सोचा ना था ये कहाणी,
ऐसा भी रंग लायेगी ।
छोटी सी एक मुलाखात,
इतना गहरा रिश्ता दे जायेगी।
काही वेळा अनावधानाने भेटी घडतात, असं वाटतं आता भेटल्यावर पून्हा कुठे आपण या व्यक्ती ला भेटणार आहोत? जेंव्हा काहीही विचार न करता, काहीही न ठरवता आपण जेव्हा आपले मार्ग एकाच व्यक्तीच्या मार्गावर जातात तेंव्हा समजायचं काहितरी नक्कीच घट्ट नातं तयार होणार आहे आपलं त्याच्यासोबत.... माझंही तेच झालं...
विक्रमचं आणि माझं नातं हे विधिलिखित होतं हे मी नाही बोलणार, कारण विक्रमने सगळं काही प्लॅन करून मिळवलं होतं...नाव, चांगली नोकरी, चांगलं पद, आणि त्यानंतर मी...मला शरीराने मिळवलं त्याने पण माझं मन त्याच होईल अशी काही प्लॅनिंग केलीच नाही त्याने...मी प्रयत्न केले...जबरदस्ती...पण जेव्हा जेव्हा माझा मान त्याच्या पायाखाली तुडवल्या गेल्या तेंव्हा माझे हे जबरदस्तीचे प्रयत्न कमजोर पडायचे...आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे माझा आत्मविश्वास कमी व्हायला लागला, मला वाटायला लागलं की मी काहीच करू शकत नाही आयुष्यात.... पण आता हे सगळं बदलणार होतं, त्या एका छोट्याश्या अपघाताने मला माझ्या आयुष्यातील प्रेरणा दिली होती...मला घडवणारा गुरू दिला होता...
त्या दिवशी मला अचानक सगळं दिसेनासं झालं आणि अंधारी येऊन मी पडली...पाच मिनिटांने जेंव्हा माझ्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब पडले तेंव्हा थोडे डोळे उघडायाची हिम्मत झाली...डोळे उघडल्यावर जेंव्हा पाहिलं, चेहरा ओळखीचा वाटत होता,
“ओ मॅडम...माझा आवाज ऐकू येतोय का?? दिसतोय का मी??”
आता सगळं स्पष्ट दिसायला लागलं मला, आणि त्याला पाहून मी खाडकन उठून बसली...
“तुम्ही..???” मी आश्चर्यचकित झाली कारण अभय उभा होता....
“हो मी..!! प्रत्येक वेळी तुला मीच सापडतो का ग??? नागपूर सोडून इथे ही माझ्या मागे आलीस....ते बरं मी वेळेवर ब्रेक लावले गाडीचे, नाहीतर आज तू आरामात गेली असती वर आणि मला सासुरवाडीचा पाहुणचार झाला असता चांगलाच🙄🙄...”
“तुम्ही इथे कसे?? तुमचं सासर आहे का इथे....??🤔”
मी आपलं सहज म्हणून विचारलं...
“कसं व्हायचं तुझं..🤦..माझ्या गाडीने तुला काही झालं असतं तर मला जेल मध्ये जावं लागलं असतं ना, त्या सासुरवाडी बद्दल बोललो मी😂😂” आणि तो नेहमीसारखा खो खो हसत सुटला....
“ठीक आहे मी....सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला...आणि हो मला माहित असतं की तुम्ही पण आता इथे आले आहेत तर, पाच मिनिटं थांबून चक्कर येऊन पडली असती...तुम्हाला त्रास नसता दिला😏”
“अरे वा..!! असं प्लॅन करून चक्कर येणं थांबवता येत?? किती खराब जोक मारला ना तू...”
“सुरुवात तुम्हीच केली होती...व्हा बाजूला मला निघायचं आहे...” मी बोलली असं पण माझ्यात उभं राहण्याचे त्राण नव्हते,
“नको तेंव्हा झाशी ची राणी अंगात का येते मुलींना मला ते कळत नाही...मी सोडतो तुला घरी...”
“नको...कशाला तुम्हाला त्रास उगाच...जाईल मी...”
