चिल्लर
आज शाळेचा पहिलाच दिवस होता. बाळुला नविन गणवेश नव्हता, म्हणून त्याने गेल्या वर्षाचाच गणवेश घातला. तो गणवेश त्याला आखुड येत होता. पँटचं हुकही तुटलं होतं. त्यानं कडदुडयात डबडयाची काडी अडकवून पँट कमरेला फिट केली. पँट जागोजागी फाटली होती,सिटवर फाटलेल्या ठिकाणी बाळुच्या आईने वेगळया रंगाच्या कपडयाचं ठिगळ बसवलं होतं. शर्टच्या भाया त्याच्या हाताच्या मनगटाच्या वर येत होत्या, खालूनही शर्ट आखूड येत होता. छडी वाचवण्यासाठी बाळु तोच जुना गणवेश घालून शाळेत गेला. सगळया पोरांनी शर्टइन केलेली त्याने पाहिली. त्याला आठवलं, जाधव मास्तर शर्टइन केली नाहीतर त्याची वेगळीच छडी मारतात. त्याने शर्टइन केली, ठिगळावर हात ठेवून तो प्रार्थनेला गेला. प्रार्थना झाल्यावर सगळे विद्यार्थी वर्गात गेले.पँटचे ठिगळ दिसु नये म्हणून बाळुने मुद्दामच वर्गात सगळयात मागे कोपऱ्यामध्ये जागा गाठली होती. वर्गात पहिलाच तास गणीताचा होता. गणीताच्या सरांचा स्वभाव फार कडक होता. बाळुला नेहमी प्रश्न पडायचा, हे गणीताचे सगळे शिक्षक कडकच कसे असतात? सरांनी एक गणीत सोडवून देवून वहीवर उतरून घ्यायला सांगीतले. बाळुकडे वही नव्हती, तो तसाच खाली मान घालून बसला. सरांनी त्याला हेरलं, गणिताची वही का आणली नाहीस? म्हणून मारलं.
दहावीच्या वर्गात येवून आता पाच दिवस झाले होते. वहया-पुस्तक नाहीत म्हणून बाळुला रोजच मार खावा लागत होता.त्याला मारामुळे तर वाईट वाटतच होतं, पण आणखी एका गोष्टींमुळे वाईट वाटत होतं. त्यांच्या वर्गामध्ये माधुरी नावाची एक सुंदर मुलगी आली होती. तिला पाहिल्यापासून ती त्याला आवडू लागली होती, तिच्या समोर मार खावा लागतो म्हणून त्याला लाज वाटत होती.
आज शनिवार असल्यामुळे शाळा लवकरच सुटली. बाळुचे वडील कपडयाच्या दुकानावर कामाला होते. ते अजून दुपारच्या जेवणाला घरी आले नव्हते. बाळुची आई दळण करत बसली होती. बाळु घरी येताच ती त्याला म्हणाली, “हातपाय धुवून घे, आणी जेवण कर.”
“मला नाही जेवायचं.”, असं बाळु रागातच बोलला.
तशी आई त्याला प्रेमात म्हणाली, “कारं बाळा?”
“वहया पुस्तक नाहीत म्हणून मास्तरचा रोजच मार खावा लागतो मला, सगळे पोरं-पोरी हसतेत”. बाळु रडक्या स्वरात म्हणाला.
त्याचं बोलणं ऐकून तिलाही वाईट वाटलं, पण ती माऊली परस्थितीपुढे हतबल होती.
तरीही ती म्हणाली, “बरं बाबा,घेऊत तुला वहया-पुस्तकं. आता जेवण तर कर.”
त्यावर बाळु तावातावातच बोलला, “कवा शाळा संपल्यावर घेतीस का? मी उन्हाळयाच्या सुट्टयामध्ये किराणा दुकानावर कामाला राहिलो होतो. त्या कामाचे पैसे पण तुम्ही घेतले, त्याचे वहया पुस्तके नसते का घेतले मी?”
त्यावर त्याची आई त्याला समजावत म्हणाली, “आरं, काय करावं बाबा? त्या सावकाराचे पैसे द्यायचे होते ना, त्याला द्यायला कमी पडले होते, म्हणून तुझ्याकडले घेतले, देते तुला वापस.”
बाळु रडवेला चेहरा करत म्हणाला ,“नाही देत तुम्ही पैसे वापस.”
