Victims - 5 in Marathi Adventure Stories by Amita a. Salvi books and stories PDF | बळी - ५

Featured Books
Categories
Share

बळी - ५

बळी -- ५
केदार बराच वेळ टॅक्सीतल्या लहानशा सीटवर झोपला होता; शिवाय हालचाल करायचीही सोय नव्हती; त्याला हालचाल करताना पाहिलं असतं, तर त्या दोघा गुंडांना संशय आला असता. आता त्याचे हातपाय ताठरले होते. हा जीवघेणा प्रवास कधी संपतोय; असं त्याला झालं होतं. पण राजेश आणि दिनेशचं मात्र पुढचं प्लॅनिंग चाललं होतं..
"आपण गोराईला पोहोचेपर्यंत तिथली वर्दळ खूप कमी झालेली असेल. काळोख पडेपर्यंत विशेष कोणी तिथे रहात नाही; फिरायला गेलेले लोक लवकर परत फिरतात! त्यामुळे तिथे जास्त पोलीस पहारा असतील; असं वाटत नाही! " राजेश दिनेशला धीर देत होता.
" या वेळी गर्दी कमी असल्यामुळेच तर प्राॅब्लेम आहे! एकदा पोलीस जरी ड्यूटीवर असला तरीही त्याचा डोळा चुकवून ह्याला लाँचपर्यंत कसं न्यायचं; हा मोठा प्रश्न आहे!" दिनेशच्या स्वरात आता काळजीबरोबरच थोडी भीती डोकावत होती.
दिनेशच्या मनातली भीती घालवण्यासाठी राजेशने लगेच उपाय सुचवला,
" एक उपाय आहे माझ्याकडे! तुझ्याकडची बाटली काढ! मला माहीत आहे ---- तू नेहमीच जवळ बाळगतोस! याच्या अंगावर शिंपडतो, म्हणजे जास्त प्यालाय; म्हणून बेशुद्ध आहे, असं सांगता येईल! कोणालाही संशय येणार नाही!" दिनेश म्हणाला.
बहुतेक ड्रायव्हरने बाटली उघडली होती! दारूचा तीव्र गंध केदारच्या नाकात शिरला, त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याला मद्याची अॅलर्जी होती- नाक दाबून धरावसं वाटत होतं; उलटी होईल असं वाटत होतं; पण त्याने महत्प्रयासाने स्वतःवर ताबा ठेवला होता. दिनेशने भरपूर दारू केदारच्या कपड्यांवर ओतली.
"आता कोणाला संशय यायचं कारण नाही!" तो म्हणाला.
"वाह! हुशार आहेस!" दिनेश खूश होऊन म्हणाला.
"मित्र कोणाचा आहे? तुझा मित्र तुझ्यासारखा! आता काळजी करण्याची गरज नाही! कोणालाही संशय येणार नाही!" राजेश त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.
********

