Savani in Marathi Short Stories by संदिप खुरुद books and stories PDF | सावनी

Featured Books
Categories
Share

सावनी

‘वन अधिकारी’ या पदावर अमरची नक्षलग्रस्त जिल्हयामध्ये नुकतीच नियुक्ती झाली होती. या भागामध्ये वन्य प्राण्यांची मोठया प्रमाणावर तस्करी होत होती. वनाचं आणी प्राण्यांचं तस्करांपासून रक्षण करणं फार जोखमीचं काम होतं. पण कोणतीही जोखीम घेवून वन देवतेला आणी तिच्यामध्ये वास करणाऱ्या प्राण्यांना वाचवण्याचं अमरने मनोमन ठरवलं होतं. जंगलाच्या बाजूला आदिवासी लोकांचे पाडे होते. आदिवासींना जंगलाचा कोपरान्-कोपरा माहित होता. जंगलात फिरण्यासाठी अमरला त्यांची खुप मदत व्हायची. नदीच्या पाण्यात सुर मारुन वेगानं पोहणं, कामटयांचे बाण करुन नेमबाजी करणं, तसेच भाला फेकून आपलं लक्ष अचूक साधणं या कलाही अमर त्यांच्याकडून विपरीत प्रसंगी कामाला येईल म्हणून शिकला होता.

एके दिवशी अमर जंगलात भटकत असताना, एका नयनरम्य धबधब्याजवळ त्याला एक सुंदर तरुणी अंघोळ करताना दिसली. तिला पाहून अमर भान हरपून गेला. तिचं निसर्गनिर्मित सौंदर्य तो एका झाडाच्या आडोश्याला थांबून पाहु लागला. तिचं रेखीव, यौवनाने मुसमुसलेलं भरगच्च अंग पाहून तो वेडापिसा झाला. ती आधीच गोरी होती, त्यात सुर्य देवतने तिच्या सुंदर शरीरावर कोवळया, सोनेरी किरणांचा अभिषेक घालून तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली होती. तिचे ते सौंदर्य अधिकच दैवी भासत होते. एखादी परीच पृथ्वीतलावर अवतरली नसेल ना? असा उगाचच त्याच्या भाबडया मनाला तिचे ते दैवी सौंदर्य पाहून प्रश्न पडला. एवढं अप्रतिम सौंदर्य त्यानं यापुर्वी कधीच पाहिलं नव्हतं.अंघोळ झाल्यानंतर ती त्या जलप्रपातापासून बाहेर आली. तिनं त्या भागातील आदीवासी स्त्रिया घालतात तसेच वस्त्र परिधान केले. याच्यावरुन अमरची ती नक्कीच कोणीतरी आदीवासी मुलगी याबाबत खात्री झाली. ती पुढे-पुढे चालू लागली. अमर तिच्या नकळतपणे तिच्या मागे-मागे चालू लागला. ती एका मोगऱ्याच्या फुलाच्या झाडाजवळ थांबली. त्या फुलांचा सुगंध दूरपर्यंत दरवळत होता. तिनं त्या फुलांचा छानसा गजरा करून आपल्या केसांमध्ये गोवला. तिनं कामटयापासून बनवलेल्या दुरडीमध्ये फुले घेतली. पुढे पारिजातकाचं झाड होतं. त्या केशरी देठांच्या,पांढऱ्याशुभ्र असंख्य फुलांचा सडा पडला होता. ते सुंदर दृश्य पाहून भुईवर पांढऱ्या शुभ्र रंगाची केशरी धाग्यांनी विणलेली चादर पसरल्याचा भास होत होता. तिनं तेही फुलं आपल्या दुरडीमध्ये वेचली, ती पुढे चालु लागली. पुढे गेल्यावर एका बेलाच्या झाडाजवळ सुंदरशी महादेवाची पिंड होती. तिनं ती फुले पिंडीवर वाहिली,डोळे मिटून देवाचे स्मरण केले. अमरही त्या पिंडीजवळ गेला. त्यानेही हात जोडून महादेवाचे दर्शन घेतले. तिने डोळे उघडले, तिला वन अधिकाऱ्याच्या वर्दीतील अमर दिसला. त्याला पाहून ती बावरली. ती फलांची दुरडी उचलून चालू लागली. अमरने तिला विचारलं, “तुझं नाव काय आहे?”

