जाई घरी येई पर्यंत एकदम शांत होती. घरी आल्यावर ती सरळ फ्रेश व्हायला गेली. तर नितीन आणि आई बाबा बाहेरच हॉल मध्ये बसून राहिले. सगळेच खूप अस्वस्थ दिसत होते.
नितीन आईला म्हणाला,..."आई बाबा तुम्ही दोघेही जाई समोर असे हताश बसू नका, आपल्याला तिला सावरावे लागेल.जरी ती चेहऱ्यावर दाखवत नसली तरी तिची अवस्था माहीत आहे ना कशी असेल."
आई पण भरल्या डोळ्यांनी बोलते…."हो रे मला तीच काळजी वाटते. एक तर ती कोणाकडे जास्त बोलत नाही आतल्या आत कुढत राहील. इतकं सगळं झालं तरी तिने डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही."
बाबा…."हो ना आपण कमजोर पडलो पण ती कठोर बनली."
नितीन..."त्याच कठोर पणाची मला भीती वाटतेय."
बाबा आश्चर्याने त्याच्याकडे पहात म्हणतात…" म्हणजे?"
नितीन ..."अहो बाबा तिने मोकळं व्हायला पाहिजे रडलं पाहिजे नाहीतर तिच्या मनावर काही…." त्याची पुढे काही म्हणायची हिम्मत होत नाही.
आई घाबरून… "नाही नाही नितीन अस काही होणार नाही आपण आहोत ना. आता माझ्या पोरीला मी अजून त्रास होऊ देणार नाही."
नितीन…."आई हेच तर सांगतोय मी, की आता तिला त्रास होईल असं आपण काहीही करायचं नाही."
सगळे त्याच्या बोलण्यात हामी भरतात. तितक्यात जाई फ्रेश होऊन येते आणि पहाते तर सगळे हॉल मधेच बसलेत.
जाई…."अरे असे काय बसलेत तुम्ही सगळे चला झोपायचं नाही का?"
ती किचन मधून पाणी घेऊन आली. एक बॉटल आईच्या हातात दिली आणि एक घेऊन तिच्या रूम कडे वळतच होती तर नितीन ने तिचा हात पकडला. हातातून बॉटल घेऊन खाली ठेवली. अचानक झालेल्या कृतीमुळे जाईला काही समजलेच नाही पण दुसऱ्या क्षणाला नितीन ने तिला मिठीत घेतले. इतका वेळ स्वतःच्या भावनांना घातलेला बांध आता फुटू लागला. जाईला तिच्या दादूच्या मिठीत मात्र वेदना सहन करणे असह्य झाले. तीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती हमसून हमसून रडू लागली. नितीन चे डोळे पाणावले. तो तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होता. आज जितका त्रास तिला होत होता तितकाच त्यालाही होत होता. शेवटी त्यांचं नातं च तस होतं. इतर भाऊ बहीण चिडवतात, मारतात, छळतात, भांडतात पण जाई आणि नितीन त्याला अपवाद होते. ते दोघे एकत्र असतील तर त्याना जगाचा विसर पडायचा. भाऊबीज, रक्षाबंधन त्यांच्यासाठी सगळ्यात मोठे सण होते. जाईला थोडी दुखापत झाली तरी नितीनच्या डोळ्यात पाणी येत होते. आणि नितीन तर जाईच्या इच्छा, हट्ट,तिची स्वप्ने, सार काही पुरवण्याचे दुकान होता.
सगळेच रडत होते. आईबाबा त्यांच्या जवळ येऊन त्याना सावरू लागले. वेदनेचा भर ओसंडून गेल्यावर सगळे शांत झाले. नितीन ने जाईला हिम्मत दिली. तिनेही मान्य केले आणि सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले.
