Ardhantar - 18 in Marathi Moral Stories by अनु... books and stories PDF | अधांतर - १८

Featured Books
Categories
Share

अधांतर - १८

"जब सह ना पाते दाह हमारा,
दफन अरमानो कर देते है।
रिवाजो की घंटी गले मे, और,
सभ्यता की पायल बांध देते है।"


मी लहानपनापासून बघत आली आहे, घरी काही संकट आले, घरात कोणी आजारी आहे किंवा घरातले पुरूष काही अडचणीत आहेत, माझ्या घरात उपास, तापास, नवस, नैवेद्य सगळे घराच्या बायकांनीच केलेत, अजूनही करतात, मलाही तशीच 'ट्रेनिंग' मिळाली....जेंव्हा 'हे सगळं आपणच का करावं?' हा प्रश्न विचारला घरात तेंव्हा 'जास्त बोलू नये' किंवा 'हे अभद्र प्रश्न विचारू नये' अशी ताकीद मिळाली...त्यामुळे मुकाट्याने सगळं काही अनुसरण करायची सवय लागली, आणि हे मझ्यासोबतच नाही, प्रत्येक मुलीसोबत होत तिच्या जन्मल्यापासून, आणि त्यामुळे होते काय, ती काही प्रश्न विचारायचे सोडून देते आणि परिणामस्वरूप तिचे कोणत्याही गोष्टीत प्रतिकार कमी होतात...आता मला कळतंय, हे अस का घडवल्या जातं मुलींना?? खरं तर हे आहे आपल्या समाजात अजूनही पुरूष एक महत्त्वाकांक्षी स्त्री संभाळू शकत नाही कारण त्याच्यात तेवढी हिंमतच नाही, मग एकदम साधी फिलॉसॉफी ही आहे की जर प्रतिस्पर्धी खूप बलवान असेल आणि आपल्याला जिंकता येत नसेल तर त्याच्या मानसिकतेवर आघात करायचा म्हणजे तो स्वतःच स्वतःला कमजोर समजायला लागतो आणि अर्ध युद्ध तर आपण तिथेच जिंकलेलं असतो... असंच मुलींच्या बाबतीत केलं गेलं आहे आधीपासून, आता त्याचं प्रमाण थोडं कमी जरी झालं असेल तरी ते संपला नाही अजून...आता मुलींना शिकवल्या जातं, नोकरी ही करू देतात काही ठिकाणी, पण मुलांना मात्र बाळकडू हेच मिळतं की काहीही झालं तरी मुलींची लगाम आपल्या हातात ठेवायची, स्वतः मात्र कितीही बेलगाम झाले तरी चालतील.....

त्या दिवशी विक्रमही असाच बेलगाम झाला, आणि त्याचं बेलगाम होण्याचं एक कारण हे होतं की ज्या मुलीला तो 'मला पहा अन फुले वहा' समजत होता तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC ची पूर्वपरीक्षा पास केली होती, आणि ते तर विक्रमलाही जमलं नव्हतं, त्यामुळे 'कानामागून आली अन तिखट झाली' असं समजून त्याला त्याच्याच अहंकाराची मिर्ची झोंबली होती..आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीच..अगदी नेहमीचीच आपली..नवऱ्याला मैत्रीण असू शकते पण बायकोने मित्र बनवण्याची हिम्मत, नव्हे पाप कसं केलं..!!

विक्रमला हे कळलं होत की मी अभय सरांना त्याच्या हालचाली बद्दल सांगितलं होतं, आणि या सगळ्या गोष्टी विक्रम साहेबांचा पारा चढवायला पुरेशा होत्या, पण त्या सगळ्या गोष्टींचा राग तो ज्याप्रकारे माझ्या वर काढत होता ते मला नक्कीच असहनिय होता, माझ्या डोळ्यांतून फक्त पाणी निघत होत, बाकी काही बोलण्याची शक्ती मी हरवून बसली होती, ज्या आईबापांनी जन्म देऊन वीस वर्ष सांभाळ केला त्यांनी त्यांच्या फुलाला एक बोट ही लावलं नव्हतं, त्याच फुलाला विक्रम आपल्या रागाच्या ज्वालानी भस्म करू पाहत होता, हाच विचार डोक्यात घुमत असतांना मला फक्त हेच ऐकू आलं,

"अजून हवंय नैना...." आणि असं बोलताना त्याने त्याचा हात पुन्हा उगारला पण यावेळी मी त्याला ती संधी देणार नव्हती, मी खूप ताकतीने त्याचा हात पकडला आणि खूप हिंमतीने बोलली,

"बस विक्रम, हे करताय तुम्ही?? थोडी तरी तुमच्या शिक्षणाची आणि पदाची मॅच्युरिटी दाखवा..असं काय केलंय मी जे तुम्ही असं जनावरा सारखं मला वागणूक देताय...?"

