Ardhantar - 22 in Marathi Moral Stories by अनु... books and stories PDF | अधांतर - २२

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

अधांतर - २२

"माना बडे सख्त है,
तेरे इम्तिहान जिंदगी।
टूट के बिखरने वाले,
लेकिन हम भी नही।"


कधी ऊन तर कधी सावली...कधी ग्रीष्मातली दुपार तर कधी शरदेच्या रात्रीसारखा गारवा देणारा..कोणी म्हणतं आयुष्य हे नदीच्या प्रवाहासारखं असतं सतत वाहणारं..हो बरोबर आहे, पण त्यात नुसतंच वाहून चालत नाही, कधी त्या प्रवाहात येणाऱ्या अडथळ्यांचा आढावा ही घ्यावा लागतो थांबून, कधी कधी प्रवाहाच्या विरोधात ही जावं लागतं आणि यामुळे आयुष्य वाहत नाही तर घडत जातं...आयुष्य तर तसंच घडतं जसं आपण घडवत जातो...खरं तर काही रूप रंग असतात का आयुष्याला??? नाही...पण तरीही त्यातले छुपे रंग उधळायचे असतील तर एक सकारात्मक दृष्टिकोन हवा..आयुष्य एकदाच मिळते आणि त्यालाही जर सतत चिंतेत, रडण्यात किंवा केवळ दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्तीसाठी घालवल तर काय अर्थ आहे त्या आयुष्याला, कोणाच्या अपेक्षेवर आपण शंभर टक्के उतरुच शकत नाही...कधीच नाही...पण दिलेले शब्द तर आपले असतात, ते तर नक्कीच आपण संभाळू शकतो, कोणच्या अपेक्षेवर खरं उतरण्यापेक्षा आपण स्वतःच्या शब्दांवर खरं उतरणं म्हणजे आयुष्य..!! असं मला वाटतं...मला ही गोष्ट कळून चुकली होती की एक बायको, एक मुलगी, एक सून म्हणून मी कितीही काही केलं तरी माझे त्याग न बघता, मी चुकते कुठे यावरच नेहमी बोट ठेवल्या जाणार आहे..त्यामुळे मी आतापासून फक्त स्वतः सोबत केलेल्या अपेक्षांसाठी वचनबद्ध होती....

अभय सरांना भेटून मी नागपूर साठी रवाना झाली. डोक्यात कितीतरी विचार घोळत होते..कोवळ्या वयात विक्रम बद्दल वाटलेलं आकर्षक, त्यांनंतर त्याचं माझं आयुष्यात जीवनसाथी बनून येणं, त्याच्या सोबत घालवलेले आनंदाचे क्षण, हे सगळं आठवण्याचा पर्याय करत होती..खरं तर त्या आठवणींमध्ये मी जे मोजकेच चांगले क्षण शोधण्याचे प्रयत्न करत होती, पण डोळ्यांसमोर मात्र विक्रमने पदोपदी माझा केलेला उपहास, माझा अपमान आणि मला कायम दुय्यम दिलेली वागणूकच आठवत होती, तेच चित्र उभं राहतं होतं.. जिथे तो आणि मी समान असेल तो एकही क्षण मला आठवणींच्या ढिगाऱ्यात सापडला नाही...आणि चांगल्या आठवणी शोधण्याची गरज नसते, त्या तर नेहमीसाठी आपल्या मनात घर करून जातात पण माझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात फक्त दुःख दिसत होतं मला..आणि हा सगळा विचार करताना स्वतःचा रागही आला की सगळं मागे सोडून आली आहे तरी मी का प्रयत्न करत आहे ते आठवण्याचा?? कदाचित यामुळे की आयुष्यात फक्त नातं असो किंवा कोणाचं मन, ते जोडण्याचेच काम केले होते, तोडणं ही भावना तर कुठेच नव्हती.. पण आता हेच विधिलिखित आहे हे मान्य करावंच लागणार होतं मला...

