Pathlag in Marathi Comedy stories by संदिप खुरुद books and stories PDF | पाठलाग

Featured Books
Categories
Share

पाठलाग

दोन दिवसांपासून एक माणूस अजयचा पाठलाग करत होता. त्याच्यावर पाळत ठेवत होता. पहिल्या दिवशी अजयच्या एवढं लक्षात आलं नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याला ते चांगलंच जाणवलं. तो जेथे जाईन तेथे तो माणूस त्याच्या मागे जायचा. त्याने त्या माणसाकडे पाहिले तर तो माणूस दुसरीकडे पाहायचा. तो माणूस कोणत्या कारणासाठी त्याचा पाठलाग करत असेल याचाच अजय विचार करत होता. एक तर तो माणूस दिसायला भयंकर दिसत होता. साधारणत: सहा फुट उंची, धिप्पाड शरीर, लाल डोळे, रुबाबदार मिशा, डांबरासाराखच काळा रंग त्याला बघीतलं की, त्याची भिती वाटावी असा तो माणूस होता. काल रात्री तर तो अजयच्या घरापर्यंत त्याच्या मागे-मागे आला होता. अजयने घरात जावून खिडकीतून पाहिलं होतं. त्याचं घर बघून तो माणूस परत चालला होता.

त्या रात्री अजयला कसलीच झोप लागली नाही. घरी सांगावं तर घरचे काळजीत पडतील, म्हणून तो घरीही काहीच बोलला नाही. पण त्याच्या मनात भितीने जागा घेतली. तो माणूस कशामुळे पाठलाग करत असेल? याचा तो मनाशी तर्क बांधत होता. काही दिवसांत आपले कोणाबरोबर भांडण झालं आहे का? हे आठवत होता. पण त्याचे कोणाबरोबरच भांडण झाले नव्हते. कदाचीत, त्याच्या गळयातील सोन्याचं लॉकेट, हातातील अंगठया यामुळं तर तो पाठलाग करत नसेल ना? या विचारानं त्यानं लॉकेट व अंगठया काढून कपाटामध्ये ठेवून दिल्या.

त्या माणसाची देहयष्टी पाहून, माझा पाठलाग का करतोस? म्हणून त्या माणसाला विचारायची हिंमत अजयला झाली नव्हती. तो माणूस अजयची पूर्ण माहिती काढत होता. अजय कुठे जातो? काय करतो? ही सर्व माहिती बहुतेक त्याने काढली होती. आज जर तो माणूस मागे आला, तर पोलीसात त्याचं नाव सांगावं, असं अजयनं मनोमन ठरवलं होतं. अजय घराबाहेर पडला. तेव्हा त्याचा जवळचा मित्र राजा त्याला दिसला. त्याला अजयने तो माणूस त्याचा पाठलाग करत असल्याचं सांगीतलं. मग दोघांनी मिळून एक योजना आखली. बसस्टँडजवळ अजय आणी त्याचे दोन मित्र थांबणार. तो पाठलाग करणारा माणूस आला की,अजय गणुच्या हॉटेलकडे चालत निघणार आपसुकच तो माणूस अजयचा पाठलाग करत हॉटेलकडे येणार.अजय पुढे, त्याच्या मागे तो माणूस आणी त्याच्या मागे अजयचे दोन मित्र असणार. हॉटेलजवळच पोलीस स्टेशन आहे. हॉटेलवर बरेच मित्र बसलेले असतात. हॉटेलजवळ येताच अजयने मित्रांना इशाऱ्याने तो माणूस दाखवायचा मग सगळया मित्रांनी त्याला घेराव घालून धरायचं. पाठलाग का करतोस? म्हणून जाब विचारायचा. नाही सांगीतलं तर चांगला चोप देवून पोलीसांच्या हवाली करायचा.अशी योजना त्यांनी आखली होती.

ठरल्याप्रमाणे अजय त्या माणसाची वाट पाहत उभा होता. बराच वेळ वाट पाहिली पण तो माणूस आलाच नाही. शेवटी कंटाळून सगळेजण आपापल्या घराकडे निघाले. अजय मागे वळून पाहत होता. पण तो माणूस काही त्याला काही दिसला नाही. तो माणूस आज अजयच्या पाठीमागे नव्हता, तरी त्याच्या मनात त्या अज्ञात माणसाविषयी भिती बसली होती. त्यानं दोन दिवस अजयच्या हालचालीचं बारकाईनं निरीक्षण केलं होतं. त्यानं अजयचं घर सुद्धा पाहिलं होतं. कदाचीत तो चोर असला तर आज रात्री तो आणी त्याचे काही साथीदार अजयच्या घरी चोरीस येण्याची शक्यताही होती. अजयला काय करावं काहीच सुचत नव्हतं.

