Chocobar in Marathi Short Stories by संदिप खुरुद books and stories PDF | चोकोबार

Featured Books
Categories
Share

चोकोबार

सहावीची परिक्षा संपून नुकत्याच उन्हाळयाच्या सुट्टया लागल्या होत्या. आमच्या नेकनुर या गावापासून जवळच सात कि.मी. अंतरावर चाकरवाडी हे छोटेसे गाव आहे. त्याठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत ज्ञानेश्वर माऊली यांचं समाधीस्थ‍ळ व महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी दर अमावस्येला जत्रा भरते. पंचक्रोशीतील तसेच इतर ठिकाणाहून भावीक दर्शनासाठी येतात.त्यावेळी आमच्या गावाहून चाकरवाडीला गाडीने जाण्यासाठी एक जणाला पाच रु. तिकीट होतं. अशाच एका अमावस्येला माझा मित्र चम्या आणी मी सकाळी लवकर उठून पहाटेच चाकरवाडीला चालत निघालो. कारण दोघांकडेही पाच-पाच रुपयेच होते. उन्हाच्या आधी चालत जायचं, आणी येताना गाडीने यायचं, असं आम्ही ठरवलं होतं. मधल्या कच्चा रस्त्यानं चालत-चालत आम्ही चाकरवाडीच्या शिवारात आलो होतो. मंदिराचा कळस लांबुनच दिसत होता. थोडं पुढे आल्यानंतर जत्रा पण दिसु लागली. नारळवाले, पेढयावाले, फुलांच्या हारावाले येणाऱ्या भक्तांना नारळ,पेढे,हार घ्या म्हणून ओरडत होते. काही जणांची इच्छा नसतानाही बळंबळंच हातात देत होते. चहाचे हॉटेल, शेवचिवडयाचे हॉटेल व खेळण्यांच्या दुकानांनी जत्रा फुलून गेली होती. हॉटेलमधील गरमा-गरम भजे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. पण भजे खावे तर गावाकडे उन्हात चालत जावं लागेल म्हणून जीव मारुन पुढं निघालो. दर्शनासाठी खुपच मोठी रांग दिसत होती. तेवढयात चम्या म्हणाला, “चल बाहेरुनच पाया पडुत,लईवेळ गर्दीत थांबावं लागणार असं दिसतंय.”

मी म्हणालो, “नगं बाबा, आईनं दर्शन घेउुनच ये म्हणून सांगीतलंय.”

आता त्याचाही नाईलाज झाला.आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. गर्दी असल्यामुळे मागून ढकला-ढकली होत होती. दहाच मिनिटात आमच्या मागेही मोठी रांग लागली. आम्ही वयानं आणी उंचीनेही लहान असल्यामुळे गर्दीत गुदमरल्यासारखं होऊ लागलं. मी आधीच बुटका, त्यात बाजूला सगळी गर्दी, मला तर बाहेरचे काहीच दिसेना. माझं सगळं अंग घामानं निथळलं. चम्या बाहेर तोंड काढायला बघायचा पण गर्दी काही बाहेर निघु देईना. आधीच उन्हाळयाचे दिवस रांगेतल्या माणसांना पण घाम आला होता. त्यांच्या घामाचा दुर्गंध येत होता. आता रांगेच्या बाहेर पडणंही मुश्किल झालं होतं.चम्याचं नाक एका म्हाताऱ्याच्या बगलाजवळच होतं. त्यामुळे त्याला त्याचा दुर्गंध असहय होत होता. त्यामुळे त्याने थोडा हालचाल करण्याचा प्रयत्न केला तर म्हातारं त्याच्यावर चांगलच डाफरलं. म्हातारं चांगलं धिप्पाड होतं. त्याचा चेहरा अतिशय तापट आणी उग्रीट दिसत होता. त्याला काही म्हणावं तर त्यानं तिथंच आमच्या कानाखाली ठेवून दिल्या असत्या. ते म्हातारं जर मोकळया जागेत खवळलं असतं तर चम्या नक्कीच त्याला शिव्या देवून पळून गेला असता. पण पळायला जागाच नव्हती, त्यामुळं चम्या गप्प बसला होता. कसा तरी एक तासानं आम्ही देवा पुढं आलो. डोके टेकवतो का नाही, तोवर पुजाऱ्यानं आम्हाला पुढं ढकललं.

