अति का भला न बोलना, अति की भली न चूप....'मुलींनी जास्त बोलू नये' हे जस शिकवल्या जात तस 'मुलींनी जास्त सहन करून शांत ही राहू नये' हे का शिकवल्या जात नाही?? आणि जर कधी सहन न करता राग व्यक्त केला तर लगेच 'संस्काराचे प्रमाणपत्र' वाटायला तयार सगळे....मला तर एकच कळतं, 'राग' हा संस्काराचा भाग नाही, ती एक भावना आहे ज्याला आपण व्यक्त करून वाट मोकळी करून देतो....प्रेम, मोह, दुःख, आनंद जश्या ह्या भावना आहेत तसच 'राग' ही एक भावनाच आहे...बरं मग जर ती भावना खराबच आहे तर ती सगळ्यांसाठीच खराब असायला हवी ना? की भावना पण स्त्री पुरुष भेदभाव करायला लागल्या....कधी कधी आपल्या हक्कासाठी, आपल्या आयुष्यासाठी राग ही व्यक्त करावा लागतो, आणि मी तेच केलं होतं...आता अस वाटते तो राग जर मी व्यक्त केला नसता तर आज एवढं यश मिळवलं नसतं...आणि हे सगळं करण्यासाठी माझ्यात हिम्मत आली कुठून??? तर त्याच एकच उत्तर आहे....'अभय'...
त्या दिवशी विक्रम कडून एक छोटी अपेक्षा मी केली होती आणि त्याने ती गोष्ट 'जगरीत' म्हणून खूप सफाईने टाळली होती, आणि त्यात माझी एवढी हिम्मत ही नव्हती की मी त्याला पुन्हा त्या विषयावर बोलू...दुसऱ्या दिवशी विक्रम परत जाणार होता, आता त्याची आणि माझी भेट लग्नातच होणार होती, त्याने मला भेटायची ईच्छा दाखवली पण या दोन दिवसांत अस काही घडलं होतं की मला त्याला बोलायची ईच्छा नव्हती, तर भेटणं तर दूरच...त्यामुळे मी पण बहाना केला की मला लग्नाच्या आधी कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिट कार्ड घ्यायचं आहे कारण लग्नानंतर लगेच परीक्षा असणार होती... मला वाटलं नव्हतं की तो ही गोष्ट मान्य करेल पण त्याने काहीही हरकत दाखवली नाही...
खर तर मी पण हा विचार केला की मला नंतर वेळ मिळणार नाही त्यामुळे कॉलेजचे कामं उरकून टाकते...त्यादिवशी शनिवार होता, माझं काम करून मी बाहेर जायला निघाली तर मला दिसलं की कॉलेज च्या ऑडिटोरियम काहीतरी कार्यक्रम सुरू आहे...साहित्य संमेलन असावं कदाचित...मी जाऊन बॅनर पाहिलं तर खरच अमृता प्रीतम यांच्या कविताही वाचून दाखवल्या जाणार होत्या...अमृता प्रीतम यांच्या कविता किंवा कादंबऱ्या माझा जीव की प्राण.... मला पहायची इच्छा झाली पण माझ्याकडे पास नव्हता किंवा काही तिकिट नव्हतं त्यामुळे वाचमन मला आत सोडत नव्हता, मी माझं कॉलेज च आयडी दाखवला तरी सोडत नव्हता, आणि माझा मात्र केविलवाणा प्रयत्न सुरू होता आतमधे जाण्याचा, शेवटी तो वाचमन मला रागावला आणि मला प्रिन्सिपल कडे घेऊन जायची धमकी द्यायला लागला.....माझ्या कधीच कोणत्या तक्रारी घरी गेल्या नाहीत त्यामुळे मी घाबरली आणि त्यात माझा स्वभाव तर असा की कोणी उंच आवाजात जरी बोललं तरी डोळ्यातून पाणी झिरपतं....तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला, मी मागे वळून बघितलं तर साधारण तिशीतलं एक रुबाबदार व्यक्तीमत्व माझ्यासमोर उभं होत...
"किती शोधलं तुला? किती विसरभोळ असावं माणसाने? हे बघ पास माझ्याजवळच सोडून आलीस ना तुझा?"
