Hadalpida in Marathi Horror Stories by संदिप खुरुद books and stories PDF | हाडळपीडा

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

हाडळपीडा

हाडळपीडा

अमावस्याची रात्र होती. सगळीकडे काळयाकुट्ट अंधाराचे साम्राज्य पसरले होते. साडे दहा वाजताच सामसुम झाली होती. लाईट पण गेलेली होती. बबन आज बाहेरच ढाळजात झोपलेला होता. घरातले सगळेजण आतील खोल्यांमध्ये झोपले होते. बबनच्या काळजात धाकधूक होत होतं. आभाळ आल्यामुळं आणी डोंगरातलं गाव असल्यामुळं मोबाईलला रेंजच नव्हती. बबनचं आणी ताराचं तर आज कसल्याही हालतीत पळून जायचंच असं ठरलं होतं. कारण तिच्या घरामध्ये तिच्या लग्नाविषयी चर्चा सुरु झाली होती. मोबाईलला रेंज नसल्यामुळं तारा ठरलेल्या वेळेवर बाहेर येईल का ? याबाबत त्याच्या मनात काळजी लागून राहीली होती.

एक महिन्यांपुर्वीच त्यांचं प्रेम जुळलं होतं. पाणीदार डोळे, काळेभोर,मुलायम केस, गोरा वर्ण, रेखीव शरीर, डाळींबासारखे लाल चुटुक ओठ आणी त्या लाल ओठांवर काळा तिळ असे तिच्या सौंदर्यात भर घालणारे सौंदर्यवर्धक अलंकार तिच्याकडे होते. त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. तिने आपल्याशी केवळ एकदाच हसून बोलावं, एवढयासाठी तिच्यावर जीव ओवाळून टाकण्यासाठी, गावातील जवळ-जवळ सर्वच पोरं ताराच्या मागे-मागे फिरायचे. पण कडुजी पाटलाच्या बबननेच तिला पटवले होते. आजच ते दोघे आमराईत भेटले होते. तिथंच त्यांनी आज काहीही झालं तरी पळून जायचंच, असा निर्णय घेतला होता. बबनला माहित होतं, आता नाही तर मग कधीच नाही. आज जर आपण हिंमत केली नाही तर आपलं प्रेम आयुष्यभरासाठी आपल्याला पारखं होणार. तेव्हा पश्चाताप करुनही काहीच उपयोग होणार नाही. तारा तशी गरीब घरची आणी बबन तालेवार, प्रतिष्ठीत कुटुंबातील होता. त्यामुळे बबनच्या वडीलांना बबनचं तारासोबत लग्न करणं मुळीच आवडणार नव्हतं. म्हणूनच पळून जाण्याचा निर्णय घेतल्यापासून बबनच्या पायातलं आवसानच गळालं होतं. काय करावं? त्याच्या काहीच लक्षात येत नव्हतं. त्यात ताराचा फोन लागत नव्हता. त्यामुळे तो आणखीनच काळजीत पडला होता. सगळं सुरळीत पार पडु दे म्हणून तो देवाला विनंती करत होता.

बबनने पळून जाण्याची योजना आखली होती. रामनगर पर्यंत मोटारसायकलवर जायचं, आणी तेथील मित्रांना सोबत घेवून त्यांच्या मदतीने कोर्ट मॅरेज करायचे. एकदा का कोर्ट मॅरेज झालं की, मग त्याला अडवणार कोणी नव्हतं. रात्रीचे बारा वाजले होते. सगळीकडे सामसुम होती. ढगाळ वातावरण आणी त्यात अमावस्या असल्यामुळे सगळीकडे काळोख दाटला होता. एका हाताच्या अंतरावरील दिसणंही कठीण झालं होतं. बबनने मोबाईलची टॉर्च लावली. तो गाडीजवळ आला. तो घरातील कोणी जागे होवू नये म्हणून गाडी बाहेर पर्यंत ढकलत नेवून बाहेर गेल्यावर चालु करणार होता. पण गाडीचे चाक पंक्चर झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो आणखी काळजीत पडला, पण ठरलेल्या वेळी गावाबाहेर निघणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याने बाजूलाच असलेली सायकल बाहेर काढली. त्याने वाडयाचा दरवाजा हळुहळु उघडला. जुन्या काळातील भलामोठा दरवाजा असल्यामुळे हळु उघडला तरी त्याचा कर्रकर्र असा आवाज झालाच. क्षणभर तो शांत राहिला. त्याने कानोसा घेतला, कोणीच जागे झालेले दिसत नव्हते. त्याने दरवाजा परत लावण्याची तसदी घेतली नाही. कारण अजून दरवाजाचा आवाज झाला असता.

