हा आहे! हातात छाटी आणि त्यात बाड दोनच व्यक्तींकडे पाहायला मिळेल—एक कवी दुसरा चित्रकार. दोघांनाही जरा कुठे मोकळा वेळ मिळाला की लागलीच कागदावर रेघोट्या मारण्याची खोड निसर्गत:च मिळालेली असते. या प्रकरणात मात्र कवी असह्य हे पार्टटाईम चित्रकार व उरलेल्या वेळात कवी अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पार पाडत होते. ज्यांचे कान-नाक-डोळे सुस्थितीत आहेत त्यांना कविता ऐकवायच्या व चित्रे दाखवायची, ज्यांचे फक्त डोळे सुस्थितीत आहेत त्यांना फक्त चित्रे दाखवायची, व ज्यांचे फक्त कान सुस्थितीत आहेत त्यांना फक्त कविता ऐकवायच्या असा विचित्र उद्योग असह्य करतात. मूकबधिर व अंध यांना (छळण्यासाठी किंवा) कलेचा आस्वाद घेता यावा यासाठी असह्य युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत!
त्यांनी बाड चाळली. "वेळीच सुगंध घ्यायला शिक . . . " असह्य म्हणाले, "वेळीच सुगंध घ्यायला शिक, नाहीतर फुले सडतील . . . " मग त्यांनी माझ्याकडे पाहून मान हलवली.
"वाह, वाह" मी बळजबरीने म्हणालो.
"वेळीच सुगंध घ्यायला शिक, नाहीतर फुले सडतील. मनातील प्रेम थोडं व्यक्त करायला शिक, नाहीतर माझ्या मैताला तुझ्यापेक्षा जास्त आपल्या शेजारणीच रडतील!"
असह्यांच्या मुजरा करण्याच्या अभिनयाकडे साफ दुर्लक्ष करून मी पटकन दरवाजा पुढे ढकलला. कारण, जर आमच्या हिने ऐकलं तर शेजारणी लवकरच रडायच्या!
मानवी मेंदूतील पेशी दरताशी सरासरी पाचशे या वेगाने मृत होतात. जर कवी असह्य सोबत असले तर हाच आकडा सरासरी दीड ते दोन हजारांवर जाऊन टेकतो हा माझा स्वानुभव आहे! भविष्यात येणाऱ्या संकटाची मला चाहुल लागली.
"वाह, वाह . . . वाह, वाह . . . क्या खुब, क्या खुब . . . " मी खूप बळजबरीने म्हणालो, "कविता तर जबरदस्त, बाकी काम काय होतं?"
"तेच तर काम होतं!" असह्य म्हणाले, "मला वाटतय तुम्ही तुमच्या नावाखाली माझ्या कविता रसिक श्रोत्यांपर्यंत, दर्दी वाचकांपर्यंत, चोखंदळ साहित्यप्रेमींपर्यंत, कवी हृदयापर्यंत आणि मराठी मनापर्यंत पोहोचवाव्यात."
गल्लीतल्या आण्णा भोकसेच्या परसबागेतील कैऱ्या (गुपचूप) काढून आणणे हे काम सुद्धा सोप वाटावं असं काहीसं असह्य बोलून गेले. लागलीच माझ्या मनाने बोळक्या आण्णा भोकसेच रुप धारण करून असह्यांच्या सात कुळांचा उद्धार सुरू केला.
"छे-छे असलं पाप माझ्या हातून होणार नाही!" मी निर्विकारपणे सांगितलं.
"काय? पाप?"
"नाही म्हणजे तुमच्या कविता माझ्या नावाखाली छापण्याचे पाप हो! बाकी तुमच्या कविता तर एकदम बावनकशी सोनं! तुम्ही असं करा स्वतःच नवीन प्रोफाइल उघडा. हवं तर मी मदत करेन."
"ते मला सांगू नका. मला कविता तुमच्याच नावाखाली छापायच्या आहेत."
"अहो पण का?" आलेले वाचक परत जातील या भीतीने मी काकुळतीला येऊन म्हणालो.
"तेवढीच तुमची प्रसिद्धी वाढेल!"
"नको हो काय करायच्यात या प्रसिद्धीच्या पळवाटा. आपले दोन-चारजण वाचतात दररोज तेच पुष्कळ आहे. उगाच दुसर्‍याचा माल ढापाढापीत मजा नाही."
"तसलं काही चालणार नाही. माझ्या दोस्ताने लेखन करावं आणि मी त्याला मदत करु नये असे कदापि होणार नाही." आता असह्य हट्टालाच पेटले.
