Mile sur mera tumhara - 7 in Marathi Short Stories by Harshada Shimpi books and stories PDF | मिले सूर मेरा तुम्हारा - 7 - अंतिम

Featured Books
Categories
Share

मिले सूर मेरा तुम्हारा - 7 - अंतिम



दिवस असेच छान जात होते. अचानक एक दिवस सकाळी वृंदाच्या खुप पोटात दुखू लागलं. तो शनिवार असल्याने निनाद आणि वृंदा दोघांना सुट्टी होती.
“काय झालं वृंदा?”
“पोटात दुखतंय रे खुप. चक्कर पण येतेय.”
“अचानक कसं? दवाखान्यात जायचं का?”
“अचानक नाही रे. पीरियड्स आलेत माझे. म्हणून दुखतंय. खुप वाटलं तर जावं लागेल दवाखान्यात.”
“बरं. तू आराम कर. झोप इकडे.”, निनाद ने तिला बेड वर झोपवले आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आला.
“जास्तंच त्रास होतोय का?”
वृंदा आता रडू लागली होती. तिने निनादचा हात घट्ट पकडला.
“काय करु मी? बोल ना कुठे दुखतंय?”
वृंदाने पाया कडे इशारा केला. निनादने बाम घेतला आणि तिच्या पायाला चोळला. तिचे पाय तो दाबू लागला तसं तिला थोडं बरं वाटू लागलं.
“आलोच मी.”, झोपलेल्या आणि कण्हत असलेल्या वृंदाला तो म्हणाला.
त्याने थोडा नाश्ता बनवला. गरम पाण्याची पिशवी तयार केली. आणि वृंदा नेहमी घ्यायची ते औषध घेऊन तो तिच्याजवळ आला.
तिला प्रेमाने ऊठवून आधी तिच्या कमरेच्या मागे गरम पिशवी ठेवली. मग तिला स्वत:च्या हाताने आग्रहाने खाऊ घालू लागला.
“नकोय रे मला. बस झालं.”
“हे बघ… शेवटचा घास.. खा बरं. मग हे औषध घे. बरं वाटेल तुला.”
वृंदाचं औषध घेऊन झालं तशी ती पुन्हा झोपली. निनाद तिकडेच बसून तिचे पाय दाबत राहीला. तिला शांत झोप लागलेली पाहुन तो तिकडून उठला. त्याने घरातली सगळी कामं आवरली आणि दुपारी जेवायला साधा वरण भाताचा कुकर लावला. वृंदाला उठवून जेवायला दिलं. स्वत:पण खाल्लं.
पुढचे ३-४ दिवस तो अशीच वृंदाची सेवा करत राहीला. तिला बरं वाटू लागलं तशी ती फ्रेश होऊ लागली.
वृंदा खुश होती की तिला निनाद सारखा नवरा भेटला. त्यांच्या लग्नाला आता २ वर्ष होत आली होती. अशातंच तिला दिवस गेले. दोघांनी planning करुन बाळाचा निर्णय घेतला होता.
“निनाद होईल ना रे सगळं नीट.”
“होईल गं. नको काळजी करुस.”
दोघांच्या घरी गोड बातमी पोहोचली तसे सगळेच खुश झाले. तिला सल्ले देऊ लागले.
सगळयांचे ते सल्ले आधी तिला चांगले वाटले. पण जास्तंच होऊ लागल्यावर तिची चिडचिड होऊ लागली. कोणत्याही गोष्टीं वरुन तिला राग येऊ लागला. तिचा तो राग निनाद वर निघू लागला. निनाद शक्य तेवढं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. पण शेवटी माणूसंच तो. कधी कधी त्याच्या सहनशक्तीचा अंत व्हायचा.
या सगळ्यावर उपाय म्हणून दोघांनी बसून बोलायचे ठरवले.
“निनाद मला माफ कर. मला रागवायचं नसतं रे. पण काय करु? मला नाही control करता येत आहे..”
“मला पण माफ कर मी तुला समजून घ्यायला कमी पडतोय.”
“नाही रे. उलट तू तर किती सांभाळतोस मला.”
“मग काय करायचं आता?”
“मला नाही काही सुचत आहे.”
“डॉक्टर म्हणालेत की pregnancy मध्ये होतं असं. तरीपण योगा, meditation करुन स्वत:चे विचार control करता येतात. त्याचा बाळावरही चांगला परिणाम होतो.”
“पण मला जमेल का?”
“का नाही? मी आहे ना तुझ्यासोबत. आणि आपले घरचे सगळे आहेतंच की. आपण त्यांची पण मदत घेऊ.”
“तू मला इतकं कसं समजून घेऊ शकतोस?”
“कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर.”
वृंदाने डॉक्टर आणि घरच्या मदतीने तिच्यात होणा-या negative बदलांना positive करण्याचा प्रयत्न सुरु केला. निनाद होताच मदतीला. हळूहळू तिला फरक जाणवू लागला.