बबन सायकल घेवून ताराकडे निघाला. मोबाईलची टॉर्च लावावी तर प्रकाशामुळे कोणी पाहील. त्यामुळे तो अंधारातच सावधगिरीने, कानोसा घेत सायकल हातात धरून चालू लागला. अंधारात एक कुत्रं झोपलेलं होतं. त्याच्या अंगावर बबनची सायकल गेल्यानं ते कुत्रं केकाटत बाजूला जावून जोरजोरानं भुंकु लागलं. त्याच्या आवाजानं बाजूचे सर्वच कुत्रे भुंकु लागले. आता थांबणं अडचणीचं होतं. आवाजानं कोणी जागं झालं, आणी बाहेर आलं, तर सगळा खेळ खल्लास होणार होता. त्यामुळे बबन वेगानं ताराच्या घराकडे निघाला.

सुदैवानं तारा बाहेर येवून थांबलेलीच होती. अंधारात दोघांचे चेहरेही एकमेकांना स्पष्ट दिसत नव्हते. बबनने घाईनेच ताराला पुढे सायकलच्या दांडीवर बसवले. वातावरणामध्ये ओलावा जाणवत होता. दूर कुठेतरी पाऊस पडून मातीचा दरवळ येत होता. थोडयाच वेळात रिमझिम पाऊसही चालु झाला.बबन जोरानं सायकल चालवु लागला. गाव संपेपर्यंत त्यांन अंदाजानंच सायकल चालवली. गाव संपल्यानंतर त्याने ताराच्या हातात पावसात भिजू नये म्हणून कॅरिबॅगध्ये ठेवलेला मोबाईल दिला. आणी तिला टॉर्च चालु करायला सांगीतली.

वेशीच्या बाहेर पडल्यावर नगीबाचा माळ लागत होता. नगीबाच्या माळावरील वडावर भुताचं अस्तित्व आहे. याबाबत तो लहाणपणापासूनच ऐकून होता. जस-जसा वड जवळ येऊ लागला, तस-तशी त्याच्या हदयाची धडधड वाढु लागली. नगीबाच्या वडाला वळसा मारुन ते पुढे गेले. तसा पाऊस जोर धरु लागला. बबन अधिक जोर लावून सायकल पळवु लागला. पण पाऊस जोराचा असल्याने सायकल चालवणं कठीण झालं.सायकलचं चाकही चिखलात रुतु लागलं. आता कुठेतरी थांबण गरजेचं होतं. तेवढयात वडजाई देवीचं मंदिर जवळ आलं होतं. त्यानं पटकन तेथे सायकल थांबवली. ताराच्या हातातील बॅटरी घेतली. आणी त्याने तिचा हात धरुन पायऱ्यांवरुन मंदिराकडे पळण्याचा प्रयत्न केला. पण तारा जागची हाललीच नाही. तो तिचा हात धरुन जोरानं तिला ओढू लागला. पण ती तसुभरही हलली नाही. तारा अशी का करत आहे ते त्याच्या काहीच लक्षात येईना. त्यामुळे त्यानं तिला उचलून मंदिरात घेवून जाण्याचा प्रयत्न केला.

तेवढयात त्याला आवाज आला, “थांब बबन”.

तारासारखाच आवाज होता तो. त्याने आवाजाच्या दिशेनं बॅटरी चमकावली तर ताराच होती ती. त्याचं काळीज चर्रकन चरकलं. मग एवढया वेळापासून माझ्यासोबत सायकलवर बसून आलेली ही कोण आहे? म्हणून त्याने तिच्याकडे बॅटरी चमकवली. बॅटरीच्या त्याला प्रकाशात केस मोकळे सोडलेली, सुळया सारखे दात असलेली विचित्र हाडळ तिच्या मुळ रुपात उभी असलेली दिसली. तो पर्यंत खरी तारा त्याच्याजवळ आली होती. हे सगळं दृश्य पाहून तिची शुद्धच हरपली. ती जमिनीवर कोसळणार तितक्यात बबनने तिला उचललं. पटकन पळत तो देवीच्या मंदिरात शिरला. आता जोराचा पाऊस सुरु झाला होता. विजांच्या कडकडाटानं आणी ढगांच्या गडगडाटानं ते भयाण वातावरण आणखीनच भयानक झालं होतं. बबनने ताराला खाली ठेवले. त्याने बाहेर पाहिले , हाडळ तेथेच उभी होती. पण ती देवीच्या मंदिरात येऊ शकत नाही याची बबनला पुर्ण खात्री होती.

