#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_२१
तिने तिरमिरीत वेद्चा नंबर डायल केला पण वैतागून लगेच कट केला.
“काय विचारू त्याला? तुझ्या रूमवरून माझ्यापर्यंत पोहचलेले हे पेजेस कसले? आपल्यात जे कधी झालं नाही ते का आहे त्यात?” विचार करून ती वैतागली.
“मे बी त्याच्या त्या रिसोर्टच्या प्रोजेक्टचा पुढचं स्क्रिप्ट असेल काही किंवा तो आता काम करत असलेला प्रोजेक्टचा भाग असेल किंवा त्याच्या डायरीची पानं असतील निशांत नावाने लिहित असेल,
मे बी ...stop it yaar मी काय काय विचार करतेय..आणि ही सोनाली म्हणजे मीच ना? काल अभय पण सोनाली असंच म्हणाला,वेद काही लपवतोय का? आणि तू ? तू पण कबीरसोबत आलीस ते लपवलंच आहे ना त्याच्यापासून? तुला काय हक्क आहे गं वेद्ला जाब विचारायचा?किंबहुना तुला आता रेवा,जयराज कुणालाच दोष द्यायचा अधिकार नाहीये.तुला त्याला हे विचारायचं असेल तर कबीरबद्दल पण सांगायचं. असेल हिम्मत तर फोन कर..”
काल कसंबसं शांत झालेल्या मनात पुन्हा वादळं थैमान घालायला लागली.
तिने ते पेपर झटकून तिच्या कपाटात ठेवले. वैतागून ती डोक्याला हात लावून खुर्चीवर बसली.इतका वेळ बाल्कनी स्वच्छ करत असलेल्या प्रियाने तिला तसं बसलेलं बघितलं-
“काय गं,काय झालं? थकलीस का?”
“नाही just असंच..”
“ओके. ऐक,तुझा tab चार्ज करून ठेव,मला लागणार आहे.” प्रिया जाता जाता म्हणाली.
“हम्म”
ती tab शोधायला गेली.बरीच शोधाशोध केल्यावर तिला आठवलं tab गोव्याला जातांना नेला होता. पुन्हा डोक्याला हात लाऊन बसली. तिने तो छोट्या पिंक bag मध्ये ठेवला होता.ती bag सापडत नव्हती.कदाचित कबीरच्या गाडीत ती bag राहिली असेल म्हणून तिने त्याचं कार्ड शोधलं नाईलाजाने त्याला फोन केला.
“कबीर,ऋतुजा बोलतेय..” तिच्या नकळत तिचं हृद्य वेगात धडधडत होतं.
“बोल”
“Actually गाडीत माझी bag राहिलीय का चुकून?.”
“अं..हो आहे,ठेवलीय व्यवस्थित.”
“आज मिळू शकते का मला? माझा tab आहे त्यात.”
“आज जरा अवघड आहे ...” तो शक्य तितकं नॉर्मल बोलायचं प्रयत्न करत होता.
“नो प्रोब्लेम.उद्या ऑफिसनंतर घेते,कुठेतरी मिडवे सांग मी येते.”
“बाणेर रोड कॅफे अल्डोराडो चालेल? आणि ऑफिस आहे म्हटल्यावर हिरो ही आला असेल घेऊन ये जमल तर,भेट होईल. ”
बोलणं शक्य तेवढं फॉर्मल आणि तिऱ्हाईत असल्यासारखं वाटावं ही त्याची धडपड चालली होती.तो परकेपणा तिला ही जाणवला.
“ठीक आहे,लोकेशन पाठव.” तिने फोन बंद केला.
तिच्या बोलण्याचा सूर काहीसा गोंधळलेला,काहीतरी शोधत असल्यासारखा होता हे नक्की आणि त्याने ते बरोबर हेरलं होतं.
काही नाव नसलेल्या फिलिंग्सला तसचं अमूर्त राहू देणं कधीकधी सगळ्यांच्याच हिताचं असतं,त्यालाही तेच करायचं होतं.
