ऑक्सिजन
सकाळी ऑफीसला निघण्याच्या तयारीत असतानाच योगेशला मोबाईलवर कॉल आला.मोबाईलवरील मामाच्या मुलाचा नं.पाहून त्याच्या काळजात धस्स झालं. कारण त्याचे मामा हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात ॲडमिट होते.मामाची प्रकृती चिंताजनक होती. कधी काय होईल ते सांगता येत नव्हते. योगेशची आई चार दिवसांपुर्वीच मामाच्या गावाला गेलेली होती. त्याने फोन उचलला.
योगेश भितच बोलला, “हॅलो.”
विकास, “ हा,योगेश! पप्पाला ऑक्सिजनवर ठेवले आहे.मला खूप भिती वाटत आहे.तु येतो का इकडे?”
“मी निघतो लगेच.काही होत नाही मामाला.तु काळजी करू नको.”
योगेशने फोन कट करून साहेबांना फोन केला.साहेबांना सगळी परिस्थिती सांगीतली. साहेबांनी खूप आढेवेढे घेतले.त्यांना खूप विनंती केल्यावर त्यांनी सुट्टी देण्याचे मान्य केले.
योगेशने मामाच्या गावाला जाणारी बस पकडली. त्याला खिडकीच्या शेजारी जागा मिळाली.त्याला मामाची तिव्र आठवण येऊ लागली. लहाणपणी मामाने केलेले लाड आठवू लागले. ज्या मामाने आपल्याला लहाणपणी स्वत:च्या मुलासारखे सांभाळले. तो मामा आज हॉस्पीटलमध्ये शेवटच्या घटका मोजत आहे.हे मनात येवून त्याचे अंत:करण दु:खाने भरून आले.डोळे पाणावले. डोळयात आलेले अश्रु मोठया मुश्किलीने त्याने रोखले. मामाच्या गावाकडे जाणारा रस्ता पाहून त्याला लहाणपणाची आठवण आली. लहाणपणी मामाच्या गावाला जायचं म्हणले की, तो व त्याची बहीण खूप खुष असायचे. गाडीतून जाताना पळणारी झाडे पाहून त्याला ग.दि.माडगुळकरांचं
झुक झुक झुक झुक आगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहुया मामाच्या गावाला जाऊया
हे बालगीत आठवायचं. आणि ते खरंही वाटायचं.आज मामाचा गाव आहे. पण मामाच्या गावाला जाताना असणारी झाडे नष्ट झाली आहेत.माणसांनी झाडांची बेछुट कत्तल केली आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात. मामा पण सध्या ऑक्सिजनवरच आहे.झाडांकडून मोफत मिळणारा ऑक्सिजन आज मामाला जिवंत ठेवण्यासाठी विकत घ्यावा लागत आहे याचे त्याला वाईट वाटले.रस्त्याच्या बाजूने असणारी उंच उचं डोंगरंही भुईसपाट केलेली दिसत होती.त्या परिसराला निसर्गाने बहाल केलेले विलोभनीय सौंदर्य तेथील माणसांनीच नष्ट केले होते.हव्यासापोटी व विकास कामांच्या नावाखाली डोंगर पोखरून भुईसपाट केले होते.
तो या विचारात असतानाच, अचानक गाडीचा वेग कमी झाला.गाडी एका जागेवर थांबली.पुढे रस्त्यावर लोकांनी गर्दी केली होती. काहीतरी मागण्यांसाठी लोकांनी रास्ता रोको केला होता. खाली उतरून पाहिल्यावर कळले की, गेल्या वर्षी सोसाटयाच्या वाऱ्याने तेथील शेतकऱ्यांचे पिके भुईसपाट झाली होती. पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नव्हती. अर्धा तास झाला तरी लोकांनी आणखी रस्ता अडवलेलाच होता.एका मागोमाग वाहनांची रांग लागली होती.अर्ध्या तासानंतर पोलीस व तेथील स्थानिक अधिकारी आले. त्यांनी लोकांकडून निवेदन स्विकारले आणि सदर निवेदन शासनास सादर करु असे त्यांनी सांगीतल्यावरच तेथील लोकांनी वाट मोकळी करून दिली.