माझा हात रागाने झिडकरात तो बोलला,
"चोर आणि वरून शिरजोर... नैना, मी बोललो होतो तुला माझ्या कामात जास्त डोकं लावू नको, आणि मी एकटा कमी पडतोय का ग तुला?? जे तुला मित्रांची गरज भासायला लागली?? काय आमिष दाखवलं अभय ने तुला? जे तू स्वतःच्या नवऱ्याच्याच जीवावर उठलीस?? आणि काय हे पास झाली म्हणून नाचत फिरत आहेस, कोणता मोठा तिर नाही मारला तू?? दरवर्षी दहा ते बारा लाख लोकं ही परीक्षा देतात आणि फक्त 0.1 परसेन्ट लोकं यातून पास होतात, तुला तर तुझी लायकी आज दाखवतो मी???"
असं म्हणत विक्रमने माझा उजवा हात पकडून मनगटाला जोरात पिळा दिला, आणि मी वेदनेने कळवळली, पण आता मी हे सहन करणार नव्हती, मी सुध्दा त्याच जोराने त्याला धक्का देत स्वतःला सोडवलं,

"मी त्या 0.1 पेरसेन्ट लोकांमध्ये आहे किंवा नाही हे तुम्ही काय मी पण नाही सांगू शकत, पण मी प्रयत्न करू शकते...आणि आता सध्या माझ्यासाठी ते महत्त्वाचे नाही, तुम्ही महत्त्वाचे आहे विक्रम, हे का कळत नाहीये तुम्हाला?? आणि मी काय तुमच्या जीवावर उठली, उलट मी तर तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, अभय सर मला त्यात मदत करत होते, तुम्हाला माहीत नाही तुम्ही जे करताय त्यात तुमच्या जीवाला ही धोका आहे, फक्त तुमचा जीव रहावा म्हणून सगळे प्रयत्न होते माझे..."
मी खूप कळकळीने सांगण्याचा प्रयत्न करत होती पण विक्रमला माझे आकांततांडव काहीही दिसणार नव्हते...आपण चुकीच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तीला तोपर्यंत तिथून परत आणू शकत नाही जोपर्यंत त्याची ईच्छा नसते, आणि विक्रमला त्याच्या वागण्याचा काहीही गम पस्तावा नव्हता...

"हे बघ नैना, मला काय करायला पाहिजे किंवा काय नाही हे तू सांगणारी कोण?? आणि बायकांच्या बुद्धीने चालणारा पुरुष नाही मी..आणि त्यातल्या त्यात माझ्या ऑफिशियल कामात दखल द्यायची काय गरज होती तुला?? माझ्या जीवाला धोखा आहे की नाही हे मला माहित आहे, त्याच बघून घेईल मी काय करायचं ते, पण हे अभय आणि तुझं काय सुरू आहे??? त्याला काय गरज पडली तुला मदत करायची?? तो IPS आहे नैना, तुला काय वाटते तुझ्या सारख्या मैत्रिणी नसतील का त्याला?? छप्पन असतील...आणि काय, माझा जीव वाचवायचा आहे त्याला?? असं सक्तीच्या रजेवर पाठवून?? त्याचे असे सगळ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे कामं आहेत म्हणून सतत बदल्या होत असतात..."

"तुम्ही असे शंकेने का बोलत आहेत विक्रम?? अभय सर, माझ्याच कॉलेज मध्ये शिकले आहेत नागपुरात, आणि योगायोगाने ते भेटले इथे मला, त्यापेक्षा जास्त माझ्यासाठी ते काहीच नाहीत, हो, एक गोष्ट खरी की त्यांनी मला अभ्यासात खूप मदत केली, त्यामुळे त्यांना मी माझा मेन्टर म्हणू शकते, त्यापेक्षा जास्त काही नाही, आणि त्यांनी तुमचा जीव सुरक्षित रहावा यासाठी माझी मदत केली कारण ते मला चांगली मैत्रीण मानतात...त्यांचा विषय का घेऊन बसलोय आपण विक्रम, मी काय म्हणते, तुम्ही हे सोडा ना सगळं, काय कमी आहे आपल्याला, सगळंच तर आहे ना आपल्याकडे, तुम्ही ज्या लोकांना मदत करताय ते कोणाचेच सख्खे नाहीत, आणि पैसा कधीच आयुष्याला पुरत नाही..."
एवढं होऊनही मी शक्य तेवढ्या सौम्य शब्दांत विक्रमला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यात मी यशस्वी नक्कीच होणार नव्हती कारण हे सगळं विक्रमला तर तोच बरोबर आहे हे वाटत होतं....