मला घरी पोहोचायला जरा उशीरच झाला, प्रवासात बाबांना फोन केले पण त्यांनी उचलले नाही, आणि आईकडे कसला फोन अन काय?? त्यामुळे तिच्याशी घरी जाऊनच बोलणं होणार होतं... घरी पोहोचता पोहोचता रात्रीचे नऊ वाजले, मला पोहोचायला जरा उशीर झाला होता पण माझी बातमी किंवा असं म्हणेल माझे कारनामे माझ्या आधीच नागपूर मध्ये माझ्या नातेवाईकांच्या कानापर्यंत पोहोचले होते...हो, कारनामेच होते ते त्यांच्या दृष्टीने, कारण ती कहाणी विक्रम आणि त्याच्या घरच्यांनी तिखट मीठ लावून सगळ्यांपर्यत पोचवली होती.. आणि या सगळ्या प्रक्रियेत दोरीचा साप झाला नसता तर ते नवलच..!! माझं विक्रम सोबत असं वागण्याची प्रत्येकाकडे वेगळी कहाणी होती...जितकं सोप्प मला विक्रमला सोडून येणं आणि त्याच्या विरुद्ध तक्रार करणं होतं त्यापेक्षा कठीण या समाजात येऊन राहणं होतं, आणि याची जाणीव मला घरी गेल्यावर झाली..

घरी पोहोचल्यावर बाबांनी माझ्याकडे पाहिलं ही नाही, आईला वाईट नक्की वाटलं, कारण ती एक स्त्री होती आणि मला जन्म दिला होता तिने, त्यामुळे माझी अवस्था नक्कीच तिला समजत होती...तिच्या गळ्यात पडून खूप रडावं वाटलं पण आवर घातला स्वतःच्या भावनांना..रात्री बाबा झोपल्यावर जेंव्हा ती आली माझ्याकडे तेंव्हा सगळी हकीकत सांगितली मी तिला..स्वतःच्या मुलीचं दुःख ऐकून कोणतीच आई सुखाने झोपू शकणार नाही, मी घेतलेला निर्णय कुठेतरी तिला योग्य वाटत होता पण बाबांच्यासमोर बोलणार कोण आणि त्यांना समजवणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं काम करणार कसं याची धास्ती आईला जास्त होती...मला शारीरिक थकवा खूप जाणवत होता आणि त्यात हे सगळे मानसिक आघात त्यामुळे मला झोप कधी लागली काही कळलंच नाही, पण आईच्या उबदार स्पर्शाने मला खूप हलकं वाटतं होतं....

दुसऱ्या दिवसाची सुरुवात बाबांच्या रोषाने झाली, त्यांचं एकच बोलणं होतं की एवढा मोठा निर्णय घेताना मी त्यांच्या काहीही विचार केला नाही आणि माझ्या आयुष्याचा ही विचार केला नाही...त्यांच्या मते, बायकोने नवऱ्याचा थोडा राग, त्याचे निर्णय सगळे मान्यच करावे, आणि एक मुलगी किंवा एक सून म्हणून मी माझ्या आधी माझ्या घरच्यांचा, त्यांच्या मान सन्मानाचा विचार आधी करावा...माझ्या वागणुकीने त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नव्हती हेच त्यांचे आरोप होते...आणि बाबांच्या कोर्टात माझ्यावर आरोप प्रत्यारोप चालू असतांना माझे सासू सासरे इतर नातेवाईकांना घेऊन आले घरी..आणि त्यांनी तर माझ्या वागणुकीपासून तर माझ्या आईवडिलांनी मला दिलेल्या संगोपणा पर्यंत प्रश्न उपस्थित केले, माझ्या चरित्रावरही त्यांनी आपले निर्णय ऐकवून मोकळे झाले...त्यांचं एकच होतं की हा घरगूती वाद होता जो मी आता कोर्ट आणि कानून पर्यत नेऊन ठेवला होता..त्यांच्या मते न्यायव्यवस्थेपेक्षा, जातपंचायत यावर योग्य निर्णय घेऊ शकली असती..माझ्या या अक्षम्य गुन्हेसाठी मला शिक्षा तर मिळणारच होती...