आजची रात्र वैऱ्याची होती. जाईच्या स्वप्नाची चिता धगधगत होती. कोवळ्या हृदयाचे अनेक तुकडे जमवून ती बेड वर पडून होती. रोज फोनवर त्याचा चेहरा पाहून तासनतास गप्पा मारत बसणारी जाई आज मात्र फोनला हात लावायलाही घाबरत होती. आज सताड उघड्या डोळ्यांनी छतावर आपल्या तुटलेल्या प्रेमाची समीकरणे मांडत होती.ती विचार करत होती आणि तिचे डोळे सतत वाहात होते. तिने तिची नेहमीची डायरी काढली ज्यात रोज ती तिच्या भावनांची अक्षरे सजवून ठेवत होती. तिने यश सोबत पाहिलेली स्वप्ने रेखाटली होती. आजवर ज्या भावना कुना समोर बोलली नव्हती त्या ती ह्या डायरीत लपवून ठेवत होती. आजच्या पानावर साठवून ठेवायला बरंच होत पण तिचे शब्द मात्र हरवून गेले होते. कितीदा पेन उचलून सुरुवात केली परंतु हातातील पेनाने साथच दिली नाही.शेवटी चार ओळी कश्या तरी लिहून तिने ते पान आसवात भिजवून तसेच ठेवून दिले.
चुकलेल्या नजरेने हृदयाला केले घायाळ का?
प्रेमाच्या बदल्यात आसवांची झाली बरसात का?
का पाहिलेल्या स्वप्नाची आरास इतकी महाग होती की,
आता आयुष्य भर आसवांची किंमत मोजावी लागणार का?
आजची रात्र काही तिला झोप लागेल अस वाटत नव्हतं. अश्यातच छताकडे पहात तिला काहीतरी आठवले आणि ती तशीच छताकडे पहात म्हणाली यश तुझ्या मनात जर मी कधीच नव्हते तर ते काय होते ज्याची मोहोर तू माझ्या ओठावर ठेऊन मला माझ्या पासून दूर केले होतेस.
काही वेळात ती पुन्हा त्या सुंदर भूतकाळात पोहोचली. जिथे फुलांप्रमाणे मने उमळत असतात. तोच काळ जिथे तीने तारुण्याच्या जगात पहिल्यांदा पाऊल टाकले होते. जिथे तिने पहिल्यांदा प्रेमाला चाखले होते.
ते दिवस होते तिच्या कॉलेजचे दिवस. शाळेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन तिने कला क्षेत्रात करियर करायचे म्हणून आर्टस् शाखेत ऍडमिशन घेतले होते.
तिचं आणि नितीन चं एकच कॉलेज होतं. ज्युनिअर सिनिअर शेजारी शेजारीच दोन सेक्शन मध्ये होते. नितीन आणि यश सिनिअर सेक्शनमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होते.जाई ज्युनिअर सेक्शनमध्ये11वी त जात होती.
दोन सेक्शनच्या मध्ये एक कुंपण होते. पण कॅटिंग एकच होती. त्यामुळे नितीन सहज तिच्यावर लक्ष ठेवू शकत होता.
रोज नितीन सोबत कॉलेजमध्ये ये जा करताना, कंटिंग मध्ये रोज भेटताना ती यशच्या नकळत जवळ जाऊ लागली होती. आता पर्यंत ती त्याला फक्त घरी भेटत होती. पण कॉलेजचे त्याचे डॅशिंग लुक मध्ये वावरणे तिला भुरळ पाडत होत. तो दिसत च तसा होता की कोणीही सहज त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. बास्केट बॉल क्रिकेट असे ग्राउंड वरचे खेळ ती फक्त तो दिसावा म्हणून पहायला जात होती. एक दिवस त्याला पाहिलं नाही की तिचं मन उदास व्हायचं. कधी कधी नितीन ऐवजी त्याच तिला घरी सोडणे तिला खूप आवडायचं. तो सोबत असला की तिच्या मैत्रिणी पण तिच्यावर जेलस व्हायच्या. त्याला चोरून पहाण्यात आणि मनात साठवण्यात ती नेहमी व्यस्त असायची. तिची मैत्रीण आशूला तिच्या मनातलं सगळं माहीत होतं.ती त्याच्या वरून तिला खूप चिडवत असे.
एकदा आजारी असल्या कारणाने ती कॉलेजला गेली नव्हती. महत्वाचे लेक्चर मिस झाल्याने ती बेचैन झाली होती. तिने तिच्या मैत्रिणीला आशूला कॉल केला.
जाई,...."हॅलो आशु..."
