अहंम की छत गिरने का,
शोर नही हो पाता है ।
शोहरत का आसमाँ तो,
बस एक वहम होता है ।
मला असं वाटतं यश मिळवणं फार सोप्प आहे पण ते टिकवणं म्हणजे ब्रह्मव्रत...!! असं का?? तर, मला वाटतं यश म्हणजे भ्रमाचा भोपळा...ज्या दिवशी हा भ्रमाचा भोपळा फुटला त्यादिवशी हे यश आणि त्याचा अभिमान किती अर्थहीन आहे याची जाणीव होते... त्यामुळे ज्याच्या जवळ विवेक आहे त्यालाच यश हाताळता येतं असं मला वाटतं...विक्रमने जितक्या लवकर सगळं काही मिळवलं तितक्या लवकर त्याने सगळं गमावलं ही !!...त्याला चांगल्या वाईट मधला फरक कळलाच नाही किंवा मी असं बोलेन की ते समजून घेण्याची विवेकबुद्धी नव्हतीच त्याच्याकडे...आणि का नव्हती?? कारण त्याच्या डोळ्यांवर अहंकाराची पट्टी त्याने बांधली होती, त्याच्या घमंडाच्या वर्तुळात त्याने कोणाला येऊच दिलं नाही, आणि त्याचा हा 'मीपणा'च त्याला नडला....मला मात्र त्याची चिंता खात होती, आपल्याकडे तर असंच असतं ना की नवऱ्याने कितीही खराब व्यवहार केला तरी बायको म्हणून आपण कमी पडायचं नाही, आपले कर्तव्य चुकवायचे नाही....आणि हीच शिकवण मलाही देण्यात आली होती त्यामुळे साहजिकच मला त्याची काळजी वाटायची, मला मनातून वाटायचं की तो कोणत्या अडचणीत फसायला नको, पण त्याला हे कधी कळलंच नाही...काय म्हणायचे अभय सर, विक्रमला माझ्या प्रेमाची 'ग्राव्हिटी' कळलीच नाही...
विक्रमचं वागणं दिवसेंदिवस माझ्या आकलनापलीकडे जात होतं...रात्री अपरात्री घरी येणं, कधी कधी घरातून तीन तीन दिवस गायब असणं, मी काही विचारायला गेली की प्रचंड राग यायचा त्याला...खूप खोदून खोदून विचारलं तेंव्हा नवीन केस आहे किंवा कामं वाढलीत याचे कारणं द्यायचा.... माझी मात्र त्याच्यासाठी चिंता वाढत होती, त्याच्या घरी मी सांगण्याचा प्रयत्न केला, मला वाटलं कदाचीत घरच्यांचं तो ऐकेल पण अस काहीही झालं नाही...
एकदा त्याने मला फोन करून लवकर येत असल्याचं कळवलं आणि त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र येणार आहेत हे पण सांगितलं, त्यानुसार मी जेवणाची सगळी तयारी करून ठेवली होती...ते सगळे घरी आल्यावर मी त्यांना चहा नाश्ता नेऊन दिला, तेवढ्यात विक्रमने मला त्याची बॅग दिली ठेवायला, पुन्हा ती पैशाने भरलेली बॅग पाहुन मी तिथेच त्याला विचारलं तर त्याने रागाने एक कटाक्ष टाकला माझ्यावर, उत्तर मात्र दिलं नाही....सगळ्यांचे जेवण वैगरे आटोपल्यावर त्याचे मित्र निघून गेले, मी किचनमध्ये कामं आवरत असतांना विक्रम आतमध्ये आला अन मला बोलला,
"नैना, रुममध्ये ये लवकर, माझी नाईट शिफ्ट आहे..मला निघायचं आहे..."
"माझे हात भरलेत विक्रम, काय काम आहे इथेच बोला.."
"तुला ऐकायला आलं नाही का?? रुममध्ये ये...आताच..."
"नाही येणार विक्रम, कंटाळा आलाय मला, वीट आलाय तुम्ही ज्यासाठी बोलवत आहे रुममध्ये त्या गोष्टीचा...माझं शरीर सोडून कधीतरी माझ्या मनाकडे ही लक्ष द्या...आता तुमच्या मित्रांसमोर ही कशी वागणूक दिली तुम्ही मला, केवढं अपमानित वाटलं मला ते..."
"तुझा काय अपमान केला मी?? तुला लाज नाही वाटली लोकांसमोर नवऱ्याला प्रश्न उत्तरं करताना, आणि माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करणं हे तुझं कर्तव्य आहे, आणि सगळ्या म्हणजे सगळ्याच गरजा..., कळलं ना.."