त्याला बघताच वाचमनने एक सॅल्युट ठोकला पण मला काहीच कळत नव्हतं काय चाललंय,
"मी..ते मी..म्म्म माझा पास...नाही" मला तर काय बोलावं काही कळत नव्हतं त्यात तो वाचमन डोक्यावर नाचत होता,
"अरे सर, ये लडकी ने बहोत परेशान किया मेरेको, ये आज कल के बच्चे बहोत बिगडे हुये है, इनको प्रिन्सिपल के पास ही लेके जाना पडता..."
"कायको लेके जाना पडता तिवारी? पास है ना उसके पास, भूल गयी रे वो...जाने दो उसको, मेरी पहचान की है..."
"ठीक है सर, आप बोलते तो जाने देता, वैसे भी अभी खतम होणे को आया आपका प्रोग्राम, बचे हुये पंधरा मिनिट मे क्या कविता सुनगी ये...जा बेटा तू...."
तो अस बोलताच माझा जीव भांड्यात पडला आणि मी त्यातून सुटका झाली म्हणून मी पळायला सुटणार तेव्हढ्यात मला आवाज आला पुन्हा,
"अग ये....पास तर घेऊन जा, की पुन्हा रडून तुला तुझ्या डोळ्यांना त्रास द्यायचा आहे 😝😝...."
आणि त्यावर तो व्यक्ती आणि वाचमन दोघेही हसत सुटले, मला मात्र फार ओशाळाल्यागत झालं....किती पागल माणूस हा! ओळख नाही पाळख नाही आणि येऊन असा बोलत होता जसा खूप जवळचा आहे माझा, मला जरा ते विचित्र वाटलं पण शेवटचे पंधरा मिनिटं ही भेटले म्हणून मला आनंद होत होता...मी त्याच्याकडून पास घेतला आणि न पाहताच बॅगेत टाकला पण घाईघाईत तो कोण आहे, त्याच्याजवळ पास कसा होता किंवा वाचमन त्याला का घाबरला हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.....
कार्यक्रम संपत आला होता अगदी शेवटची कविता सुरू होती त्याआधी सूत्रसंचालकाने त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची इतकी स्तुती केली होती आणि विशेष म्हणजे ते माझ्याच कॉलेज मध्ये शिकले होते आणि आता एक यशस्वी आईपीएस म्हणून काम करत होते...मला खूप इच्छा आणि उत्सुकता होती त्यांना पाहण्याची पण मला बाबांचा फोन आला, तिथे बोलता येणार नव्हतं म्हणून मी बाहेर येऊन बोलली पण जोपर्यंत आतमध्ये जायची वेळ आली तोपर्यंत सगळा कार्यक्रम संपला होता...शेवटची कविता ऐकता आली नाही आणि ज्या व्यक्तीबद्दल एवढं ऐकलं, जो माझ्याच कॉलेजमध्ये शिकला त्याला पाहता आलं नाही म्हणून खूप वाईट वाटलं मला पण त्याचा काही फायदा नव्हता...तो दिवसच माझ्यासाठी कटकटीचा होता अस वाटत होतं मला, कारण घरी जायला निघाली तर माझी बस निघून गेली आणि त्यात ऑटोही सापडत नव्हता....माझी मात्र चिडचिड होत होती, तेवढ्यात एक ऑटो सापडला तर त्यातही ज्याने मला पास दिला तो व्यक्ती माझ्या आधीच येऊन बसला, आता मला राग आला,
"हे बघा मी आधी ऑटो थांबवला आहे त्यामुळे मला बसायचं आहे..."
"हो, पण मी आधी बसलो ना, त्यामुळे मी जाणार आधी...."
"अरे काय जबतदस्ती आहे ही? मी बोलली ना मला जायचं आहे आधी करून?"
"माझ्याजवळचा पास घेताना नाही वाटली जबरदस्ती तुला?? भलाई का तो जमाना ही नही..."
"त्या पासचे पैसे देऊन देते तुम्हाला मी, चांगलं ओळखते तुमच्यासारख्या लोकांना मी, आधी मुलींना मदत करायची, मग ओळख करायची आणि त्यानंतर त्यांचा फायदा घ्यायचा, विक्रम बरोबर बोलतो, कोणावरही विश्वास नाही करू शकत या जगात...."