पोराचा रडका चेहरा पाहून त्याच्या आईलाही गहिवरुन आलं. पण तिनं त्याला ते दिसु दिलं नाही. त्याला समजावून सांगून,तिने त्याला कसं तरी जेवू घातलं.
जेवण झाल्यावर बाळु चावडीवर येवून बसला. इतर मुले खेळत होती. पण त्याचं त्यांच्याकडे लक्ष नव्हते. वहया, पुस्तके कसे घ्यायचे? याचाच तो विचार करत होता. तेवढयात त्याला लांबून लोकांची गर्दी येताना दिसली. त्यानं ओळखलं, नक्कीच कोणीतरी वारलं होतं. जवळ आल्यावर त्याला कळलं, ती अंतयात्रा भीमा सावकाराची होती. त्या प्रेतावर एक माणूस चिल्लर उधळत होता. त्याच्या हातात एक पिशवी होती, त्या पिशवीत भरपूर खुर्दा होता. बाळुला त्या चिल्लर मध्येच त्याच्या वहया-पुस्तके दिसु लागली. त्याने माणसांना पुढे जाऊ दिले, तो चिल्लर गोळा करु लागला. त्याच्या पँटचे, शर्टचे खिसे भरले, दोन्ही हाताच्या मुठी पण भरल्या. तेवढयात त्याला एक फाटकं चिरगुट दिसलं. त्याने सगळी चिल्लर त्यात ओतली. आणी तो अंतयात्रेच्या मागे-मागे जात चिल्लर गोळा करु लागला. अंतयात्रा सावकाराच्या शेतात आली, चिल्लर उधळायची बंद झाली. जमा केलेले पैसे घेवून तो परत फिरला. तो चावडीजवळ आला. पुन्हा त्याच्या लक्षात आले, तो चावडीपासूनच चिल्लर गोळा करत शेतापर्यंत गेला होता. म्हणजे, आणखी चावडीपासून सावकाराच्या घरापर्यंतची चिल्लर गोळा करायची राहिली होती. पुन्हा तो ती चिल्लर गोळा करु लागला. जमा केलेली चिल्लर घेवून तो नदीजवळच्या म्हसोबाच्या मंदिराकडे गेला. तेथील लिंबाच्या झाडाखाली त्याने सगळी चिल्लर खाली टाकून मोजायला सुरुवात केली. जवळजवळ साडेचारशे रु. जमा झाले होते. त्यामध्ये सर्व वहया पुस्तके येणार नव्हते. म्हणून त्याने ज्या विषयाचे शिक्षक वहया पुस्तके नसल्यामुळे जास्त मारतात, त्यांच्या विषयाचे पुस्तके आणी त्यांच्याच विषयासाठी वहया विकत घेतल्या.
रात्री जेव्हा त्याचे वडील घरी आले, तेव्हा त्यांना बाळुने मढयावर उधळलेली चिल्लर गोळा केल्याची खबर लागलीच होती. ते आल्या-आल्या बाळुला खवळले. पण बाळुने त्यांना त्या पैशाच्या घेतलेल्या वहया पुस्तके दाखवली. तेव्हा ते ही निरुत्तर झाले. कारण त्यांची इच्छा असतानाही पैसे नसल्यामुळे ते त्याला वहया-पुस्तके विकत घेऊन देऊ शकत नव्हते. पण त्यांनी बाळुला यापुढे असे करु नकोस, लोक आपल्याला नावे ठेवतील असे सांगीतले.
