गज़ब की धूप मे,
छाँव सा मिला।
खुद को पाया मैने,
ऐसा आईना मिला।
कधी तरी आयुष्यात एक काळ असा येतो की एका पाठोपाठ एक घडणाऱ्या घटना सगळ्या निराशा पसरवून जातात, कुठेतरी हा विश्वास व्हायला लागतो की आता आपल्या सोबत काही चांगलं घडणारच नाही....आणि तीच गोष्ट सत्य समजून आपण ही त्याच निराशेच्या प्रवाहात वाहत जातो, त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न तर दूर, विचार ही करत नाही...अशा वेळी गरज असते फक्त एका कवडस्याची जिथून अंधार भेदून एक किरण आपल्या काळोखात शिरेल आणि आपलं आयुष्य बदलवून टाकेल... कधी कधी ती आशेची किरण आपल्याला शोधून काढावी लागते तर काही वेळेस ती अकस्मातपणे आपल्या समोर येऊन उभी राहते...माझ्या आयुष्याच्या काळोख्यात ही अभय सर तशीच एक किरण बनून आले.. मी काय आहे, त्यांच्या शब्दांत सांगायचं तर माझं 'पोटेन्शीयल' काय आहे याचा आरसा त्यांनी मला दाखवला, पण हे सगळं होत असताना माझ्या आणि विक्रमच्या काचेसारख्या असणाऱ्या नात्यात भेगा पडत होत्या...खर तर ते नातंच इतकं तकलादू होतं की ते तुटण्यासाठी कोण्या तिसऱ्याची गरजच नव्हती, त्यासाठी विक्रमचा अहंकारच पुरेसा होता...बरं, नातं तुटेल तोपर्यंत ठीक होतं, पण विक्रमने मला चकानाचूर केलं होत आतमधून, आणि माझे हे तुकडे सावरायला अभय सर पदोपदी होते....
त्या दिवशी विक्रमशी बोलल्यावर खुप हलकं वाटत होतं, आणि त्यापेक्षा जास्त राहून राहून अभय सरांचा विचार येत होता...काहीही अपशब्द न बोलता किंवा कुठला वाद न घालता किती किती सहजपणे त्यांनी विक्रम समोर माझा तणाव मांडला, फक्त माझ्या चेहऱ्यावरून कस ओळखलं असेल त्यांनी?? आणि त्यांच्या सकारात्मक व्यक्तिमत्वामधूनच कदाचित मला हिम्मत आली असावी की मी निःसंकोचपणे विक्रमसमोर थोड्या प्रमाणात का होईना माझी व्यथा मांडली...
दुसऱ्या दिवसाची सुरुवात माझ्यासाठी खूप काही घेऊन येणार होती..मी सकाळी लवकर उठून पटापट सगळं आवरलं, विक्रमचा नाश्ता, त्याची सगळी काम करून मी तयार होऊन बसली...विक्रमने त्याच आवरल्यावर माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि बोलला,
"आज इतक्या लवकर सगळं कसं तयार झालं? आणि विशेष म्हणजे आज तुझा किचनमध्ये ना भांड्यांचा पडण्याचा आवाज आला, ना तुझी धावपळ दिसत आहे आणि आज तुला काही भाजलं किंवा पोळलं ही नाही हाताला..... काय कारण? म्हणजे बाहेर जायचं म्हणून इतके दिवस तुझी नाटकं होती का ही?? माझी सकाळ खराब करण्याची??"
हं...कसं नाही कळाल विक्रमला की जर मनस्थिती चांगली असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात, मन प्रफुल्लित असेल तर कोणत्याही कार्यात काहीच बाधा येत नाही. आपण मनाने जर स्फुर्त असू तर शरीर कधीच थकत नाही किंवा शरीराला कोणतीच ईजा होत नाही...पण विक्रमने माझी मनस्थिती समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, त्याच्या मतानुसार तर मी त्याची मनस्थिती समजून घ्यावी हेच माझं बायको होण्याचं परम कर्तव्य आहे असं वाटायचं...
"असं काहीही नाही, आणि तुम्हाला त्रास का देऊ मी विनाकारण?? तुम्हाला त्रास झाला तर मला नाही होणार का विक्रम? काहीही का बोलता? बायको आहे मी तुमची, जाणून असं काहीही करणार नाही मी..."