सगळ्यांनी बाबांना ताकीद दिली की माझा निर्णय मागे नाही घेतला तर याचे परिणाम गंभीर होतील, त्यांना वाळीत टाकल्या जाईल, उद्या उठून माझ्या भावाला लग्नाला मुलगी मिळणार नाही समाजात वैगरे वैगरे...मला ऐकून फार आश्चर्य झालं आणि दुःखही, की आपण एकविसाव्या शतकात जगतोय आणि तरीही इतक्या खालच्या पातळीचे विचार बाळगतोय, पण हेच सत्य होतं...यातून एकच कळत होतं की वरवर बघता अतिशय सुशिक्षित आणि पुरोगामी वाटणारे लोकं अजूनही पुरुषप्रधान आणि मागासलेल्या विचारांनी ग्रस्त आहेत हे खूप मोठं दुर्दैव आहे...मी माझा निर्णय मागे न घेतल्यामुळे बाबा खूप चिडले आणि मला बोलले,
" स्वतःच आयुष्य तर बरबाद करूनच घेतलं आहेस, आता तुझ्या या स्वार्थीपणात तुझ्या भावाचं ही आयुष्य खराब करायचं आहे कसं तुला?"

"बाबा..हे काय बोलताय तुम्ही? मी खरंच असं काही करू शकेल असं वाटतं का तुम्हाला??" मी कळकळीने बोलली,

"मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे तर तुझ्या मनमानीने चुकीचं ठरवलंच आहे, जे लोकं न्याय निवडा करायला माझ्याजवळ यायचे आज त्यांच्याच मधात माझी धिंड काढली आहेस तू?? आता मी तुझ्यामुळे माझ्या मुलांचं आयुष्य खराब नाही होऊ देऊ शकत...."

"हो, बाबा बरोबर, मुलगा महत्त्वाचा आहे, तुमच्या वंशाचा दिवा...आणि हे फक्त यामुळे ना की तुम्ही तुमच्या मुलासाठी विक्रमच्या नात्यातली मुलगी शोधली आहे जिथून तुम्हाला हुंडा मिळणार आहे भरभरून... आता कळतंय मला सगळं... असो, माझ्यामुळे काही खराब नको व्हायला..एक काम करा सांगून द्या सगळ्यांना की तुम्ही माझ्याशी सगळे नाते तोडले आहेत... मी निघून जाते हे घर सोडून...."

"तुला जे योग्य वाटते ते कर..." अस बोलून बाबांनी माझ्याकडे पाठ फिरवली...आईने प्रयत्न केला मला थांबवण्याचा आणि बाबांना समजवण्याचा पण तिने आयुष्यभर हिम्मत केली नव्हती बाबांच्या विरोधात जाण्याची, मग आता कसं तिला जमणार होत, आणि मला
आईला त्रासात पाहायचं नव्हतं...जेवढी पीडा मला विक्रमने दिली नाही तेवढी बाबांच्या त्या एका वाक्याने दिली...घर तर सोडलं होतं पण आता जायचं कुठे हा प्रश्न होता, काही मैत्रिणींना विचारून झालं होतं पण काळोखात सावली ही आपली नसते मग ह्या मैत्रिणी किंवा नातेवाईक आपले कसे असतील...आता एकच पर्याय होता..'अभय सर'
-----------------------------------------------------
जेंव्हा सगळ्यानी पाठ फिरवली तेंव्हा अभय सर मात्र माझ्या पाठीशी कायम उभे होते...त्यांना एक फोन केला आणि त्यांनी माझी व्यवस्था केली...नागपूर पासून 50 किलोमीटर वर त्यांचं गाव होत, त्यांचं घर होत, जिथे आता कोणीही राहत नव्हतं, तिथे त्यांनी माझी व्यवस्था केली..आधी त्यांनी मला NGO मध्ये येण्याचा सल्ला दिला पण मला तिथे परत जायचं नव्हतं कारण डिपार्टमेंट मध्ये त्यांच्या आणि विक्रमच्या मधात जे शीतयुद्ध होत ते सगळ्यांना माहीत होतं आणि आता मी केलेल्या तक्रारीने
विक्रम बद्दल आणि अभय सरांबद्दल ठिकठिकाणी चर्चा होत होत्या, त्यात की तिथे जाऊन अभय सरांचं मान माझ्यामुळे कमी होईल असं काही करायचं नव्हतं...

