Bio ... in my memory .. in Marathi Short Stories by aadarshaa rai books and stories PDF | बयो ... माझ्या आठवणीतली..

Featured Books
Categories
Share

बयो ... माझ्या आठवणीतली..

गर्दी आणि भयानक गर्दी...
मी आणि कौस्तुभ..
सलग नऊ तास प्रवास..
मध्यरात्रीनंतरचा..
आता सकाळचे अकरा वाजत आलेले..
मी भिंतीच्या अलीकडे उभी आहे..
ओस पडलेला लांबलचक रस्ता निवांत धुळीत पहुडला आहे.. काही शुष्क वाळलेली पाने..
जागच्या जागी वाऱ्यावर हलत आहेत..
थंडगार वाऱ्याची एखादी झुळूक येते आहे क्षणात जाते आहे..
परत परत का येते मी इथे...
यावेळीही माझ्या मनात हाच विचार आहे...
किती दिवस झाले.. महिने...की वर्षच्या
वर्षे निघून गेली..
या वास्तू कडे जाणारा रस्ता लपूनछपून आपलाच पाठलाग करत राहतो की काय असं वाटत राहतं मला कधीकधी...
इथे मी तासभर तरी आता उभी असेन...
ही एक कंटाळवाणी उबदार दुपार आहे..
तीन मांजरीची पिल्ले बागडत आहेत.. एक कबूतर फडफडून गेलंबाकी सगळी पडझड डोळ्यात साठून राहिली..एक जीर्ण म्हातारं घर!

कौस्तुभ म्हणाला, " या पडझडीच सौंदर्य मला कागदावर ही रेखाटता येणार नाही, मनाचे सगळे बारकावे.. एखाद्या वस्तू विषयी नेमकं किती किती ...आणि कसं वाटून येतं... हे भौतिक गोष्टीने सिद्ध करण्याइतका, माणूस समृद्ध झाला नाही अजून..नाही?..

"मी पाहत राहिले... तोही बोलत राहिला
अधून-मधून
मग म्हणाला... "तू वेडी आहेस..असं किती वेळा पाहायची आहे तुला ही जागा ..? "

" ही फक्त वास्तू नाही"

●●
2.20 am friday

अलिकडे मी एकटीच येत राहते...का?.. कितीवेळा..कशासाठी ?
अजून एक रात्र.. जागत राहण्यासाठी...नकळत जाग..
तनामनावर..
किती वाजले असतील..चेहर्‍यावर पसरलेले केस मागे सारून मी घड्याळात पाहिलं...
दोन वाजून वीस मिनिटे..मी परत डोळे मिटले..
आठवणी रेंगाळत राहिल्या मग माझ्या आसपास...आणि आठवत राहिलं तेच जीर्ण म्हातारं घर.. दिवसा पेक्षा रात्रच बरी वाटत राहिली.
कलकलणारे आवाज नाहीत..प्रत्येक मिनिटाला वाजणारे नोटीफिकेशन टोन नाहीत
सतत कानावर आदळत राहणारे कसले ना कसले आवाज नाहीत..दमलेल्या जीवांचे आक्रोश नाहीत..
अशाश्वताच्या मागे सुसाट धावत सुटलेल्यांचे हताश उसासे नाहीत..
माझ्या सगळ्या न संपणाऱ्या अविश्रांत धडपडी रात्र आपल्या कुशीत सामावून घेत होती..
या शांततेत मनाचे आवाज बरेच स्पष्ट उमटले..
हृदयाच्या तळातील...उगाच जपलेले खोल खोलवर काही...आपल्याही नकळत मनावर कोरले गेलेले काही...

विश्वाच्या अंतापर्यंत, फक्त आपल्या आतच जपली जातील अशी काही गुपिते..
रात्र उलगडत राहली.. माझेच अंतरंग.. रात्र जागत राहीली..माझ्यासोबत उबदार होत गेली..