तिनं एकदा अमरच्या डोळयात पाहिलं, आणी ती लगेच नजर चोरून लाजतच बोलली, “जी माझं नाव सावनी.”

तिच्या सौंदर्याप्रमाणेच सुंदर आवाज होता तिचा. अमरने परत विचारल, “तुझ्या वडीलांचं नाव काय? आणी तु कुठे राहतेस?”

त्यावर तिनं स्वत:च्या पायाच्या बोटाकडेच पाहत उत्तर दिल, “जी बाचं नाव सायबा हाय, आम्ही त्या डोंगराच्या पल्याडच राहतो.”

तिच्याकडे पाहत अमर बोलला, “रोज येतेस का इकडं?”

तिनं लाजतच उत्तर दिलं, “रोज नाही. कवा तरीच येते.”

अमर तिला बोलून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं तिला आणखी विचारलं,

“तुला भिती नाही का वाटत? असं जंगलात एकटीलाच यायला.”

तिनं एकदा अमरच्या वर्दीकडे पाहिलं, आणी हसून उत्तर दिलं, “तुमच्या सारखं सायब लोक असल्याव आम्हाला कशाचं भ्याव?” अमर तिचं सुंदर रुप पाहत तिच्या सुंदर डोळयात पाहून तिला म्हणाला,“तु खुपच सुंदर आहेस.”

अमरच्या बोलण्यानं ती लाजली, बावरली, गालातल्या गालात हसली आणी त्याला काही न बोलताच ती हळुहळु चालु लागली. ती नजरेआड होईपर्यंत अमर तिचं पाठमोरं सौंदर्य पाहत होता. ती नजरेआड झाल्यावर त्याच्या लक्षात आलं, ‘सायबा’ म्हणजे त्याला आणी त्याच्या आधीच्या साहेब लोकांना त्यांच्या कामात मदत करणारा साठ वर्षाचा रांगडा गडी, पण अजून तिशीतल्या तरुण पोरासारखा जोश, तिच चपळाई.

त्या दिवसापासून अमर रोजच सावनीला पाहण्यासाठी काही ना काही बहाणा करुन पाडयावर जाऊ लागला. तिथल्या माणसांमध्ये पहिल्यापेक्षा जास्त मिसळु लागला. त्यांना पण तो खुप जवळचा वाटु लागला. सावनी पण काम करता-करता चोरुन अमरला पाहायची. उगाचच पाणी भरण्याच्या बहाण्याने अमर जवळून आडाकडे जायची. तीही आता आपल्या प्रेमात पडली आहे, हे अमरच्या लक्षात आलं होतं.

एकदा सकाळी-सकाळीच सायबा अमरला घरी घेवून आला. त्यानं दारातूनच आवाज दिला, “सावनी, सायेब आलेत. चहा टाक साहेबास्नी.” तिनं दारातून पाहिलं,अमरला पाहून तिला खुप आनंद झाला, तो आनंद ती लपवु शकली नाही. तिच्या सुंदर चेहऱ्यावर पसरलेला मनमुराद आनंद अमरने बरोबर हेरला. तिनं लगबगीनं गोठयातल्या शेळीचं दूध काढलं. शेजारच्याकडून गुळाचा खडा पदरात लपवून आणून चहा बनवला. शेळीच्या दुधाचा पाडयावरील चहा अमरला खुपच आवडला. चहा पिऊन आभार मानून अमर जायला निघाला.

तेवढयात सायबा म्हणाला,

“सायेब,रातच्याला जेवणाला गरीबाच्या घरी या, लै झ्याक जेवण बनवती आमची सावनी”.

अमरने तिच्याकडे पाहिलं, लगेच तिने नजर चोरली, अमरने तिला पाहतच होकार दिला. सावनीही मनातून खुप खुष झाली. तीही अमरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. दिवसभर तिचं कशातच मन लागलं नाही. अमर येण्याची ती आतुरतेने वाट पाहू लागली.