दुसऱ्या दिवशी रविवारी बाळु हॉटेलवर कामाला गेला. बाळु ज्या हॉटेलवर कामाला होता, त्याच्या बाजूलाच मसाल्यावाले व्यापारी बसलेले होते.तेथे एक माणूस आला. त्या माणसाने मसाल्यावाल्या व्यापाऱ्याला २०० रु. ची चिल्लर दिली. त्या व्यापाऱ्याने त्याला २२० रु. दिले. बाळुच्या लक्षात आलं, बाजारात व्यापाऱ्यांना चिल्लर लागते, त्यामळे १०० रु. ची चिल्लर दिल्यावर ते १० रु. जास्त देतात. आज गिऱ्हाईकाला चहा पाणी देता-देता एकटयाची खुपच पळापळ होत होती. दुसरं पोरगं आज कामाला आलं नव्हतं. त्यामुळे बाळुला एकटयालाच पळापळ करावी लागत होती. गिऱ्हाईकाला लवकर चहा नाही दिला, तर मालक ओरडत होता. तेवढयात बाळुचे दोन शिक्षक हॉटेलवर आले. त्यांना पाहून बाळुला लाज वाटु लागली. बाळुने नजर बाजूला करुनच सरांना चहापाणी दिलं. बाळुला हे काम करताना कमीपणा वाटत आहे हे त्या सरांच्या लक्षात आलं, त्यांनी बाळुकडे पाहत एक शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर दिली. त्यांच्या प्रोत्सहानाने त्यालाही बरे वाटले. दिवस मावळला, मालकाने दिवसभराच्या कामाचा मोबदला म्हणून बाळुच्या हातावर ७० रु.टेकवले.
दुसऱ्या दिवशी सोमवती अमावस्या होती. जवळच्या गावात दर अमावस्याला जत्रा भरत होती. बाळु आणी त्याचा मित्र गोटया सकाळीच जत्राला गेले. तेथे लोकांना गंध लावून बाळुकडे दिवसभरात १६० रु. जमले. आता बाळुकडे २३० रु. झाले होते. तेवढया पैशामध्ये गणवेश येत नव्हता. आता त्याचा जुना गणवेश घालण्यासारखाच राहिला नव्हता. त्यामुळे तो शाळेत दुसरे कपडे घालून गेला. त्यांचे एक टिरटिरे नावाचे शिक्षक होते. ते आधीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये गरीब-श्रीमंत असा भेदभाव करायचे. आज पण त्यांनी बाळूला गणवेश नसल्यामुळे खुप मारले. गणवेश नाही तर शाळेत कशाला येतो? असे हिणवले. तो खुपच दुखी झाला. त्याने त्याचा समदुखी मित्र गोटयाला सोबत घेवून टिरटिरे सरला अद्दल घडवायचे ठरवले.
दिवस मावळता ते दोघेही शाळेत गेले. सर बसतात त्या खुर्चीवर ओले होवू नये, म्हणून एक पोते अंथरलेले होते. त्या पोत्यामध्ये त्यांनी काटे लपवले. दुसऱ्या प्रार्थना झाल्यावर सगळे विद्यार्थी आपापल्या वर्गामध्ये गेले.बाळु आणी गोटया टिरटिरे सर येण्याची व खुर्चीवर बसण्याची वाट पाहू लागले.पण टिरटिरे सरांच्या ऐवजी पहिल्या तासाला देशपांडे मॅडमच आल्या. जाळं लावलं होतं एकासाठी आणी फसायला आलं होतं दुसरचं. बाळु आणी गोटया एकमेकांकडे पाहू लागले.
मॅडमने म्हणाल्या, “टिरटिरे सरांना काम असल्यामुळे त्यांचा पहिला तास आज मी घेणार आहे. दुसऱ्या तासाला ते येणार आहेत.”
मॅडमने शिकवायला सुरुवात केली. तास संपायला पाच मिनिटे कमी असे पर्यंत मॅडम शिकवत होत्या. आता खुर्चीवर बसणार, इतक्यात बाळु म्हणला,
“मॅडम हा मला पॅरेग्राफ समजला नाही, परत सांगता का?”
मॅडम प्रेमळ होत्या. त्यांनी परत समजावून सांगीतले. तेवढयात तास संपल्याची घंटा वाजली.बाळुने व गोटयाने सुटकेचा निश्वास सोडला. दुसऱ्या तासाला टिरटिरे सर वर्गात आले. ते वर्गात येताच बाळुने आणी गोटयाने एकमेकांकडे पाहून शिकार आल्याचा इशारा केला. टिरटिरे सर पण शिकवु लागले. बाळुचं आणी गोटयाचं शिकवण्याकडे लक्ष नव्हते, ते सरांनी हेरलं, आणी दोघांना प्रश्न विचारले. दोघांनाही उत्तरे देता आले नाहीत.