"एक काम कर, हे तुझे प्रवचन ना, तुझ्या माहेरी जाऊन दे आता, अजिबात या घरात राहायचं नाही, मागच्या वेळीच तुला ही चेतावणी दिली होती मी ,आता खुप झालं, तुझ्या आई बाबांना ही कळू दे तुझे कारनामे, त्यांनाही सांगतो मी की त्यांच्या मुलीला स्वतःचा नवरा चुकीचा वाटतो पण एक परपुरुष मात्र खूप जिवलग आहे, खूप खूप नुकसान केलंस तू माझं, आताच फोन करतो तुझ्या घरी आणि सांगतो त्यांना तुला इथे येऊन घेऊन जा म्हणून..."

"अरे, हा आपल्यामधला वाद आहे त्यात घरच्यांना का मधात आणायचं, प्लिज असं नका करू, बाबा टेन्शन घेतील खूप, असं नका करू प्लिज...."
मला माहित होतं, विक्रमला हा वाद वाढवायचाच होता आणि त्याने केलं ही तेच, त्याने लगेच बाबांना फोन केला आणि त्यांना तडकाफडकी इकडे यायला सांगितलं, मला ही बोलू दिल नाही त्यांच्याशी, बाबा नक्कीच खूप टेन्शन मध्ये आले असतील याची जाणीव होती मला...एकीकडे मी विक्रमचं एकही गाऱ्हाणं त्याच्या घरी सांगितलं नाही हा विचार करून की त्याचा घरच्यांना नको अडचणीत टाकायला...म्हणजे सून म्हणून मी सगळ्याच गोष्टींचा विचार करायचा, सगळी कर्तव्य फक्त मीच पार पडायची, आणि जावई म्हणून विक्रमने काय करायचं?? फक्त आपले मानपान जपायचे... वाह..! आता तर माझ्याही डोक्यात गेली ही गोष्ट आणि विचार केला येऊ दे बाबांना, आता गेली की परत येणारचं नाही...

विक्रमचं फोनवर बोलून झालं बाबांशी आणि मला बोलला,

"तुझ्यासारखे असे घरातच विभीषण असल्यावर लंका जळणारच आहे, काय संसार मांडशील ग तू?? माझं तर आयुष्य खराब झालं तुझ्याशी लग्न करून...या सुंदर चेहऱ्यामागे अशीही बाजू असेल हे वाटलं नव्हतं..."

"हम्म, बरोबर, पण हा सुंदर चेहरा आला नव्हता लग्नाची मागणी घालायला, तुम्ही आले होते या सुंदर चेहऱ्यामागे, आणि काय बोलले तुम्ही की विभीषण घरातच आहे, म्हणजे तुमच्यातही रावण दडलाय हे मान्य करता तुम्ही..?"
मी असं बोलल्यावर विक्रमला खूप राग आला, रागारागात त्याच्या हातात येतील त्या वस्तूंची आदळआपट केली त्याने आणि मला बोलला,

"अभय सोबत राहून चांगलीच जीभ वळायला लागली तुझी, आता उरलेलं ज्ञान माहेरी जाऊन दे सगळ्यांना, एका आठवड्यात तुझी अक्कल ठिकण्यावर नाही आणली तर नावाचा विक्रम नाही मी....."