"अरे हो हो! दम घे जरा, मी तुला थोडी मदत केली आणि तू तर माझ्यावरच काहीही आरोप करत आहे यार....ओळखते किती तू मला?"
"का? आता थोड्यावेळेपूर्वीच तर खूप चांगली ओळख दाखवली ना तुम्ही? विसरले का?"
"हे पहा, तुमचं भांडून झालं असेन तर एक सुचवतो, जर तुम्हाला एकाच रस्त्याला जायचं असेल तर मी सोडू शकतो,?" ऑटोवाला आमच्या भांडणाला कंटाळुन बोलला,
"वर्धा रोड..."मी बोलली, आणि त्याच्या उत्तराची वाट पाहत त्याच्याकडे पाहिलं..
"जहाँ आझाद रुह की झलक पडे समझना वह मेरा घर है।😂😂" तो मिश्कीलपणे बोलला पण तो अस बोलताच माझी तळपायाची मस्तकात गेली,
"कॉपी करून पेस्ट केलेले शेर बोलून झाले असतील तर उत्तर द्या पटकन, उशीर होतोय..." मी चिडून बोलली..
"तिकडेच जायचं आहे, छत्रपती चौकात..चला लवकर" त्यानेही चिडतच उत्तर दिलं....
आम्ही ऑटोत बसताच त्याची काहितरी चुळबूळ सुरू झाली, काय शोधत होता काय माहीत... ऑटोवल्याला त्याने ऑटो मागे घ्यायला लावला त्याच काय हरवलं ते शोधण्यासाठी पण मी त्याला विरोध केला,
"आपल्या वस्तू ही ठेवता येत नाहीत व्यवस्थित, किती तो बेजबाबदारपणा... हं...आता अजून टाईमपास चालेल याचा आणि मला उशीर होईल जायला" मी तोंडतल्या तोंडात पुटपुटली पण त्याने मात्र ऐकलं,
"जाऊद्या चला, काही शोधायचं नाही मला, मी एवढाही बेजबाबदार नाही की एखाद्या मुलीला माझ्या कामासाठी वाट पाहायला लावू....चला..."
"अरे, पण तुमचं काहीतरी हरवलं ना?" मी बोलली,
"जाऊदे, संध्याकाळ झाली, तुला उशीर होईल ...माझं काही एवढं महत्त्वाचे नाही...."
मी हिम्मत तर केली जायची एका अनोळखी व्यक्तीसोबत पण मला भीती वाटत होती, त्यामुळे मी उगाच विक्रमला फोन केला...त्यालाही आश्चर्य झालं की मी स्वतःहून कसा फोन केला, त्याने विचारलं कोण आहे सोबत तर मी खोट सांगितलं मैत्रीण आहे कारण खर सांगितलं असत तर तो चिडला असता, त्याच्यासोबत मोजकेच बोलून मी फोन ठेवला,
"बॉयफ्रेंड ला अस खोट नाही बोलायला पाहिजे.." तो बोलला,
"मी काहीही बोलेल तो माझा प्रश्न आणि हो बॉयफ्रेंड नाही, होणारा नवरा आहे माझा, DySP आहे त्यामुळे तुम्ही जास्त आगाऊपणा नका करू हं, आताच सांगून ठेवते..."
"हा हा हा...काळजी नको करू मी काहीच करणार नाही, तसही पोलिसांची भिती वाटते मला, आणि वडीलधारे लोक म्हणतात की शहाण्या माणसाने पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढू नये...
"ते पास चे किती पैसे झाले, मी देऊन देते तुम्हाला"
"नको रे बाबा, एका पोलिसाच्या होणाऱ्या बायकोकडून नाही घ्यायचे पैसे मला...." आणि तो हसायला लागला, मला तर विचित्र वाटत होता तो
"नाही, तुम्ही मला मदत केली तिथे आणि मला ते उपकार नाही ठेवायचे कोणाचे..."
"पहिली गोष्ट तर मी उपकार नाही केले, आजकाल च्या कॉलेज च्या मुलांना अमृता प्रीतम कोण आहे हे सुद्धा माहीत नाही त्यात त्यांच्या साहित्यासाठी तुझी इतकी तळमळ होती ते पाहून मी तुला पास दिला...."
"हम्म...थँक्स..."
