मुकेश! फॅशन इंडस्ट्री मधले नामांकित नाव, त्याच्या शोमध्ये मॉडेलिंग करायला मिळावं हे प्रत्येक मॉडेलचे स्वप्न आज माझ्याबाबतीत खरे होत होते. खूप खुश होते मी आज. तशी मी दिसायला छान होते आणि माझ्या नशिबाने माझा मेकअप करणारा प्रकाशपण खूप चांगला असल्याने त्याने मन लावून माझ्या चेहऱ्यावर केलेल्या रंगरंगोटीमुळे आणि छान केशरचनेमुळे आज मीच माझ्या प्रेमात पडले होते.
माझे सगळे आवरून झाल्यावर आरश्यात स्वतःलाच न्याहाळत असताना अचानक शो सुरू व्हायच्या 5 मिनिट अगोदर सगळ्या मॉडेल्स ना एका रांगेत उभे राहायला सांगितले होते. कोणाला काहीच माहीत नसल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता पण मुकेशच्या शोमध्ये तो सांगतो तेच करायला लागत असल्यामुळे सगळे शांत होते. तेवढ्यात त्याची खाजगी चिटणीस पूजा तिथे आली. तिने आम्हा सगळ्यांना अपादमस्तक न्याहाळले. परत मागे फिरून ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली व मला रांगेतून बाहेर काढून बाजूला उभं राहायला सांगून बाकीच्यांना सूचना द्यायला लागली.
मला काही कळतच नव्हते काय झाले ते? मेकअप, केस करताना मी माझे काही मतपण नव्हते दिले, शांत लहान बाळासारखी बसून होते, प्रकाशने जसे आणि जे पाहिजे तसे माझे सगळे आवरले होते, त्यांनी मला दिलेला ड्रेस व सँडलसुद्धा मी न कुरकुरता घातले होते. मग मला का काढले? काय झाले? सगळ्यांच्या चेहऱ्यावर "हुश्श, आम्ही वाचलो" ह्या भावनेबरोबरच माझ्याकडे पाहण्याचा जो तुच्छतेचा भाव होता तो बघून खूप रडू येत होते आणि मी तो अगदी कसोशीने दाबायचा खूप प्रयत्न करत होते. पूजाने दुर्लक्ष करून सगळ्यांना तिने दिलेल्या अनेक सूचनांचे तंतोतंत पालन करायला सांगून मला घेऊन मुकेशच्या केबिनमध्ये घेऊन आली. तिथे तीने मला आरश्यासमोर उभे केले व तिथून निघून गेली. आरश्यातून मला मुकेश माझ्याकडे चालत येत असलेला दिसत होता. अगदी माझ्यामागे येऊन उभे राहून तिथेच टेबलवर ठेवलेला फुलांचा ताज त्याने माझ्या डोक्यावर चढवला. तो चमचमणारा, सुगंधित मुकुट बघून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. काय करावे हेच कळत नव्हते, माझ्याच नकळत मी मुकेशला एकदम मिठी मारली. त्यानेही मला समजून घेऊन हसत मान डोलावली.
मुकेशच्या शो मध्ये मॉडेलिंग करायला मिळावे एवढीच इच्छा होती पण मला तर डायरेक्ट शोस्टॉपर व्हायचा मान मिळाला.
शो सुरू झाला आणि मी सगळ्यात शेवटी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी सजलेला फुलांचा ताज घालून चेहऱ्यावरचा आनंद न लपवता उभी होते. आणि तो क्षण आला!
मुकेशने माझा हात हातात घेऊन आम्ही रॅम्पवॉक केले. पुढे जाऊन परत मध्ये येऊन उभे राहिलो. हर्षोनंदाला पारावर उरला नव्हता... आता कोणीही मला एक यशस्वी मॉडेल होण्यापासून रोकणार नव्हते, आता मी मला त्या फुलांच्या ताजमध्ये एक गुलाबाचे फुल मधोमध लावून त्याची शोभा वाढवायची असा विचार करतानाच मुकेशने माझा हात दाबून मला शुद्धीवर आणले आणि माझ्या मनातले ओळखून म्हणाला,"ह्यात गुलाब मुद्दाम नाही घेतले. शो संपून परत विंग मध्ये जाताना म्हणाला "का ते नाही विचारणार" मी नुसतेच त्याला माझ्या मनातले कसे कळाले म्हणून विचारणार तर तोच हसून म्हणाला " पुढच्या शोमध्ये आपण एकच गुलाब ह्यात घालण्यापेक्षा गुलाबाच्या फुलांचाच ताज करून घेऊ! मी रूम नंबर 10 मध्ये उतरलो आहे, रात्री तू रूममध्ये आल्यावर त्याचे प्लॅंनिंग करूयात" असे म्हणून तो हसून निघून गेला . माझा तिथल्या तिथे पुतळा झाला होता. काय बोलावे, काय करावे तेच सुचत नव्हते. ओठावरले हसू आसू मध्ये बदलत होते, प्रसन्न चेहऱ्यावर आठ्या उमटल्या, आनंदाने खुललेले डोळे मलूल झाले होते. पुढच्या वेळेस गुलाबाचा ताज व त्यावर पूर्ण काट्यांनी भरलेला ड्रेस घालून मी शोस्टॉपर म्हणून रॅम्पवॉक करत आहे हे दृश्य भरलेल्या डोळ्यावरून ओघळणार्या अश्रूंमधून तरळून गेले.
सुप्रिया कुलकर्णी