मला खुप विशेष वाटतो मानवी स्वभाव, चुकीचं काम तर करायचं आहे पण कोणी चुकीची उपमा आपल्याला द्यायला नको हे पण वाटते, म्हणजे स्वतःलाच किती फसवत असतो आपण...विक्रमची तीच गत होती, सगळं करून त्याला असं वाटत होतं कि त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणावं...स्वार्थीपणाची हद्दपार करायची आणि परोपकाराची भाषा बोलायची...हं, कीव येते या मानसिकतेवर...!! ती रात्र माझी फक्त रडण्यात गेली, कळत नव्हतं का विक्रम एवढा बदलला, त्याच इतकं आंधळं होण्याचं काय कारण असावं?? बाकी कारणं तर नाही शोधता आली मला, पण विक्रमच्या बाबतींत एक गोष्ट अतिशय खरी ही होती की त्याच्यावर कोणाचा दबाव नव्हता...एकुलता एक असल्यामुळे त्याला हवं ते सगळंच दिलं त्याच्या घरच्यांनी, त्यात अभ्यासात हुशार त्यामुळे हवी ती नोकरी ही मिळवली पण जेंव्हा त्याला या गोष्टींचा अहंकार येत गेला तेंव्हा त्या अहंकाराला हवा देण्याचं कामही त्यांनीच केलं, विक्रमला त्याच्या चुका कधी त्याच्या नजरेत आणून दिल्याचं नाहीत...त्यामुळे आज विक्रमची ही अवस्था होती की सगळ्यांपेक्षा पुढे जाण्याच्या घाईत त्याने चुकीच्या मार्गावर कधी पाय ठेवला हे त्याला कळलंच नाही, आणि जेंव्हा मी त्याला याची जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला तेंव्हा मी त्याला त्याच्या मार्गात आडकाठी वाटली...
-------------------------------------------------------
बाबा दोन दिवसांनी येणार होते मला घ्यायला पण हे दोन दिवसाचे एक एक क्षण खूप भारी जात होते, विक्रम मला एक शब्दही बोलत नव्हता, एवढंच काय, तो तर कालपासून घरीही आला नव्हता, त्याला फोन करण्याचा काही फायदा नव्हता कारण त्याने माझे एकही फोन नेहमीप्रमाणे उचलले नव्हते...पण तरीही एक शेवटचा प्रयत्न करून मी फोन केला तर त्याने उचलला, आणि उचलता क्षणीच मला बोलला,
"नैना, मला वारंवार फोन करून परेशान करू नको, तुझे बाबा आले की मला एक मेसेज कर तेंव्हा मी येतो, कामात आहे मी सध्या..."
आणि मला बोलण्याचा एकही सेकंद न देता त्याने फोन कट केला...या सगळ्या वादात मी काहितरी परीक्षा पास झाली आहे याचा तर मला विसरच पडला होता, पण अभय सरांच्या आलेल्या एका मेसेजने मला त्याची आठवण करून दिली, अभिनंदन करण्यासाठी जरी त्यांनी मला मेसेज केला होता तरी मला माहित होतं त्यांच्या मनात काय चाललेलं असावं, त्यामुळे मी विचार केला एकदा त्यांना भेटूनच येते...तसं तर त्यावेळी विक्रमच्या डोक्यात ही काहीतरी शिजत होत त्यामुळे तो घरी आला नाही...विक्रमच्या नजरेत माझी ,अभय सरांसोबत मैत्री चुकीची असली तरी माझ्यासाठी ते माझे गुरू होते आणि ते नातं मला अजिबात चुकीचं वाटत नव्हतं त्यामुळे विक्रमची तमा न करता मी त्यांना भेटायचं ठरवलं... तसही आता नागपूरला गेल्यावर माझा परत यायचा मानस नव्हता त्यामुळे ही माझी आणि अभय सरांची शेवटची भेट ठरणार होती...मी त्यांना तसा एक मेसेज टाकला आणि निघाली त्यांना भेटायला...

मी NGO मध्ये अभय सरांची वाट पाहत होती, पण मनात मात्र वेगळेच वादळ डोकं वर काढत होते...कळत नव्हतं कोवळ्या वयात हाच विक्रम मला किती चांगला वाटायचा, त्याच्या नुसतं समोर येण्यानेही धडधड व्हायची, किती गोड अनुभव होते ते, आणि त्याला ही मी तेवढीच आवडायची, पण सगळं कसं अचानक बदललं, यावर विश्वास ठेवणं कठीण जात होत, कधी काळी माझंही प्रेम होतंच त्याच्यावर, कोवळ्या वयातलं ते प्रेम किती शुद्ध होतं, आता मात्र चीड येत होती... का आयुष्याने असे खेळ रचावे माझ्यासोबत???

