कोकण म्हटलं की, डोळ्यासमोर येतं ते निसर्गसौंदर्य. ह्या कोकणाला परशुराम भूमी असेही म्हटले जाते.
अशा ह्या निसर्गरम्य कोकणात आहे माझ्या मामाचं गाव.
तसे आमचं ही घर आहे कोकणात. पण काही वर्षांपूर्वी ते घर पाडल्यामुळे आता फक्त तिथे घराचा चौथरा बाकी आहे. त्याभोवती सगळीकडे नुसती झाडी पसरलेली दिसते. माझ्या पप्पांचा जन्म त्याच घरात झाला. माझी आजी बरीच वर्षे त्या घरात राहत होती. पण नंतर आजोबांनी मुंबईत खोली घेतली आणि मग आजी मुंबईत आली ती कायमची.
मग त्यांनतर मामाचं गाव आमचं गाव बनलं. माझी आजी ही माझ्या आईची सख्खी आत्या त्यामुळे तिचं आणि आईचं माहेर एकच. त्यामुळे गावी आल्यावर आम्ही इथेच उतरत असू. पण न चुकता आजी आम्हा भावंडाना आमच्या गावी नेऊन आमच्या घराच्या चौथऱ्याच्या पाया पडायला नेत असे आणि त्या घरात जिथे देवघर होते तिथे तांदूळ वाहून आम्ही पाया पडत असू. अजूनही जेव्हा पण आम्ही गावी जातो तेव्हा न चुकता आमच्या गावी जाऊन आमच्या घरासमोर नतमस्तक होतो.
असो, तर मामाच्या गावाच्या खूप आठवणी आहेत. रोज काहिनाकाही नवीन दंतकथा आजीकडून ऐकायला मिळत असत.
एकदा काय झाले, आम्ही सगळी भावंड दुपारी आजोबांच्या बैलगाडीत बसून खेळत होतो. नुसती बैलगाडी आजोबा सावलीत उभी करून ठेवत असत.
तर आम्ही बैलगाडीत बसलेले असताना अचानक वावटळ सुरू आली. वावटळ म्हणजे धुळीच वादळ. मी आजीकडून ऐकले होते की, असे वादळ दुपारी येते आणि जर त्या धुळीच्या भोवऱ्यात मीठ टाकले तर राक्षस दिसतो म्हणे. खरं खोटं देवास ठाऊक. पण तिच्या म्हणण्यानुसार कोणीतरी तसे केलेले.
अशा वेळेला नेहमी खाली वाकायच. म्हणजे आपण त्या भोवऱ्यात सापडत नाही. असेही आजी म्हणत असे. मला ते आठवलेलं. मग आम्ही सगळेजण घाबरून खाली वाकलो होतो. मग थोड्यावेळाने बघितले तर ती वावटळ दूर निघून गेली होती.
अजून एक गमतीदार किस्सा आठवतो तो असा की, आजोबा रोज सकाळी गोठ्यातल्या गाई-बैलांना चरायला सोडायचे आणि संध्याकाळी ती गुरे आपोआप गोठ्यात परत येत असत. त्यांना घर कसे सापडे हे माझ्यासाठी अजूनही आश्चर्यचं आहे.
तर झाले असे की, एक दिवशी आमचा एक तांबडा बैल संध्याकाळ झाली तरी घरी आला नव्हता. बाकी सगळी गुरे आली होती. आजोबांना माहीत होतं तो येईल घरी. पण तरीही मज्जा म्हणून त्यांनी आम्हाला त्याला शोधायला पाठविले. आम्ही सगळी बच्चापार्टी निघालो शोध मोहिमेला.
आम्हाला एक जागा माहीत होती जिथे हिरवागार गवत असायचं. तिथे जास्त गुरे-ढोरे चरायला जात असायची. आम्ही तिथे गेलो तर एक हुबेहूब आमच्या तांबड्या बैलासारखा दिसणारा बैल आम्हाला दिसला. मग आम्हाला वाटलं हा आमचाच बैल. मग काय त्याला हाकवत घेऊन आलो घरी. पण तो तर गोठ्यात जायला तयारच होईना मग आम्ही जबरदस्तीने त्याला गोठ्यात हाकवत नेले आणि तिथे बांधलं. त्या अनोळखी बैलाला बघून बाकी सगळी गुरे ओरडायला लागली. कारण त्यांना माहीत होतं की, हा आपला फॅमिली मेंबर नाही. त्यांचा आवाज ऐकून आजोबा बाहेर आले आणि त्या बैलाला बघून त्यांनी डोक्याला हात मारला आणि त्या बैलाला सोडून दिलं. तसा तो बैल धावतच गोठ्यातून पसार झाला. आम्हाला फार वाईट वाटलं की, आम्ही जबरदस्तीने त्याला इथे घेऊन आलो याचं. थोड्यावेळाने बघतो तर आमचा तांबडा बैल रमतगमत घरी येत होता. हे पाहून आम्हालाच फार हसू आले. ते दिवस खूपच मजेचे होते.