"हम्म...पटलं... म्हणजे आमच्या बायकोचं आमच्यावर आता थोडं तरी प्रेम जागृत होत आहे असं समजावं का??"
विक्रमने मागून येऊन माझ्या कमरेला विळखा घातला आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवत बोलला..
"फक्त आताच काहीही होत नाही आहे असं, माझं प्रेम आधीपासूनच आहे तुमच्यावर पण मी तुमच्यासाठी काहीही केलं तरी तुम्हाला ते दिसतं नाही.."
"हो का? दिसलं नसेल, आता दाखव ना तुझं प्रेम..तस ही निळा रंग तुझ्यावर खूप खुलुन दिसतो, आणि आज तर तू निळ्या रंगात अजूनच सुंदर दिसत आहेस... बघू दे मला ही किती प्रेम आहे तुझं माझ्यावर..."
आणि अस बोलत विक्रमने येऊन मला त्याच्या कवेत घेतलं...प्रेमाची भाषा फक्त स्पर्श करुनच कळते असं वाटायचं विक्रमला...पण खऱ्या प्रेमाला स्पर्शाची गरज नसते हे त्याला कळलंच नाही, आपल्या डोळ्यांतून, आपल्या कृतीतून, काळजीतून, सहवासातून आणि कितीतरी मार्ग आहेत प्रेम व्यक्त करण्याचे...केवळ शरीरानेच एकरूप होणं हे प्रेम नसुच शकते...
"विक्रम प्लिज..काय करताय तुम्ही, सकाळच होत आहे आणि आपल्याला जायचं आहे बाहेर..."
विक्रम मात्र त्याच्याच धुंदीत होता, आज पुन्हा माझा 'नाही' चा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचतच नव्हता..आता तर मी माझे निरर्थक प्रयत्न ही सोडले होते त्याला 'नाही' म्हणण्याचे, पण आज मला काहीतरी करण्याची एक संधी मिळत होती आणि त्यात मला उशीर करायचा नव्हता, तो विचार करूनच माझे डोळे भरून येत होते, अश्रू मात्र मनातून वाहत होते... आणि एवढ्यात विक्रमचा फोन वाजला, विक्रमने तो दुर्लक्ष केला... आता मात्र दुसऱ्यांदा फोन वाजला तेंव्हा मात्र भानावर येत त्याने फोन बघितला, आणि रागारागात तनफन करत फोन घेऊन बाहेर निघून गेला...त्या फोनमुळे माझी मात्र सुटका झाली, मी लगेच स्वतःला व्यवस्थित करत सगळं आवरून बसली...विक्रम पाच मिनिटांत बोलून आला, त्याच्या चेहऱ्यावर तणाव आणि राग दोन्ही दिसत होते...
"काय झालं?? काही अडचण आहे का?" मी काळजीने म्हणून विचारलं त्याला...
"हा माणूस जेव्हापासून आलाय ना, मला सुखाचा श्वास घेऊ देत नाहीये...आपल्या लग्नाच्या काही दिवस आधीच आलाय..त्याच्यामुळेच मला तुझ्यासोबत ईच्छा असूनही वेळ देता येत नाही, एवढा काय इमानदारीचा पुळका येतो त्याला काय माहीत...?"
"कोण? कोण त्रास देतंय तुम्हाला...?"
"तोच आहे तो, IPS अभय..."
अभय सरांचं नाव ऐकून मला हसू आलं, आम्ही जेंव्हा ही भेटलो ते मला एकच बोलले, 'अडचणीच्या वेळी मीच सापडतो का ग तुला'...आजही नकळतपणे, अप्रत्यक्षरित्या त्यांनी मला 'अडचणीतून' सोडवलं..तो विचार करून माझं मलाच हसू येत होतं..
"नाकात दम करून ठेवलाय त्याने माझ्या..." विक्रम कपाळावर आठ्या आणत बोलला..
"मी काय म्हणते, विनाकारण जर कोणी एका सरकारी अधिकारी वर दबाव आणत असेल तर आपण त्याला चॅलेंज करू शकतो, कायद्यात तश्याही तरतुदी आहेत...." मी पून्हा काळजीच्या सुरात बोलली..