ऑफिस सुटल्यावर ती पार्किंगमध्ये वेदची वाट बघत होती.
आज दिवसभर रेवाची जळकी नजर आणि लंचब्रेकला जयचे कुजके कमेंट्स,तिच्या आणि वेद्च्या भांडणाची दबकी चर्चा,इतर मैत्रीणीचं ‘काय झालं नेमकं’म्हणून मागे लागणं या सगळ्या प्रकारांनी ती अस्वस्थ झाली होती.आज मात्र रेवाच्या,जयच्या कुठल्याच बोलण्याचा तिला त्रास होत नव्हता.
कदाचित वेद्चा विश्वास तोडण्यासाठी स्वतःला तिने जय-रेवा एवढच गुन्हेगार मानलं होतं. जरा वेळाने वेद धावतच खाली आला.
“सॉरी यार थोडा उशीर झाला. बघ किती सुंदर वातावरण झालंय.दूर कुठेतरी भटकून यायचं का?” तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती जी त्याने हेरली.
“वेद तू आज जेवायलाही नव्हतास,दुपारनंतर फोन बंद होता,जागेवरही नव्हतास?”
“अग हो, किती ते प्रश्न ? जरा नव्या ऍडस्क्रिप्टवर काम चालू आहे. टीमसोबत मिटिंगमध्ये होतो. ”
“तसा मेसेज करून जायचं ना वेद.”
“सवय करून घ्या मिसेस इनामदार. क्रियेटीव्ह रायटरला संभाळण,त्याचे मूड्स हन्डल करणं सोप्पं काम नाहीये.”
तिचे गाल ओढत नेहमीसारखच गोड हसत तो म्हणाला.
“वेद आपल्या लव्हस्टोरीवरच एखादं पुस्तक का नाही लिहत तू?”
त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय सांगतात हे तपासून पाहिल्यासारखं त्याच्याकडे एकटक बघत होती..
“ओह्ह नो,लव्हस्टोरी..........बघ बोलता बोलता विसरलोच होतो,एक ड्राफ्ट अर्जंट मेल करायचाय,घरी लवकर जायला हवं. चल रात्री फ्री झाल्यावर फोन करतो आणि तुझी गाडी कुठेय?”
“वेद थांब ना,आपल्याला बाणेरला जायचंय आत्ता.तुला एका मित्राला भेटवायचं आहे.तू सोबत असशील म्हणून गाडी नाही आणली.”
“ऋतू आज नाही, नंतर जाऊ कधीतरी.खूप महत्वाचं काम आहे,प्लीज यार समज ना.” त्याने गाडी चालू केली.
“वेद आजचा वेळ दिलाय,...तुला भेटवायचंय. ऐक ना..”
“ऋतू खूप महत्त्वाच काम असल्याशिवाय का मी नाही म्हणतोय,समज ना राव.”
“ओके”ती नाईलाजाने म्हणाली.तो निघून गेला.ती विचार करत अजूनही तिथेच थांबून होती. वेदशिवाय कबीरला भेटावं का?
ती संध्याकाळ आठवून ओकवर्ड होत असतांना त्याला पुन्हा भेटायचं म्हणजे...अवघड होणार आहे.काय करावं? पण ओकवर्ड होण्याचा प्रश्न येतोच कुठे? तो म्हटलाय ना त्याच्या मनात काही नव्हतं...आणि माझ्या? तिने पुन्हा मनाला चाचपडून पाहिलं.
“नाही हे अस नाहीये आणि माझी तर एंगेजमेंट होणार आहे माझ्याच हट्टाप्रमाणे,वेदच माझ्या आयुष्याचं सत्य आहे... ऋतू फेस हिम...”
तिने कबीरला फोन केला. तो on the way होता. तिने कॅब बुक केली.