असह्यांनी माझ्यासाठी काहीच न करणे हीच मोठी मदत आहे! वास्तवात कवी असह्य हे 'पावसाळी कवी' आहेत. पावसाळ्यात भिजक्या लाकडावर कुत्र्याच्या छत्र्या उगवतात त्यापेक्षा दुपटीच्या वेगाने असह्यांना कविता सुचतात. कधीकधी कविता होतात सुद्धा! मुक्रर होतात असं म्हणायचय मला! जरा कुठे पावसाने तडाखा दिला किंवा साधी भूरभूर जरी आली तरी असह्यांना स्फुरण चढतं. कधी-कधी चार काळे डाग किंवा ललनेच नृत्यही चालतं. अशा या बेभरवशा कवीच्या 'हवामान कविता' म्हणजे कहरच असतात. आधीच 'अचानक कवींचा' सुकाळ आलेला. एका दाढीला बारा नाव्ही किंवा एका गुळाला बारा मुंगळे (ही म्हण माझी स्वतःचीच!) चिकटावेत तसे हे बारा 'अचानक कवी' एकाच वाचकाला जाऊन चिकटतात. म्हणूनच कविता म्हणलं की प्रेक्षकातील अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होतात. 'अचानक कवी' जमात फार भयंकर—पावसाळा संपेपर्यंत लोकांना बाहेर निघता येत नाही व हे 'अचानक कवी' लोकांच घरात बसणं ही दुष्कर करून टाकतात. तसेच एक अचानक/पावसाळी कवी आहेत 'कवी असह्य'.
"कसल्या विचारात गुंतलाय?" असह्यांनी मला चुचकारले.
"काही नाही हो, वाचक तुमच्या कवितांना जो उदंड, बलदंड प्रतिसाद देतील त्याचा विचार करून करून गलबलून आलं!"
"हा मग पटलाना तुम्हाला? मग ही घ्या माझ्या कवितासंग्रहाची 'निष्ठुरता'ची कच्ची प्रत!"
असह्यांनी त्यांची निम्मी काव्य निर्मिती व निम्मी चित्रकला अशी खास बनवून घेतलेली मजबूत बायंडींग ची बाड माझ्या ओटीत टाकली. त्या बाडीच्या मुखपृष्ठावर एक कागद चिकटवला होता. मी नखानेच कागद खरवडला 'साभा . . . ' मी दुसऱ्या बाजूने कागद खरवडला ' . . . रत' मी मनातच अंदाज बांधला—साभार परत अशी नावे त्या कागदाच्या खाली लपलेली होती. अशी 'फक्त' तीन कागदे त्या बाडीच्या मुखपृष्ठावर चिकटवलेली होती!
"अहो नको हो तुमचा हा 'अमूल्य' काव्यसंग्रह. माझ्यासारख्या पामराच्या तो काय हो कामाचा? शिवधनुष्य पेलावे ते प्रभू रामचंद्रांनीच, माशाचा डोळा भेदावा तो सव्यसाची पार्थानेच!" मी बोटाच्या चिमटीत पकडून ती बाड असह्यांच्या कुशीत फेकली. (जड होती!)
"असं म्हणून कसं चालेल? मग तुमची प्रतिभा तर कधी बाहेर येणार?"
"प्रतिभा अशी असेल तर ती बाहेर न आलेलीच चांगली!" मी चुकून मोठ्याने म्हणालो.
"काय?" असह्यांनी शाब्दिक अंगार फेकला.
"नाही म्हणजे प्रतिभा ही प्रतिभावंतालाच शोभते. मी साधा नाणावलेला लेखक आहे." (खुलासा : नाणावलेला ज्याच्याकडे फक्त नाणीच असतात तो!)
"हीच का आपली दोस्ती?"
दोस्ती-यारीला मधे घुसडून असह्यांनी अप्रत्यक्षपणे ती बाड माझ्या डोक्यात हाणल्याचा भास मला झाला.