"जाऊदे माझं काम मी बघून घेईल... आणि हे कायदा वैगरे तुला काही कळणार नाही, तुला तुझं किचन कळाल हेच खूप आहे माझ्यासाठी... आणि तसही या सगळ्या गोष्टींचा विचार करून ताण घेऊ नकोस, गेल्या काही दिवसांत चेहऱ्याचा रंग उडालाय तुझा...स्वतःकडे लक्ष दे, तू सुंदर आहेस पण अजून छान दिसलीस तर, माझं प्रेम अजून वाढेल ना..."
माझे गाल ओढत विक्रम डोळे मिचकावत मला बोलला, त्याचे हे शब्द मला त्रास देऊन गेले...म्हणजे विक्रमचं प्रेम माझ्या सुंदरतेशी जोडलं आहे का? आणि हे काय की तू फक्त घरात लक्ष दे? मला का नाही कळू शकत कायद्याच्या गोष्टी? मी बाहेर जात नाही, नोकरी करत नाही किंवा मोठ्या पदावर नाही म्हणजे मी अडाणी नक्कीच नाही..मी पण विक्रम इतकीच शिकलेली आहे, मला संधी मिळाली आणि मी प्रयत्न केले तर मी पण कदाचित त्याच्या ठिकाणी पोहचू शकते...पण....पण मी एक मुलगी आहे आणि त्यातल्या त्यात विक्रम सारख्या पुरुषाची सहचारिणी आहे म्हणून मला काहीही कळत नाही...हं...'सहचारिणी', सोबत चालणारी...हसू येत स्वतःवर...विक्रमने मला कधीच बरोबरीच महत्त्व दिलंच नाही तर कशाची 'सहचारिणी' मी त्याची...तो त्याच्याच वेगात पुढे जात होता, आणि मी मात्र कुठेतरी खूप लांब, खूप मागे आहे त्याच्यापासून हे त्याने वळून पाहिलंच नाही..त्याचे थोडेसे शब्द मला खुप काही विचार करायला भाग पाडत होते....
"नैना...नैना...चल लवकर उशीर होतोय...नको तेंव्हा काय विचार करत राहते काय माहीत..."
विक्रम माझ्या आवाजने ओरडत होता..मी लगेच जाऊन गाडीत बसली त्याच्यासोबत....आज विक्रम मला ज्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रवास करत होता ते खरं तर माझं गंतव्य नव्हतं...तो माझा आरंभ होता जिथून माझी खरी सुरुवात होणार होती..
-----------------------------------------------------
विक्रम मला त्या ठिकाणी सोडून, ढीगभर सूचना देऊन निघून गेला...भंडारा सिटीपासून काही किलोमीटर अंतरावर जुने पडके पोलीस क्वार्टरस होते, जिथे काही मुली काही स्त्रियांना ठेवल्या गेलं होतं... कोणी अनाथ होत्या, कोणाला नवऱ्याने घराबाहेर काढलेले होतं, कोणाचं कुटुंब नक्षलवाद्यावे उध्वस्त केलं होतं तर कोणी नराधमी, लचके तोडणाऱ्या पुरूषांच्या केलेल्या कृत्याने पिडीत होत्या...तिथे गेल्यावर मी एका अधिकाऱ्याची बायको म्हणून मला सगळ्यांनी अदबीने ओळख करून दिली, खूप प्रेमाने त्यांनी माझं स्वागत केलं...पण कुठेतरी मनात एक सल उठत होती की काय फरक आहे यांच्यात आणि माझ्यात?? त्यांच्या तुलनेत माझ्याकडे चांगले कपडे असतील घालायला, खर्च करायला पैसे असतील, फिरायला गाडी असेल, पोटभर जेवायला असेल, थोडक्या शब्दांत भौतिक सुखं सगळीच असतील माझ्याकडे... पण माझ्याही आयुष्याची लगाम दुसऱ्याच्याच हातात आहे, माझं माझ्याकडे काय आहे??? इथे राहणाऱ्या स्त्रिया, मुली गरीब वाटत असल्या तरी अभय सरांनी त्यांना त्यांच्या जाचातून काढून मुक्ती दिली आहे, पण मी मात्र अजूनही बंदिनीच आहे....