पलीकडून आशु बोलली..."बोला मॅडम कुठे होतात दोन दिवस?"
जाई…" अग माझी तब्बेत बरी नव्हती."
आशु…"ओहह ! आता कशी आहेस? डॉक्टर कडे गेलेलीस का?"
जाई… "अरे हो गेले होते. आणि आता मी ठीक आहे पण माझे ऐक आधी."
आशु…."बरं बोला मॅडम."
जाई…."माझे सगळेच लेक्चर मिस झाले मला तुझ्या कडून नोट्स देशील का?'
आशु..."हो का नाही स्वीट हार्ट, तुझ्यासाठी काहीही. अरे पण उद्या तर सुट्टी आहे आम्हीं बाहेर जाणार आहोत तर तू आजच घरी येशील का संध्याकाळी आपण मस्त तुझ्या नोट्स पण काढू आणि अभ्यास पण करू."
जाई..."ठीक आहे दादुला विचारते त्याने आणलं तर येईन.
आशु….बरं बाई विचार मी वाट पहाते."
खूप प्रयत्न करून तिने दादूला तयार केले. नितीन ने तिला पाच वाजता आशूच्या घरी सोडले. आणि संध्याकाळी सात वाजता घ्यायला येईन असे सांगून तो निघून गेला.
आशूच्या मम्मी ने छान नास्था बनवून दिला. दोघीही छान गप्पा मारत अभ्यास करू लागल्या.
दादू येई पर्यंत तिच्याकडे वेळ होता. दोघीनीही गप्पा मस्तीत वेळे कडे लक्ष दिले नाही. साडेसात वाजून गेले तरीही अजून नितीन चा पत्ता नव्हता. आता बाहेर अंधार पडू लागला होता. जाईने नितीन ला कॉल केला पण त्याचा फोन अनरीचेबल लागत होता. मग जाईने तिच्या घरी लँडलाईन वर कॉल केला पण कोणीच उचलत नव्हते. जाईला टेंशन आले होते. आशु ने तिला थांबायला सांगितले. आता खूप उशीर झालाय आणि नाही म्हटलं तरी निर्जन रस्ता एकटीने जाणे तर शक्यच नव्हते. ती पुन्हा पुन्हा कॉल करत होती पण कोणाचा कॉल लागत नव्हता.
मग तिने बाबांना कॉल केला त्यानी लगेच फोन उचलला आणि म्हणाले... "तिथेच थांब जाई, तूझ्या आईची अचानक तब्बेत बिघडली म्हणून नितीन तिला चैतन्य हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे. मी आताच पोहोचलोय इथे हॉस्पिटलमध्ये. तू घाबरू नकोस. मी नितीनला पाठवतो तुला घायला ओके बेटा."
आधीच आईला बरं नाही हे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती त्यात आता बाबांनी लगेचच फोन ठेऊन दिला होता. तिला काही सुचत नव्हते शब्द तोंडात अडकले होते आणि डोळे वहात होते. तिने विचार केला आपण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले तर?
तितक्यात आशु आली तिला विचारलं काय झालं? पण ती सांगण्याच्या स्थितीत नव्हती. तिने सरळ ….."मी चालले एखादी रिक्षा मिळेल जाते मी ओके बाय."
म्हणून घाईतच निघाली आशु खूप वेळ थांब थांब म्हणत होती पण एव्हढ्यात तिला रिक्षा मिळाली.ती निघूनही गेली आणि आशु माघारी परतली.
चैतन्य हॉस्पिटलमध्ये बाबा पोहोचले तर त्याना समजलं जाईच्या आईला हार्ट अटॅक आला होता. त्याना आय सी यु मध्ये ठेवलं होतं. डॉक्टर अजूनही उपचार करत होते. नितीन बाहेर बसला होता खूप टेंशन मध्ये होता. बाबा जवळ येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून फक्त नितीन म्हणताच.
त्याने बाबांना पाहिले आणि तो खूप भावुक झाला व त्यांना मिठी मारून रडू लागला. बाबांचे पण डोळे वाहू लागले ते त्याला शांत करत होते तर त्यानेच सांगितले.
