Duabai Trip in Marathi Travel stories by Supriya Joshi books and stories PDF | दुबई ट्रिप

Featured Books
Categories
Share

दुबई ट्रिप

आम्ही युगांडाला असताना भारतात सुट्टीसाठी जाताना ४ दिवस दुबई बघून नंतर भारतात जायचे हे ठरवले. तिथल्याच एका एजन्टकडे बुकिंग केले तेव्हा त्याने विचारले की अजून एका कपलला दुबई बघायचे आहे आणि त्यांना कोणाबरोबर तरी जायचे आहे तर तुम्हाला चालेल का? आम्ही लगेच होकार दिला.

आम्ही चौघे, माझी आई व ते कपल असे आम्ही दुबई ट्रिपसाठी निघालो. विमानप्रवास छान झाला. एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला भारतीय चालक असलेली गाडी आली होती. त्याने आमचे छान स्वागत करून आता पुढचे ४ दिवस मी तुम्हाला सगळीकडे फिरवणार आहे म्हणून सांगितले. हॉटेल मध्ये गेल्यावर बॅग्स ठेवून थोडे फ्रेश होऊन आम्ही लगेच बाहेर पडलॊ. मी माझ्या लेखामध्ये प्रवासवर्णन न लिहिता प्रवास करताना आलेले अविस्मरणीय अनुभव इथे लिहीत आहे. त्याप्रमाणे आजपण ह्या लेखात तेच लिहिणार आहे!

तर आम्ही अबुधाबी मध्ये फेरारी वर्ल्ड ह्या अम्युझमेंट पार्क मध्ये गेलो होतो.

तशी मी खूप फट्टू बरं का! पण तरीही सगळ्या गोष्टी अनुभवायच्यापण असतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी घाबरत का होईना पण करते! तिथे आत गेल्यागेल्याच एक उंचच्या उंच १३.५ मीटरचा खांब आणि त्याला गोलाकार सगळीकडे खुर्च्या. आर्या व आईला त्यात बसायला परवानगी नव्हती. म्हणून आम्ही पाचजण त्यादोघींना बाहेर असलेल्या खुर्चीवर बसवून तिथे रांगेत थांबलो. अगोदर बसलेल्यांचे ओरडायचे आवाज आणि त्याचा वाढता स्पीड.... हृदय असे धडधडत होते की विचारायची सोय नाही. आमचा नंबर आला तेव्हा त्यात बसावे की नाही असा प्रश्न पडला होता पण जान्हवीपण माझ्यासारखी फट्टू! त्यामुळे मी काहीच म्हणूच शकत नव्हते. ती नाही म्हणत असताना तिचा हात पकडून आम्ही त्यावर बसलो. वरून एक सेफ्टी बेल्ट येऊन आम्ही सुरक्षित झालो. अगोदर ते थोड्या उंचीवर हळूहळू वर गेले परत हळूहळू खाली आले असे २-३ दा हळूहळू करत स्पीड वाढवला आणि नंतर झुपकन वर आणि झपकन खाली. आईशपथ! तोंडातून आवाज पण निघत नव्हता, असे वाटले की आता हृदय शरीरातून बाहेर येणार आहे! पण २दा असे झाल्यावर नंतर मजा आली, छान वाटायला लागले. टर्बो टॉवरवरून उतरल्यावर मात्र थोडेसे गरगरले.

अश्याप्रकारच्या बऱ्याच राइड्स केल्या. खूप मज्जा आली, प्रत्येक राईड करताना वेगळा अनुभव येत होता. आमच्याबरोबरचे कुटुंब थोडेसे आमच्यापेक्षा वयाने जास्त होते पण तरीही प्रत्येक राईडमध्ये आम्ही एकत्र बसून खूप मज्जा केली. आई व आर्याला पण खूप साऱ्या राइड्स होत्या, तिथेपण एकत्र बसलो. टर्बो ट्रॅक, फ्लाईंग विंग्स, स्पीड ऑफ मॅजिक, टायर ट्विस्ट, ड्रायविंग विथ चॅम्पिअनस असे अनेक राइड्स मध्ये बसलो.