कबीर तिच्या अगोदर पोहचला होता. रोड फेसिंगला असलेला टेबल त्याने निवडला होता.कालचा आणि आजचा संपूर्ण दिवस त्याने विचित्र अस्वस्थेत काढला होता.
एरव्ही काम, मिटिंग,प्रेझेंटेशन यात दिवस कुठे निघून जायचा कळायचं देखील नाही पण तिला ड्रॉप केल्यापासून ती फुलपाखरासारखी अवखळपणे आजूबाजूला वावरते आहे आणि तिचं हे अल्लड वावरणं खूप सुखावून जातंय एवढंच त्याला कळत होतं.पण त्याला हे पक्क माहित होतं की ती वेदची आहे, रागावलेल्या,चिडलेल्या,दुखावलेल्या मनस्थितीत असल्याने ती त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाली होती,तिच्यासाठी तो क्षण म्हणजे त्या वातावरणाचा,शब्दांचा आणि मनस्थितीचा एकत्रित प्रभाव होता बाकी काही नाही. पण त्याच्यासाठी? तो क्षण काय होता?
त्याचासाठी ते दोन क्षण तिच्या आयुष्यातून चोरलेले दोन श्वास होते जे त्याला कदाचित सगळं आयुष्य तिच्याशिवाय काढायला आता पुरेसे होते.
थोड्यावेळाने ती आली.त्याचं लक्ष बाहेरच होतं. दाट मोकळे केस, तिने ते बोटांनी अलगद सावरले,एकसारखे केले.तो वरून बघतच होता अगदी एकटक. ऑफव्हाईट लॉंग कुर्ता आणि ब्लूजीन्स, डोळ्यातलं डार्क काजळ,पायात वेजेस. पर्स सावरत तिने त्याला फोन केला.
तो काचेजवळच्या खुर्चीवरून उठून त्याच टेबलच्या दुसऱ्या खुर्चीवर बसला.तिला वर यायला सांगितलं.त्याने उगाचच टीम मेंबरला फोन लावून कामात असल्याचं भासवलं.
ती वर आली,कबीर कुठेही बसला तरी भारदस्त फिजीकमुळे उठून दिसण्यासारखा होता.तिने त्याला काज्युअल्स मध्येच बघितलं होतं. आज ऑफिसमधून सरळ भेटायला आल्याने तो फॉर्मलमध्ये होता. त्याच्या त्या नेव्हीब्लू शर्टमधूनसुद्धा त्याची अथलीट बॉडी जाणवत होती. मेसी फ्रीन्जेस आज परफेक्ट स्टाईल केले होते.
’ऑफिसमधल्या मुली उगाच नाही ह्याच्या मागे लागत’ मनात आलेला विचार तिने पटकन झटकला.
तो फोनवर बोलत असल्याने ती समोर उभी राहिली आणि हात हलवून “हाय “ असं हळूच पुटपुटली.
तो थोडंस हसला हातानेच ‘बस’ असा इशारा केला.ती अवघडून बसली.त्याच्याकडे न बघत तिने दुसरीकडे लक्ष वळवलं. समोरच्या टेबलावर कॉलेजच्या मुलींचा ग्रुप होता आणि त्या जरा जरा वेळाने कबीरकडे बघत. होत्या उघड उघड फ्लर्ट करत होत्या,ऋतुजा येऊन बसल्यावर मात्र स्वतःच्या फजितीवर त्यांनी हसून गलका केला.
“स्टुपिड..” तिच्या तोंडातून आपसूकच निघालं.
“मला म्हटलीस?” तो फोन ठेवत बोलला.
“न..नाही,सोड असंच” त्या मुलींकडे बघत ती म्हणाली.
“काय घेणार?’
“ब्लॅक कॉफी”
“ओके” त्याने दोघांसाठी ऑर्डर केलं.
“यार हिरो नाही आला सोबत?”