तिथे राहायला काही अडचण नव्हती, पण खूप एकटेपणा जाणवत होता, बाबांना एक दोनवेळा कॉल करून पाहिले पण त्यांनी तर माझं श्राद्धच केलं होतं वाटते..एकदा फक्त चुकून आईने फोन उचलला त्यामुळे तिला माझी खबर देऊ शकली इतकंच...अभय सरांकडून फोन वर सगळं कळायचं, माझ्या एका तक्रारीने डिपार्टमेंट ने विक्रमचे सगळेच काळेबाजार उकरून काढायला सुरुवात केली..आणि आता अभय सर तिथले SP असल्याने त्यांनी सगळ्याच केसेस विक्रमच्या ओपन केल्या होत्या...

जवळपास एक महिना झाला होता, आणि एवढ्यात त्या यवतमाळ च्या डॉक्टरचेही सगळे घोटाळे, त्याच्या सोनोग्राफी मशीन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा परवाना रद्द केला होता..पण त्याने अजूनही विक्रम विरोधात काहीही बोलण्यास तयार नव्हता...मी अजूनही कायद्याने विक्रमची पत्नी होती, पण सगळं काही करायला मला त्याची माहिती नव्हती आणि अभय सरांना अजून मदतीच बोलणं म्हणजे मला लाज होती...मला काहीतरी छोटं मोठं काम करायचं होतं पण सुरवात कुठून करू हे सुचत नव्हतं...एकटी कधी राहिलीच नव्हती त्यामुळे आत्मविश्वास ही नव्हता...

अचानक एक दिवस अभय सर आले मला भेटायला मला न सांगता...त्यांना बघून छान वाटलं,आणि आता मी विचार केला होता त्यांना सांगते की मी इथून जाते पण मी काही बोलायच्या आधीच ते बोलले,
"नैना, तयार हो पटकन, जायचं आहे आपल्याला.."

"इतक्या घाईने कुठे?? आणि मला ही बोलायचं आहे अर्जेन्ट तुमच्याशी..."

"ते रस्त्यात बोलू आपण,नाहीतर वकील चालला जाईल आपला..."

"वकील???का? म्हणजे मला काही कळत नाहीये..."

"तुला पेटीशन लिहून द्ययाची आहे आणि पाठवायची आहे विक्रमला...घटस्फोट साठी...."
अभय सर हे बोलले आणि माझे पाय जागेवरच थांबले... मला हावभाव बघून ते बोलले,

"नैना, काय झालं..चलवकर.."

"मला नाही यायचं आता..."

"नाही यायचं म्हणजे, मी मूर्ख आहे का? की तो वकील मूर्ख आहे जो वेळ काढून तुझी वाट बघत बसलाय.."

"मला विचारून वेळ दिला होता तुम्ही त्याला??"

"ओहहह, चूक झाली माझी, त्यादिवशी तु बोलली की तुला गरज आहे माझी त्यामुळे मी सगळं आधीच मॅनेज केलं, पण तुझं बोलणं आणि तुझ्या वागण्यात फार तफावत जाणवत आहे मला..."
त्यांचं असं रागात बोलणं मला त्रास देऊन गेलं आणि मी।काही बोलणार तेवढ्यात ते बोलले,

"हे बघ, मी थोडा चिडलो असेल तर सॉरी, पण तुला जर हे वाटत असेल की मी काही उपकार करतोय तुझ्यावर किंवा काही तर असं काहीही नाहीये, जेंव्हा तू स्वतः कमवायला लागशील तेंव्हा सगळा खर्च मला परत करशील..आता ठीक आहे..."