एक तासानं तारा शुद्धीवर आली. मंदिरातील दिव्याची वात जळत होती. तारा खुप भ्याली होती. शुद्धीवर येताच ती खुप मोठयानं ओरडली. पण बबन समोर दिसताच तिनं त्याला मिठी मारली.

बबन तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला, “हे बघ भिण्याचं काहीच कारण नाही आपण देवीच्या मंदिरात सुरक्षीत आहोत.सकाळपर्यंत आपल्याला इथेच थांबवं लागेल.”

देवीच्या मंदिरात असल्यामुळे तिच्याही जीवात जीव आला. ती म्हणाली,“मी घरापासून तुझ्या मागे तुला हाका मारत पळत होते.पण तुला ऐकूच येत नव्हते.”

बबन म्हणाला, “कसं येणार, त्या हाडळीनं माझ्यावर काहीतरी जादू केली होती.सुदैव म्हणून बचावलो. पाऊस चालु व्हायला आणी देवीचं मंदिर जवळ यायला एकच झालं.”

बबन भिंतीला पाठ टेकवून बसला होता. तारा भितीनं मिठी सोडायला तयार नव्हती. तिला आता झोप लागली होती. ती बबनच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत झोपी गेली होती. बबनचेही डोळे ताटरले होते. पहाट होत आली त्याला कधी डोळा लागला ते कळलेच नाही. सकाळी लोकांच्या गलबल्यानंच त्यांना जाग आली. गावातले लोक दिसताच बबन खडबडून जागा झाला. त्या माणसांत त्याचे वडील पण होते. त्यांनी बबनकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्यांना पाहताच तो खाली मान घालून उभा राहिला.तेवढयात त्याची आई पण तेथे आली. आईला पाहताच त्याच्या जीवात जीव आला. आता आई त्याची नक्कीच पाठराखण करणार यात शंकाच नव्हती.

कडुजी पाटलानं आपल्या लेकाकडं पाहत म्हटलं, “आरं लेका, तुला काय अक्कल हाय का न्हाय? तु वाडयात कुठं दिसना, म्हणून तसल्या अंधारात अन् पावसात सारं शिवार धुंडाळून काढलं ना आम्ही. हेव पवाराचा नाम्या राती मंबईहून आला. त्यो रातच्याला रामगडलाच थांबला व्हता. तेथून पहाटच्याला गावाकडं निघाला, त्याला वाटलं जाता-जाता देवीचं दर्शन घ्यावा, तर तुमचंच दर्शन झालं त्याला. त्यानीच आम्हाला तुम्ही दोघं हितं हाईत म्हणून सांगीतलं.”

बबननं आईकडं पाहिलं,बबन सापडल्यामुळं तिला आनंद झाला होता. तिचे डोळे भरून आले होते.

बबन म्हणाला, “आबा, चुकलच माझं. मी असं करायला नको होतं.”

कडुजी पाटील म्हणाले, “लेका, किती केलं तरी म्या तुझा बाच हाई. मला तुमच्या दोघांबद्दल आधीच माहित झालं होतं. म्या तुमचं लगीन थाटामाटात लावून देणार होतो. पण देवरुषानं या अमावस्यापर्यंत तुझ्या मागं हाडळपीडा हाय म्हणून सांगीतलं होतं. आता अमावस्या टळली.आता लगीन लावाया काही हरकत न्हाय”.

हाडळपीडा शब्द ऐकताच बबनला रात्रीच्या प्रसंगाची आठवण झाली. त्याने घडलेला प्रसंग सर्वांना सांगीतला. सर्वांच्या अंगावर काटा आला. पण आता भिण्याचं कारण नव्हतं. कारण अमावस्या झाली होती, आणी हाडळपीडा टळली होती. आता बबनच्या लक्षात आलं होतं, त्याचे आईवडील का त्याला गावच्या शिवाच्या बाहेर येऊ देत नव्हते ते.

सर्वजण घरी आले. आणी दोनच दिवसात कडुजी पाटलांनी बबन आणी ताराचं लग्न मोठया थाटामाटात लावून दिलं.