“He was lil busy”
“काय यार जरा जोडीने फिरत जा ना ते love you sona, love you baby type” तो नेहमीप्रमाणे खळखळून हसायचा प्रयत्न करत म्हणाला.
“कबीर...यार ” ती ही त्याच्या हसण्यात सामील होण्याचा प्रयत्न करत होती.
नंतर कॉफी घेतांना दोघे शांत होते,जरावेळाने त्याचं लक्ष तिच्या बोटातल्या रिंगकडे गेलं.ती रिंग त्यादिवशी तिच्या बोटात नव्हती.
“Nice Ring” त्याचा बोलण्यात कॉम्प्लिमेंट तर होतंच पण उगाच कुतूहलसुद्धा होतं.
“ohh ,वेदने दिली,Next week एन्गेजेमेंट करतोय..” त्याच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन टिपायला म्हणून त्याच्याकडे बघून जरा हसून ती म्हणाली.
“Waw!! Nice,Congratulations!! चला प्रेमाची फेयरीटेल पूर्ण झाली तर,प्रिन्स चार्मिग भेटला प्रिन्सेसला शेवटी.” तो शक्य तितके आनंदी भाव आणि सहजपणा चेहऱ्यावर आणत म्हणाला.
“तुला यावं लागेल हं एंगेजमेंटला.” तिनेही मग तोच प्रयत्न केला.
“शक्य नाही..” त्याने तिच्याकडे पाहिलं,तिचीही नजर भिडली, इथे आल्यापासून पहिल्यांदाच.
“का?” तिने नजर न हटवता विचारलं. त्याचे डोळे वाचायचा तिचा प्रयत्न चालू होता.
“I Mean ..अरे बंगलोरला शिफ्ट होतोय नेक्स्ट विक. तिकडे एक प्रॉजेक्ट असाईन झालाय.जबरदस्त काम मिळालंय यार,मज्जा येणार आहे.ह्या अश्या संधीच्या शोधात होतो मी इतके वर्ष.बघ तुझी पण विश पूर्ण झाली आणि माझीही..मंदिरातल्या आजीला सलाम !! तुला जीवनसाथी मिळाला आणि मला ही तू दिलेल्या प्रसादामुळे मनासारखं काम....खूप काम असणार आहे,असं लाईफ आवडतं मला.सो आजी जिंदाबाद.”
तो हसत म्हणाला.
खोलवर काहीतरी दुखावल्याची जाणीव होतीच पण ‘तो शिफ्ट होतोय तर आपल्याला का वाईट वाटावं? काहीच कारण नाही,come on’ ती स्वतःलाही समजावत होती.
मग गोंधळ आतल्या आत दाबत चेहऱ्यावर हसू ठेवत ती म्हणाली.
“हो आजी जिंदाबाद.. आणि तुझ्या नवीन कामासाठी congratulations..”
“Thank you & my best wishesh will be always with you.तुला आयुष्यात जे पाहिजे ते मिळू दे.” स्वतःच्या मनावर शक्य तितका ताबा ठेऊन तो बोलत होता.
“Thanks.”
“So, this is our last meeting ha?शेवटची भेट & ऑल. ”
“Yes..”
“ ऋतुजा त्या दिवशी खूप रागात होतीस,पण आज तर खुश आहेस ना ? मग हिरोचा फोटो तर दाखव, यार.”
“ओह्ह..तू वेद्ला पाहिलंच नाहीये ना..” तिची बोटं फोनवर झरझर फिरली,तिने त्याचा हातात मोबाईल दिला.
“Handsom dude. Perfect pair. ” फोटो बघून, तिला फोन देत तो म्हणाला.
“ डिंपल सॉलिड आहे हिरोच्या.” त्याच्या ह्या वाक्याने ती जराशी लाजली.
“हो”
“आणि त्याचा tattoo “livin la vida loca” awesome ,तो “Meraki writer” आहे का?” तो सहज बोलून गेला.
“कुठला writer?” तिला आश्चर्य वाटलं.