तो घरी आला. घरातील सर्वजण जेवायला बसले.अजयचं मन कशातच लागत नव्हतं. तेवढयात अजयची आई म्हणाली, “आम्ही पाच दिवसापुर्वी एका लग्नाला गेलो होतो ना?”

तिचं बोलणं अर्धवटच तोडून अजय म्हणला, “माहित आहे.”

“तर तुला एक मुलगी पाहिली, खुपच सुंदर आहे मुलगी शांत आणी सुलक्षणी वाटत होती”, आई म्हणाली.

लग्नाचा विचार काढल्यामुळं अजयच्या मनातील भिती कुठल्या कुठे पळून गेली.आई परत म्हणाली, “आम्ही बघीतलीच आहे, मुलगी आम्हाला पसंत आहे. आताच पाहुण्यांचा फोन आला होता,पाहुण्यांनी तुला उद्याच मुलगी पाहायला बोलावलं आहे.तर तु एखादा मित्र सोबत घेवून जा, मुलगी पाहायला”. अजय मनातल्या मनात लाजला. पण तसं न दाखवता तो हो म्हणाला. जेवण झाल्यावर त्यानं न राहवून मोठया भावाला पाठलाग करणाऱ्या माणसाविषयी सांगीतलं. तर त्यावर खबरदारी म्हणून अजय व त्याचे तीन-चार मित्र अजयच्या खोलीमध्येच झोपले. पण सुदैवाने चोर आले नाहीत. कदाचीत त्यांना चार-पाच जण वरती झोपलेलं कळालं असेल म्हणून ते आले नसतील.

अजयनं दाढी कालच दुपारी केली होती म्हणून करण्याची गरज नव्हती. त्याचे केस पण जास्त वाढलेले नव्हते. अजयच्या आईनं सकाळी चांगले हात-पाय घासून त्याला अंघोळ घातली. त्याच्या हाता पायाचे नखं वाढलेले होते. आईनं त्याला नखं कापायला सांगीतले. म्हणाली, “पाहुणे पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळत असतात. त्यामुळे आपण आपलं निटनेटकं जावं बाबा”. घरातून बाहेर पडेपर्यंत ती त्याला कसं वागायचं, कसं बोलायचं याबाबत सुचना करत होती. अजयने आई -वडीलांच्या पाया पडून, देव घरातल्या देवांना नमस्कार केला आणी तो घराबाहेर पडला.

अजय राजाला घेवून मोटारसायकलवर पाहुण्याच्या गावाकडे निघाला. नुकताच पावसाळा संपून हिवाळयाची चाहूल लागली होती. थंडगार वारं अंगाला झोंबर होतं. सगळीकडे हिरवंगार दिसत होतं. रस्त्याच्या बाजुची हिरवीगार शेतं, हिरवी –हिरवी डोंगरं, डोंगराच्या कडया कपाऱ्यातून वाहणारे सुंदर,निखळ झरे मनाला प्रसन्न करत होते. अजयच्या मनात आलं, मुलीच्या गावाकडचा परिसर तर सुंदर आहे. आई म्हणते तशी मुलगी सुंदर असली म्हणजे झालं.

ते त्या परिसरात नविन होते. त्यामुळं गुगल मॅपच्या सहाय्याने गाव शोधत होते. गाव जवळ-जवळ आलं होतं, गावाच्या अलीकडे एक चहाचं साधं हॉटेल होतं तिथे त्यांनी चहा घेतला.

राजानं हॉटेल मालकाला विचारलं,

“हासेगाव अजून किती कि.मी. आहे?”

हॉटेलवाल्यानं, “अजून तीन कि.मी. आहे साहेब”. म्हणून सांगीतलं.

ते पुढे निघाले, त्यांना लघुशंकेसाठी थांबायंच होतं पण रस्त्याच्या कडेच्या शेतामध्ये बायामाणसं काम करत होते म्हणून थांबता आलं नाही. तेवढयात गाव आलं, गाडीवर थोडे केस विचकटले होते. चेहऱ्यावर धुळ जमा झाली होती. बाजूलाच न्हाव्याचं दुकान होतं. दुकानात गेल्यावर अजयने चेहऱ्यावर पाणी मारलं. व्यवस्थित केस विंचरले. आणी पाहुण्याला फोन लावला. पाहुण्यांनी एकजणाला न्यायला पाठवतो म्हणून सांगीतले.