सुर्याची डयुटी संपत आली होती. तो घाईने परत निघाला होता. दिवसाचा लख्ख प्रकाश जावून अंधारून येऊ लागलं. तसं सावनीच्या मनात जास्तच धाकधुक होऊ लागलं. ती आतुरतेने अमरची वाट पाहू लागली. थोडयाच वेळात अमर सावनीच्या पाडयावर आला. सायबा अंगणातच बाजावर बसला होता. सावनी तुळशीजवळ दिवा लावत होती. अमरला पाहताच सायबानं बाजूला सरकून घोंगडी झटकून अमरला बसायला जागा दिली. सायबाच्या आणी अमरच्या गप्पा चांगल्या रंगात आल्या. जुन्या अधिकाऱ्यांबरोबर कशा-कशा मोहीमा फत्ते केल्या. तस्करांना कसं पकडून दिलं, याबद्दल सायबा अभिमानानं सांगु लागला. अमरचं मात्र सावनीकडेच लक्ष होतं. चूल पेटवताना तिला होणारा त्रास तो पाहत होता. तिनं सवयीप्रमाणे चूल पेटवली. स्वयंपाक करत-करत तिचेही लक्ष अमरकडेच होते.

तिनं सायबाला आवाज दिला, “बापु, जेवाय झालंय, या लौकर”. चुलीवर बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. त्या भाकरी बघून अमरला लहाणपणीची आठवण झाली. त्याची आई रानातून येवून चुलीवर अशीच भाकरी बनवायची. तो त्या भाकरी वरील पापुडा खायचा. त्याला तो खुप आवडायचा. सावनीनं जर्मनच्या ताटात बेसन भाकरी वाढून तीन ताटं बनवली. सोबतीला ठेचा होताच. सायबानं बुक्कीनं कांदा फोडून अमरला दिला.

बोलता-बोलता तो अमरला म्हणाला,

“खरं तर आज कोंबडीचाच बेत करायचा व्हता, पण ही म्हणाली, आज एकादस हाय, म्हणून बेसन भाकरी केली बगा”.

अमर म्हणाला, “खुपच छान झाली बघा बेसन भाकर”.

त्याच्या स्तुतीने सावनी लाजून नाजूक गालात हसली. जिच्यावर

आपलं प्रेम झालं होतं, तिच्या हातचं खायला मिळाल्यामुळे अमरला खुप आनंद झाला होता.

आज कितीतरी दिवसातून अमर घरच्या सारखं जेवला होता.

सावनीच्या पाडयापासून अमरचं ऑफीस चार कि.मी.अंतरावर होतं. सावनीच्या पाडयाकडे येण्यासाठी गाडीवाट नव्हती. त्यामुळे अमरने पुढच्या पाडयाजवळ गाडी लावली होती. तेथून तो चालत आला होता. आता गाडीपर्यंत दीड कि.मी.अंतर त्याला चालतच जावे लागणार होतं. जेवण झाल्यावर अमर जायला निघाला. सायबानं अमरला सोबत येऊ द्या म्हणून खुप विनंती केली.पण अमरने त्याला सोबत येऊ दिले नाही. अर्धे अंतर चालत गेल्यावर अमरला रस्त्याच्या बाजूला झाडीमध्ये बॅटरीचा उजेड दिसला. तो त्या दिशेने दबक्या पावलानं चालु लागला. त्या ठिकाणी चार-पाच जण झाडे तोडत असलेले त्याला दिसले. त्याने ताडकन पुढे होत त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखण्याचा प्रयत्न केला. तेवढयात त्याच्या लक्षात आलं कमरेला रिव्हॉल्व्हरच नाही. तो रिव्हॉल्व्हर सावनीच्या घरीच विसरला होता.काही कळायच्या आतच त्या तस्करांनी त्याच्यावर हल्ला चढवला. एक जणानं तलवार उपसली. तो अमरला मारणार, इतक्यात कोणीतरी त्याच्यावर गोळी झाडली. अमरने पाहिले, सायबाच्या हातात पिस्तुल होतं. सोबत सावनीही होती. सायबाने आणखी एक जणावर गोळी झाडली. बाकीचे पळून गेले.अमर खुपच गंभीर जखमी झाला होता.त्याच्या अंगावर जखमा झालेल्या होत्या. त्याला चालणंही अशक्य झालं होतं.दवाखाना खुप दूर होता. त्यामुळे त्या दोघांनी त्याला पाडयाकडेच परत आणलं. त्याच्या जखमेवर झाड पाल्याचे औषध लावले. तशाही अवस्थेत अमर ऑफीसकडे जायला निघाला. ऑफीसमधील शिपायाची आई वारल्याने तो सुट्टीला गेला होता. दुसरा सहकारी अर्जुन त्यापुर्वीच सुट्टीवर गेलेला होता. ऑफीसमध्ये कोणीच नसल्यावर ऑफीसमधील महत्वाचे दस्तऐवज चोरीला जाण्याची शक्यता होती. आणी झालेला प्रकार वरिष्ठ कार्यालयास कळविणेही आवश्यक होतं. त्यामुळेच तो ऑफीसला जाण्यासाठी धडपड करत होता. पण त्याला तशा अवस्थेत सावनी आणी सायबा बाहेर जाऊ देत नव्हते.