"आणि दुसरी गोष्ट, एवढ्या लवकर लग्न करत आहेस म्हणून सांगतो, हा जो स्वाभिमान आहे ना तुझा असाच ठेवशील नेहमी, कोणाच्याही उपकराच्या ओझ्याखाली दबणार नाहीस तू...अजून एक तुझी 'रुह' आझाद ठेवायला शिक...येतो...."
त्याच्याशी बोलता बोलता छत्रपती चौक कधी आला आणि तो कधी उतरला काही कळलंच नाही...जाता जाता त्याच शेवटचं वाक्य मला खूप लागून गेलं...हाच तर स्वाभिमान मी विक्रमसमोर तटस्थ ठेवू शकत नव्हती, त्याला तर इतकं बोलली मी पण विक्रमसमोर का एवढ्या खंबीरपणे नाही बोलू शकत, खरच तो बोलल्याप्रमाणे माझी 'रुह' आझाद नाही का??? याचा विचार करता करता मी घरी पोचली....
-------------------------------------------------------
एक महिना कसा निघून गेला काही कळलंच नाही, लग्नाचा दिवसही जवळ आला...लग्नाची व्यवस्था, इतका खर्च सगळं काही करता करता बाबांची दमछाक होत होती, पण माझं लग्न चांगल्या घरात होतंय याचा आनंद जास्त दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर... विक्रमचे फोन सुरूच होते, त्याला तर सगळं काही जिंकल्यासारखं वाटत होतं, तो मला बोलून दाखवायचा नेहमीच की ज्या ज्या गोष्टींचं प्लॅनिंग त्याने केलं होतं ते सगळंच त्याने मिळवलं, आणि विशेष म्हणजे मी सुध्दा त्या प्लॅनिंगचा च एक हिस्सा होती...त्याच्या दृष्टीने प्रेम केलं तर ते मिळवायलाच पाहिजे, मग ते प्रेम मिळवण्याचा मार्ग कोणताही असला तरी चालेल, समोरची व्यक्ती त्याच्यावर प्रेम करते नाही करत याचा काहीही संबंध नाही, तो करतो तेच महत्त्वाच अशी धारणा होती त्याची...
आणि मी??? मी फक्त प्रवाहासोबत वाहत होती...जीव नसल्यासारखी, एकदम अचेतन...स्वतःला एका चौकटीत कटिबद्ध केलं होतं, ती चौकट आधी आईबाबांनी आखून दिली होती, आता त्या चौकटीचा मालक विक्रम होता, एवढंच काय बदल होणार होता माझ्या आयुष्यात...
नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध जायचं नसतं पण प्रत्येक वेळी प्रवाहासोबत वाहत जाणं हे निर्जीवपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं...तेंव्हा मला हे कळत होतं पण ते वळवण्याची हिम्मत नव्हती माझ्यात, त्यामुळे जे काही घडत होतं ते स्वीकारलं होतं मी मनापासून...बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला, मी आणि विक्रम लग्नबंधनात अडकलो, सगळे आनंदी होते पण माझ्या मनात भीतीने काहूर माजवल होतं... नवीन घर, नवीन आयुष्य, सगळं काही नवं नवं...
विक्रमच्या घरी तशी कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती, त्याच्या घरच्यांनाही अगदी मनापासून माझं स्वागत केलं, अजूनही माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही कटुता नाही, पण शल्य हे आहे की विक्रम जिथे चुकत होता तिथे त्यांनी त्याला टोकायला हवं होतं, त्याच्या चूका दाखवून जर त्यांनी त्याची कानउघडणी केली असती तर कदाचित विक्रमचं आणि माझ आयुष्य वेगळं असतं खुप...
लग्नानंतर दहा दिवसांतच माझी फायनल सेमिस्टर ची परीक्षा होती, चार पाच दिवस देवदर्शनात गेले आमचे त्यामुळे विक्रमला माझ्यासोबत हवा तो एकांत मिळाला नाही, आणि त्यात त्याने आधीच घरी सांगून ठेवलं होतं की मी परीक्षेसाठी माहेरी जाणार त्यामुळे माझी परतीची तयारी सुरू होती...त्यादिवशी सगळे सोपस्कार आटोपल्यावर विक्रम रूममध्ये आला, माझी तयारी सुरू होती, माझं लक्ष नसताना अचानक त्याने मला मागून येऊन मिठी मारली, मी मात्र घाबरली, आज तर माझी सुटका नव्हती हे मला निश्चित माहीत होतं,
"कशाची तयारी सुरू आहे?" तो बोलला
"ते..घरी जायचं आहे ना, परीक्षा आहे माझी...माहीत आहे ना तुम्हाला...?"