तिथे गेल्यावर कळलं की या सगळ्यांची सुरुवात अभय सरांनीच केली आहे, त्यांनीच पुढाकार घेऊन सगळ्या परमिशन घेऊन स्वखर्चाने हे सगळं केलंय... डिपार्टमेंटचा प्रत्येक कर्मचारी आपल्या सोयीने या उपक्रमला हातभार लावतो... मला फार कौतुक वाटलं या सगळ्यांच...पहिला दिवस होता त्यामुळे मी फक्त सगळ्यांची ओळख करून घेण्यातच वेळ घालवत होती.. कोणाची दुःखद कहाणी ऐकून मन भरून यायचं तर कोणी त्यावर मात करून त्याच्यातून कस बाहेर पडलं हे ऐकून चांगलही वाटायचं...हे सगळं करत असताना संध्याकाळचे पाच वाजले.. मी विक्रमची वाट पाहत तिथे बाहेरच असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बेंचवर बसली होती, तेवढ्यात...
प्रफुल्लित झाले आज मन,
इंद्रधनूच्या छटा अनुभवूनी।
बंदिस्त असलेले कोमल पक्षी,
का बरे पडले बाहेर घरट्यातूनी?
कोणाचा आवाज आहे म्हणून मागे वळून पाहिलं तर अभय सर उभे होते..त्यांना पाहून आधी तर मला ओशाळाल्यागत झालं, कारण जेंव्हा ही आम्ही भेटलो मी त्यांना काय काय बोलून गेली...विचार केला आता संधी चांगली आहे, त्यांची माफी मागून घेते आणि त्यांनी मला जे मदत केली त्यासाठी त्यांना धन्यवाद ही करून देते, माझ्या वागणुकीवरून त्यांनी विक्रमला काही करू नये हा बालिश विचार करून मी पुढे सरसावली...,
"सर, तुम्ही...ते मी...सॉरी, म्हणजे ना मला ते..." मी भांबावून शब्दांची जुळवाजुळव करत असताना ते मात्र हाताची घडी घालून, राग चेहऱ्यावर आहे या अविर्भाव आणून माझ्याकडे पाहत होते...मला मात्र भीती वाटत होती की हे कदाचित आज राग काढतील माझ्यावर...
"सॉरी तर तुम्हाला फील करायलाच पाहिजे ना नैना..."
त्यांच्या कणखर आवाजात ते बोलले...आता मला मात्र त्यांच्याकडे पहायची ही हिम्मत नव्हती..
"पण मला माहित नव्हतं ना तुमच्याबद्दल, तुम्ही पण तर सांगितलं नाही.." मी जरा चाचरतच उत्तर दिलं...
"मग आता माहीत झालं ना? तुला माहीत आहे, एका IPS अधिकाऱ्याचा अपमान केल्याबद्दल मी तुला शिक्षा ही करू शकतो..."
"माफ करा ना मला प्लिज, मला माहीत नव्हतं...आणि हो जर काही शिक्षा करायचीच असेल तर मला करा, माझ्यामुळे विक्रमला त्रास नका देऊ..." मला सकाळच विक्रमचं बोलणं आठवलं....
"हम्म...शिक्षा तर द्यायलाच पाहिजे... चल माझ्यासोबत.."
आता मात्र मला दणाणून घाम फुटला, मला वाटलं अभय सर नक्कीच खुप रागावले असतील माझ्यावर...
"मी...मी एकदा विक्रमला सांगू का तुम्ही मला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जात आहेत...त्यांना माहीत नाही.."
"एक चहा घेण्यासाठी पोलीस स्टेशन ला जायची काय गरज आहे, तो तर इथल्या कॅन्टीन मध्ये ही मिळतो🤣🤣"
"हूं...काय? तुम्ही पण ना...घाबरवलं ना मला..."
"मला वाटलं इथे एकटी बसण्यापेक्षा कॅन्टीन मध्ये जाऊन चहा घेऊ...आणि मी तुला काय घाबरवणार ग, DySP ची बायको तू..मीच घाबरायला पाहिजे..😜😜"
"आता हे जास्त होतंय हं तुमचं...स्वतः SP आहेत अन पोलिसाला घाबरतो म्हणे 😏😏"
"पोलिसाला नाही पण बायकोला सगळेच घाबरतात... विक्रम पण घाबरत असेल ना??"
एक तिरकस नजर माझ्यावर टाकून त्यांनी विचारलं मला,
"तुम्ही पण घाबरत असणार ना...?" मी पण सरळ उत्तर दिलंच नाही..."
