Shallow people demand variety-but I have been writing the same story through out my life, every time trying to cut nearer the aching nerve.
-----Strindberg। {पिंगळावेळ जी.ए.कुलकर्णी}
#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_२२ (#कबीर)
कबीर निघून गेला आणि जातांना ऋतूला अगदी सैरभैर करून गेला. जड पावलांनी ती वर आली स्वतःचं काहीतरी हरवून आल्यासारखी,विझल्यासारखी झाली होती.
‘आज पुन्हा हिचं काहीतरी बिनसलंय’ तनु हळूच प्रियाला म्हणाली. जेवतांना आज दंगामस्ती,गाणी ,चिडवण काहीच नव्हतं. त्या शांततेत एकमेकांना वस्तू पास करत होत्या. जेवण आटोपल्यावर त्यांनी आपापली कामं देखील अगदी निमुटपणे आवरली कुठेही नेहमीसारखा आरडाओरडा नाही.
“प्रियु tab कबीरच्या गाडीत राहिला होता,आणलाय,टेबलावर आहे बघ. तुला काम होतं ना?” गॅलेरीतल्या झुल्यावर बसत ती म्हणाली.
“तू कबीरला भेटायला गेली होतीस?” प्रियाला तिचं कबीरसोबत असणंच मान्य होत नव्हतं.
“हो कॅफेत भेटलो. त्यानंतर त्याने घरी सोडलं अजून काही डीटेल्स सांगू?” प्रियाच्या प्रश्नाचा रोख तिला कळला तसा तिचाही ताबा सुटला.
“ऋतू रागावू नको पण जरा विचार कर जे वागतेय ते योग्य आहे का ?
तिच्या बोलण्यातला कडवटपणा ऋतूच्या अगदी अंगावर आला.तनु शांतपणे ऐकून अजूनही काहीच रिऍक्ट झाली नव्हती.
“प्रियु मलाच कळत नाहीये मी काय वागतेय rather मला समजूनच घ्यायचं नाहीये माझ्यासोबत काय होतंय ते.”
तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं.
“ऋतू एक स्पष्टच सांगते तू आमच्यापासून लपव,घरच्यांपासून लपव तुझ्या मनात काय चाललंय ते पण वेदपासून आणि स्वतःपासून लपवू नको,चूक असेल,बरोबर असेल, जे असेल ते असेल पण व्यक्त हो,वेदशी बोल ऋतू.” प्रियाच्या ह्या बोलण्याने ती अधिकच हळवी झाली.
“ऋतू तुझी काळजी आहे म्हणून बोलतोय लक्षात घे.काय झालंय तुला? मी तुला म्हटले ना वेदला कन्फेस कर. तो नक्की समजून घेईल ,कन्फ्युजनचा प्रश्नच नाहीये. तुमचं प्रेम आहे,थोडी भांडण झाली, त्याच्याकडून चूक झाली,तुझ्याकडून जरा जास्त झाली पण Not a big deal at all,लाईफ आहे चूक होणार पण मान्य कर आणि पुन्हा होणार नाही याची काळजी घे. कन्फेस कर that’s all.”
नेहमीसारखं तिच्या डोक्यावरून तिने हात फिरवला.मनात उसळणाऱ्या असंख्य प्रश्नांना दाबत ती वरवर शांत झाली.वेद्चा फोन येतोय हे बघून ती आत गेली.तनु आणि प्रिया तिच्या ह्या वागण्याने कोड्यात पडल्या होत्या.
“काहीतरी चुकतंय यार, ऋतू गोंधळात तर पडलीय पण त्याच बरोबर खूप सॉरटेड पण झालीय असं का वाटतंय,काहीतरी चालूये हिच्या मनात? खूप काहीतरी बदलेलं आहे नक्की.” तनु प्रियाकडे बघून म्हणाली.
“तनु , ऋतू नकळत कबीरच्या प्रेमात तर पडली नाही ना...? ”
प्रियाच्या ह्या वाक्याने तनुही ब्लॅंक झाली. त्यांचं बोलणं तिथेच थांबलं.
*****
“ऋतू सॉरी,सॉरी खूप सॉरी मला थांबता आलं नाही आज तुझ्या फ्रेंडला भेटायचं होतं ना?भेटलीस का तू ?”
“ठीक आहे रे,भेटले मी आणि ऐक उद्या संध्याकाळचा काहीच प्लान बनवू नको मला खूप महत्वाचं बोलायचंय..”