"खेळात आयुष्याच्या,
हरवला तो संपला।
बनवले अस्तित्व ज्याने,
तोच हा खेळ जिंकला।"

नेहमीप्रमाणे अभय सर आजही सरळ सरळ बोलले नाही, गंभीर प्रसंगी असं कमी शब्दांत परिस्थिती हाताळण कसं जमायचं त्यांना काय माहीत, पण माझे तरी सगळेच खेळ माझ्यावर उलटे पडले होते, आयुष्याचे खेळ खेळता खेळता मी हरवली होती कुठेतरी हे नक्की, आणि मला स्वतःला शोधणं ही अवघड जात होतं....

यावेळी मी अभय सरांना काहीच उत्तर दिलं नाही त्यामुळे ते स्वतःहून बोलले,
"एवढ्या कमी दिवसांत अभ्यास करून परीक्षा पास केली त्यासाठी आंनद होत नाहीये का?"

"माझ्या सारखे तर लाखो असतील असे पास होणारे, आणि खरी पोस्ट काढणारे अगदी बोटावर मोजण्या इतके..!! त्या लाखोंच्या गर्दीत कुठे हरवली आहे मी काय माहीत आणि त्यावर काय खुश व्हायचं...."
मी निराशेने बोलली,

"कुठे हरवली आहे?? मला नाही वाटत असं... लाखोंनी परीक्षा दिली होती, त्यापैकी हजारोंनी ही पास केली त्यामुळे मला वाटते तू लाखोंमधून हजारो मध्ये आली आहेस, त्यामुळे मला तर नाही वाटत की तू हरवलीस.."

"आयुष्याच्या परिक्षेत हरवली आहे, आणि त्यासमोर बाकी परीक्षा तर अगदी नगण्यच ना..!! आता कुठे शोधू स्वतःला काही कळत नाही..."

"जॉर्ज बर्नाड शॉ म्हणतात, आयुष्य म्हणजे स्वतःला शोधणं नाही तर स्वतःला घडवणं असतं...त्यामुळे स्वतःला शोधण्याचा प्रयत्न नको करू नका, काही तरी बनव स्वतःला, थोडी मेहनत अजून कर, बघ पुढचे टप्पे ही पार होतील..."

"हम्म...बघू...ते सोडा सगळं, मी नागपूर ला जात आहे उद्या, त्यामुळे वाटलं तुम्हाला शेवटचं भेटून घ्यावं.."

"शेवटचं म्हणजे??? मी इतका तुला पकवतो का? ठीक आहे माझ्या कविता बोर करत असतील तुला पण याचा अर्थ असा नाही की इतक्या छोट्या गोष्टी साठी तू अशी मैत्रीच संपवावी.. हा अन्याय मी सहन नाही करणार..😀😂.."

"सर...मला कामं आहेत तिकडे, विक्रमच्या आणि माझ्या घरच्यांना गरज आहे माझी, त्यामुळे जात आहे, या वयात त्यांना बघणारं कोणी नाही, त्यामुळे परतीचे चान्स नसल्यात जमा आहेत..."

"त्यांना तुझी गरज आहे हे ठीक आहे नैना, पण विक्रमला नाही का तुझी गरज???"

"अम्म्म, मला ना तुमच्या कविता खूप आठवतील, मला का नाही जमत तुमच्या सारख्या कविता काय माहीत...?"
मी उगाच विषय टाळायला म्हणून काहितरी बोलली,

"तुला माहीत आहे नैना, मी पहिल्यांदा UPSC चा इंटरव्ह्यू पास का नाही होऊ शकलो, कारण मला जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं काय द्यावी हेच कळलं नाही मला, आणि मी विषय बदलवून काहीही बोलायला लागलो, प्रत्येक वेळी विषय बदलवण्यात आपण यशस्वी होतो अस नाही..."
ते एक तिरकस कटाक्ष माझ्यावर टाकत बोलले,

"तुमची माझी भेट झाली तेंव्हा तुम्ही माझ्यासाठी एवढे मार्गदर्शक ठराल याचा विचार ही केला नव्हता..तुमच्या कडून बरंच शिकायला मिळालं, आणि...."

माझे वाक्य मधातच तोडत अभय सर बोलले,
"माझे गुणगान गाऊन झाले असतील आणि आभार प्रदर्शनाचे तुझे भाषण संपले असतील तर तुला काहीतरी सांगायचं आहे मला...सांगू??"

"अरे तुम्ही काय हे फॉर्मलिटी करताय, बोला ना..."

"फॉर्मलिटी तू करत आहेस आज..."

"बरं, नाही करत, आत बोला काय सांगायच आहे??"