चौकात ते पाहुण्याची वाट पाहत थांबले. तेवढयात एक मुलगा मोटारसायकलवर आला. बहुतेक तो मुलीचा भाऊ असावा असा अजयने मनाशीच तर्क लावला. नमस्कार चमत्कार झाला. त्या मुलानं त्यांना त्याच्या मागे यायला सांगीतलं. राजा गाडी चालवत होता. अजय मागेच बसला होता. ते आता घराजवळ आले होते. मुलीच्या घराशेजारच्या बाया दरवाज्यातून त्यांच्याकडे पाहत होत्या. मुलीच्या घरी पाहुणे आले, पाहुणे आले म्हणून लगबग सुरु झाली. एकजणानं त्यांना हातपाय धुवायला पाणी दिलं. तोवर एकानं हातात टॉवेल दिला. हातपाय धुवून ते घरामध्ये गेले. एकत्र कुटुंब असल्याने घरात बरेच माणसं दिसत होते.

राजाचं लग्न झालेलं होतं, त्याला या गोष्टींचा अनुभव होता. पाहुण्यांनी पाणी दिलं,चहा आणला. अजयला आधीच लघुशंका लागली होती. त्यात पाणी आणी चहा त्यामुळे त्याचं पोट आणखीनच फुगलं. त्याला बाथरूम कुठे आहे? म्हणून विचारावं वाटलं, पण नविन ठिकाणी कसं विचारावं,म्हणून तो शांत बसला. चहा पाणी झालं. तेवढयात एकानं सर्वांचा परिचय द्यायला सुरुवात केली. घरात चिल्यापिल्ल्यासकट चौदा-पंधरा माणसं होती. सगळयांचा परिचय झाला. मुलीची आवराआवर चालु होती, तोवर इकडच्या-तिकडच्या गप्पा निघाल्या. अजयचं शिक्षण, त्याचा पगार यावर त्याला प्रश्न विचारले, त्याने रितसर सर्वांना उत्तर दिलं. राजा बोलघेवडा होता, म्हणून तो तेवढया पाहुण्यांना बोलण्याच्या बाबतीत एकटाच पुरुन उरत होता. अजयचं मात्र लघवी आल्यामुळे पोट फुगलं होतं, त्याचं त्यांच्या गप्पाकडे लक्षच नव्हतं.

साधारणत: दहा मिनिटांनी मुलीच्या आईने मुलीच्या वडिलांना बोलावले.त्यांचे आतमध्ये काहीतरी बोलणं झालं, थोड्या वेळाने मुलीचे वडील बाहेर आले. ते अजयकडे पाहून म्हणाले, "मुलीचे मामा पण येणार आहेत पण त्यांना थोडा उशीर होईल तोवर आपण पाहण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ". अजयने हो म्हणून सांगितले. मुलीच्या वडिलांनी मुलीच्या आईला मुलीला घेऊन यायला सांगितले. अजयचं मुलगी येणार त्या वाटेकडे लक्ष लागलं होतं. तेवढयात खाली मान घालून डोक्यावर पदर घेवून ती आली. अहाहा! किती सुंदर अगदी आई म्हणाली होती तशीच नाकी डोळी निट, अजयला शोभेल अशी उंची, गोरा रंग, आणी गुलाबी साडीमध्ये तर ती खुपच सुंदर दिसत होती.तिला पाहता क्षणीच अजयला ती आवडली. तिला तसंच डोळयात साठवून ठेवावं असं त्याला वाटलं, पण काहीजण त्याच्याकडे पण बघत होते. त्यामुळे त्याला कोणी त्याच्याकडे पाहत तर नाही ना? याची खात्री करुनच चोरुन त्याला तिच्याकडे पहावं लागत होतं.

मुलीच्या काकांनी तिला खाली बसायला सांगीतलं. ती खाली मान

घालून बसली. तिचे काका अजय आणी राजाकडे पाहत म्हणाले, “विचारा तुम्हाला काही विचारयचं असेल तर.”

राजा प्रश्न विचारु लागला, “नाव?”

तिनं पूर्ण नाव सांगीतले.

“शिक्षण?”

“बी.एस.सी”

“स्वयंपाक येतो का?”

“हो.”

असे प्राथमिक स्वरुपाचे बरेचसे प्रश्न विचारले,

तिच्या आईने सांगीतले,

“ब्युटी पार्लरचा कोर्स, एमएससीआयटी, शिवणक्लास, टायपींग हे सगळं झालय. आणी स्वयंपाक पण खुप छान बनवते आमची सोनी.”