“यार एंगेजमेंटचा विषय सोडून काहीही प्लीज. खरं सांगतो, मी अजूनही घरी सांगितलेलं नाहीये.ऋतू प्लीज पुन्हा विचार कर ना, तसं आर्याला माहित आहे पण आईला सांगणं म्हणजे..lets see आणि हे माझं पर्सनल मत आहे, तुझा हट्टच असेल तर ठीक आहे उद्या सकाळी बोलून बघतो.”
“You are right वेद, घाई नको करायला आणि मला काहीतरी सांगायचंय तुला.” तिच्या आवाजाची गंभीर लय त्याने ओळखली.
“ये यार, घाबरवू नको असं बोलून.सगळं ठीक आहे ना? काय बोलायचंय तुला?पुन्हा जयरेवा प्रकरण का? अजून नाराज आहेस?उद्याची का वाट बघतेय आत्ता सांग काय झालंय ते आणि काय बोलायचंय? मला भीती वाटतेय तुझ्या अश्या वागण्याची.”
“वेद फोनवर नाही सगळं सांगता येणार. आपण उद्या शांततेत बोलू.”
“ऋतू मला का असं वाटतंय मी तुला हरवून बसलोय?सारखं तू कुणी परकी असल्यासारखी वाटतेय. ठीक आहे as you wish. उद्या बोलू.” तो ही कोरडेपणाने म्हणाला आणि पुढे एक शब्द ही न बोलता फोन ठेऊन दिला.
दोघांच्या मनात प्रचंड गोंधळ,अस्वस्थता होती....नव्हे तिघांच्या होती.
****************
डोळे डबडबून समोरचं काही दिसेनासं होतंय हे पाहून कबीरने गाडी जरा बाजूला घेऊन थांबवली.
“This is not done Kabir….you can’t be like this yaar..तुला माहितीय आता तू नाही पहिल्यासारखं जगू शकणार....”
स्वतःशी बडबडत त्याने पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसले. दोन चार सिगरेट भसाभसा ओढल्या.कडवट धूर श्वासात भरून तो जरा वेळ मागे टेकून बसला.बैचेनी वाढतच होती,त्याने नाईलाजाने पुन्हा गाडी सुरु केली आणि तो घराकडे निघाला.रस्ता उगाच दूर दूर जातोय असं त्याला वाटलं. त्याचं चित्त थार्यावर नव्हतं.
शांत होण्याचा प्रयत्न करत तो घरी पोहचला.
“जेवायला आवाज देऊ नको” एवढं हाउसमेडला सांगून तो तडक रूममध्ये गेला. ऋतुचं अंक्लेट,तिची एकमेव निशाणी.
त्याने ते छातीशी घट्ट धरलं.समोर त्याच्या स्टडीवर लावलेलं ऑर्फियस आणि युरीडीसच्या सुंदर illustration ने त्याचं उगाच लक्ष वेधून घेतलं. तसं तर रोज त्याच्या नजरेस ते पडत होतं पण एका दुर्दैवी प्रेमकहाणीचं सुंदर illustration ह्यापलीकडे त्याचित्राकडे त्याने कधी पाहिलंही नव्हतं पण आज “शेवटची भेट” ह्या शब्दाने ते चित्र त्याच्यासाठी जिवंत झालं. ऑर्फियस आणि युरीडीसच्या विरहाचा तो क्षण उगाच छळायला लागला.
“किती कठीण असेल ऑर्फियससाठी तो क्षण ज्या क्षणी युरीडीस त्याच्यापासून दूर झाली.खरंच ऑर्फियस इतका मूर्ख असेल की प्लूटोच्या मृत्युमय कृष्णविवरात गेलेल्या युरीडीसला एवढी यातायात करून बाहेर काढल्यावर ती पुन्हा सजीव प्रकाशात येण्यापुर्वीच मागे वळून न पाहण्याची अट विसरून आवेगाने मागे बघतो आणि युरीडीस पुन्हा कृष्ण विवरात परत जाते? त्याने का जाऊ दिलं असेल तिला स्वतःपासून दूर? तो शतमूर्ख होता, आततायी होता एवढंच ह्या दंतकथा सांगतात पण त्याने जाऊ दिलं असेल ते तिचं हित बघूनच. नक्कीच. मी थांबवलं असतं तर ऋतू थांबली असती माझ्यासाठी? कदाचित हो पण तिच्या त्या दोलायमान मनाचा ताबा घेऊन मी तिला नाही माझ्या प्रेमाची हाक देऊ शकत.आता ऑर्फियसचं जिवंत दुःख मात्र कायम सोबत घेऊन तुला जगावं लागेल..आता युरीडीसचं परतून येणं अशक्य..केवळ अशक्य.”