योगेश गाडीत येवून बसला, आणि परत भुतकाळात हरवून गेला. या परिसतरात पुर्वी खुप मोठी डोंगर रांग होती. त्या डोंगरावर झाडांची गर्दी होती. येथील परिसर सतत हिरवागार असायचा. काही दिवसांपुर्वी विकास कामांच्या नावाखाली येथील डोंगर भुईसपाट करण्यास सुरुवात झाली.कंत्राटदारांनी डोंगर पोखरून तेथील मुरुम अवैधरित्या उत्खनन करून उचलून नेला होता. बघता-बघता सगळी डोंगर रांग नष्ट झाली. निसर्गाने त्या परिसरातील डोंगर रांगांची रचनाच वारा अडवण्यासाठी केली होती. पण लोकांनी निसर्गालाच हानी पोहचलवली होती.आणि त्याचाच परिणाम आज वाऱ्याने तेथील पिके भुईसपाट झाली होती.
योगेश मामाच्या गावाजवळ आला, तितक्यात त्याला विकासचा फोन आला.मामा गेल्याचे त्याने सांगीतले.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच मामाचा प्राण गेला होता. सगळे कार्यक्रम उरकले.
योगेश कॉटवर झोपला होता. पण त्याला झोप येत नव्हती. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच मामाचा प्राण गेला हेच शब्द त्याच्या कानात घुमत होते. ज्या झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मोफत मिळत आहे. तीच झाडे आज आपण संपवत आहोत. निसर्ग कोणतीही गोष्ट माणसाला दुप्पट परत करत असतो. मग माणसाने निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही माणसाची काळजी घेईल. आणि माणसाने निसर्गाला हानि पोहचवली तर नक्कीच निसर्गही माणसाला हानि पोहचवल्याशिवाय राहणार नाही. हे विचार त्याला अस्वस्थ करत होते.
झाडे ऑक्सिजन देतात. तापमान नियंत्रित करतात,कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. पाऊस पाडतात, पाणीपातळी वाढवतात, पाणीसाठा करतात, पूर रोखतात, हवा शुद्ध करून फुप्फुसाचा बचाव करतात,शांतता आणि बचतीचा दिलासा देतात,मातीतील विषारी पदार्थ शोषतात, जैवविविधता राखण्यास मदत करतात. पाऊस पाडण्यास मदत करतात, मुसळधार पावसाचे पाणी थोपवतात. त्यामुळे जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरते, मातीची धूप रोखली जाते. एक झाड वर्षात एका शंभर किलोपर्यंत ऑक्सिजन देते. एका व्यक्तीस वर्षाला सातशे चाळीस किलो ऑक्सिजनची गरज असते. हे शाळेतील अभ्यासक्रमामध्ये शिकवण्यात येते.झाडांचे इतके फायदे असूनही माणूस आपल्याला फायदेशीर असलेल्या झाडालाच संपवण्याच्या प्रयत्नात आहे.याचे त्याला दु:ख होत झाले.
संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपुर्वीच आपल्या ‘अभंगातून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षिही सुस्वरे आळविती’ असे सांगून ठेवले आहे. तसेच शिवाजी महाराजांनीही आपल्या सैनिकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रांमध्ये वृक्षतोड करु नका,वृक्षांचे संवर्धन करा असे सांगीतलेले आहे. चारशे वर्षापुर्वी त्यांना वृक्षांचं महत्तव कळलं होतं.मग आज आपल्याला का कळत नाही? याचा त्याला प्रश्न पडला.शासन वृक्ष लागवड करण्यासाठी वेगवेगळया योजना राबवत होते. पण पाहिजे तो परिणाम साधता येत नव्हता. नेते मंडळी फक्त फोटो काढण्यापुरते वृक्ष लागवडीत सहभागी होत होते. खरी जनता या चळवळीपासून दूरच होती. प्रशासनासोबतच वृक्ष लागवडीत सामान्य जनतेचा सहभाग असणं महत्त्वाचं होतं. हे विचार करताना पहाटे-पहाटे त्याला झोप लागली.