“आता एवढा त्रास दिलाच आहेस तर अजून थोडा दिला तर काही फरक पडत नाही, आणि जर माझ्यासोबत येण्याची भीती वाटत असेल तर, घरी फोन कर तुझ्या, ते येतील तोपर्यंत थांबेल मी इथे.....”
रस्त्यावर किती वेळ उभं राहायचं म्हणून मी आणि अभय जवळच्या कॉफी शॉप मध्ये बसलो... मी विक्रमला फोन करत होती पण त्याने माझे फोन उचलले नाही...मला वाटलं तो कामात असेल आणि पुन्हा त्याला फोन केला तर त्याने माझं काहीही न ऐकता बिझी आहे म्हणून फोन बंद केला...आता माझी काही इच्छा झाली नाही त्याला फोन करण्याची...
“मी निघते...मला उशिर होतोय...” मी अभयला बोलली
“अग पण एकटी कशी जाशील, तुझ्या घरचे नाही येनार का?? फोन केलास ना तू...”
“हम्म...”
“काय झालं? काही प्रॉब्लेम??”
“काही नाही...निघते मी..”
मला खूप दुःख झालं होतं विक्रमच्या वागण्याचं, भरून आलं होतं, माझे अश्रू अभय समोर बाहेर पडू नयेत याची काळजी मी घेत होती...आणि त्यामुळे स्वतःला सावरत मी जायला निघाली, तेवढ्यात...
शुभ्र आशेच्या आभाळावर,
मळभ असे का दाटूनी यावे?
मेघांविना सरी बरसल्या,
याला कारण काय असावे??
मी वळून बघितलं तर अभय माझ्याकडे पाहत होता, त्याचं बोलणं कळलं मला, मी डोळ्यांनेच त्याला इशारा केला काय झालं म्हणून, तर बोलला.....
“काही नाही ग, ते मी कविता करत असतो कधी कधी, सुचतात असंच.... तुला नाही आवडत का???”
त्याने असं बोलल्यावर मला रडू अनावर झालं, मला वाटत नव्हतं की मी एकटी घरी जाऊ शकेल...माझं अवस्था त्याने ओळखली आणि मला बोलला,
“मी सोडतो ग तुला घरी, काळजी नाही करायची...छोटंसं आयुष्य आहे त्यातले पण दहा मिनिटे तू रडण्यात घालवले, चल आता, नाहीतर अजून कोणाच्या तरी गाडी समोर येऊन धडकायची तू😂😂...”
काही काही लोकांचं व्यक्तीत्त्व इतकं निर्मळ असतं की ते त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून झळकतं, त्यांना जास्त पारखायची गरज पडत नाही.....चार पाच भेटीत मी एवढं तर ओळखलं होतं की वायफळ बडबड करणारा असला तरी अभय मनाने खूप साफ आहे...अगदी अनपेक्षितपणे आम्ही भेटत होतो आणि प्रत्येक वेळी त्याने माझी मदतच केली होती...कुठे मी हा विचार केला होता की पुन्हा याला भेटणार नाही आणि पून्हा पुन्हा माझं नशीब मात्र आमची भेट घडवत होतं...फक्त मला चेहऱ्याने ओळखत होता अभय, तरी माझी मदत करायला मागेपुढे पाहत नाही आणि विक्रम सोबत तर आयुष्यभराची गाठ आहे माझी मग का तो असा वागत असावा माझ्यासोबत...?? ह्या सगळ्या विचारात असताना अभय बोलला....
“मॅडम, या ड्रायव्हर ला पत्ता सांगा तुमच्या घरचा..आणि काय ग, मला तर नेहमीसाठी बाय करून गेली होतीस ना, मग माझ्या मागे मागे इथपर्यंत आलीस, इतका ही हँडसम नाही आहे हं मी😜😜🤣🤣”
“तुम्हाला कंटाळा नाही येत का एवढी बडबड करून, एकमेकांना ओळखतो किती आपण??? आणि काहीही अंदाज बांधता माझ्याबद्दल...”
“हम्मम...बरोबर, ओळख नाही....करायला पाहिजे ना....मी अभय...तुझं नाव सांग आता....”