तेवढयात सायबा म्हणाला,“सायेब, इथं सावनी हाई तुमच्याकडं लक्ष द्यायला, मी जातु हापीसाकडं”.

अमरने त्याला एकटयाला जायला नकार दिला. तेवढयात सावनी म्हणाली, “जाऊ द्या, बापुला सवय हाय जंगलात हिंडायची,कोणालातरी सोबत घिवून जाईल”.

तरीही अमरने त्याला नकार दिला. पण सायबा काही न ऐकताच पाडयावरीलच दादुशाला सोबत घेवून ऑफीसकडे निघाला.

रात्रभर सावनीने अमरची खुप काळजी घेतली. त्याच्या जखमेवर औषधाचा लेप लावला. त्याला मुक्का मार लागलेल्या ठिकाणी गरम कपडा करुन शेक दिला. तिच्या या प्रेमभऱ्या सहवासाने त्याच्या वेदना कुठल्या कुठे पळून गेल्या. त्याला कधी झोप लागली तेही कळले नाही. सावनीही रात्रभर त्याची काळजी घेत पहाटे झोपली. सकाळी त्याच्या आधीच लवकर उठून तिनं अंगणात सडा सारवण केलं. दारात छानशी रांगोळी काढली. अमरला तिने जवळच्याच लिंबाच्या झाडाची काडी दात घासायला काढून दिली. अमर दात घासून बाजावर बसला. ती गुळाचा चहा घेवून आली.

तिने अमरला विचारलं,“बरं वाटतयं का आता?”

त्यानं तिच्याकडे निरखुन पाहिलं, रात्री झोप नसल्यामुळे तिचा चेहरा आळसलेला दिसत होता. त्यानं “आता बरं वाटत आहे.” म्हणून सांगीतलं.

ती म्हणाली, “आता आंघोळ करुन घ्या”.

अमरने होकारार्थी मान हलवली. तेवढयात दादुशा पळतच आला. त्याच्या अंगावर जखमा दिसत होत्या. अमरच्या लक्षात आलं, नक्कीच काहीतरी विपरीत घडलेलं दिसतय. त्यानं दादुशाला काही विचारायच्या आतच दादुशा म्हणाला, “आज पहाटच्याला तुमच्या हापीसाकडं तस्कर आलते, त्यांनी सायबाच्या डोस्क्यात दगड घालून मारुन टाकलं त्याला.मी पळालो म्हणूनशान बचावलो, नाहीतर मलाबी जितं नसतं सोडलं त्यांनी.”

दादुशाचे शब्द ऐकून अमरला आणी सावनीला धक्काच बसला. ते पळतच ऑफीसकडे निघाले. पळताना जखमेचं भान न राखता अमर वेगानं पळत होता. त्याच्या बरोबर पाडयावरील माणसं पण पळत होते. सगळेजण ऑफीसमध्ये आले. पाहतात तर काय? सायबा रक्ताच्या थारोळयात पडला होता. बाजूलाच भला मोठा दगड होता. त्या दगडाने सायबाच्या मुंडक्याचा पार चेंदामेंदा झाला होता. अमरने त्यांना रात्री तस्करी करण्यापासून रोखल्यामुळे व त्यांचे साथीदार मारले गेल्यामुळे त्यांनी ऑफीसमध्ये असलेल्या सायबाचा खुन केला होता.

सावनीला काय करावं? सुचत नव्हतं. अमर तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. तिचा बाप, तिचा आधार आता तिला सोडून गेला होता. आता अमरलाच तिचा आधार व्हावं लागणार होतं.