बाहेर आल्यावर आम्हाला जरा मोकळा श्वास घेता आला. बाहेर आल्याबरोबर चम्या एका झाडाकडे गेला. मला काही कळायच्या आतच त्याने तेथील कोणाचे तरी दोन बुट दोन्ही दिशेला लांब फेकून दिले. ते बुट त्या म्हाताऱ्याचेच होते. म्हाताऱ्याने ते पाहिले, आणी ते म्हातारं आम्हाला शिव्या देतच आमच्याकडे येऊ लांगलं. मी चम्याकडे पाहिलं, तोवर चम्या लांब पळाला होता. मी चम्याचाच दोस्त म्हणून म्हातारं मला शिव्या देत माझ्याकडे येऊ लागलं. आता मलाही पळणं भागच होतं. मीही चम्याच्या मागेच पळालो.

म्हाताऱ्यापासून बरेच लांब आल्यावर आम्ही थांबलो. चम्या हसत म्हणाला, “कसं काय म्हाताऱ्याची मजा केली.”

मी म्हणालो, “आरं, असं करीत जाऊ नको ना बाबा, कुणाचा तरी

फुकटचा मार बसवशील.”

त्यावर चम्या म्हणाला, “बरं ते जाऊ दी.भजे खायचे का रं?”

मी म्हणालो. “हो, पण भज्याला पैसे दिल्यावर आपल्याला चालतच जावा लागण बघ.”

तो म्हणाला, “आरं तु कशाला काळजी करतो? हिकडं बघ.”

मी त्याच्या हाताकडं बघीतलं, त्याच्या हातात पाकीट होतं. म्हणजे, त्यानं गर्दीमध्ये कोणाचं तरी पाकीट मारलं होतं.

मी त्याला म्हणालो, “आरं देवाच्या दारात कशाला चोरी केलीस?”

तो म्हणाला, “आरं लई भुक लागली व्हती रं.”

मला पण भुक लागलीच होती, भज्याच्या मोहानं मी ही त्याला होकार देवून म्हणालो, “बरं एवढी वेळेस जाऊ दी. पण आता इथून पुढं अशी चोरी करायची नाहीस.”

त्यानेही चोरी नाही करणार म्हणून सांगीतलं. आम्ही पालातल्या भज्याच्या हॉटेलमध्ये आलो. त्या हॉटेलमधील सर्वच आयटम आम्ही घेतले. वडापाव, जिलेबी, भेळ, भजे खावून-खावून पोट भरलं. आता हयाच्यावर जाणारच नाही, असं कळल्यावर आम्ही खाणं बंद केलं.चम्यानं हॉटेल वाल्याला पैसे दिले. आता आम्हाला गावाकडे चालत जाण्याची गरज नव्हती. आता भरपूर मौजमजा करुनच घरी जायचं असा बेत आम्ही आखला. थोडा वेळ जत्रेमध्ये आम्ही इकडे तिकडे फिरलो. एका रसवंतीजवळ थांबत चम्या म्हणाला, “चल आता रस पिऊत”. माझ्या पोटामध्ये जागा नव्हती, पण आता फुकट भेटायल्यावर नाही तरी कसं म्हणावं? म्हणून मी त्याला होकार दिला. रसाचा एक ग्लास पिल्यावर मला ढेकर आला. चम्यानं मात्र दोन ग्लास पेले. तो माझ्यापेक्षा अंगानं मजबुत होता. त्याला खायला पण खुप लागायचं.

त्यानं, रसावाल्याला पैसे जरा गडबडीतच दिले. आणी मला म्हणाला, “आरं ज्याचं पाकीट मारलं ना मी, तो माणूस इथंच हाय.”

मला तर धडकीच भरली. हातापायातलं आवसान गळल्यासारखंच झालं. तो माणूस मी पाहिला नव्हता. पण एखाद्या माणसानं आमच्याकडं पाहिलं तरी मला वाटायचं हा तोच माणूस आहे. तो माणूस अचानक येवून चम्यासकट मलाही झोडपून काढेल, याची मला भिती वाटु लागली.

मी चम्याला म्हणालो, “चल जाऊ गावाकडं, आता नको थांबायचं हितं.”

तो,“आरं थांब खालच्या मंदिरात जेवायला जाऊ.”

मी,“ माझं पोट भरलेय ब्वा, आता तुच जेव.”

तो,“नको म्हणु नको.देवाचा परसाद थोडा तरी घ्यावा लागतो.”

आम्ही खालच्या मंदिरात जेवायला गेलो. मला भुक नव्हती. मी मला वाढलेलंही चम्यालाच दिले. चम्याने तेही संपवून टाकले.

आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. चम्या म्हणाला, “तु थांब हितं, मी आत्ता आलो.”