आता वेळ आली जगातली फास्टेस्ट रोलर कोस्टर मध्ये बसायची. स्पीड ० to २४० km/h , ५२ मी उंची. ही राईड फक्त ४.९ सेकंदामध्ये पूर्ण होते. दिसतानाच इतका भला मोठा दिसणारा कसाही कुठूनही वळलेला, खालून एकदम सरळ वर आणि वरून खाली येताना एकदम सरळ खाली.... बघूनच भीतीने पोटात गोळा उठत होता. तिथे भली मोठी रांग होती! इथे त्यांनी आई व आर्याबरोबर जान्हवीलापण परवानगी नाकारली. मग काय आम्ही चौघेच गेलो. पोटात खड्डा आला होता तरीही त्यात बसायचीपण उत्सुकता होती. २ राईड झाल्यावर आमचा नंबर आला. बसल्यावर सगळ्यांचे बेल्ट घट्ट आहेत का आणि प्रत्येकाने गॉगल लावला आहे ना हे तपासल्यानंतर त्यांनी राईड सुरु केली. सुरु झाल्यानंतरच इतका जास्त स्पीड होता की घाबरून तोंडातून आवाज पण निघेना. आणि वर जाताना माझ्या डोळ्यावरचा त्यांनी दिलेला गॉगल आपोआप उडून गेला. इतका जास्त स्पीड होता की त्या हवेने डोळे खराब होतील का अशी भीती वाटून आपोआप डोळे एकदम घट्ट बंद केले गेले, काहीही बघता आले नाही. आत्ताच तर बसलो होतो आणि लगेच राईड कशी संपली असे वाटून खाली उतरायला लागलो तर एकदम पडल्यासारखे झाले. बरोबर असणाऱ्या दादांना थोडा त्रास झाला आणि त्यांच्या छातीत किंचित दुखायला लागले. त्यांना आधार देऊन एका खुर्चीवर बसवले व त्यांना औषध वगैरे हवे का विचारात होतो पण थोड्यावेळाने ते नॉर्मल झाले. “मी आता ठीक आहे काळजी करू नका”, म्हणून सांगितले. त्या भाभींना परत रोलर कोस्टर मध्ये बसायचे होते. दादांनी लगेच सांगितले,"माझी काळजी करू नका, तुम्ही तिघे जावा!" मगाशी आलेला अनुभव बघता अगोदर मी नाही म्हणाले पण भाभी फक्त "चल ग" म्हणाल्या आणि मी लगेच तयार झाले. दादांना आई व २ मुलींबरोबर बसवून आम्ही परत रांगेत उभे राहिलो. ह्यावेळी मात्र ती राईड आम्ही एन्जॉय केली आणि एक गोष्ट जाणवली की कुठल्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर ती गोष्ट आपण लगेच करायला पाहिजे आणि हो दोनदा केली पाहिजे कारण पहिल्यांदा केली की अर्धा वेळ भीतीच वाटत राहते पण दुसऱ्यावेळी त्याची मज्जा अनुभवता येते.

तिकडून नंतर मात्र आम्ही निघालो आणि हॉटेल वर गेलो. थोडावेळ आराम करून लगेच बुर्ज खलिफा बघण्यासाठी निघालो. लिफ्ट ने आम्ही १२४व्या मजल्यावर पोहचलो. लिफ्टने जाताना इतका स्पीड होता की थोडावेळ एकदम पोटात गोळा आला. वर पोहचल्यानंतर मात्र खूप छान वाटत होते, पूर्ण दुबई तिकडून दिसत होती. खाली बघितले की सगळे मुंग्यापेक्षाही लहान दिसत होते! थोड्यावेळाने सूर्य मावळायला लागला आणि ते दृश्य आम्ही सगळे डोळ्यात साठवत होतो. सगळे इकडे तिकडे फिरणारे, गप्पा मारणारे बऱ्यापैकी सगळे शांत झाले होते. सूर्य मावळताना थोडेसे उदास वाटत होते, एका काचेच्या खाली कठड्यावर बसून मी खूप वेळ एकदम शांत बसून बाहेर बघत बसले होते. काहीवेळानी दोन्ही लेकी ‘आई का रडत आहेस’ हे विचारत आल्यावर मला जाणवले की माझ्या डोळ्यात पाणी होते. का ते मात्र मलापण कळाले नाही! थोड्यावेळाने खूप छान संगीताबरोबर फाऊंटन शो सुरु झाला. मैसूरला गेलो होतो तिथे आम्ही हा शो बघितला होता त्याची आठवण झाली. छान होता शो.

शो संपल्यानंतर परत खाली जाऊन तिथे असलेल्या aquarium मध्ये व तिथल्या मॉल मध्ये भरपूर फिरलो.

तिथे अजून बऱ्याच ठिकाणी आम्ही भेट दिली आणि हो रोज रात्री दोघींना हॉटेलमध्ये सोडून भरपूर खरेदी केली. थोडीफार सोनं खरेदी पण झाली बरं का!

सुप्रिया