असेच महिने गेले. नवव्या महिन्यात वृंदाचं डोहाळजेवण झालं. निनाद बायकोचं मनापासून कौतुक करत होता. सगळ्या बायकांनी तिची ओटी भरली. निताबाई, वृंदाची आई, सुलेखा, निशा, प्रतापराव आणि संदिपराव सगळयांनी मनापासून तिचं कोडकौतुक केलं.
लवकरंच तो दिवस आला. वृंदाने जुळ्या बाळांना जन्म दिला. एक मुलगा आणि एक मुलगी. चौकोनी कुटुंब. मुलाचं नाव मुकुंद आणि मुलीचं जाई ठेवण्यात आलं.
आता दोघांच्या संगोपनात वृंदा आणि निनादचा वेळ जाऊ लागला. सुरवातीला आळीपाळीने वृंदाची आई सीमाताई आणि सासूबाई नीताबाई इकडे येऊन राहिल्या. वृंदाने सहा महिन्यांची maternity leave घेतली होती. सहा महिने कसे भुरकन निघून गेले. आता तिला नोकरीवर रुजू होणे गरजेचे होते. ब-याच वेळा नातेवाईक तिला जॉब सोडण्याचा सल्ला देत. परंतु निनाद तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहीला.
दोघं नोकरी करणारे असल्यावर बाळांची काळजी कोण घेणार असा प्रश्न निर्माण होऊ लागला. तेव्हा निनादने आणि वृंदाने वेगळाच पर्याय निवडला.
निनाद च्या कामाचं structure पाहता त्याला work from home शक्य होतं. यात एक मात्र होतं की त्याच्या नेहमीच्या पगारात काही टक्के कपात होणार होती. तरीही त्याने तडजोड करायचं मान्य केलं. समाजाचं कुठलंही दडपण न स्वीकारता त्याने घरून काम करण्याची तयारी दर्शवली.
आठवड्याच्या सुट्ट्या वेगवेगळ्या घ्यायच्या हेदेखील त्यांनी ठरवलं. जेणेकरुन मुलांना वेळ देता येईल. आणि एकदा मुलं मोठी झाली की पुन्हा आपलं नेहमीचं रूटीन चालू करता येईल.
त्यांचे आईवडील येऊनजाऊन होतेच. पण हा त्यांचा कायमस्वरुपी निर्णय होता. त्यांनी सगळ्यांना तसं कळवलं. आणि घरच्यांनी ते मान्य देखील केलं.
एक दिवस सकाळी उठल्या उठल्या निनाद ला किचन मधून खमंग असा वास आला. मुलं झोपली होती. डोळे चोळतंच तो किचन मध्ये आला. बघतो तर गरमा गरम बटाटे वडे तेलात खरपूस तळले जात होते.
“आज काय special?”
त्याच्या आवाजाने वृंदाने मागे वळून बघितलं.
“अरे उठलास. पटकन तयार हो. नाश्ता रेडी आहे.”
निनाद ब्रश आणि अंघोळ करुन, कुर्ता पायजमा घालून बाहेर hall मध्ये येऊन बसला.
वृंदा बटाटेवडे आणि चटणी घेऊन आली. तो वडा खाणार इतक्यात वृंदाने त्याच्या हातात सोनेरी कागदात सुंदर रित्या गुंडाळलेला एक बॉक्स आणि एक कार्ड दिलं.
“हे काय आहे?”
“काय तू पण. बघ ना.”
निनादने कार्ड वाचलं. त्यात लिहिलं होतं.
“नशीबवान आहे मी की तुझी साथ मला लाभली
आयुष्यातली खडतर वळणं कशी सहज पार झाली
सुखाच्या सरींनी अलगद प्रवेश केला माझ्या आयुष्यात
तुझ्यासमवेत मी न्हाऊन निघाली त्यात
देशील का रे साथ अशीच मला साजणा
वाटेल प्रत्येक क्षण पोरका तुझ्याविना
भविष्याची स्वप्ने बघायला आवडतील मला तुझ्यासोबत
घेऊन कवेत मला सांग ना साजणा करशील का अशीच सोबत.”
कार्ड वाचलं आणि निनादच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याने गिफ्ट उघडलं. त्यात एक छान हार्मोनिका होती. ती बघून काय बोलावं हेच त्याला सुचत नव्हतं. त्याने वृंदाला मिठीत घेतलं.
“Many many happy returns of the day. Happy birthday Ninad..”
“ Thank you. तुला कसं माहीत हार्मोनिका वाजवायला मला आवडते असं...”
“आईंनी सांगितलं. तू आधी वाजवायचा असं. आणि इतकी छान आवड आहे तुला. तर ती जोपासायला नको का?”
निनाद त्या हार्मोनिका वरुन हात फिरवू लागला.
“वाजव ना रे एकदा.”
“आता बरीच वर्ष झाली गं.”
“तरीपण वाजव. मला ऐकायचंय…”
निनाद हार्मोनिका वाजवू लागला. आणि त्या सुरेल संगीतात वृंदा धुंद झाली. जशी कृष्णासाठी राधा वेडावली.
***समाप्त***


©हर्षदा शिंपी-बागुल