अशा पावसाळी कवींच्या अमर्याद वाढीमुळेच काव्यरंजनाच अतोनात नुकसान झालेल आहे. खरे कवी त्यामुळे दुर्लक्षितच राहिले. यमक म्हणजे कविता किंवा उगाचच वाक्ये उलटी करून लिहायची म्हणजे कविता नव्हेच. कविता तर भग्न मनातून निघालेला झंकार आहे. टळटळीत दुपारी बोडक्या टेकडीवरच्या झेंडूच्या फुलासारखी असते कविता. भले तो झेंडू सावली देत नाही व देत नाही अन्नही; पण रणरणत्या टेकडीवर चढून जाण्यासाठी त्या झेंडूचा मादक सुगंध अफूच्या गोळीसारखं कार्य करतो. एकूणच काय की आयुष्यात धैर्याची कमी असताना, झुंज देण्याची आंतरिक शक्ती संपलेली असताना, जगण्याची आशा नष्ट झालेली असताना मानवाला पुन्हा उभी करते ती कविता. केवळ शाब्दिक अलंकार तिथे नसतात, तिथे असतात जीवनाचे नियम. यातलं काहीच ठाऊक नसताना केवळ मानसिक शक्तीच्या जोरावर बळजबरी कवी होऊ पाहणारे कवी असह्य मला खरोखरच असह्य वाटू लागले.
"दोस्तीचा प्रश्न इथे आलाच कुठे असह्य? मी कपाळावरचा घाम पुसला आणि उठून (भर पावसाळ्यातही) पंखा तीनवर केला!"
"मग काय अडचण आहे?"
"त्याच असं आहे . . . " मी शब्द शोधू लागलो, " . . . आपण तुमच्या कविता तुमच्याच नावाने टाकुयात एवढंच माझं म्हणणं आहे." मी सारवासारव केली.
"म्हणजे माझ्या कविता चांगल्या नाहीत असच म्हणायचं ना तुम्हाला?"
"तसं नाही हो . . . "
"नाही म्हणा ना म्हणा 'माझ्या कविता वाईट आहेत!' "
'आहेत वाईट!' मी मनातल्या मनात म्हणालो. वरकरणी मात्र मी काहीच बोलू शकलो नाही.
"तुम्हाला वाटत असेल माझ्या कविता वाईट आहे तर . . . "
"तर?" मी उत्साहाने विचारलं. आशेचा नवा किरण दिसला.
"तर मी तुम्हाला आणखी 'निवडक' रचना ऐकवतो!"
"जमलं. जमलं." मी पटकन असह्यांच्या हातातून बाड खेचली. "करतो मी प्रयत्न."
"अहो पण एक-दोन रचना तर ऐका." असह्य बाड घेण्यासाठी झटपटत होते.
"नको माझी काव्यतृष्णा मी स्वतःच भागवेन. तुम्ही काळजी करू नका." मी म्हणालो.

मी कवी असह्यांना दारापर्यंत सोडायला गेलो तर त्यांची छाटी घरातच विसरलेली. ते पायात कोल्हापुरी (फर्स्ट कॉपी) चढवण्याचा द्राविडी प्राणायाम करत असतानाच मी छाटी हातात घेऊन हजर झालो. आमच्या हिने अजूनही मधे पवित्रा घेऊन 'कमनीय व्ह्यू' ब्लॉक केलेलाच होता!
"अधूनमधून काही सुचलं तर आणून देईन तुम्हाला." असह्य म्हणाले.
म्हणजे पावसाळा संपेपर्यंत हा माणूस थांबणार नाही याची मला पुरेपूर जाणीव झाली. "हो नक्कीच!" मी या कानापासून त्या कानापर्यंत हसत म्हणालो.
"मला ठाऊक आहे तुम्ही कोणत्या नावाने, कुठे लिखाण करता! मी वेळोवेळी तपासणी करतच राहणार आहे!"
'पूर्ण' दहा रुपये मोजून घेतलेल्या खारे शेंगदाण्यात अचानक एखादा खवट शेंगदाणा यावा तस माझ तोंड झाल असावं. असह्यांना फुटवणे हा हेतू असाध्य झाला होता. आणि मी स्वतःच्या पायावर बाड (निष्ठुरता—कच्ची प्रत) हाणून घेतली होती. मी नंदीबैलासारखी मान हलवली व घरात येऊन पंखा पाचवर केला. पटकन ती बाड पोटमाळ्यावर, न दिसण्याच्या, जागी भिरकावली!
प्लेट मधल्या रद्दड झालेल्या पोह्यांची पर्वा मला नव्हती. माझ्या दृष्टीने तर आता साहित्यावर होणारे कवी असह्यांचे आघात जास्त चिंताजनक होते. दैवी शुभसंकेतांची मालिका थांबली इथेच.

क्रमश :



[ ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील पात्रे, स्थळ, काळ, वेळ अथवा इतर कोणत्याही गोष्टीचा वास्तवाशी काहीएक संबंध नाही. असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग आहे. सोबतच कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, संघटना किंवा धर्माला दुखावण्यासाठी हे लेखन करण्यात आलेले नाही. असे आढळल्यास आधीच क्षमा मागतो. क्षमस्व —आपलाच रंगारी. ]