केव्हापासून रोखून धरलेल्या अश्रूंना त्याने मोकळी वाट करून दिली. कितीवेळ झाला त्यालाही कळलं नाही,मिटलेल्या डोळ्यांखाली ओलसर अंधारात तिचा चेहरा तेवढा चमकत होता. जरावेळाने दरवाजा ठोठावण्याच्या आवाजाने तो भानावर आला. डोळे व्यवस्थित पुसून त्याने दरवाजा उघडला,समोर त्याची आई होती.आईला पाहून त्याने विस्कटलेले केस जरा व्यवस्थित केले, चेहऱ्यावर पाणी मारून आला. त्या येऊन शांतपणे त्याच्या बेडवर बसल्या. तो आईजवळ जाऊन बसला.
“कबीर जेवण न केल्याने सुटेल असा कुठला प्रोब्लेम सापडलाय तुला?” त्याच्या केसांवरून हात फिरवत त्या म्हणाल्या.त्या मायेच्या स्पर्शाने तो विरघळला.आईला मिठी मारून तो पुन्हा रडायला लागला. त्याच्या बाजूला पडलेलं सुंदर अंक्लेट त्यांनी हातात घेतलं.
“माझ्या angry young man ला ह्या छोट्याश्या साखळीत बांधणारी नक्कीच खास असेल. सयगावच्या फार्महाउसवर सोबत होती तिचं नाव कळेल का?” त्यांनी हा प्रश्न विचारताच गोंधळून त्याने पुन्हा डोळे पुसत त्यांच्याकडे पाहिलं.
“मॉम टिकटॉक ने सांगितलं का?”
“हो, त्याने सुनीमावशीला सांगितलं आणि तिने मला,मी खरतरं वाट बघत होते तू स्वतःहून केव्हा सांगतोय ते. गोव्यावरून आल्यापासून बघतेय,तुझ्यातला बदल लगेच जाणवला पण तू काही बोलायला तयार नाही आणि खाली सरू पण बोलली ‘दादा रडल्यासारखे वाटले..जेवायचं नाही म्हणताय” म्हणून एक अंदाज घेतला.इतर कुठल्या गोष्टीने तर कबीर रडणार नाही.प्रेम ह्या एकाच गोष्टीची उणीव होती तुझ्या आयुष्यात आणि मला वाटतंय ती आता भरून निघालीय. हो ना? काय झालंय कबीर ? ”
त्यांनी त्याच्या केसांत हलकेच हात फिरवत त्याला शांत करायचा प्रयत्न केला.
“मॉम..तुम्हाला सांगणारच होतो पण कसं सांगू हेच कळत नव्हतं. माहित नाही तुम्हाला कितपत खरं वाटेल पण पहिल्यांदा तिला दुरून बघितलं आणि बघतच राहिलो,काय कनेक्शन होतं माहित नाही. तिला पाहिल्याबरोबर वाटलं की मी ओळखतो हिला, जन्मोजन्मीची ओळख आहे.हिच ती जिची मी वाट बघत होतो. दुसऱ्यांदा तिला सामोरा गेलो तेव्हा नकळत स्वतःला विसरून आलो पण तोपर्यंत कळून चुकलं की ती कमिटेड आहे,मी सावरलं स्वतःला पण ध्यानीमनी नसतांना ती दुसऱ्या दिवशी पुन्हा समोर आली आणि तिच्यासोबत गोव्याहून पुण्याला आलो.फक्त आणि फक्त एवढ्या सोबतीने तिच्या नावावर आयुष्य करून आलो.वाटलं नव्हतं मी कधी अनुभव घेईल पण खरच हे प्रेम खूप विचित्र असतं. ऋतुजा....तिचं नाव. You know mom ती जेवढा वेळ माझ्यासोबत होती खूप कंटेंट वाटत होती.माझ्यासाठी तर तिचं सोबत असणं काय होतं मी सांगू शकत नाही.जर भेटलात न तिला तुम्हालाही खूप आवडेल ती.सतत काहीतरी शोधत असल्यासारखे भिरभिरते डोळे ,अगदी लव्हगॉडेस आफ्रोडायटीसारखी,चंचल तर अशी एखाद्या सराईत मेटॅडोरच्या हातातल्या सळसळत्या लाल रेशमी वेरॉनिकासारखी. उनाड वाऱ्यासारखं थाऱ्यावर नसणारं मन, बालिश अगदी.भिरभिरणारं फुलपाखरू आहे.मॉम ती दुःखी असली ना तरी ते दुःख गोंडस वाटतं,आपलसं करावं वाटतं..आणि तिच्यासाठी फक्त प्रेम ही एकच भावना नाही आली तर तिला उगाच फुलासारखं जपावं वाटलं,तिच्या मनात चाललेल्या असंख्य आवर्तनांना शांत करून तिला हसवावं वाटलं..कुठल्याही अटीशर्तीशिवाय”
त्याने पुन्हा डोळे पुसले.
