कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे. कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.या संग्रहात माझ्या सहा कविता आहेत.त्या तुम्हाला तुमच्या जीवनाशी जोडलेल्या वाटतील..
कविता..
1.पाऊस
2.दुरावे
3.राख
4.तो
5.आर्त
6.रात्र
----------------------------------------------------------
पाऊस
प्रिय ..
आताच असा पडून गेला पाऊस
झाडाच्या पानांना गच्च बिलगून गेला पाऊस
मातीचे थंड उसासे , अंकुरांचे कोवळे शहारे
मागे ठेवून गेला पाऊस
दरवळ ओले गंधाळलेले , शुभ्र ढगांचे अथांग गालिचे
मागे पसरून गेला पाऊस
दरवेळच्या पावसासोबत जुन्या होत चाललेल्या
जखमांचा पसारा मनावर कोरून गेला पाऊस
हल्ली तुझ्यासारखा रिमझिम बरसत नाही पाऊस
मुसळधार होत जातो क्षणाक्षणाला
आणि अचानक मग रागावून निघून जातो पाऊस
चेहर्यावर अल्लड थेंब आठवणींचे तसेच ठेवून जातो
पाऊस..
●●●●
दुरावे
तुझ्या माझ्यात असे दुरावे का झाले
तुझे माझे श्वास तुटक तुटक झाले
आठवणींचे तुकडे मी गोळा करत राहते
ओळखीच्या रस्त्यांशी बोलत राहते
नजरेचे सोहळे अबोल का झाले
हे सारे असे अनो ळखी झाले
वाट पाहणारे डोळे मात्र
तसेच पाणावलेले राहिले
जुने नवे हिशोब शून्यात जमा झाले
मोगर्याने झाड बहरले तरी काटे रूतले
समजले नाही कधी हातातून हात सुटले...
●●●●
राखतू जळत राहिलीस तरी चालेल
पण तू ओरडायच नाहीस
तुझ्या आत नव्याने उमलणार नाही काही
याची खूणगाठ तूच बांधली पाहिजेस
नजरेत तुझ्या अंगार पेटेल
घडेल असे काही ..
तू शांतपणे विझून जायचं आहेस
अनावर होईल कधीकधी
काळजात मावणार नाही
तुझ्याच्याने पेलवणार नाही
तुझी कुंपणे तुलाच घट्ट रोवायची आहेत
कणाकणाने तुझी तूच
धूळधाण करून घ्यायची आहेस....
●●●●
तो..तो बोलत राहीला माझ्या
असण्यावर
आणि मग दिसण्यावर
कधीच न संपणारे .. असेच काही बोलत
राहिला तो..
मग कळत नकळत
हरवत राहिला तो माझ्या घट्ट मिठीतून..
वाट पाहणाऱ्या नजरेतून..
डोळ्यात अनेक अपरिचित भाव घेऊन
पाहत राहायचा तासतास
मग अबोल होते गेला तो
दिवसेंदिवस तुटक होत गेला तो
माझ्यातून वजा होत गेला..
कधी फक्त माझाच असणारा... तो
..
●●●●
आर्तजेंव्हा कुणीतरी आत्म्याच्या तळापासून ओरडत असत
त्या आर्त किंकाळ्यानी व्यापलेल्या आकाशाखाली
माझी पाऊले चालत राहतात तशीच
माझा छोटासा परीघ,मर्यादा मला ओलांडता येत
नाहीत
आरशा समोर मी मलाच खरी वाटत नाही
मीच कैद होत जाते माझ्या पिंजऱ्यात
भावनेच्या बाजारात उभी राहते डोळे बंद करून
आर्त हाका माझा पाठलाग सोडत नाहीत
मग माझ्याच आत्म्याची मीच चिरफाड करत उसवत राहते
शोधत राहते तो शुध्द परमात्मा जो प्रत्येकात असतो म्हणे
मलाच माझी मी अनावर होत जाते
शरीराच्या मर्यादेत मावत नाहीत काही भावना
कधी कधी हिशोब निघतो या सगळ्याचा
स्वतःच्याच सुडाने पेटलेले माझेच मन
मग मलाच पेलवत नाही
●●●●
रात्रदिवसांपेक्षा रात्रीच बर्या असतात नाही?
रात्री नसतात कलकलणारे आवाज
प्रत्येक मिनिटाला वाजणारे नोटीफिकेशन टोन नाहीत
सतत कानावर आदळत राहणारे कसले ना कसले आवाज नाहीत दमलेल्या जीवांचे आक्रोश नाहीत
अशाश्वताच्या मागे सुसाट धावत सुटलेल्यांचे हताश उसासे नाहीत
सगळ्या न संपणाऱ्या अविश्रांत धडपडी रात्र आपल्या कुशीत सामावून घेते
या शांततेत मनाचे आवाज बरेच स्पष्ट उमटतात.
सुचत जातात एक एक शब्द, जे सामावून घेतात हृदयाच्या तळातील...उगाच जपलेले खोल खोलवर काही...
आपल्याही नकळत मनावर कोरले गेलेले काही...
विश्वाच्या अंतापर्यंत, फक्त आपल्या आतच जपली जातील अशी काही गुपिते रात्र उलगडत राहते आपलेच अंतरंग..
कुणी नसले सोबत तरी रात्र जागत राहते आपल्यासोबत
उबदार होत जाते
रात्र. कोर्या पानांवर जोडू पाहते शाई, पान आणि
माझ्यातल्या तरल मोहक लहरी..
शब्द गहीरे होत जातात, गडद होत चाललेल्या अंधारा सारखे..
मी जागत राहाते,
तुझ्या एक एक जाणीवा गोळा करत..त्यांना शब्दात बांधत.. रात्रभर..
●●●●