आजोबा रोज आम्हाला नवनवीन टास्क द्यायचे. थोडक्यात पावसाळा यायच्या आधीची तयारी उन्हाळ्यात करून घेत असत. पण आम्ही मुले खूप एन्जॉय करत असू ते टास्क.
अजून एक किस्सा आठवतोय तो मालवण सफरीचा. म्हणजे एकदा आम्ही ठरवलं की, गाडी करून मालवण सफरीला जायचं. मला आरवलीच्या श्री वेतोबांचे दर्शन घ्यायचे होते. त्याचबरोबर श्री देवी सातेरीचं वारूळ असलेलं मंदिर सुद्धा पाहायचं होत. हे सगळं मी कोकणचा सांस्कृतिक इतिहास ह्या पुस्तकात वाचलेलं होत. मग आम्ही निघालो सगळे सफरीला. बरोबर आई, मामा यांनाच घेतलं. बाकी आम्ही सगळी चिल्लरपार्टी होतो.
आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच असे सगळं बघत निघालो. मग दुसऱ्या दिवशी सातेरी देवीचं मंदिर शोधत होतो. विचारता विचाराता आम्ही बिळवस गावातील पाण्यामधले सातेरी देवीचं मंदिर बघितलं. आम्ही उन्हाळ्यात गेलेलो म्हणून तिथे जास्त पाणी नव्हतं. पण तिकडच्या पुजाऱ्याने सांगितलं की, पावसात हे मंदिर पाण्यात असत. अजून माहिती हवी असेल तर मला कंमेंटमध्ये लिहून कळवा. यासाठी मी सविस्तर ब्लॉग बनविन.
तर सातेरी देवीचे ते अद्भुत मंदिर बघून मग आम्ही श्री वेतोबा क्षेत्राला भेट देण्यासाठी आरवलीला निघालो. वाटेत आम्ही हॉटेलमध्ये जेवायचे ठरविले होते. पण काय आश्चर्य संध्याकाळचे ४ वाजल्यामुळे ती बंद झाली होती. मग आम्ही उपाशीच वेतोबांचे दर्शन घेतले. किती प्रसन्न वाटलं होतं आम्हाला. सगळे भूक विसरून गेलेले.
एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा संपल्या आणि मे महिन्याची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की, मामाच्या गावी जायचे वेध लागायचे. तसे दरवर्षी आम्हाला गावाला जायला मिळायचे नाही. पण जेव्हा केव्हा आम्ही गावी जात असू. तेव्हा नुसती धमाल, मस्ती आणि मजाच असे.आजोबांच्या बैलगाडीत फिरायची मजा औरच होती. जेव्हा गावच्या घराचे काम सुरू होते तेव्हा वाळू आणण्यासाठी आजोबा दूर माळरानावर आम्हाला बैलगाडीतून घेऊन जात असत. मला आठवतं तिथे पाम वृक्षाची झाडे होती. किती सुंदर नजारा असायचा तो. तिथे आम्हाला एकदा ससे ही दिसले होते. पण अशा सफरींना गेल्यावर येताना मात्र सगळ्यांना चालत यावं लागे. कारण बैलगाडीत कधी वाळू, कधी कौले, तर कधी लाकडे असायची. पण एका फेरीला बैलगाडीत बसायला मिळायचे याचा ही तितकाच आनंद असे. येताना मग आंबे, करवंद, जांभळं यांचा आस्वाद घेत घेत आम्ही सगळी बच्चेकंपनी मजा करत येत असू. मग घराजवळच्या बोरिंगवर हातपाय, तोंड धुवून घरी जात असू.
गावाला चहा नाश्ता पासून जेवणापर्यंत सगळे काही अगदी वेळेवर असायचे. माझी आजी सुगरण होती. तसे पण गावाला पहाटेच लवकर जाग येत असे. त्यामुळे ब्रश करून, सकाळच्या क्रियाविधी आटपून मग आम्ही सगळे चहा बरोबर बटर, खारी, बिस्कीट खात असू. त्यानंतर नंबर लावून सगळे अंघोळीला जात असत. माझे भाऊ बादली घेऊन सरळ बोरिंगवर अंघोळीला जात असत.