चम्या माझ्यापासून गेला. मी त्याच्याकडचं पाहतचे होतो. आता मला त्याच्या सोबतीचीच भिती वाटत होती. कारण चम्या कधी काय कुटाणा करेल आणी कधीचा कोणाचा मार बसेल हे सांगता येत नव्हतं. चम्यानं त्याची तुटकी चप्पल ठेवून कोणाची तरी नवीच चप्पल पायात घातली. मला अजूनच भिती वाटायला लागली. आतापर्यंत फक्त पाकीट वाल्याची भिती होती, आता चप्पलवाल्याची पण भिती वाटु लागली. मला मनातच वाटु लागलं, उगाचचं याच्या बरोबर आलो, हा नक्कीच आपल्याला मार बसवणार. चम्यानं चोरलेली चप्पल भारीतली दिसत होती. नक्कीच ती कोण्यातरी श्रीमंताच्या पोराची होती. त्या पोरानं जर पाहिली, तर लगेच ओळखु येईल अशी चप्पलची वेगळीच डिझाईन होती.

दर्शन झालं होतं, जेवण झालं होतं, आता पटकन गावाकडं सटकनं गरजेचे होते. आम्ही तेथून थोडं पुढं आलो. चम्या एका कडयाच्या दुकानाजवळ थांबला. तो थांबल्यामुळं मलाही थांबण भागच होतं. तेथे आधीच खुप गर्दी होती. चम्यानं एक कडं हातात घालून बघीतलं. दुकानदाराला घासाघीस करुन कमी पैशात मागीतलं. दुकानदारानं दिलं नाही. “एवढं महाग असतयं का? नगं आम्हाला हे.” असं म्हणून चम्या उठला, चम्याच्या बरोबर मीही उठलो. आम्ही दहा-पंधरा पाऊलं चालत पुढे गेलो, तोच मागून कोणीतरी आमच्या मानगुटा धरल्या. चम्या धडपड करत होता. मी सडपातळ, किडमीडीत अंगाचा होतो. त्यामुळे मला हलताही येईना. मानगुट पकडल्यानं मागं पण बघता येईना. मनात आलं नक्कीच हा पाकीटवाला असणार. कसं तरी मागं बघीतलं तर तो कडयावाला दुकानदार होता. तो खुप चिडला होता. तो शिव्या हासाडतच बोलला, “चोरी करता व्हयरं भाडयांनो?”

आता काय चोरी केली मला काहीच कळलं नाही.

तेवढयात कडयाच्या दुकाना शेजारचा गंडे-दोरे विकणारा दुकानदार तेथे आला. म्हणाला, “मगापासून माझं हयांच्याकडं लक्ष व्हतं. चोरी करतात व्हयरं.”

असं म्हणून त्यानं चम्याच्या एक कानपटात ठेवून दिली. ईकडं मीच बोंबलायला लागलो. त्यानं चम्याच्या पँटीच्या खिशात हात घालून दोन कडे बाहेर काढले. म्हणजे चम्यानं बोलता-बोलता कडे चोरले होते. मला पण त्याची खबर नव्हती. बघता-बघता तेथे चांगलीच गर्दी जमली. तेवढयात एक जण चम्याची झडती घेवू लागला. तर त्याच्या खिशातून मगाचं पाकीट निघालं. तर गर्दीतून आवाज आला, “आरं माझं पाकीट हाय त्ये”. तितक्यात ते चप्पलवालं पोरगं पण आलं. त्यानं पण बापाला बोट दाखवून सांगीतलं. “पप्पा तीच चप्पल आहे माझी”, तसा तो पोराचा बाप पण चिडून आला. त्यानंही चम्याच्या दोन कानाखाली वाजवल्या. चोरी चम्यानं केली असताना मी त्याचा साथीदार म्हणून लोक मलाही मारत होते. सगळा तमाशाच चालु होता. मला तर खुप अवघडल्यासारखं झालं होतं. तेवढयात चम्यानं त्या दुकानदाराच्या हाताला हिसका दिला आणी काही कळायच्या आतच तो सुसाट पळत सुटला. मला काही पळता आलं नाही. तेवढयात एक जण म्हणाला, “याला पोलीसांच्या हवाली करा, म्हणजे चांगलं तिंबून काढतेन.” कोणी म्हणत होतं, “याला नागडं करुन पूर्ण जत्रेत फिरवा. म्हणजे पुन्हा चोरी करणार नाही.” असे वाक्य ऐकून मी मोठमोठयानं रडु लागलो. तितक्यात एक आजी आली. तिलाच माझी किव आली. ती मला मारणाऱ्या लोकांना थांबवून म्हणाली, “लहान आहे तो, मारु नका त्याला.”