“कबीर एकदा तिला सांगून बघ तुझ्या मनात काय आहे ते.मान्य आहे कमिटेड आहे पण भावनेच्या ओझ्याखाली किती दिवस राहणार? तिला बोलून दाखवलं असतं तर तुझ्यासाठी move on इझी झालं असतं.”
“मॉम तिची एंगेजमेंट आहे आठवडाभरात,त्याचं प्रेम आहे एकमेकांवर. मीच आगंतुकासारखा आलो त्यांच्या प्रेमात आणि तिला गोंधळात टाकलं. ही सिच्युएशनच अशी आहे की इथे कुणीच चुकीचं नाही आणि कुठलाही निर्णय योग्य न्याय करणार नाही म्हणून हा तिढा सोडवावा यासाठी आज तिला शेवटचं भेटून आलो.. खरं सांगू? एक क्षण असं वाटलं की ती देखील माझ्यात गुंततेय की काय..आज अगदी गोंधळलेली, सैरभैर झालेली,अगदी incoherent वाटत होती.मी खूप प्रयत्नांनी सावरलंय स्वतःला आणि तिलासुद्धा. तुम्हाला म्हटलं ना खूप नादान आहे ती,तिला वेडीला कळणार देखील नाही तिला आयुष्यात काय हवंय.मॉम ती आयुष्यात फक्त प्रेमाने सावरणारी नाहीये,तिला जपायची गरज आहे,समजून घ्यायची गरज आहे एवढं मला कळतंय बस्स. ती आयुष्यात खूप आनंदी आहे,समाधानी आहे हे पाहून जावं असंही मनोमन वाटतंय पण मी आता इथे पुण्यात थांबलो तर स्वतःला सावरू शकणार नाही,खरतर तिच्यापासून दूर राहू शकणार नाही पण दूर राहिलो तर मनाला समजावता येईल. खरं म्हणायचं तर आज शेवटचं भेटून नाही तर स्वतःला त्या क्षणांमध्ये कायमचा कैद करून आलो. मॉम मी तो बंगलोरचा प्रोजेक्ट जॉईन करायचं ठरवलं आहे.Why this love is so strange mom. पाहताच क्षणी ती आयुष्याची प्रायोरिटी झाली. मॉम तुम्हाला आठवतंय तुम्ही लहानपणी सुट्टीमध्ये सगळ्या बच्चे कंपनीला Alice वाचून दाखवायच्या आणि मी रोज गोष्ट संपल्यावर एक डायलॉग रिपीट करायला सांगायचो....आठवतोय?
त्याच्या लहानपणीचे दिवस आठवून एक छान हसू त्यांच्या चेहर्यावर पसरलं.
“कसं विसरेल...कबीर किती पारायण केलीत तू त्या डायलॉगची-
“How long is forever?” Alice asked.
“Some time just one second.” White rabbit said.
त्याचा आवडता डायलॉग त्याला ऐकवून त्या प्रसन्न हसल्या. कितीतरी वर्षांनी झाकोळलेल्या जुन्या झगझगीत क्षणांवर अचानक फुंकर पडून ते चमकावे तसं त्याला वाटलं.
“Yes…sometime just a one second can be too long to explain, काश मी तिला सांगू शकलो असतो what she means to me..!!”
”कबीर ती आयुष्याचा भाग बनणार नसेल तर नको एवढं गुंतवून घेऊ स्वतःला तिच्यामध्ये.इतकं प्रेम नको करू की ज्याची आहे त्याची राहूच शकणार नाही. ”
“नाही मॉम, now I can’t unlove her ,never. मी उद्याच बंगलोर प्रोजेक्ट accept करतो,तुम्ही packingला मदत करा.”
“Ok….मी तुझ्या प्रत्येक निर्णयात सोबत असेन.time is the best solution.Take your time.”