मग अंघोळ केल्यावर आजीच्या हातची भाकरी आणि त्याबरोबर कधी पिठलं, कधी कांद्याची भाजी, तर कधी सुका जवळा असायचा. तर कधी घावणे, आंबोळ्या सुद्धा असत. मग लगेच दुपारी १२-१२.३० पर्यंत जेवण नंतर संध्याकाळी ४ वाजता पुन्हा चहा आणि रात्रीचे जेवण बरोबर ८ वाजता. मुबंईला इतके टाइम टू टाइम सगळं जमत नाही. जास्त भूक ही लागत नाही. पण गावाला भरपूर भूक लागते. ते का हे मला तरी माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा.
पप्पांची मुंबईतली मामी म्हणजे आमची सगळ्यात फेवरेट आजी होती. ती मूळची मुबंईची असल्यामुळे तिला जास्त गावचे माहीत नव्हते आणि कोणाची कोणती झाडे ते तर अजिबात नाही. आम्ही कुठेही फिरायला गेलो तर आजी आमच्याबरोबर असायचीच. एक दिवस आम्ही आमचे कलमाचे आंबे झाडावर किती धरले आहेत ते बघायला गेलो. तर तिथे २ मुले घळ घेऊन आंबे काढताना आम्हाला दिसली. मग काय आम्ही लागलो आरडाओरडा करायला. पण आजीने तर धमालच केली तिच्या हातात नॉर्मल एक काठी होती. ती तिने त्या मुलांना हळूच पायावर मारली. ती मुले तिथून धूम पळाली आणि आम्ही इन शॉर्ट आंबे चोरणाऱ्या मुलांना पळवून लावले म्हणून ऐटीत होतो.
आम्ही फिरून काही वेळाने घरी येऊन बघतो तर ती मुले आमच्या घरी होती आणि त्यांच्याबरोबर त्यांचे वडील पण होते. आम्ही आजीकडे आणि आजी आमच्याकडे बघायला लागली. तेव्हा आजोबांना सगळा किस्सा त्या मुलांमुळे आधीच कळलेला. आम्हाला बघून मग आजोबांनी लगेच आमचे कन्फ्युजन दूर केले. ती मुले सुद्धा मुबंईतली होती त्यामुळे ती आम्हाला ओळखत नव्हती आणि ती त्यांच्याच झाडाचे आंबे काढत होती. जे अगदी आमच्या आंब्याच्या झाडाच्या बाजूला आहे. झालं त्यादिवशी आमचा खूपच मोठा पचका झाला होता.
मुबंईच्या आजीबरोबरचे किस्से तर भन्नाट आहेत. आम्हीं एकदा आमच्या शेजारच्या मित्राला घेऊन गावी गेलो होतो. तो थोडा हेल्दी होता. आजी नेहमी त्यालाच काही न काही काम सांगत असे. उठल्यापासून झोपेपर्यंत दोघांमध्ये सारखे वाद होत असत. पण तरीही तो झोपताना आजीच्या आसपास झोपत असे आणि सकाळी उठल्यावर पाहिले तर त्याच्या हातात आजीच्या वेणी असे.
आजी असली की पेप्सीकोला, वडापाव, भजी, थंडा हमखास मिळे. त्यामुळे आमची चंगळच असे.
मामाच्या गावाची एक अद्भुत कथा सुद्धा आहे. असे मी ऐकलंय की त्या गावाच्या वेशीवर एक वाघ मरून पडलेला. मग गावातल्या काही जणांनी त्याची समाधी बांधली आणि ह्या वाघावरूनच मामाच्या गावाला नाव मिळाले. ती समाधी अजूनही तिथे आहे. आम्ही लहानपणी लिंगेश्वर पावणादेवीच्या मंदिरात पाया पडायला गेलो की तिथेही नतमस्तक होतो. तिथे ब्राम्हणदेवाच सुद्धा देऊळ आहे. पण तिथे स्त्रियांना जायला मनाई आहे. त्यामुळे तिथे फक्त माझे भाऊ जाऊन पाया पडून येत असत.
कोकणात भरपूर मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे काही ना काही वैशिष्ट्य आहे आणि त्याचबरोबर त्यांची माहिती सांगणाऱ्या कथाही आहेत. त्याला तुम्ही दंतकथा ही म्हणू शकता. पण त्यामधल्या काही खऱ्या ही आहेत.
अशाच काही नवीन कथा आणि थरारक अनुभव घेऊन भेटूया या ब्लॉगच्या पुढच्या भागात.
क्रमशः
@preetisawantdalvi
(तुम्ही माझ्या फेसबुक पेजला ही like करू शकता.) 👇
https://www.facebook.com/preetisawantdalvi/