"तुमच्या सगळ्या गरजा मी पूर्ण करायच्या हे बरोबर आहे पण जीवनसाथी म्हणून तुम्ही माझ्यासाठी काय करता?? प्रत्येक वेळी मला हिनवण आणि मला कमी लेखणं..."
"मी तुला काहीही कमी समजत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी तुला येत नाहीत त्यात माझी चूक आहे का? नवऱ्याला खुश कसं ठेवायचं हे पण नाही कळत तुला...तुला तुझ्या घरच्यांनी काहीच शिकवलं नाही का ग?? असंच तुला माझ्या माथी मारून दिलं का??"
विक्रमने माझ्या घरच्यांना मधात आणल्यावर मात्र माझे संयम सुटले, त्याने माझ्याविषयी काहीही बोललं तरी मी सहन केलं असतं किंबहुना ते सहन करत आली होती पण त्यांनी मला काय शिकवलं आणि काय नाही हा बोलण्याचा अधिकार विक्रमला अजिबात नव्हता असं मला वाटते...
"एक मिनिटं...पहिली गोष्ट तर त्यांनी मला नाही मारलं तुमच्या माथी, आठवत नसेल तर सांगून देते, तुम्हालाच घाई होती माझ्याशी लग्नाची, आणि का तुम्हाला असं वाटतं की मी आयुष्यात काहीही करु शकत नाही?? काय फायदा तुमच्या शिक्षणाचा विक्रम, जर तुमचे विचार अजूनही बुरसटलेले असतील आणि एका स्त्रीला तुच्छ लेखत असतील तर...अधिकारी होताना तर सगळा अभ्यास केला असेन ना तुम्ही, मग हे कसे विसरले की घटनेत ही स्त्री पुरुष समानता कायदा दिला आहे...एवढे मोठे अधिकारी असून अशी मागासलेली विचारसरणी आहे तुमची मला नाही पटत...अभय सरांचे विचार किती प्रगल्भ आहेत, काही शिका तुम्ही त्यांच्याकडून.."
मी दुखलेल्या मनाने विक्रमला बोलत होती आणि तो ऐकत होता पण जेव्हा मी अभय सरांचं नाव काढलं तेंव्हा मात्र त्याचा राग शिगेला जाऊन पोहोचला, त्याने रागाने माझ्या उजव्या हाताच्या मनगटाला पीळ देऊन मागे पकडत बोलला,
"ओहहह, आता कळलं, माझ्या प्रत्येक शब्दाला पूर्वदिशा समजनाऱ्या नैनाच्या तोंडी अचानक हे क्रांती घडवणारे शब्द कसे आलेत...तुला आधीही बोललो होतो मी, त्या NGO मध्ये आपल्या कामाशी काम ठेवायचं तू, पण नाही, बाईसाहेबांना तर नको तिथे डोकं लावायचं आहे, आणि ते पण कोणाचं ऐकून, त्या माणसाचं ज्याने तुझ्या नवऱ्याचं जगणं मुश्किल केलंय त्याचं... खरंच मला नवरा मानते तू की उगाच हे ऐशआराम मिळतायेत म्हणून माझ्या सोबत राहत आहेस?? उद्या त्याच ऐकून तू मला सोडायला ही मागे पुढे पाहणार नाही...."
"विक्रम, प्लिज सोडा मला, दुखतंय मला खूप, मला कोणीही काहीही शिकवलं नाही, प्लिज ऐका तरी माझं..."
त्याने माझा हात एवढा घट्ट पकडला होता की त्याचे व्रण उमटले होते माझ्या हातावर, त्याची पकड अजून घट्ट करत विक्रम बोलला,
"सकाळ झाली की बॅग भरायची आणि सरळ नागपूर ला निघायचं, कळलं ना? तुला जेवढी सूट मी दिली त्याचा असा फायदा उचलत आहेस का तू??"
विक्रमचं बोलणं ऐकून मला खरंच खूप भीती वाटली, एकतर मला माहित होतं की हे सगळं जर मी घरी सांगितलं तर कोणी माझा विश्वास करणार नाही आणि दुसरी गोष्ट ही की विक्रम त्याचं कसं सगळं बरोबर आहे हे पटवून देण्यात मातब्बर होता त्यामुळे मी सगळ्यांसमोर खोटी पडली असती, आणि या सगळ्याचा मनस्ताप बाबांना झाला असता, त्यामुळे मला नमती बाजू घेणं गरजेचं होतं..
"मला माफ करा विक्रम, मी चिडली आणि माझ्या तोंडून चुकीचे शब्द निघाले, पुन्हा असं होणार नाही..."
