Vasundhara in Marathi Love Stories by संदिप खुरुद books and stories PDF | वसुंधरा

Featured Books
Categories
Share

वसुंधरा

यंदा पाऊसकाळ चांगला झाला होता. सगळं शिवार हिरवागार शालु पांघरल्यासारखं दिसत होतं. पाखरं आनंदानं बागडत होते. पिकं वाऱ्यावर डोलत होते. झाडं, वेली फळाफुलांनी बहरले होते, फळांनी लगडले होते. विहीरी, तलाव तुडुंब भरले होते. नद्या-ओढे ओसंडून वाहत होते. परिसरातील विहीरी पोहायला येणाऱ्या मुलांनी गजबजून गेल्या होत्या. गावातील आया-बाया नदीवर धुणं धुवायला जात होत्या. त्या बायांसोबतच अप्रतिम सौंदर्याची राणी ‘वसुंधरा’ पण धुणं धुवायला जायची.तिचा हळदीसारखा पिवळाधमक रंग, मुसमुशीत मदमस्त अंग, रेखीव शरीर, मादक चाल, सुंदर हास्य आणी लाघवी बोलणं पाहूनच गण्या तिच्या प्रेमात पडला होता.ती धुणं धुवायला बाहेर पडली की, गण्या तिच्या मागे-मागे जायचा. पण रोजच तिच्या सोबत इतर बाया किंवा तिच्या मैत्रीणी असायच्या त्यामुळे गण्याला तिला बोलणं होत नव्हतं. त्यांचं धुणं धुवायचं होईपर्यंत गण्याच्या नदीपासून तीन-चार चकरा व्हायच्या.

गण्या तिच्या मागे लागला आहे, हे आता तिच्याही लक्षात आलं होतं. आणी तिच्या सोबतच्या बाया व तिच्या मैत्रीणींच्या पण ही गोष्ट लक्षात आली होती. गण्या त्यांच्या जवळून जाताना त्या कुजबुज करायच्या. तिच्या मैत्रीणीही त्याच्याकडे पाहून हसून तिला चिडवायच्या. ती बायांसोबत असल्यावर त्याच्याकडे पाहत नव्हती. पण चोरून पाहिल्याशिवाय ही राहत नव्हती. बहुतेक तिलाही आता गण्या आवडू लागला होता. कारण ती आता मोठया बायांबरोबर धुणं धुवायला येत नव्हती. तर तिच्याच वयाच्या मैत्रीणी बरोबर धुणं धुवायला येऊ लागली. तीही आता त्याच्या नजरेला नजर भिडवू लागली. तसा त्याच्या शरीराचा कण ना कण आनंदून जाऊ लागला.

आता त्यांची रोजच नजरेला नजर भिडु लागली. रोजच तिला पाहून गण्याला देव पाहिल्याचा आनंद होऊ लागला. पण तिच्या सोबत रोजच कोणीतरी असल्यामुळं त्याचं तिच्याशी बोलणं होत नव्हतं. त्याला जेवताना, झोपताना, प्रत्येक काम करताना फक्त तिच दिसु लागली. त्याचं मन आता त्याचं राहिलं नव्हतं, ते तर केव्हाच वसुचं झालं होतं. तो तिच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेला होता. तो ज्या वेळेस तिला पाहायचा त्या वेळेस तो क्षण तसाच राहावा असं त्याला वाटायचं. ती डोळयांसमोरुन दूर होताच त्याचं मन बेचैन व्हायचं. कधी एकदा तिला पाहतोय, असं त्याला वाटायचं. ती एकदा धुणं धुवून घरी गेली की, दुसऱ्या दिवशीच ती नदीवर दिसायची. तिला पाहण्याच्या आशेने तो तिच्या घरासमोरुन चकरा मारायचा, पण ती घरातून बाहेरच येत नव्हती. जवळ-जवळ सगळया गावातच गण्या तिच्या मागे लागला आहे, असं माहीत झालं होतं. तिच्या घरा समोरुन जाताना तिच्या गल्लीतील, तिच्या भावकीतील पोरं त्याच्यावर दात-ओठ खात होती. त्यामुळं तिच्या गल्लीत पण त्याला जास्त जाता येत नव्हतं.त्याचं मन बेचैन होत होतं.त्याला मनात वाटायचं, तिनं फक्त एकदा हो म्हणावं मग सगळा गाव जरी आडवा आला तरी पर्वा नाही.