बयो आणितिच्या आठवणींसोबत..
●●
1.50 am sunday

बयो असेपर्यंत घर अगदी नंदनवन होत... तिच्यानंतर तिथे फक्त पडझड उरली आहे. कुणी मायेने हात फिरवणारं नसलं कि वास्तू मरत जाते ....
हे घर विकण्याच मला जितकं दुःख आहे. तितकं कुणालाच नाही.

याच विचारातच अडकून राहिले मी.. गेले कित्येक दिवस..
माझ्यातच गुरफटलेली..
बयो च्या आठवणी आणि तिने आठवणीने पाठवलेल्या वस्तू सांभाळत.. अगदी एकाकी..

ती अगदीच अबोल..कधीतरीच हसणारी..मी तिला जेव्हापासून पाहिलं तेंव्हापासून अगदी अशीच...मी घरातून निघताना उदासलेली...दरवेळेस काहीबाही सोबत पाठवून देणारी..
बयो..

आता अशी तुकड्यात आठवते..अधेमधे...
तिच्यानंतर त्या घराच काय करायचं.. माझ्यासाठी दिवसेंदिवस हे कठीण होत चाललंय..

●●


2.25 pm mon

" तूझं नक्की ठरलय ना वैशू..."

कौस्तुभ चा गंभीर चेहरा मला पुन्हा पुन्हा विचारत होता...
माझ्या साठी बयो न जपून ठेवलेल घर..
मी विकायच ठरवलं...तिच्या मालकीची एकुलती एक वस्तू.
तिने माझ्यासाठी जपलेली..एकही कर्ता षुरूष नसताना..एकहाती कुटूंब सांभाळणारी..बयो..आयुष्यात एकही आनंदाचा रंग नसताना...
अबोल राहून ती आयुष्यभर मंद दिव्यासारखी जळत राहिलेली.. तिचे उदासलेले डोळे..त्यात कधीच न दिसणारे अश्रू...
तिची संगतवार दिवसभर चालणारी कामे...दमून गेल्याचे उसासे... माझ्या नकळत माझ्या मनाच्या एका कोपर्‍यात ह्या सगळ्या नोंदी झालेल्या..तिने लग्न केलं नव्हत.. का...?
मी लहान असल्याने याच उत्तर मला कधीच मिळालं नाही..
ती घरात सगळ्यात मोठी आणि प्रेमळ.. कधीतरच बोलायची..
पण अस्तित्व जाणवण्या इतकी ठसठशीत होती.. तिचे डोळेच सगळ बोलायचे... मी तिच्या भावाची एकुलती एक मुलगी.. ति माझ्याशी खूप कमी बोलायची..पण ती नेहमीच मला एका प्रेमळ
आई सारखी वाटत आली..पण तिने हे घर माझ्यासाठी का म्हणून ठेवलं असेल..लहानपणीच्या धूसर आठवणीतच तिचा माझा संवाद होता... पण आता वाटतं.. नकळत तिच्या एकाकी आयुष्याकडे मी एका अनामिक आकर्षणातून ओढली गेले.. तिच्या वागण्याबोलण्यातमी सामील होत गेले..तिच्या व्यक्तिमत्वाची दाट सावली माझ्या अंतरंगावर पडली..
●●
6.27 pm wed

पांढरे जाळीचे नक्षीदार पडदे .. नाइटलँप चा त्यातून आरपार झालेला प्रकाश .. भिंतीवर त्या प्रकाशाची नक्षी..टेबलवर कॉफी मग चे गोल वण.. या शांततेत मी सगळी संध्याकाळ घालवली..
अंधारून आलय अगदी.. आता ते घर आणि मी कायमचे दुरावले गेलो. अजून काही दिवसांनी तिथे त्या जीर्ण म्हाताऱ्या भिंती सुध्दा नसतील..

पण बयो...
ती तर नेहमीच माझ्या जवळच असेल..
माझ्या अगदी जवळ.