"माफी मागायचं काम पडेल अस कामच करायच नाही ना मग...शेवटची वॉर्निंग समज तू ही माझी नैना, तुला बाहेर जायचं, काम करायचं ते कर, पण पुन्हा जर मला शहानपणाच्या गोष्टी शिकवल्या तर माझ्या इतकं वाईट कोणी राहणार नाही आणि अजून एक गोष्ट जर पुन्हा अभय चं नाव माझ्यासमोर निघालं तर तो दिवस तुझा माझ्या आयुष्यातला आणि या घरातला शेवटचा दिवस ठरेल...कळलं ना?"
"हो कळलं..."
जर त्यादिवशी मी थोडी हिंमत दाखवली असती तर कदाचित माझा खूप काही त्रास वाचला असता, पण नाही, मला तसं करून चालणार नव्हतं, कारण संसार आनंदाने म्हणा किंवा मजबुरीने, मला तो करायचाच होता....काय म्हणतात ते आपल्याकडे?? पत्नी पतीची अर्धांगिनी असते, म्हणजे असंच ना की दोघांचा समान अधिकार, दोघांना समान मान, दोघांचाही वाटा संसारात बरोबरचा...! पण संसाराचा हा रथ चालवताना का असं होतं की एका बाजूने ते भार जास्त वहावे लागतात आणि दुसरी बाजू फक्त तटस्थ असते...? आता असं बोलायला गेलं तर माझ्या घरच्यांचे उत्तर ठरलेले होते, "पती पत्नी संसाराच्या गाड्याचे दोन चाक जरी असले तरी ते टिकवून ठेवण्यासाठी बाईच्या जातीलाच झुकतं माप घ्यावं लागतं, कुटुंब बांधून ठेवणं हे स्त्रीचंच लेणं आहे..." काय बोलावं या दुजाभाव साठी...
--------------------------------------------------------
अभय सरांचं आणि माझी चांगली मैत्री झाली होती, कदाचित एवढी चांगली की माझ्या चेहऱ्यावरून त्यांना माझ्या मनातल्या हालचाली कळायच्या...बोलणं व्हायचं रिकाम्या वेळेत, त्यांच्याशी प्रत्येक वेळी बोलताना एक नवीन विषय शिकायला मिळायचा, त्यांचं ज्ञान अफाट होतं आणि त्यामुळेच एखाद्या गोष्टी वर आमची मतं जुळली नाही तर मी घरात असलेले पुस्तकं घेऊन वाचायला बसायची...कधी इतिहास, कधी भूगोल, तर कधी सामाजिक गप्पा तर कधी साहीत्य, भरपूर काही शिकायला मिळायचं त्यांच्या कडून...एवढं सगळं काही असतांना त्यांनी मात्र त्यांची मर्यादा ओलांडली नाही, मित्र जरी होते तरी त्यांना ठाऊक होतं की मी सांसारिक आहे आणि मलाही त्यांच्या पदाचा, त्यांच्या मित्र म्हणून मिळालेल्या सोबतीचा तेवढाच आदर होता...
एकदा त्यांना बरीच सवड मिळाली आणि खूप वेळ ते NGO मध्ये बसून होते, मला आठवलं विक्रमचं बोलणं की त्याला सध्या अभय सरांनी काही तरी केस मध्ये गुंतवलंय, तस मला खात्री होती की अभय सर काही चुकीचे नाहीत पण विक्रमची काळजी मला शांत बसू देत नव्हती आणि त्याचा हा बदल कशामुळे आहे हे मला जाणून घ्यायचं होतं, त्यामुळे मी अभय सरांशी यावर बोलायचं ठरवलं पण सुरुवात कुठून करू ते कळत नव्हतं,
परतीची वाट ना याला,
लाटांना मिळे ना किनारे।
आसवांनी विझतील का,
सच्च्या प्रेमाचे ते निखारे??
"आज IPS साहेबांना प्रेमाची कविता कशी सुचली? आणि ते ही इतके दर्दी शब्द?" मी विचारलं....
"तुला पाहून सुचलं...." ते आकस्मातपणे बोलले,
"काय??? म्हणजे???" मी पण अवघडतच विचारलं
" अग म्हणजे, सतत तू विक्रमच्या विचारात असते, आमचे 'अहो' जेवले असतील का, त्यांना खूप काम असतील का, त्यांना काही त्रास आहे का?? याच विचारात असते ना नेहमी, मग प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीला पाहून ते सुचलं मला...😂😂" मला चिडवत ते बोलले,
"असं काहीही नाही, बुडाली तर मी आहेच, पण प्रेमात की कशात ते माहीत नाही...त्यात विक्रमची काळजी वाटणं तर साहजिक आहे ना...आणि सध्या काही नवीन केस मध्ये गुंतलेत वाटते ते...हो ना?"
मी पण हिम्मत करून बोललीच, कारण अभय सर आणि विक्रमच्या कामाबद्दल जाणून घेणं हे नीतीच्या विरुद्ध होतं, पण तरीही चाचरतच विचारलं मी...