सकाळी तो एका निश्चीत ध्येयाने प्रेरीत होवूनच उठला.पावसाळा जवळ आला होता. त्याने मोठया मुश्किीलीने आणखी एक महिन्याची रजा टाकली.गावात दोन गट होते. त्या दोन्ही गटांना एक करणे गरजेचे होते. ‘गाव करील ते राव काय करील.' ही म्हण त्याला माहित होती.गावातील लोकांशिवाय वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन होणार नाही याची त्याला खात्री होती.योगेशने दोन्ही गटांना झाडांचं महत्त्व पटवून सांगीतले.काही दिवस राजकारण बाजूला सोडून गावाच्या भल्याचे पहा विनंती केली. दोन्ही गटांना एकत्र करणे सोपे नव्हते. पण त्याच्या महत्तवकांक्षेमुळे ते घडून आले. गावातील काही रिकामटेकडे लोक त्याची टिंगल-टवाळी करत होते.पण तो त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता.गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.घराघरातून माणसं कुदळ,फावडे घेवून कामाला लागले. काहींनी श्रमदान केले तर काहींनी धनदान केले. गावातील शाळा,कॉलेज या ठिकाणी वृक्ष लागवड करणेत आली. गावामध्ये ठिकठिकाणी घरांचे अतिक्रमण झाले होते. लोकांनी नाल्यावर पायऱ्या सोडल्या होत्या.त्यामुळे गावातील रस्त्याच्या बाजूला झाडे लावणे शक्य नव्हते. कारण रस्त्यांची रुंदी आधीच कमी व अतिक्रमणामुळे आणखी कमी झाली होती.शेतकरी बांधवांनी शेतीच्या बांधावर झाडे लावून त्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. गावाच्या परिसरात जिथे जागा उपलब्ध असेल तेथे झाडे लावण्यात आली. गावाच्या बाहेरच्या डोंगररांगा, शासकीय जमिनीवरही मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली.शासनाने राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या कंत्राटदारांनाही रस्त्याच्या बाजूने झाडे लावण्याबाबत निर्देश दिले होते. त्यामुळे त्यांनीही गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या बाजूने झाडे लावली.
पावसाळा संपला.लोकांनी उन्हाळयातही झाडांचे संवर्धन केले.दहा वर्षात गाव हिरवंगार दिसु लागलं. वृक्ष मोठी होवू लागली. इतर गावातील लोकही योगेशच्या गावाने केलेली वृक्ष लागवड पाहण्यासाठी येऊ लागले. आपल्या गावातही वृक्ष लागवड करू लागले. योगेशचे गाव व त्याच्या गावाच्या बाजूच्या इतर गावातही मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड झाली. भारतीय जनता एकदा मनावर घेतले तर काहीही करू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
आज वीस वर्षांनी योगेश त्याच्या पाच वर्षाच्या नातवाला मामाच्या गावाला सोडवण्यासाठी चालला होता. गाडीतून पळताना दिसणारी झाडे पाहून योगेशचा नातु खुष होत होता.त्याचा आनंद पाहून योगेशही खूष झाला.रस्त्याच्या बाजूची झाडे वाहनाच्या धुरातून निघणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घेवून शुद्ध ऑक्सिजन सोडून माणसाचा दुहेरी फायदा करत होते.योगेश झाडांपासून मोफत मिळणारा शुद्ध ऑक्सिजन घेत रस्त्याच्या बाजूने गाडीतून पळताना दिसणारी झाडे पाहू लागला. पळणारी झाडे पाहून त्याला ग.दि.माडगुळकरांचे ‘पळती झाडे पाहुया मामाच्या गावाला जाऊया’ हे बालगीत बालपणीच्या स्मृतींसह पुन्हा आठवु लागले.
-संदिप खुरुद