“नैना...तुमचं नाव माहीत आहे मला... ”
“माझं नाव कस माहीत तुला🤔, ओहहह नो, आता कळाल, पोलिसाची बायको ना तू, माझी जासुसी करते...कसं व्हायचं, आमच्या सारख्या सामान्य नागरिकांच...😮😮”
आता मात्र अभयची बडबड ऐकून हसायला आलं मला, विक्रम मुळे जी निराशा दाटून आली होती ती आता थोडी थोडी दूर व्हायला लागली होती....
“तस नाही, माझ्याकडे तुमचं ते टी...”
मी काही बोलनार तेवढ्यात विक्रमचा मला फोन आला, मी त्याला बोलली माझ्यासोबत काय झालं हे सांगायचं टाळलं
कारण मी विचार केला घरी जाऊनच त्याला सगळं सांगेल, नाहीतर पुन्हा काहीतरी गैरसमज करून तो रागवेल मला....आम्ही घरी पोहोचलो, तर विक्रम बाहेरच उभा होता, कदाचित तो पण नुकताच ऑफिस मधून येत असावा....मी कोणाच्या गाडीतून उतरली याचा विचार आणि राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता...रागातच तो माझ्याजवळ आला आणि बोलला,
"कुठे गेली होती मला न सांगता आणि हे कोणासोबत आली आहेस?? बोल..."
त्याचा राग पाहून मला काही सुचत नव्हतं तेवढ्यात आवाज आला...
"कुठे गेली होती ते नाही माहीत, पण माझ्यासोबत आली आहे तुमची वाईफ ऑफिसर...." मी मागे वळून पाहिलं तर अभय गाडीतून उतरला होता...
"सर..तुम्ही इथे...काय झालं काही प्रॉब्लेम?? नैना ने काही केलंय का?"
"नाही विक्रम, काहीही झालं नाहीये पण झालं असतं जर मी ब्रेक लावले नसते तर...तुमची वाईफ भर रस्त्यात चक्कर येऊन पडली तेही माझ्या गाडीसमोर... ते बरं मी होतो तिथे..नाहीतर गुन्हे करून पळून जाणारे आणि पळून जाऊ देणाऱ्यांनाशी तर तुम्ही चांगलेच परिचित आहेत ना..हो ना ऑफिसर??"
हे काय सुरू होतं मला काहीच कळत नव्हतं..म्हणजे अभय आणि विक्रम एकमेकांना ओळखतात...आणि अभयचं असं विक्रमला खोचक बोलणं मला आणि विक्रमला कळत होतं..शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात ना तशीच विक्रमची अवस्था वाटत होती त्याचा चेहरा पाहून...पण तरीही अभयच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विक्रम मला बोलला...'
"लागलं तर नाही ना तुला नैना?? ठीक आहेस ना...? तस अभय सरांच्या गाडी समोर आली म्हणजे मला चिंता करायची गरज नाही म्हणा...प्रामाणिकपणे चे शिलेदार आहेत ते....शहराचा असा एसपी असल्यावर कोणाला काय भीती, बरोबर ना सर..?"
हे ऐकल्यावर आता मला कळलं की अभय सर नेमके आहेत कोण...म्हणजे नागपूरला माझ्या कॉलेजमध्ये जे मला भेटले होते ते एक IPS होते, ज्यांना ऑटोसाठी मी भांडली, शर्ट साठी ज्यांच्या सोबत मी वाद घातला आणि आज पण ज्यांनी मला मदत केली ते अभय सर विक्रमचे नवीन एसपी आहेत...मी कस चुकीचं समजलं त्यांना म्हणून मला माझा राग आला...मी त्यांच्याकडे पाहून हळूच कान पकडून माफी मागितली तर त्यांनीही डोळ्यानेच सगळं काही ठीक आहे म्हणून सांगितलं...
"बरं.. ठीक आहे, मला उशीर होतोय, निघायला हवं...आणि हो विक्रम...तुमच्या मॅडमला घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर बोलले स्ट्रेस आहे त्यांना खूप.. त्यामुळे थोडं लक्ष द्या त्यांच्या कडे...त्यांना हवं ते करू द्यावं असं मला आणि अर्थातच डॉक्टरांना वाटलं..बाकी तुमचा घरगुती प्रश्न आहे, बघा काय करायचं...निघतो मी..."