"मी घाबरतो की नाही हे बायको असल्यावर कळाल असत ना मला....बरं, आता येणार आहेस चहा घ्यायला की खरच केस ठोकू तुझ्यावर😜"
"आता तर यावच लागेल...मी पण घाबरली यावेळेस एक पोलिसाला..😂"
मी अभय सर कॅन्टीनमध्ये जाऊन बसलो...त्यांचं बोलणं, वागणं, इतकं सहज होतं की अस वाटतच नव्हतं ते इतके प्रतिभावंत असतील...कुठलाच अहंकार नाही, शेरेबाजी नाही किंवा दिखाऊपणा नाही...मी विचार केला अभय सरांनी केलेलं काम जर विक्रमने केलं असतं तर त्याने किती गवगवा केला असता मोठेपणाचा...
"काय झालं, काय विचार करत आहेस? काळजी नको करू तुझा नवरा यावेळेस येईल तुला घ्यायला नक्की😜"
"यावेळेस म्हणजे? मागच्या वेळी पण येणारच होते घ्यायला पण त्याआधीच तुम्ही मला घरी सोडलं.."
मी विक्रमची बाजू घेत बोलली...
"वा....हीच आपली संस्कृती !! नवऱ्याबद्दल फक्त चांगलंच बोलायचं..."
"नाही असं काही नाही, तुमच्या बद्दल ही चांगलं आहे बोलायला माझ्याकडे...कोणीतरी म्हणतं प्रेम आणि कार्य ही आपल्या माणुसकीची कोनशिला आहेत..आणि हे तुमच्या इथल्या कार्यातून दिसून येते..."
"हो का...आणि अस कोण म्हणतं...??"
"सिगमन फ्राईड..."
"हम्म...तर तुमचे सिगमन फ्रायड हे पण म्हणतात की जेव्हा माझ्यावर टीका केली जाते, तेव्हा मी माझा बचाव करू शकतो, परंतु स्तुतीविरूद्ध मी शक्तीहीन आहे...त्यामुळे नैना मॅडम माझी स्तुती मला आवडत नाही..."
"ठीक आहे स्तुती करत नाही, पण जे खरं आहे ते आहे हे जे काम तुम्ही करताय ते खरच खूप ग्रेट आहे...तर मग मला यात थोडा हातभार लावता येईल एवढी तरी परमिशन आहे ना तुमची..."
"चांगल्या कामासाठी कोणत्याच परमिशन ची गरज नसते नैना...सगळं तुझंच आहे, कधीही येऊन सुरू कर काम.."
आणि आम्ही बोलत असताना विक्रमचा फोन आला..तो मला बाहेर घ्यायला आला होता, माझी वाट पाहत होता..एका क्षणासाठी इच्छा झाली की त्यालाही बोलावावं इथेच पण मला त्याचा अभय सरांबद्दल राग दिसला होता त्यामुळे मी ते टाळलं आणि तसही त्यांचं नातं फक्त कामाचं होत , ते कस आहे हे मला माहीत नव्हतं...त्यामुळे त्याच्यात माझ्यामुळे काही ढवळाढवळ व्हावी ही माझी इच्छा नव्हती....
"सॉरी सर..मला निघायला हवं..विक्रम बाहेर वाट पाहतायेत..."
"हे डायरेक्ट सर वैगरे नको बोलू ग, भांडायलाच छान वाटतं तुझ्यासोबत..तू सर बोलली तर मी नाही भांडू शकणार ना😀"
"ठीक आहे भांडतांना सर म्हणणार नाही...आता जाऊ...आणि अजून एक हा पक्षी बंदिस्त घरट्यातला जरी असला तर नाजूक आणि कोमल अजिबात नाही..वेळ आल्यावर कणखरपणा ही दाखवू शकतो...."
"ते आम्ही कधीच ओळखलं होतं..."
आणि अभय सरांनी मला बाय केलं..आजचा दिवस खरच खूप काही देऊन गेला होता मला..आणि आता खात्री होती मला की येणार प्रत्येक दिवस मला काही ना काही शिकवूनच जाणार..नकळतपणे माझी आणि अभय सरांची मैत्री ही रंगणार होती...पण या सगळ्यांचा माझ्या आणि विक्रमच्या नात्यावर काय परिणाम होणार होता याची कल्पना नव्हती मला.....
--------------------------------------------------------
क्रमशः