“Thanks mom..मला माहित होतं तुम्ही समजून घ्याल ते. daddyनां ही सांगेन सकाळी transfer बद्दल. ”
आईच्या खांद्यावर डोकं ठेऊन तो बसला. समोरच्या चित्रातल्या ऑर्फीयसच्या डोळ्यातला विरहाचा क्षण त्याच्या डोळ्यातून वाहत होता. तो कितीतरी तसाच वेळ शांत बसून होता..अगदी शांत.
****************
काही दिवस येतांनाच अस्वस्थेचं गाठोडं घेऊन येतात आणि रेंगाळत पुढे सरकतात.आजचा दिवस तसलाच,कमालीचा अस्वस्थ करणारा.काहीही झालं तरी आज हिंमत करून वेदला कबीरबाबत सगळं सांगणार होती ती आणि तोच विचार एकसारखा तिच्या डोक्यात फिरत होता.ती जरा लवकरच आली. पंच करून जागेवर बसते तोच मागून तिला आरुषने हाक दिली.ती थांबली.
“गुड मॉर्निंग सर”
“गुड मॉर्निंग..ऐक,जास्त वेळ नाहीये महत्वाचं सांगायचंय,ऋतुजा मुंबईब्रांचला टेम्पररी रिसोर्स हवाय तुमच्या सेक्शनमधून आणि उद्याच नाव पाठवायचं आहे. ‘कोयना अग्रोरिसर्च & टुरिझमचा’ जबरदस्त गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मिळालाय त्यांना. फक्त सहा महिन्याचं शेड्युल आहे,मला वाटतंय तू हा चान्स सोडू नये,तुझ्या talent ला खूप स्कोप मिळेल,ट्रस्ट मी.तुला जर सलोनीने ऑफर केली तर काही prejudice ठेवून नाकारू नको.. actually मला असं वाटतंय की तू वेदला सोडून जायला तयार होणार नाहीस कदाचित म्हणून तुला समजवायला आलोय.At this stage you should think about your career. बाकी तू समजदार आहेसच.ओके?”
“Ok sir thanks a lot..हे खूप छान झालं तुम्ही सांगून ठेवलं ते, विचार करायला वेळ मिळाला, नाहीतर आयत्यावेळी काय निर्णय घ्यायचा कळलं नसतं.thank you.ह्या out of the way हेल्प बद्दल ”
“You deserve lots of success, keep it up..” तो आला त्या घाईने निघूनही गेला त्याच्या ह्या माहितीने तिच्या विचारांमध्ये अजून भर टाकली.आरुषने दिलेल्या माहितीप्रमाणे दुपारी सलोनीने मिटिंगमध्ये प्रोजेक्टची डिटेल माहिती दिली.ऋतुजा सोबतच अजून दोघांना प्रपोझल भरायला दुसऱ्या दिवशी १२ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. रेवाला पहिल्यांदा ऋतुजाची निवड व्हावी असं मनापासून वाटलं. प्रपोझल समजून घेण्यातच तिचा दिवस निघून गेला.जय रेवाला टाळण्यासाठी वेदही तिच्या सेक्शनला फिरकला नाही,कालच्या ऋतूच्या तुटक बोलण्याने तोही जरा नाराजच होता.
ऑफिसनंतर मात्र तो तिची वाट बघत पार्किंगमध्ये थांबला होता. तिची गाडी दिसली नाही तसा तो घाबरला, ‘ती निघून तर गेली नाही’ मनात विचार आला पण तिला समोरून येतांना बघून त्याला हायसं वाटलं.
“गाडी कुठेय तुझी?”
“कॅबने आलेय”
“फुल्ल ऑन गप्पांचा प्लान दिसतोय आज.” बोलण्यात सहजता यावी म्हणून तो म्हणाला.
“अभयची कुठली शिफ्ट आहे?” तिने जरा विचार करून त्याला प्रश्न केला.
“सेकंड...का?” तिच्या ह्या प्रश्नाचा रोख त्याला कळला नाही म्हणून गोंधळून त्याने उत्तर दिलं.
“तुझ्या फ्लॅटवर जाऊया?”
“ओह्ह्ह हो...madam काय इरादा आहे.” एकदम ताण निवळून,थोडंस फ्लर्ट करत तो म्हणाला.
“शांतता हवी आहे. बोलायचंय,एवढाच इरादा आहे” ती अगदी शांततेत म्हणाली.
“As you wish...चला.” ती मागे बसली, त्याने हसत गाडी वळवली.
*******
#क्रमशः
©हर्षदा
Next 23--6.30 pm today.