---- समुद्राची थंड ओली हवा अंगाला झोंबू लागली. टॅक्सी बहुतेक गोराई बीचजवळ आली होती! केदारच्या मनात सुटकेची आशा पल्लवित झाली होती.
" बहुतेक गोराई खाडी जवळ अाली! उतरल्यावर यांच्याशी दोन हात करायची संधी नक्कीच मिळेल. यांना चांगलाच इंगा दाखवला पाहिजे. कारणाशिवाय त्रास दिलाय त्यांनी! रंजना किती काळजी करत असेल! मागोमाग येतो असं तिला सांगितलं; आणि आता दोन तासांपेक्षा जास्त वेळ गेलाय! मला फक्त थोडी संधी मिळायला हवी! आणि पोलिसांची किंवा आजूबाजूच्या माणसांपैकी कोणाची मदत मिळाली, तर फारच बरं होईल!" तो स्वतःशी पुढचे आडाखे बांधत होता. कधी एकदा या दोन गुंडांच्या तावडीतून सुटतोय; असं त्याला झालं होतं.
केदारला फार वेळ वाट पहावी लागली नाही! टॅक्सी थांबली--- दोघानी दोन बाजुंनी आधार देऊन त्याला खाली उतरवलं! केदार डोळे किलकिले करून परिसर न्याहाळत होता. एका गार्डला त्याने जवळ येतांना पाहिलं. मागोमाग एक पोलिसही येत होता. आता केदारला मदतही मिळणार होती. इतका वेळ टॅक्सीत अवघडलेल्या अवस्थेत झोपल्यामुळे केदारचं अंग आंबून गेलं होतं; पण तिकडे लक्ष न देता केदार त्या दोघांना ढकलून पोलीसांकडे धावत जायच्या तयारीत होता. अचानक् त्याच वेळी आजूबाजूचे अनेक लोक घोळका करून त्याच्या भोवती जमले, आणि कलकलाट करू लागले; त्यांचं कडं तोडून पोलिसाला आणि गार्डला केदारजवळ येता येईना! ते सगळे तिथले रहिवाशी होते--- त्यांच्या बोटी तिथे दररोज चालत होत्या, त्यामुळे त्यांच्या ओळखीचे होते. त्यामुळे त्यांच्याशी फार कडक शब्दांत बोलत नव्हते.
"काय झालं? या बेशुद्ध माणसाला कुठे घेऊन चालला आहात तुम्ही?" पोलिसाने लांबूनच विचारलं. त्यावेळी अनेकांनी केदारला इतकं घट्ट पकडलं होतं, की त्याला हालचाल करता येत नव्हती. आणि इतक्या लोकांच्या गराड्यातून पोलीस केदारपर्यंत जाण्यापूर्वीच दिनेशने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.
"आमचा मित्र आहे! पार्टीमध्ये थोडी जास्त झालीय ---- पलीकडे गोराई गावात रहातो. त्याला त्याच्या घरी पोचवायचा आहे!" गार्डला आणि पोलिसाला केदारच्या जवळ येऊ न देण्याची खबरदारी घेत ; आणि त्यांना बोलण्यात गुंतवत दिनेश आणि तिथला एक रहिवासी बाजूला घेऊन गेले.
" यांनी फोन केला होता; त्याला घरी न्यायला बोट घेऊन आलो आहोत!" दुसरा माणूस म्हणाला.
"भरपूर दारू ढोसलीय त्याने! लांबून सुद्धा वास येत होता! पण तुम्ही कोणी घेतलेली दिसत नाही-- तो एकटाच कसा प्याला?" पोलिसाने संशयाने विचारलं.
" आमच्या मित्र मंडळीत कोणीही ड्रिंक घेत नाही! तो सुद्धा कधीच घेत नव्हता! इंजिनियर आहे साहेब! खूप हुशार आहे ----- पण एका पोरीने दगा दिला; आणि इतका चांगला माणूस कामातून गेला! वेडा व्हायचाच बाकी राहिलाय! आम्ही त्याला लायनीवरून आणायचा प्रयत्न करतोय!" दिनेश सांगत होता. पोलीस आणि गार्डला आपल्या गोड बोलण्यात त्याने चांगलंच गुंतवलं होतं! आणि बोलता-बोलता केदारपासून लांब घेऊन गेला होता.त्यांना आता त्या दारूड्या माणसाविषयी सहानुभूती वाटू लागली होती.