तिला कधी एकदा मनातलं बोलेन, असं त्याला झालं होतं.तो त्या संधीची वाट पाहत होता. पण तशी संधी त्याला भेटत नव्हती. तिला पाहण्याच्या ओढीनं कोणत्याच कामात त्याचं मन लागत नव्हतं. आईनं दळणासाठी पिठाचा डबा गिरणीत ठेव म्हणून त्याला सांगीतलं होतं, पण त्याला वसुला पाहण्यासाठी तिच्या घराकडे जायचं होतं. म्हणून तो आईचं काम न ऐकताच घराबाहेर पडला. तिच्या घराकडं जातानाच त्याला ती तिच्या घरचा दळणाचा डबा घेउुन येताना दिसली. तो मनात म्हणाला, कधी-कधी आईचं काम ऐकायला पाहिजे गडया फायदा होतो. तो पळतच घरी आला. दळणाचा डबा घेवून गिरणीत गेला. तशी ती त्याला पाहून लाजली. गिरणीत इतर बाया पण होत्याच, त्यामुळं इथं पण बोलणं होणार नव्हतं. दळायचं झाल्यावर बाया निघून गेल्या. पण गिरणवाल्या मामाचं लक्ष त्यांच्या दोघांकडं होतच. त्यामुळे एकमेकांकडे पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गिरणीवाल्या मामानं तिचा डबा उचलून धान्य गिरणीत टाकलं. तो थोडा दळण दळण्यात व्यस्त होता. तेवढयात वर ठेवलेली पिठाची पाटी गण्यानं पाहिली. त्या पाटीतील पिठावर त्यानं इंग्रजीमधून बोटानं आय लव्ह यु लिहिलं. तिनं ते पाहिलं. ती खाली पाहून गालातल्या गालात हसत होती. तेवढयात तिचं दळण झालं. तिनं दळणाचा डबा घेतला व गण्याकडं एक नजर टाकून व हसून ती गिरणीमधून बाहेर गेली. गण्यानं पीठावर लिहिलंलं हातानचं पुसलं. दळणाचा डबा घेवून तो घरी गेला. त्या रात्री त्याला रात्रभर झोप लागली नाही. ती हसली म्हणजे त्याचं प्रेम तिला मान्य होतं. पण अजून बोलणं झालं नव्हतं म्हणून तो मनातल्या मनात तळमळत होता.

बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न करुनही त्याला झोप येत नव्हती. सारखा तिचा हसरा, सुंदर चेहरा डोळयासमोर येत होता. शेवटी पहाटे कधी झोप लागली त्याला कळलचं नाही. त्यानं सकाळी लवकर उठून दोन बकेट पाणी घेवून चोळून मोळून अंघोळ केली. घराबाहेर पडण्या अगोदर दहा-बारा वेळेस आरशात पाहिलं. तो नदीकडे आला तर त्याला वसु एकटीच नदीवर दिसली.तो हळुहळु इकडं-तिकडं पाहत वसुकडे निघाला. तशी त्याच्या हदयाची धडधड वाढली. तीनं एकदा त्याच्याकडे पाहिलं आणी लाजून खाली पाहिलं. तो एक-एक पाऊल तिच्याकडे टाकत होता आणी तीही लाजेनं चुर होत होती. तेवढयात तिच्या वडीलांची पँट धुता-धुता तिच्या हातातून सुटली. ती पँट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहु लागली. गण्या पँटीच्या मागे नदीच्या कडेने पळु लागला. त्याची चप्पल चिखलात रुतली. चप्पल तशीच सोडून तो पँटीच्या मागे गुडघ्या इतक्या पाण्यातून पळु लागला. त्याचे सगळे कपडे पाण्याने भिजले. बरेच अंतर पाठलाग केल्यावर पँट नदीच्या कडेच्या झाडाच्या फांदीला अडकली. त्यानं फांदीला अडकलेली पँट ओढली तर ती पँट टरकन फाटली. तशीच फाटकी पँट घेवून तो वसुकडे आला. वसु त्याचे भिजलेले कपडे पाहून हसु लागली. तोही तिच्याकडे पाहून हसु लागला. ती म्हणाली,“पँट धुतानाच थोडी फाटली होती म्हणून मीच सोडून दिली होती”. गण्या उगाचच त्या पँटच्या मागे इतका पळाला होता. वसुला खुष करण्यासाठी तो पँटीच्या मागे पळाला होता. पण आता त्याचा चांगलाच पोपट झाला होता. वसुला हसु आवरत नव्हतं. गण्याही तिला पाहून हसु लागला. तिनं एकदा त्याच्याकडे पाहिले, ती खाली बसली आणी तिनं तेथेच त्याच्या पिठावर लिहिलेल्या शब्दांचं उत्तर चिखलावर लिहून होकारार्थी दिलं.