अजयने मान डोलावली. प्रश्न-उत्तर,पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलीला आतमध्ये जायला सांगीतले.काकांनी परत मुलीच्या मामाला फोन लावला, मामाची गाडी पंक्चर झाली होती, म्हणून त्यांनी जेवणं करुन घ्या, मी येतोच म्हणून सांगीतलं. लघवीमुळं आधीच अजयचं पोट जाम झालं होतं. त्यामुळे त्याला जेवणाची मुळीच इच्छा नव्हती. पण जेवावच लागणार होतं, अजय जरा लाजाळुच होता. म्हणून तो मुद्दामच भिंतीच्या कोपऱ्यात बसला होता.त्याच्या उजव्या बाजूला भिंत, डावीकडून राजा आणी त्याच्या बाजूला व समोर पाहुणे बसले होते. सुरुवातीलाच ताट गच्च भरुन आलं. अजय ताटातील पदार्थ कमी करा म्हणून पाहुण्यांना विनंती करत होता. पण त्याचं कोणीच ऐकलं नाही. आता त्याला बळं-बळं खावंच लागणार होतं. अजयनं इकडं-तिकडं पाहिलं, कोणी बघत नाही याची खात्री करुन पटकन एक पोळी राजाच्या ताटात टाकली. तेवढयात मुलीची चुलती आली तिनं अजयच्या ताटात पाहिलं,त्यांना वाटलं, त्यानं लगेच पोळी संपवली म्हणजे त्याला खुपच भुक लागली. असा समज होवून त्यांनी आणखी एक पोळी अजयच्या ताटात वाढली. त्याचं पोट आधीच गच्च झालं होतं, त्यानं वेडंवाकडं तोंड करुन राजाकडं पाहिलं, राजानं डोळ्यांनीच इशारा केला, आता माझ्या ताटात टाकून बघ. राजा दिसायला धिप्पाड होता. खायला पण अजयपेक्षा डबलच खायचा. तो नको म्हणतोय म्हणल्यावर अजयचा नाईलाज झाला. तरीही अजयने राजाला इशाऱ्यानेच खुणवंल, आर्धी तरी घे. राजानं पुन्हा नकारार्थी मान हलवली.अजय बळंबळं टाकणार होता पण अजयच्या लक्षात आलं, राजा खुप आडमुठा आहे. त्याला राग आल्यावर स्थळ, काळ कशाचंच भान राहत नाही.जर आपण त्याच्या ताटात पोळी टाकली, तर तो सगळया पाहुण्यात आपल्याला खवळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अजयला गुपचुप ती पोळी खाणं भागच होतं. दुसऱ्यांचे तीन-चार घास झाले की, अजय एक घासच खात होता. ताटातलं संपलं की परत वाढु नये म्हणून.

अजय ज्या कोपऱ्यात जेवायला बसला होता. ज्या भिंतीला टेकून बसला होता, त्या भिंतीवरून लाल मुंग्यांची लाईन जात होती. त्या मुंग्यांच्या लाइनकडे त्याचे लक्ष नव्हते. त्याच्या पाठीने काही मुंग्या चिरडल्या गेल्या. त्यामुळे मुंग्यांची रांग विस्कळीत झाली. मुंग्या त्याच्या अंगावर चढल्या. बघता-बघता मुंग्या अंगात घुसून काखेत, मानाला जिथं नाही तिथं जावून चावु लागल्या. लघवीनं आधीच त्याचं पोट जाम झालेलं त्यामुळे तो अस्वस्थ होता.त्याच्या अंगावर काटाच आला. ऐन हिवाळयाच्या दिवसात त्याला घाम आला. जोरात ओरडावं वाटलं, पण पाहुण्यात कसं ओरडावं. म्हणून तो वेदना सहन करत तसाच शांत बसला. सगळयांची जेवणं होत आली होती, पण मुलीच्या आजोबाचं अजून चालूच होतं. एक तर त्यांना दात नव्हते. त्यामुळे पटापटा जेवता येत नव्हतं. इकडं मुंग्या चावल्यानं त्याच्या अंगाची नुसती आग-आग होत होती. अजयच्या आईनं त्याला सांगीतलं होतं, जेवायला बसल्यावर सगळयांनी हात धुतल्याशिवाय हात धुऊ नको. सगळेजण म्हाताऱ्याचं जेवण होण्याची वाट पाहू लागले.मुंग्या चावल्यामुळं अजयचा जीव कासावीस होत होता. पण म्हाताऱ्याचे जेवण होईपर्यंत त्याला उठता येईना. एकदाचं म्हाताऱ्याचं जेवण झालं, सगळयांनी हात धुतला.अजय पटकन जाग्यावरुन उठला. मुलीची आई आणी चुलती ताट उचलायला आल्या. त्यांनी अजय बसला होता तेथील भिंतीवरील मुंग्यांची विस्कटलेली लाईन पाहिली. आणी त्या अजयला म्हणाल्या,

“तुमच्या मागं मुंग्या होत्या, चावल्या तर नाहीत ना?”