मी थरथर कापत होतो. हुंदके देत रडत होतो. आजीनं मला जवळ घेवून विचारलं, “चोरी कशाला केलीस बबडया?”

मी म्हणालो,“चोरी मी नाही केली, त्या चम्यानचं चोरी केली, मी त्याच्या सोबत आलो होतो.”

आजीनं पदरानं माझे डोळे पुसले. आणी म्हणाली, “अरे,संगत चांगली धरावी कधी पण माणसानं. चोरी त्यानं केली, तो पळून गेला, मार तुला मिळाला किनई.”

आजीच्या प्रेमळ बोलण्यानं मला जरा हुरुप आला. आजी मला त्या मारणाऱ्या माणसांपासून, गर्दीपासून दूर सोडून निघून गेली. पोलीसांच्या ताब्यात जाण्यापासून तसेच नागडं होण्यापासून आजीनं मला वाचवलं होतं. मी मनोमन ठरवलं. आता वाईट संगत कधीच धरायची नाही.

मी गावाकडं जाण्यासाठी काही वाहन भेटतयं का पाहत होतो. गावाकडं जाण्यासाठी लागणारे पाचच रु. माझ्याकडे होते. तितक्यात मला चोकोबारचा गाडा दिसला. चोकोबार सोडून दुसरी कुल्फी दोन रुपयाला होती. चोकोबार कुल्फी पाच रुपयाला होती.पैसे जवळ नसल्यामुळे मी खुप दिवसांपासून मन मारलं होतं. मी मनातच ठरवलं, आता चालत जायचं पण चोकोबार कुल्फी घ्यायचीच. मी चोकोबार कुल्फी घेतली. त्याला बाहेरुन खपटाचं आवरण होतं. चोकोबार कुल्फी भेटल्यानं मी थोडया वेळापुर्वी घडलेली घटना विसरुन गेलो. एखाद्या झाडाच्या थंडगार सावलीत बसून कुल्फी खाण्याचा मनसोक्त आनंद लुटावा असे ठरवून मी मधल्या रस्त्यानं चालत चाकरवाडी पासून थोडया दूर अंतरावर आलो. डोक्यावर सुर्य आग ओकत होता. दूरूनच मला एक लिंबाचं झाड दिसलं, झाड दिसताच मी चोकोबार कुल्फीच्या वरील खपटाचे आवरण बाजूला काढले. झाडाच्या सावलीत आलो.एक घास खाणार तितक्यात माशा घोंगावत माझ्या डोक्यावर आल्या. बहुतेक मोहळाच्या माशा होत्या त्या. मी तेथून जोरात पळत सुटलो. उन्हाच्या काऱ्हात माशापण माझ्या डोक्यावर घोंगावत माझ्या बरोबरच पळत होत्या. मी जितक्या वेगाने पळत होतो तितक्याच वेगात माशा डोक्यावर घोंगावत येत होत्या. दूरवर नजर टाकली तर कोणीच दिसत नव्हतं. आता आपलं काही खरं नाही या माशा आपल्याला चावणार. या भितीनं मी आणखीनचं जोरानं पळु लागलो. आधीच खुप उुन होतं, त्यात पळाल्यामुळे माझ्या घशाला कोरड पडली होती, धापा लागल्या होत्या, घामानं सर्वांग निथळून निघालं होतं, डोळयापुढं अंधारी आली होती. माशा माझा पिच्छा सोडत नव्हत्या. आता मी पळून तरी मरणार नाही तर माशा चावल्यामुळे तरी मरणार हे नक्की झालं होतं. तेवढयात पळता-पळता ठेच लागून मी रस्त्यात पडलो. मी पडल्यावर माशांनी माझा पिच्छा सोडला. बहुतेक त्या साध्या माशा होत्या. माझ्या डोक्यावरच्या तेलकट पणामुळं माझ्या मागे लागल्या होत्या. माशा गेल्यावर माती पोळाल्यानं मी भानावर आलो. उजव्या पायातल्या चपलेचा अंगठा तुटला होता. माझ्या पायाच्या अंगठयाला चांगलंच लागलं होतं. रक्त बाहेर आलं, मला त्या वेदना असहय होत होत्या. इतक्या दिवसापासून खाण्याची इच्छा असलेली चोकोबार कुल्फी मातीत भरली होती. त्याचं खुप वाईट वाटलं. तेवढयात माझ्या लक्षात आलं कुभांराची विहीर जवळच होती. मी पटकन एका हातात चप्पल आणी एका हातात चोकोबार कुल्फी उचलली. मी पळतच विहीरीजवळ आलो. चप्पल काठावर ठेवली. विहीरीच्या बाजूलाच आंब्याचं झाड होतं. त्याची सावली विहीरीत पडली होती. विहीरीमधील पाणी तळाला गेलं होतं. विहिरीमध्ये उतरण्यासाठी दगडी पायऱ्या होत्या. मी खाली उतरलो. एका पायरीवर बसून मातीने भरलेली, वितळून अर्धी झालेली चोकोबार कुल्फी धुतली. थंडगार पाण्यात मातीने पोळालेले पाय सोडले. आणी डोळे मिटून माझी कितीतरी दिवसांची चोकोबार कुल्फी खाण्याची इच्छा पूर्ण केली. विहीरीत थंडगार पाण्यानं चांगले हातपाय धुतले. बाहेर येवून जखमेवर कुऱ्हाडीचा पाला लावला. तितक्यात चम्या तिथं आला. माझ्याकडे पाहत हसून म्हणाला, “कसं काय पळून गेलो मी?”