माझ्या या प्रश्नावर अभय सरांनी त्यांची नजर माझ्यावर रोखली आणि खूप प्रश्नार्थक भावाने मला विचारलं,
"विक्रम साहेबांना जाणीव आहे या गोष्टींची??"
"कोणत्या गोष्टीची??"
"नैना, तुझ्या प्रेमाची ग्राव्हिटी किती आहे हे कळते का विक्रमला?? जर त्याला त्याची जाणीव असती तर आज हा प्रश्न मला विचारला नसता??"
"ग्राव्हिटी??? ते काही फिजिक्स नाही ग्राव्हिटी मोजयला, प्रेम तर आपल्या कृतीतुन, नजरेतून दिसून येतं ना....ते पाहण्याची दृष्टी विक्रमकडे नसेल किंवा माझ्या नजरेत ते प्रेम नसेल, त्यामुळेच विचारलं तुम्हाला..."
"मग ते प्रेम एक्सप्रेस कर आणि विचार ना त्या अधिकाराने त्याला की कुठे गुंतला आहे तो?? "
"हो..विचारलं होतं पण कदाचित वेळ चुकीची असावी, त्यामुळे ते मला काही सांगू शकले नाही..."
"जिथे प्रेम असतं नैना, तिथे चूक किंवा बरोबर ह्या गोष्टी येत नसतात कधी...."
"असू शकते असंही, पण मी कदाचित त्यांचं काम नाही समजू शकली, यामुळे चूक माझीच असावी जे विक्रम मला त्यांच्या गोष्टी सांगत नाहीत...पण प्रेम त्यांचं ही माझ्यावर खूप आहे बरं.."
मी नजर चोरत बोलली, आणि तसही अभय सरांना काय सांगणार होती मी की, विक्रम मला कशी वागणुक देतो, त्याच्या नजरेत तर सगळ्या चूका माझ्याच होत्या, त्याला तर मी जगातली सगळ्यांत मूर्ख बायको वाटते...आणि अश्या व्यक्तीला प्रेमाची ग्राव्हिटी काय कळणार ज्याच्या डोळ्यांवर अभिमानाची पट्टी आहे...हे विचार करत असतांना माझे डोळे भरून आले...
"काय हे, तू काय तुझ्या झाशीच्या राणीचा अवतार फक्त माझ्यासमोरच घेते का? विक्रमला ही दाखव कधी😜"
आमचं हे संभाषण सुरू असताना विक्रमचा फोन आला मला, आणि पुन्हा विनाकारण क्षुल्लक कारणासाठी त्याने माझा मूर्खपणा काढला, कारण त्याआधीचा त्याचा मिसकॉल मी पाहिला नाही, त्याच्या नजरेत कामात बिझी फक्त तोच असू शकत होता... मी त्याला सांगण्याचा प्रयत्नच करत होती की मी फोन का घेऊ शकली नाही तेवढ्यात त्याने फोन कट केला, मला वाईट वाटलं.."किती आणि कशा कशासाठी मी माफी मागायची विक्रम.." हाच विचार मी करत असताना अभय सर बोलले,
"कधीही माफी न मागणं किंवा मागू देणं हाच प्रेमाचा खरा अर्थ आहे..."
"हां...काय???"
"एरिक सेगल, लव्ह स्टोरी....छान आहे ना वाक्य..."
हातातलं पुस्तक दाखवत ते मला बोलले,
"ओहह, कादंबरी वाचताय...मला वाटलं..."
"...तुला वाटलं माझ्या मनातलं तर ऐकू गेलं नसेल ना सरांना...??"
अभय सर माझ्या डोळ्यांत बघत बोलले,
"अम्म्म...मला उशीर होतोय, मी निघू..?"
"आता जास्त उशीर करू ही नको नैना, नाहीतर खरंच यातून निघणं कठीण होईल..."
"हम्म..."
"आणि, हो, विक्रम कोणत्या केस मध्ये बिझी आहे हे तुला नक्कीच माहीत पडेल, त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठीच माझे प्रयत्न नक्कीच असतील पण त्यासाठी तुला ही झाशीची राणी बनावाच लागेल....."
आता मात्र मला याची जाणीव झाली होती की विक्रम काहीतरी चुकीच्या कामात फसत चाललाय... त्यातून तो जर बाहेर निघाला तर माझ्या अडचणी थोड्या कमी होतील, पण विक्रमचा अहंकारी स्वभाव पाहता तस काही होईल याची फार अपेक्षा नव्हती मला...विक्रमने त्याच्या आयुष्याचा खेळ तर करायला सुरुवात केलीच होती, आता टीच्यासोबत मी पण भरडल्या जाणार होती.....
------------------------------------------------–--
क्रमशः