" जपून घेऊन जा! आणि सांभाळा त्याला! पोरीच्या लफड्यात आयुष्य फुकट घालवू नको; म्हणावं त्याला! आई-वडिलांचाही विचार कर! कर्ता- सवरता मुलगा असा वागू लागला, तर त्यांनी कोणाकडे बघायचं? समजावून सांगा! " पोलीस सहानुभूतीने म्हणाला.
पोलिस आणि गार्ड तिथून निघाले, पण ते जरा लांब उभे राहून एकमेकाशी गप्पा मारत उभे राहिले. केदारला धटिंगणांनी असा काही गराडा घातला होता , आणि त्याचे हातपाय असे दाबून धरले होते; की तो हालचाल करू शकत नव्हता; आणि त्या सगळ्यांचा इतक्या मोठ्या आवाजात गोंगाट चालला होता; की हाकेच्या अंतरावर पोलीस असूनही केदारचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं.
"आपण याला एकदाचा बोटीवर चढवूया! त्या पोलीसांचा काही भरंवसा नाही! ते बघ, ते अजूनही आजूबाजूलाच आहेत! त्यांना संशय आला, आणि त्यांनी याच्याजवळ यायचं ठरवलं, तर आपण त्यांना रोखू शकणार नाही! आणि ते जवळ आले, तर हा दारूच्या नशेत नसून बेशुद्ध आहे हे लगेच ओळखतील! शिवाय जास्त वेळ गेला, तर तो शुद्धीवर येण्याचीही भिती आहे! त्याला बोटीत घेऊन बोट लवकर चालू केलेली बरी!" एकजण म्हणाला.
त्याचं म्हणणं सगळ्यांनाच पटलं.
सशक्त आणि उंचपु-या केदारला दोन्ही बाजुंनी कसाबसा उभा करून त्याला बोटीपर्यंत नेतांना त्या गुंडांची चांगलीच त्रेधा उडाली होती.
*********
बोटीवर चढेपर्यंत सगळेच पोलीसांच्या भितीने आणि केदारला बोटीत चढवायच्या श्रमाने घामाघुम झाले होते.
"तू तर म्हणाला होतास की हा काॅम्प्यूटर इंजिनिअर आहे; पण हा तर पेहेलवान गडी वाटतोय! " एक माणूस दिनेशला म्हणाला. तोच बहुधा त्याचा मित्र असावा.
"आजकाल शहरातली बरीच पोरं जिमला जाऊन व्यायाम करतात. हा सुद्धा जात असेल कदाचित्!" दिनेश म्हणाला.
"एखाद्या सिनेमातला हीरो शोभला असता, असा देखणा आहे हा!" दिनेशचा मित्र बेशुद्ध केदारकडे बघत म्हणाला.
" म्हणूनच त्याला गायब करायची घाई करावी लागली! जास्त दिवस गेले असते, तर मला खूप काही गमावावं लागलं असतं! कोणाचा काही भरवसा देता येत नाही! गेले अनेक दिवस ह्याच्या मागावर होतो. पण घराबाहेर पडायचा ; तेव्हा मित्र बरोबर असायचे; त्याला उचलणं शक्य नव्हतं! आज बेसावध होता-- तावडीत सापडला! आता काही मी त्याला सोडत नाही!" चिडखोर स्वरात दिनेश म्हणाला. त्याच्या बोलण्यातून कोणताही बोध केदारला होत नव्हता. त्याला कोणाविषयी भरवसा नव्हता, आणि त्यासाठी तो आपल्या जिवावर उठला आहे --- इतका वेळ त्यांचं बोलणं ऐकूनही केदारला कशाचंच आकलन होत नव्हतं.
दिनेश दात - ओठ खात पुढे बोलू लागला,

" मी तर त्याला बोटीवर चढवायचे कष्ट घेणारच नव्हतो! तिथेच दलदलीत फेकून देणार होतो; पण ते पोलीस आले, आणि एवढे कष्ट घ्यावे लागले. आता हे पार्सल समुद्रात जवळपास नाही फेकता येणार; दूर न्यावं लागेल!" त्याच्या बोलण्यात त्याच्या मनातला केदारविषयीचा खुन्नस पुरेपूर उतरला होता.
केदारच्या अंगावर काटा आला! जर त्याला दलदलीत फेकलं असतं; तर जिवंत रहाण्याची सुतराम् शक्यता नव्हती.. पोलीसामुळे तो मोठ्या आपत्तीतून वाचला होता.

******** contd. -- part 6.