"कसं ओळखलं तुम्ही हे....?"

"जादू....😂😂, कळते मला सगळं, चल आता उशीर होतोय...."

मला ही गोष्ट खूप आवडायची अभय सरांची, त्यांनी मला बाबांप्रमाणे मी किती लाचार किंवा अबला नारी वैगरे याची जाणीव करून दिली नाही, त्यांनी स्त्री पुरुष असा भेद आमच्यात कधीच आणला नाही..आणि त्यांनी माझा स्वाभिमान जपला, त्यामुळे त्यांची मदत मला उपकार वाटली नाही...

पेटीशन लिहून तर पाठवलं होतं विक्रमला आता फक्त त्याच्या उत्तराची वाट पहायची होती, पण मला आता काही जॉब करणं ही गरजेचं होतं, त्यासाठी अभय सरांना खूप वेळ बोलली मी, त्यांच्या मदतीने गावातल्या काही मुलांचं ट्युशन घेण्याचं काम मिळालं मला, माझ शिकवणं बघून पालक अजून मुलं माझ्याकडे पाठवायला लागली, त्यामुळे थोडी आवक ही होती...

एक दिवस अभय सर भेटायला आले आणि त्यांनी माझ्याकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पुन्हा सुरू करण्याचा विषय काढला, मी बोलली,

"नाही सर, मला नाही जमणार, खूप कठीण आहे ते...आणि माझी मनस्थिती नाही आहे..."

"मनस्थितीचं कारण देऊन निष्क्रिय राहणारे लोकं फक्त रडगाणं गाऊ शकतात नैना, असे लोकं सतत चिंतेच्या ओझ्याखाली दबलेले असतात त्यामुळे ते जिवंत असूनही नसतात...तू तशी नाहीस ना नैना...कठीण आहे मान्य आहे पण तुला जमलं नसतं तर तू पहिली परीक्षा पास झाली नसती...थोडी मेहनत अजून कर, नक्कीच तू करू शकशील...."

"मी निष्क्रिय नाही आणि मला कोणत्या ओझ्याखाली नाही दबायचं पण मी स्वतःला ओळखते सर माझ्याने नाही होणार...."

"नैना, तू आरसा का बघते??

"हं... हा काय प्रश्न आहे?? स्वतःला पाहण्यासाठी अजून काय.."

"स्वतःला तर पाहून आहेस तू पण तरीही रोज स्वतःला नव्याने पाहण्यासाठी बघतेच ना आरसा...हे तसच आहे नैना, कधी कधी स्वतःला ओळखण्यासाठी दुसऱ्यांच्या नजरेने पाहणं ही गरजेचं आहे, तेंव्हाच आपल्याला कळते आपण कुठे चुकतो आणि काय आपली ताकत आहे, मी बघितलंय तुला त्यामुळे सांगतो, मेहनत कर, तू सगळं करू शकते....आणि काही अडचण आली तर मी आहेच ना.."

"पुस्तकं कधी आणून देणार...😀"

"आज, आता ताबडतोब...😀😀"

यावेळी आयुष्याचा खूप कठीण मार्ग निवडला होता मी, विक्रमला घटस्फोट देणं असो, घर सोडणं असो किंवा UPSC ची तयारी करणं असो, सगळं काही कठीणच होत, पण हे मार्ग कठीण असले तरी त्यावर चालणं माझ्यासाठी सोप्प होतं, कारण हे मार्ग मी स्वतः निवडले होते, हे निर्णय माझे होते, माझं आयुष्य स्वतःच्या मनाने जगण्याची तयारी माझी होती, स्वतंत्रपणे.....त्यामुळे मार्ग कठीण असूनही त्यावर चालण्याची भीती नव्हती..अडथळे नक्कीच होते, विक्रमच पेटीशनचं उत्तर काय येतंय तेही माहिती नव्हतं पण ते सगळे अडथळे दूर करून पुढे जाण्याची हिंमत नक्कीच आली होती....
----------------------------------------------------
क्रमशः