"तुला माहीत आहे नैना, बेडकाला जर अचानक गरम पाण्यात टाकलं तर तो लगेच उडी मारून स्वतःचा जीव वाचवेल, पण जर तो पाण्यात आधीपासूनच असेल आणि पाणी हळूहळू गरम करत गेलो तर काय होईल माहीत आहे??"

त्यांचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्य ही वाटलं की हे काय बोलताय आणि कोणत्या संदर्भात बोलताय आणि हसु ही आलं , मी हसत हसत विचारलं...

"काय तुम्ही??? माझ्यावर जोक करता ते करता, बिचाऱ्या बेडकाला तर सोडायचं...?"

"मी मजाक नाही करत आहे नैना, बोल काय होईल? माहीत आहे का?"

"नाही माहीत, तुम्हीच सांगा..."

"मला वाटलंच तुला माहीत नसेल..जर आपण पाण्याचं तापमान हळूहळू वाढवत गेलो तर बेडूक त्या पाण्यातली आपली जागा सोडणार नाही, कारण तो स्वतःला त्या पाण्याच्या तापमानासोबत ऍडजस्ट करत जाईल, आणि एक वेळ अशी येईल की आता त्याला पाण्याच्या तापमानासोबत बरोबरी करता येणार नाही, तो त्यातच अडकून राहील आणि शेवटी तिथेच त्याचा जीव जाईल...हे असं होईल माहीत आहे...?"

आता मला कळायला लागलं हळूहळू त्यांना मला काय सांगायचं आहे, पण तरीही मी नकारार्थी मान हलवली,

"हे अस यामुळे होईल की ऍडजस्टमेंट करता करता त्याला कळणारच नाही की योग्य वेळेला पाण्यातून उडी घेतली पाहिजे बाहेर...कसं आहे ना नैना, हे मनुष्यांच्या बाबतीतही होतं, कळत नाही आपल्याला योग्य वेळेला परिस्थितीतुन बाहेर पडणं, आणि आयुष्याभरासाठी दुःखाला कवटाळून बसतो आपण...योग्य वेळी बाहेर पडता आलं पाहिजे ना नैना.. हो ना?"

"हो अगदी बरोबर सर, मी लक्षात ठेवेल ही गोष्ट...पण एक विचारू, तुम्ही इतक्या मोठ्या पदावर काम करता, तरी वेळ काढून माझ्या समस्या ही ऐकता, मला अभ्यासात ही मदत केली तुम्ही, एवढा वेळ माझ्यासाठी का काढता?? म्हणजे अजूनही मित्र असतीलच तुम्हाला, मग माझ्यासाठी का, जेंव्हा आपली तर नवी नवी मैत्री आहे,?"

"याचं उत्तर द्यायलाच पाहिजे का तुला,??"

"जबरदस्ती नाही, पण दिलं तर बरं वाटेल, आणि तुम्हीच बोलता ना, मैत्रीत काहीही लपवायला नको, तेंव्हाच ती अबाधित राहते..."

"नैना, मला आवडतेस तू खूप, तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण आवडतो, नाही वाटत तुला दुखवाव किंवा तुला दुःखात पहावं, मला नाही मा..."

"सर प्लिज, मी पत्नी आहे कोणाची तरी, आणि मी नेहमीच तुमचा खूप आदर केलाय, हे असं काहीही नका ऐकवू मला ज्यामुळे हे नातं खराब होईल किंवा यावर काही चिखलफेक होईल...."

