असे म्हटले जाते की समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून सांगितले होते . महाराज मी तुमच्या स्वराज्या मध्ये आलेलो आहे. आपण माझी उत्तम व्यवस्था करण्यास आपल्या माणसांना सांगावे. मात्र ही एकदम वेगळी गोष्ट आहे.
शिवाजी महाराज हे उत्तम प्रशिक्षक आणि शिक्षक होते .याचा मोठा दाखला म्हणजे हिरकणीचा प्रसंग.
हिरकणी नावाची गवळण गडावर दूध विकायला आली होती .दूध विकताना तिला वेळेचे भान राहिले नाही . संध्याकाळच्या समयी गडाचे दरवाजे बंद झाले. तिला सत्वर घरी जायचे होते. तिने गडाचा दरवाजा बंद करणाऱ्याला विचारून पाहिले .
दादा गडाखाली मला सोडा .
गडाच्या खाली मला जायचे आहे.
माझ्या घरी माझे लहान बाळ आहे.
ते दूध पिणारे बाळ आहे .
त्यासाठी मला खाली सोडा .
पण काळोख पडायला सुरुवात होणार होती. त्यामुळे एकदम कडक आदेश असल्यामुळे गडाचे दरवाजे उघडले नाहीत. मात्र ती हिरकणी तिची हिंमत हरली नाही. हिरकणी नावाची गवळण गडावरून कुठे खाली उतरायला जागा मिळते कां बघत बघत फिरत होती आणि तिला एक जागा सापडली. तिने क्षणात जीवाची पर्वा न करता त्या बाजूने गड उतरायला सुरुवात केली. एकेक पाऊल टाकत ती गडावरून खाली उतरु लागली. गडावरचे मावळे बघत होते. हिरकणी खाली उतरते आहे . अनेकांचा श्वास रोखला गेला होता.त्यांनी तिला पुन्हा अडवले सुद्धा.
परंतु हिरकणी गवळण त्यांना म्हणाली. घरात माझे तान्हे बाळ आहे. त्याला माझे दूध पाजायचे आहे .मी जर गेले नाही तर माझे बाळ रडून केविलवाणे होईल. भुकेने व्याकुळ होईल. मला जायलाच पाहिजे .मला जाऊ द्या आणि ती गड उतरून खाली सुद्धा आली.
तेव्हा गडावर असणारे मावळे आणि गडाचा कारभारी आश्चर्यचकित झाला. या गडाच्या नैसर्गिक तटबंदीला त्यांनी अभेद्य मानले होते. त्या गडावरून एक हिरकणी नावाची स्त्री जीवाची पर्वा न करता काळोखा मध्ये भराभरा गड उतरत खाली जाते म्हणजे काय...? तीने तसे करून गडाच्या तटबंदीला जणू खिंडारच पाडले होते. ही गोष्ट जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितली. शिवाजी महाराजांचा चेहरा बदलला. एकाएकी ते रागावले. किल्लेदाराला ते म्हणाले...
.अरे तुम्ही तिला जाऊ कसे दिले? तुम्हाला किल्ल्याचे नियम माहीत नाहीत...
महाराज त्या हिरकणी नावाच्या गवळणीचे लहान बाळ घरी होते. त्यामुळे ती ऐकेना . ती बाळाच्या ओढीने खाली उतरून गेली. आम्हाला माफ करा...
बरं... राजांनी एक दीर्घ श्वास घेतला. ते म्हणाले.
ठीक आहे. बघतो मी काय ते .शिवाजी महाराज जागेवरून उठले . त्यांची पावले हिरकनी जिथुन उतरली .त्या दिशेला पडू लागली.छत्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थितीची जाणीव घेतली.
ते शांतपणे विचार करू लागले. जर या जागेवरून... या ठिकाणावरून हिरकणी नावाची स्त्री आपल्या मुलाच्या ओढीने खाली उतरते. त्याचा अर्थ ही जागा आणि गडाची ती बाजू कमकुवत आहे ... त्यांच्या मनातला शिक्षक जागा झाला होता....
छत्रपती शिवाजी महाराजांनी लगेचच आज्ञा सोडली. गडाच्या बाजूला उतरण्याची जी जागा आहे . जिथून हिरकणी खाली उतरली. तिथे लगेच बंदोबस्त म्हणून भिंत घालून घ्या. गड एकदम सुरक्षित करून घ्या . लगोलग तिथे बुरुज बांधायला सुरुवात झाली. थोड्या दिवसात अभेद्य अशी किल्ला तटबंदी तिथे निर्माण झाली. त्या ठिकाणी गडाची कमकुवत जागा आहे. ती एका हिरकणीच्या धाडसामुळे समजली होती. शिवाजीराजांनी मनात हिरकणीचा गौरव करण्याचे ठरवले.
जेथून हिरकणी गडावरून खाली उतरली होती. तिथे प्रत्यक्ष शिवाजी महाराज आले . त्यांनी वरून खाली पाहिले. एकदम अवघड रस्ता .
तरीही ती स्त्री कशी काय उतरली. याचे त्यांना आश्चर्य वाटले.
त्यांनी तात्काळ तिथल्यातिथे निर्णय घेतला.
त्या बुरूजाला नाव दिले. हिरकणी बुरुज...
शिवाजी महाराज पुटपुटले. धन्य धन्य ती हिरकणी आणि तिचे पुत्रप्रेम...