असं बोलून अभय सर निघून गेले, ते गेल्यावर मात्र मला जाग आली की त्यांनी मला इतकी मदत केली आणि मी साधा चहा ही विचारला नाही त्यांना...आणि जाताना मात्र अजून एकदा मला बुचकळ्यात टाकून गेले...मी विचार करत होती की आम्ही कधी गेलो हॉस्पिटलमध्ये, कोणत्या डॉक्टर बद्दल हे बोलले...आणि माझा स्ट्रेस यांना कसा कळला, पण विक्रमला हे सगळं सांगू शकत नव्हती...
"घरात बसून तुला कोणता स्ट्रेस आला ग?? आणि तुला असं एकटीला बाहेर पडायची काय गरज होती...मला एक फोन केला असता तर गाडी पाठवली असती मी....तू पण ना उगाच कामं वाढवून ठेवते..."
विक्रम असं बोलल्यावर मला ते असहनिय झालं, खूप वेळा आपण गप्प बसतो हा विचार करून की समोरचा तामसी असेल तर आपण शांत राहायला हवं.. पण आपल्या मजबुरी ला जेंव्हा मंजुरी समजण्यात येते तेंव्हा मात्र बोलावं लागतं... हाच विचार करून मी बोलली,
"मला हौस नाही विक्रम स्वतःला आणि तुम्हाला त्रास देण्याची...पण तुम्ही हे का नाही समजून घेत की दिवसभर या बंगल्यात कंटाळते मी, तुम्ही घरी नसता, कधी कधी रात्री ही उशिरा येता किंवा येत ही नाही, मला भीती वाटते, मी नाही राहिली कधी एकटी अशी...माझं जॉब करणं तुम्हाला आवडत नाही, मग मी काय करायचं?"
"तुला जॉब करायची गरज काय आहे पण..मी कुठे कमी पडतो तुझ्यासाठी... आणि बाहेर लोकं चांगले नसतात, त्यात तू एक DYSP ची बायको आहेस हे विसरू नको..कितीतरी गुन्हेगार असतात माझ्या पत्यावर, त्यामुळे मी तुला एकटीला कुठे जाऊ देत नाही..."
"मग तुमच्या सोबत घेऊन जात ज मला, मी नाही राहणार आता एकटी..." आता माझा जीव रडकुंडीला आला होता..
"बरं एक काम करतो... माझ्या डिपार्टमेंट चा एक उपक्रम आहे, इथे दुर्गम भागातल्या मुलींना शिकण्याचा..सगळ्या लेडीज असतात तिथे, मी बोलतो उद्या तुझ्यासाठी..आणि हो ड्रायव्हर आणि गाडी तुझ्या सोबत असेल नेहमी, दुसरी गोष्ट ही की ते करत असताना उगाच खूप मोठं काम करते म्हणून हवेत उडायच नाही आणि माझ्याकडे किंवा माझ्या कामाकडे दुर्लक्ष करायचं नाही..."
खरं तर विक्रमने मला एवढी परवानगी दिली त्यातच मी खूप खुश होती, माझ्यासाठी आभाळ चार बोटांवर राहील आहे असं वाटत होतं......पण तेंव्हा हा विचार केला नाही की मला काहीही करण्यासाठी विक्रमची परवानगी लागत होती...म्हणजे मी बंदीस्त होती कुठेतरी...विक्रम नवरा आहे म्हणून त्याच्यासोबत कोणती चर्चा करणं, त्याचे विचार जाणून घेणं किंवा त्याचं मत विचारणं ही वेगळी गोष्ट, पण जर मला त्याची परमिशन लागत असेल तर नक्कीच या नात्यात मी दबत आहे...त्यावेळेस हे सुचलं नाही किंवा माझे विचार तेंव्हा तितके प्रगल्भ नसतील अस वाटायचं मला...पण खरं तर हे आहे की तेंव्हा माझी खरी ओळख मलाच झाली नव्हती...
पण आता सगळं बदलणार होतं, एका नव्या नैनाचा जन्म होणार होता...हे सगळं खूप सोप्प अजिबात नव्हतं, त्यासाठी मला माहित नाही कित्येत वादळांचा सामना करावा लागणार होता...आणि या सगळ्या गोष्टींना चार हात करण्यासाठी मला शिकवण देणारा ही मला भेटणार होता, कदाचित भेटला होता...
---------------------------------------------------------------
क्रमशः