"पण मी असं काय बोललो नैना, कोणी आपल्याला आवडणं चुकीचं तर नाही ना?? तू कोणाची तर पत्नी आहेस याची जाणीव आहे मला, पण एक मैत्रीण म्हणून नाही आवडू शकत का तू मला?? मला ना, गुंतागुंत अजिबात आवडत नाही नैना, आणि उगाच कोणाला शब्दांच्या जाळ्यात अडकवणं हा माझा स्वभाव नाही, तू मला प्रश्न विचारला आणि की त्याचं सरळ सरळ उत्तर दिलं, हे प्रेम वैगरे मला नाही कळत नैना, पण जो मनाला चांगला वाटला त्याच्यासाठी मी काहीही करतो, मग त्या लोकांमध्ये माझे आई बाबा आहेत, माझे जवळचे मित्र आहेत आणि तशीच तू आहे, मला तर यात काही चूक वाटत नाही,आणि राहिला प्रश्न याचा की तू कोणाची पत्नी आहेस, तर त्या ही मर्यादा मी जाणून आहे, इतक्या दिवसांत कधी तुला जाणवलं की मी त्या मर्यादा भंग केल्या आहेत....एक सांगतो नैना, या दुनियेत सगळे नाते एक ना एक दिवस साथ सोडतात फक्त मैत्रीच आहे जी सोबत राहते...आणि मैत्रीत काही करायला काय विचार करायचा?? त्यामुळे जास्त विचार नको करू, आणि आपले विचार अजून प्रगल्भ कर..मग कळतील या गोष्टी..."
नेहमी कवितेत, शब्दांचा सहारा घेऊन बोलणारे अभय सर आज किती स्पष्टपणे बोलले, हे मला खूप आवडून गेलं, आपल्याकडे तर अशी मानसिकता बनवून दिलीये की जर कोणी पुरुषाने एखाद्या स्त्रीला 'तू आवडतेस' हे बोललं तरी माहीत नाही त्याचे किती किती अर्थ काढतील, दोरीचा साप व्हायला वेळ लागत नाही..आणि त्याच दुनियेत अभय सारखा व्यक्तीही राहतो याचं नवल वाटत होतं..

"तसं, सगळं अचानकच ठरलं नागपूर ला जायचं, त्यामुळे तातडीने बोलवलं तुम्हाला आणि तुम्ही सगळे कामं सोडून आलेत, पण खरं सांगते शेवटचं भेटावं वाटत होतं, यानंतर ते शक्य होणार नाही..."

"तू तेंव्हापासून शेवटची भेट, शेवटची भेट करत आहेस, पण काय माहीत का? मला असं वाटत नाही.."

"पण असंच आहे, मी आता परत येणार नाही, आणि तुम्ही ही कायम इथेच राहणार नाहीत..."

"नैना, आपली पहिली भेट आठवते, तेंव्हा मी पण कुठे विचार केला होता ही वेंधळी मुलगी वारंवार अडचणीत सापडली की मलाच येऊन धडकेल, 😂😂, पण तरीही भेटलोच ना आपण...त्यामुळे जरी तुला ही शेवटची भेट वाटत असेल तरी मला नाही वाटत असं...आयुष्य अजून संपलं नाही, आणि दुनिया गोल आहे म्हणतात, त्यामुळे आयुष्याच्या प्रवासात एका वाटेवरून दोनदा जावेच लागते, आणि जरी शेवटची असली ही भेट तरी मला एक चांगली मैत्रीण आणि मेहनती विध्यार्थी भेटली हेच समजेन मी....आणि हो आयुष्य एकदाच मिळतं, समस्या येतीलच, पण स्वतःचा स्वाभिमान जपून, नमायला शिकावं, बाकी तू समजदार आहेस...."

"ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवेन मी..."

"ठीक आहे मग, एकदा शेवटचं कॅन्टीनची भेट घेऊन येऊयात का मग,😜😂😂"

"मला वाटलंच होतं, आज तुम्ही खाण्यासाठी उतावळे कसे नाही,😝.."

आणि अश्याप्रकारे पुन्हा एकदा माझे आणि अभय सरांचे मार्ग वेगळे केले मी...पण मला हे माहीत नव्हतं, दुनिया खरंच गोल आहे..अभय सरांना भेटून आल्यावर माझा हा निर्धार पक्का होता की माझे आता विक्रमच्या आयुष्यात परतीचे मार्ग बंद आहेत....

संध्याकाळी बाबा ही आलेत, आणि यावेळी मी विक्रमला फोन करण्याची कसरत केली नाही, सरळ त्याला एक मेसेज केला....रात्री विक्रम घरी आला, घरात आल्या वर खुप वेळ तो बाबांशी एक शब्दही बोलला नाही, वाट पाहून बाबांनीच विषय काढला...

"विक्रम, काय झालं, आता तरी सांगाल का तुम्ही दोघे व्यवस्थित, इतक्या तातडीने मला इथे बोलवलं...."

"बाबा, हे तुमच्या गुणाच्या लेकीला विचारलं तर बरं होईल, तिलाच विचारा तिचे कारनामे, तुम्हाला तर फार गर्व होता ना तिच्यावर, की आमची मुलगी गाय आहे, जे बोलणार तेच करेल...माझं तर आयुष्य झालं ना खराब..."