अजयला तेच हवं होतं. त्याला कपडे काढून मुंग्या झटकायच्या होत्या.

तो म्हणला, “चावल्या ना, अंगात घुसल्यात वाटतं”.

तेवढयात मुलीच्या चुलत्यानं लगबगीने अजय व राजाला बाजूच्या खोलीत नेलं. अजयनं पटकन पँट-शर्ट काढून कपडे चांगले झटकले. राजानं त्याच्या पाठीवर असलेल्या दोन-तीन मुंग्या काढल्या, सुदैवाने बाजूलाच बाथरूम होतं, तिथं जावून अजयनं मघापासून दाबून धरलेलं पाणी सोडून दिलं. मुंग्या चावून गेल्या तरी त्याच्या अंगाची आग होत होती. त्याच्या अंगावर चागंल्या गुदी आल्या होत्या.परत कपडे घालून ते पुढील खोलीमध्ये आले.

अजयच्या आईने अजयची व मुलीची उंची बघण्यासाठी दोघांना जवळ-जवळ उभा करुन एक फोटो घेण्यासाठी राजाला सांगीतले होते. राजानं मुलीच्या वडीलांना विचारलं,

“दोघांचा एक फोटो घेतला तर चालेल का?”

मुलीच्या वडीलांनी होकार दिला. राजानं दोघांना जवळ उभा राहायला सांगीतले.तरी दोघे जवळ-जवळ एकमेकांपासून दीड हात अंतर ठेवून उभे राहिले. राजानं त्यांना आणखी जवळ यायला सांगीतलं. सगळेजण दोघांकडेच पाहत होते. दोघांनाही खुप लाज वाटत होती. राजानं त्यांचे मोबाईल मध्ये फोटो काढले.अजयलाही मुलगी उंचीला आपल्याला शोभते का? हे पहायचेच होते. ती अजयच्या कानाला लागत होती. जोडी अगदी पूर्णपणे एकमेकांना शोभत होती.

तिला फोटो काढण्यासाठी बोलावल्यामुळे अजय खुप खुष झाला होता. कारण तिचं सुंदर रुप त्याला परत पहायला मिळालं होतं. तिला पाहून तो अंगाची होणारी आग विसरुन गेला होता. पाहण्याचा कार्यक्रम झाला होता, जेवणंही झाले होते. आता निघण्याची वेळ झाली होती. तेवढयात, अजयचा पाठलाग करणारा माणूस अजयला अचानक दरवाज्यात दिसला. त्याला पाहून अजयचा चेहरा खर्रकन उतरला. हा माणूस इथं काय करतोय? मी इथं येणार याची खबर याला कशी लागली? याची काळजी अजयला वाटु लागली. त्या माणसाच्या मागे एक बाईपण आली होती. तेवढयात त्यानेच अजयला नमस्कार केला. अजयनेही त्याला नमस्कार केला. मुलीच्या चुलत्याने ओळख करुन दिली, “हे मुलीचे मामा नारायणराव भुजंगे निवृत्त पोलीस निरीक्षक आहेत.” आता अजयच्या डोक्यात लख्ख्‍ा प्रकाश पडला, हा माणूस त्याचा पाठलाग का करत होता ते. कारण त्याला त्याची भाची अजयला द्यायची होती. मग अजय काय करतो? त्याला कोणतं व्यसन आहे का?त्याचं घरदार कसं आहे?याबाबत माहिती मिळवूनच मामांनी मुलीच्या घरच्यांना अजयच्या घरी फोन करायला लावून मुलगी पहायला अजयला पाठवण्यासाठी सांगीतलं होतं.

पाठलाग करताना भयानक वाटणारा व्यक्ती अजयशी हसून गप्पा मारत होता. बाहेर आल्यावर अजयनं राजाला सांगीतलं,

“हाच तो पाठलाग करणारा माणूस.”

राजा हसून म्हणाला,

“बरं झालं मामांनी त्या दिवशी पाठलाग सोडला.नाहीतर आपल्या मित्रांनी उगाचच चोपून काढला असता”.

राजा गाडी चालवत होता. अजय मागे बसला होता. आता त्याला पाठलाग कोण करतो? कशासाठी करतो? याचं उत्तर मिळालं होतं सोबतच सुंदर, मनमोहक, हुशार मुलगी बायको म्हणून मिळणार होती. तो तिच्यातच हरवून गेला होता.