महाड मधल्या रायगडावर ज्या ठिकाणी... जिथून... हिरकणी गड खाली उतरली. त्या ठिकाणाला नाव आहे. हिरकणीचा बुरुज... आजही जर रायगड किल्ला बघायला गेलो तर तशी तिथं पाटी सुद्धा लावलेली दिसते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी जर दुसरे कोणी असते तर त्यांनी कामात गल्लत केली म्हणून तिथल्या किल्लेदाराला शिक्षा केली असती. ज्या जागेवरून हिरकणी गवळण खाली उतरली. त्याच जागेवरून किल्लेदाराचा कडेलोट केला असता.
परंतु जाणता राजा... छत्रपती शिवाजी महाराजांनी असे काहीच केले नाही .त्यांनी मांसाहेबांच्या सल्ल्याने हिरकणीचे बुरुजाला नाव दिले होते. आणि किल्ल्यावरील मावळ्यांना हिरकणीच्या बुरुजाच्या पाशी दिवस-रात्र तेल घालून डोळ्यात पहारा करायला सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्या गोष्टीपासून शिकले होते..ते शिक्षण त्यांना शिकवले हिरकणी गवळणीने . ते त्यांनी इतरांना शिकवले . तुम्ही असं करा. तुम्ही असं नाव द्या .तुम्ही पहारा वाढवा . छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम शिक्षक होते. ही गोष्ट इथे पटते. कारण जो हाडाचा शिक्षक आहे. तो स्वतःला शिकवत राहतो. तो इतरांना प्रेमाने शिकवतो. काहीवेळा काय शिकवायचे आहे. याचा शिकवणाऱ्याला चटकन अभ्यास करावा लागतो. निर्णय घ्यावा लागतो.
कोणता मुद्दा पटवून सांगायचा आहे .
कोणत्या मुद्द्यावरून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे.
हे उत्तम जाणकार शिक्षक शिकून घेतो.
त्यात त्याला कमीपणा अजिबात वाटत नाही...
शिवाजी महाराज आयुष्यभर स्वतः शिकत राहिले. इतरांना शिकवत राहिले .इतरांचे जे काही आहे .
विचार ,कल्पना ,धाडस ,साहस यांचा निश्चितपणे आदर करीत राहिले. त्यांच्या या स्वभावामुळे, त्यांच्या या समंजसपणामुळे अनेक मावळे त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते.
लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो.
अशी म्हण त्या काळात पडली होती. ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा प्रेरणादायक गोष्टींमुळेच. दुसऱ्याला कमी लेखायचं नाही . इतरांनी ज्या चूका दाखवून दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करायचा .
त्या दुरुस्त करून घ्यायच्या.
त्या लपवून ठेवून आपल्या चुकांवर पांघरूण घालायचे नाही.
त्या बाबत अभ्यास करून पुढची पावलं टाकायची .असा शिवाजी महाराजांचा होरा होता. त्याला पाठबळ अर्थातच त्यांच्या मांसाहेब जिजाऊ यांचा होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी " रायरी " नावाच्या गडाचे नाव बदलून " रायगड " ठेवले. नंतरच्या काळात रायगडाला राजधानी बनवून राजे रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवत होते.
जय शिवाजी .जय भवानी. जय महाराष्ट्र. अशा घोषणांचा जल्लोष ध्वनी हळूहळू वाढू लागला होता.
त्या घोषणामध्ये एक निराळी ताकद होती.
एक निराळी शक्ती होती.
एक निराळेच संरक्षण होते .
एक निराळाच विश्वास होता.
त्या घोषणांची नावे जरी उच्चारली गेली तरी त्या उच्चाराला बळ प्राप्त होत होते. एक अंगामध्ये विरश्री संचारल्याचा भास होत होता.
त्या घोषणा ... अभिमान घोषणा होत्या...
कोणीतरी आपल्या पाठीशी आहे.
याबद्दल धीर देणाऱ्या घोषणा होत्या...
मराठी अस्मितेच्या गर्वाच्या घोषणा आसमंतात घुमत होत्या. मावळ्यांना त्यामुळे एक प्रकारचे स्फुरण प्राप्त होते . रयतेला संरक्षणाची हमी त्यामार्फत मिळत होती. महाराष्ट्रामध्ये कुणीतरी आपला वाली आहे याबद्दल त्यां घोषणा अनेकांची पाठराखण करीत होत्या.
शिक्षक , प्रशिक्षक या गुणांच्या जोरावर त्यांनी बाजीप्रभू देशपांडे सारख्या लढवय्याला स्वराज्याची लढाई करण्यास संधी दिली . त्या संधीचे सोने करत बाजी प्रभू देशपांडे यांनी जिवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली. याचे एकच कारण आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. उत्तम प्रशिक्षक , शिक्षक आणि स्वराज्याचे शूरवीर होते .
माणसांना पारखताना त्यांची भयंकर अशी चूक झाली नाही.
त्यांच्याजवळील ज्या माणसांनी चुका केल्या .
गुन्हे केले, अपराध केले. अशा लोकांना त्यांनी कडक शिक्षा दिल्या.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था यांचे निर्विवादपणे पालन केले जात होते. त्या कायद्याची दहशत अशी होती की गुन्हे करायला कोणी धजावत नव्हता. जे मुजोर होते .त्यांना पकडून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी दरबारात हजर केले.त्यांचा न्यायनिवाडा करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मातेच्या सल्ल्याने त्यांना शासन केले आणि स्वराज्यावर पकड बसवली.