विक्रमचे शब्द ऐकून बाबांनी माझ्यावर एक नजर टाकली, सहाजिकच आपल्या मुलीबद्दल अस ऐकून कोणत्याही बापाचं काळीज फाटेल... माझे डोळे भरले होते, हे पाहून बाबांनी मला काहीही न विचारता फक्त डोळ्यांनी आश्वस्त केले आणि पुन्हा विक्रमला बोलले,

"विक्रम, मी तिला विचारलंच नक्की, पण तू ही एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर, कस आहे, पती पत्नीच्या नात्यात एक नासमज असेल तर दुसऱ्याने समजदारी दाखवावी लागते, तू तर सगळ्याच बाबतीत तिच्यापेक्षा समजदार आहेस, हे असं घरातून निघून जा वैगरे असं बरं वाटतं का??

"अस्स...आणि मी नाही बोललो तरी मला जे आवडत नाही तेंव्हा तुमच्या मुलीला ती गोष्ट करताना बरं वाटतं का?"

"काय केलं तिने असं जे तुला आवडत नाही??"

"इतक्या वेळेपासून सांगितलं नाही का तीने??ठीक आहे मीच सांगतो, माझ्या मर्जीच्या विरोधात जाऊन माझ्या ऑफिसच्या लोकांशी बोलायची काय गरज आहे तिला?? माझे कामं मी बघतो, त्यात तिला मधात पडायची काय गरज आहे, आणि तिला कमतरता कोणत्या गोष्टींची आहे जे दुसऱ्याचं ऐकून हिला पण जॉब करायचा, बाहेर कसे लोकं असतात कळत नाही का हिला...."

"मी देतो तिला समज तशी, पण..."

"पण बिन काही नाही, तुम्हाला तिला समज द्यायची की काय करायचं ते आपल्या घरी नेऊन द्या, माझ्या मनातून उतरली आहे ती आता...माहीत नाही माझ्या पश्चात काय कामं करते आणि किती मित्र बनवले असतील हिने.."

विक्रमने बाबांना असं उलट उत्तर दिल्यावर आता माझं गप्प राहणं चुकीचं झालं असतं, माझा अपमान मी तर सहन करतच होती, पण आता विक्रम त्याची हद्द पार करत होता बाबांशी उद्धट बोलून त्यामुळे न रहावून मी बोलली,

"हो बाबा, बरोबर बोलले हे, आता एक दिवस जर अजून मी राहिली इथे तर जीव गुदमरून मरेल मी आता, माझा अपमान होतं होता तोपर्यंत झालं मला सहन, आता नाही होत..त्यामुळे उद्या सकाळी पहिल्या बस ने आपण निघू.."

"नैना तू चूप कर, मी बोलतो आहे ना..."
बाबा मला समजवण्याच्या सुरात बोलले, पण विक्रमने बाबांचं वाक्य मध्येच कापत बोलला,

"बघा, एवढ्या चूका करूनही इतकी उद्धट बोलते, आता मला इथे काहीच बोलायचं नाही, जे बोलतील ते माझे आई बाबा बोलतील नागपूरला शेवटचं, घेऊन जा तिला सकाळी..."

दुसऱ्या दिवशी सकाळीच मी आणि बाबा निघालो नागपुरला, बाबांना नक्कीच दुःख झालं होतं पण तिथे राहून विक्रम काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, बाबा त्याच सगळं ऐकूनही त्यालाच महत्त्व देऊन बोलत होते, त्याच्या चुका असूनही माझीच चूक आहे असं दाखवत होते पण विक्रमला त्याचा अहंकार आड येत होता...

बहुधा प्रत्येक घरात असंच घडत असावं, जेंव्हा काही मुलीच्या संसारात कुरबुर झाली तर आधी चूक मुलीची आहे असंच ठरवल्या जातं, आणि जावयाला 'तूच किती मोठा' म्हणून मिरवल्या जातं.. पण मला वाटतं की चूक ती चूकच असते, मग ती कोणीही केली असो, पण मुलीच्या घरच्यांना वाटतं की आपण मुलीची बाजू कमजोर दाखवली तर तिचा संसार अबाधित राहील पण नेमकी चूक तिथेच होते, माझ्याकडे ही हेच झालं, मलाच समज देण्याचा प्रयत्न देण्यात आला होता...अजून तर नागपूरला विक्रमच्या घरच्यांसमोर बरंच काही व्हायचं बाकी होतं....
------------------------------------------------------------------
क्रमशः