टिरटिरे सरांनी लोखंडयाच्या बंटयाला लिंबाच्या झाडावर चढून चांगली ओली छडी काढून आणायला सांगीतले. बंटया खुष होवून माकडासारखा भराभर लिंबाच्या झाडावर चढला. त्याने लिंबाच्या झाडाची ओली छडी काढून आणली. टिरटिरे सरांनी आपल्या स्टाईलने त्यांच्या सिटवर छडीने रट्टे दिले. तास संपत आला, तेव्हा टिरटिरे सर खुर्चीवर बसले. आणी ……. त्यांच्या पृष्ठभागामध्ये काटेच काटे घुसले. त्या दिवसापासून टिरटिरे सर वैद्यकीय रजेवर गेले, तेव्हापासून मुलांचे पृष्ठभाग सुजायचे कमी झाले.
बाळुकडे काम करुन जमलेले पैसे त्याच्या आईने घेतले होते. कारण त्याच्या लहान भावाला ताप आला होता.बाळुचे सगळे पैसे दवाखान्यात गेले होते. त्यामुळे त्याला शाळेत गणवेशामुळे मार खावाच लागत होता.
एके दिवशी शिकवता-शिकवता हांडे सरांना फोन आला. फोनवरील व्यक्तीने हांडे सरांना त्यांच्या सासुबाई वारल्याचे सांगीतले. फोनवर बोलणं झाल्यानंतर हांडे सर जाधव सरांना म्हणाले, “आमच्या सासुबाई वारल्या आहेत, मला जावं लागेल.” बाळु उठून हांडे सरांकडे जावून त्यांना म्हणाला, “सर,मला पण तुमच्या सोबत येऊ द्या.” सरांना वाटलं, काहीतरी कामाला येईल. म्हणून त्यांनी त्याला गाडीवर बसवून ते सासुबाईच्या अंत्यविधीला निघाले. अर्ध्या तासानं लिंबाचीवाडी गाव आलं. घराजवळ गर्दी जमलेली होतीच. रडापडा चालू होता. सरांना पाहून लगबगीने दोन-तीन माणसं हांडे सरांजवळ आले.
हांडे सरांनी विचारले, “केव्हा वारल्या.”
त्यातील एका माणसाने सांगीतले, “सकाळपासूनच तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. दवाखान्यात नेईपर्यंत तिचा जीव गेला. बोलता-बोलता त्यांनी बाळुकडे पाहत विचारले, “हा कोण आहे?”
सरांनी “माझा विद्यार्थी आहे.” असे सांगीतले.
हांडेबाई आधीच माहेरला येऊन थांबलेल्या होत्या. सगळी जमवाजमव झाली. पै-पाहुणे आले,म्हातारीची तिरडी उचलली. अंतयात्रा निघाली. बाळुने चिल्लर उधळणारा माणूस आधीच हेरला होता. त्या माणसाने चिल्लर उधळायला सुरुवात केली. बाळुने जमा करायला सुरुवात केली. लोक एकदा बाळुकडे आणी एकदा हांडे सरांकडे पाहु लागले. हांडे सर लालबुंद होवून बाळुकडे पाहत होते. मात्र बाळुचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, त्याचे फक्त चिल्लरकडेच लक्ष होते.
सगळी चिल्लर गोळा केल्यावर बाळु गावाकडे आला. गोटयाला घेवून कपडयाच्या दुकानात गेला. खुप दिवसांपासून दुकानात लटकवलेला गणवेश बाळु पाहत होता. आज त्याला तो गणवेश घालायला मिळणार होता. त्याने गणेवश खरेदी केला. दुसऱ्या दिवशी तो नविन गणवेशात शाळेत आला. आज शाळेचा गणवेश घातल्यामुळे त्याला छडी मिळाली नाही.आज शेवटच्या तासापर्यंत त्याला एकपण छडी मिळाली नाही. त्यामुळे तो खुप आनंदात होता. अचानक शेवटच्या तासाला हांडे सर आले. त्यांचा कालच्या प्रकरणावरुन बाळुवर आधीच राग होता. त्यांनी त्याला मुद्दाम अवघड प्रश्न विचारले. त्याला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. सरांना तेच हवे होते. त्यांनी त्याला खुप मारले.
आज बाळुकडे मढयावर उधळलेल्या चिल्लरच्याच जिवावर वहया होत्या, पुस्तके होती आणी गणवेशही होता. तरीही आज त्याला मार खावा लागला होता आणी त्याचेही कारण चिल्लरच होती.