मला आधीच त्याचा राग आला होता. मी म्हणालो, “मित्राला संकटात टाकून पळून जाणाराला मला बोलायचं नाही.”

तो म्हणाला, “नको बोलूस. माझं तरी काय जातय.”

एवढं बोलून तो निघून गेला. मी ही घरी आलो.

चार–पाच दिवसातच चम्याचे वडील घरातलं सगळं सामान-सुमान घेवून घरातल्या माणसासकट पळून गेल्याचं कळालं. कोठे गेले?कोणालाच माहीत नव्हतं. इतकचं कळलं की ते कर्जबाजारीपणामुळे पळून गेले. चम्याच्या वडीलांनी जवळच्या सगळयांकडून उसने पैसे घेतले होते. तसेच काही खाजगी सावकारांकडूनही पैसे घेतले होते. ते फेडता न आल्यामुळे ते पळून गेले होते.

या घटनेला आता दहा वर्ष झाली होती. तेव्हापासून चम्याची आणी माझी भेट झाली नव्हती. आत मी पुण्याला जाण्यासाठी एका खेडेगावाच्या बसस्थानकात थांबलो होतो. तितक्यात मला चोकोबार कुल्फीचा गाडा दिसला. मला ती कुल्फी खाण्याचा मोह झाला. मी त्या गाडयाजवळ गेलो. तितक्यात, गाडी आल्यानं मी गडबडीनं कुल्फी घेवून पैसे न देताच गाडीकडे पळालो. पण गाडी निघून गेली. गाडी निघून गेल्याने मी नाराजीतच उभा राहिलो, तेवढयात कोणीतरी माझ्या नावाने आवाज दिला. अनोळखी ठिकाणी मला कोण आवाज देत आहे म्हणून मी आश्चर्याने मागे पाहिले, तर कुल्फी विकणारा हसत माझ्याकडेच येत होता. माझ्या लक्षात आलं, याचे पैसे द्यायचे राहिले आहेत. पण याला माझं नाव कसं माहीत? म्हणून मी त्याच्याकडे निरखून पाहिलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, तो चम्याच होता. इतक्या दिवसांनी भेटल्याने मीही आनंदाने त्याला मिठी मारली.

त्यानं सांगीतलं,

“गावातून निघून गेल्यावर माझे वडील अपघातात वारले. त्या दिवसापासून मी चोरी करणं सोडून दिलं आहे. आता मेहनत करुनच जगतो”.

चम्याच्या चेहऱ्यात आणी शरीरातही आता बराच फरक जाणवत होता.थोडावेळ आम्ही जुण्या आठवणीत रमलो. पण तितक्यात पुण्याला जाणारी बस आली. मला महत्वाच्या कामासाठीच जायचं होतं. त्यामुळे थांबून चालणार नव्हतं.मी त्याचा निरोप घेवून बसकडे पळालो. बसमध्ये गर्दी नव्हती. त्यामुळे खिडकी शेजारीच मला जागा मिळाली. तेवढयात खिडकीच्या बाहेर चम्या दोन चोकोबार कुल्फी घेउुन आला. मी नाही म्हणालो, तरी त्याने बळेच हातात दिल्या. गाडी पुढे निघाली पण माझं मन माझ्या बालमित्रापाशीच घुटमळलं होतं. नकळतपणे माझ्या डोळयांच्या कडा ओल्या झाल्या. मी डोळयात आलेलं पाणी मोठया मुश्कीलीनं रोखलं.