त्याचा प्रोजेक्ट तयार करायला बाहेर गेला होता. घरी आला तेंव्हा त्याला लगेच जाई ला आणायला जायचे होते. म्हणून तो घाईत आईला बाय म्हणून निघाला. पण नंतर तो पुन्हा मागे फिरला आणि पहातो तर आई किचन कट्ट्याला पकडून विव्हळत खाली बसली होती.
नितीन ओरडला... "आई."
मात्र तो पर्यंत ती बेशुद्ध पडली होती. त्याने तसेच तिला उचलले आणि बाहेर आणले. रस्त्यावर जाऊन लागलीच रिक्षा बोलवून त्यात टाकले आणि थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला.
अजून डॉक्टर बाहेर आले नव्हते. त्यामुळे आई कशी आहे हे माहीत नव्हते.
नितीन…."पण बाबा जाई?"
बाबा..."मला कॉल होता तिचा मी तिला तिथेच थांबायला सांगितलं आहे. आता मी आलोय तर तू जाऊन तिला घेऊन ये."
हे ऐकून त्याच थोडं टेंशन कमी झालं.
नितीन…. "हो मी जाईन पण आधी डॉक्टर काय म्हणतात ते तर पाहू मग जातो मी.तसही ती आशु कडे आहे म्हणून बरं."
इकडे जाई मात्र अर्ध्या रस्त्यात पोहोचली होती. पण अचानक तिची रिक्षा बंद पडली.ती सारखा नितीन आणि तिच्या बाबांना फोन करत होती. पण कदाचित हॉस्पिटलमध्ये रेंज नसल्याने तिचा कॉल लागत नव्हता.
आधीच टेंशन मध्ये असलेली जाई आणखीन घाबरली. पाच मिनिटं प्रयत्न करून रिक्षा काही चालू होतं नाही म्हणून तिने वैतागून चालत जाण्याचा निर्णय घेतला. तसा रस्ता सरळ होता आणि जास्त रात्र पण झाली नव्हती. एखादे वाहन येजा करत होते. ती हिम्मत करून निघाली. थोडे अंतर चालत गेलीच असेल हळू हळू रस्ता सुनसान होत गेला. रस्त्यावर चिट पाखरू पण नव्हते. त्यात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे सम्पूर्ण अंधार. फोनची टॉर्च लाईट लावून ती भरभर चालत होती. अशी एकटी फिरण्याची वेळ तिच्यावर कधीच आली नव्हती. ती खूप घाबरली होती. पुन्हा तिने फोन पहिला पण आता तिच्याच फोन मध्ये नेटवर्क नव्हते.
घाईत चालताना आजूबाजूचा कानोसा घेत होती. सारखी मागे वळून पहात होती. अश्यातच मागून कोणी तरी आल्यासारखे वाटले म्हणून तिने मागे पाहिले. पण कोणीही नव्हतं. हृदयाची धडधड वाढली होती.
ओढणीने चेहऱ्यावरचा घाम पुसून ती पुढे चालू लागली. तोच पुन्हा बाजूच्या झाडीतून सर्रर्रर्र आवाज झाला ती आणखीनच घाबरली आणि आता ती पळू लागली. पळताना आजू बाजूला पहात होती तोच तिचा पाय खड्यात अडकून ती जोरात रस्त्यावर आपटली. हात पुढे करून तिने जास्त लागण्या पासून स्वतःला वाचवले पण पायाला लागलेच होते. ती कशी बशीउभी राहिली. पडल्या मुले तिचा फोन रस्त्यावर पडून त्याचे तुकडे झाले होते. ती तशीच पुढे चालणार तर तिच्या पायातून जोरात कळ आली आणि ती पुन्हा खाली पडली.
एव्हाना तिला तिची चूक समजली होती. ती रडत होती खूप घाबरली होती. तोच मागून एका गाडीचा लाईट तिच्यावर पडला. तिने वळून पाहिले तर ती गाडी सरळ तिच्या दिशेने येत होती. अजून जवळ जवळ आता अगदी तिला धडक बसेल इतकी जवळ आणि आपल्या डोळ्यावर हात घेऊन ती जोरात किंचाळली…..."आ…...ई."