"हो, परीक्षा सुरू व्हायला चार दिवस वेळ आहे ना, जाशील आरामात, काय घाई आहे, आजचा वेळ आपला आहे, ते महत्त्वाच नाही का?"
मी स्वतःला सोडवत बोलली, " मला अभ्यास ही करायचा आहे ना, वेळेवर नाही होणार काहीच, प्लिज...आपलं ठरलं होतं ना तुम्ही मला शेवटची परीक्षा देऊ देणार असं..."
मी अस बोलताच विक्रम कपाळावर आठ्या आणत बोलला, " काय परीक्षा परीक्षा सुरू आहे ग तुझं? काय फरक पडणार आहे नाही दिली परीक्षा तरी, कोणता मोठा जिल्हा सांभाळायचा आहे तुला कलेक्टर होऊन, चपात्या तर लाटायच्या आहेत आणि घर संभाळायच आहे..."
तो अस बोलल्यावर मात्र माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि मला माझे अश्रू थांबवणे कठीण झालं...एकतर मला घरची आठवण येत होती खूप आणि त्यात विक्रमच अस बोलणं खूप लागलं मला...मला रडतांना पाहून विक्रम पुन्हा बोलला....
"प्लिज यार आता हे गंगा जमुना एक नको करू....काय सुचलं मला... तू मनात भरली आणि तुझ्याशी लग्न केलं, थोडं ही प्रेम नाही का ग तुला माझ्याबद्दल, नवीन लग्न झाल्यावर लोकांच्या बायकांना रोमान्स करावा वाटतो आणि इथे माझ्या बायकोला परीक्षा द्यायची आहे...." विक्रमने चिडून माझे सगळे कपडे, सगळं सामान फेकलं...ते पाहून मला अजून रडायला येत होतं...माझं रडणं काही थांबत नव्हतं.....
"बर ठीक आहे, नको रडू, आवर पटकन, तुला सोडून येतो मी घरी, उद्या मलाही भंडाऱ्याला जायचं आहे, कोणता नवीन SP आलाय म्हणे डोक्यावर बसायला त्याला रिपोर्ट करायचं आहे आणि आपण तिथे राहायला गेल्यावर सगळी सोयी आहे की नाही ते ही पाहावं लागेल ना, तू रडून आणखी माझं डोकं नको खराब करू...आवर पटकन निघुयात आपण एका तासात...."
मी माझं आवरायला घेतलं, माझं पडलेलं सामान उचलायला गेली तर माझा पाय साडीत अडकला, मी पडणार तेवढ्यात मला विक्रमने सावरलं...माझ्याकडे एक कटाक्ष टाकत बोलला,
"स्वतःच्या अंगावरची साडी नाही संभाळू शकत, मला अन माझ्या घराला काय संभाळशील ग तू..."
नाही काही उत्तर देऊ शकली मी त्याला...विक्रमला हेच नाही कळाल कधी की संसार फुलवण्यासाठी प्रेमाची गरज असते, एकमेकांना समजून घेण्याची गरज असते, असा प्रत्येक गोष्टीत राग दाखवून कसा तो संसार फुलायचा? पण तरीही मला दिल्या गेलेल्या शिकवणीत हेच धडे होते की काहीही झालं तरी नवऱ्याला आनंदी ठेवायचं....आणि मी पुन्हा हाच विचार केला की जर सगळं स्वीकारलंच आहे तर विक्रमचा हा स्वभाव ही मला मान्य करावाच लागेल, मी माझे डोळे पुसले आणि सगळं आवरायला घेतलं....
माझी पर्स साफ करता करता मला त्यात रेल्वेचं तिकीट सापडलं...जवळपास पाच वर्षाआधीच तिकिट माझ्याकडे कसकाय आलं आणि कुठून आलं, मला काही सुचत नव्हतं...मी ते फेकून देणार तेवढ्यात त्याच्या मागच्या बाजूने काहीतरी लिहिलंय हे आढळलं मला,