“Meraki....फेमस रायटिंग platform,त्यांची tagline आहे ती.Loca मधल्या Cचा विशिष्ट कर्व्ह त्यांच्या tagline मध्ये जनरली जसा असतो तसा आहे म्हणून विचारलं.”
“मला नाही माहित,कधी विचारलं नाही मी,त्याच्या लिखणाच्या बाबतीत तो सहसा सांगत नाही.” तिला काय बोलावं हेच समजत नव्हतं.
“तसं असेल तर तो जबरदस्त रायटर असला पाहिजे, नाहीतर Meraki साठी लिहायचं म्हणजे सोप्पं काम नाही.जगातल्या सगळ्या भाषांमधल्या बेस्ट स्टोरीजच ते पब्लिश करतात.त्यांची रीडिंग मेम्बरशिप मिळवायलाही रीडिंग टेस्ट पास करावी लागते.सॉलिड प्रकरण आहे ते. मी मुबईब्रांचला असतांना माझा एक नॉर्थइंडिअन टीममेंबर होता. तो लिहायचा Merakiसाठी. त्याच्या ड्राफ्टवर असायची ही tagline.बऱ्याचवेळा तो माझा laptop वापरायचा म्हणून आठवलं.असो...छान आहे वेद.”
तो अगदी मनापासून कौतुक करत म्हणाला,ऋतुजाची निवड त्याला मनापासून आवडली होती.
“Thanks” तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल होतं.
“आणि ही तुझी bag,” त्याच्या laptop bag मधून तिची bag काढून त्याने दिली.
“ऋतुजा आठवून बघ अजून माझ्याकडे काही राहिलं नाहीये ना कारण ही आजची शेवटची भेट.” तो जरा उसनं अवसान आणून हसत म्हणाला.
“एका रात्री जरावेळ केलेली सोबत आणि प्रवासाचे १०/१२ तास आणि अजूनही बरंच काही राहिलंय तुझ्याकडे. ते कधीच परत नाही ना मिळणार.” त्याच्या डोळ्यात बघून ती म्हणाली.
“एकदा मागून तर बघ...” ओठांशी आलेलेत्याचे शब्द तिथेच राहिले.
“म्हणजे...ते क्षण आहेत माझ्याकडे, शेवटची भेट असली तरी ते जपून ठेवेन मी.आता पुन्हा आयुष्यात भेट होईलच असं नाही, झालीच तर ती इतकी सहज असेल असंही नाही,नात्याचं दडपण असेल ना.” ती मघाचं वाक्य सावरत,जरा दुरुस्त करत म्हणाली, तो नाईलाजाने हसला.
“नात्यात प्रेम असेल तर कधीच दडपण येत नाही...dont worry तुझं प्रेम तुला कधीच बदलायला सांगणार नाही, तुझं हे असं चंचल, childish असणं म्हणजेच तू आहे,ते सुट करतं तुला ,makes you complete.बघ कसं असतं ना बरेचदा आयुष्यातले कितीतरी दिवस,तास असेच फुकट निघून जातात जे कधी पुन्हा आठवत सुद्धा नाही पण काही दिवसांची,तासांची ,मिनिटांची आणि काही क्षणांचीसुद्धा किंमत इतकी असते की परत मिळवण्यासाठी आयुष्य गहाण ठेवावं..”
त्याची नजर शून्यात खिळली होती.तिला अवघडल्यासारख झालं.नको ते बोलून गेलो कळल्यावर नेहमी सारखं सावरायचा प्रयत्न करत तो म्हणाला-
“म्हणजे इतकंच म्हणेन की माझी कुठली वाईट मेमरी तुझ्याकडे राहायला नको..तू मला मनापासून माफ केलंय ना ऋतुजा?
“याचं उत्तर मी तुला केव्हांच दिलंय कबीर...बरं निघूया का?” तिचा हलक्या झालेल्या आवाजात मनात उठणाऱ्या कितीतरी भावनांचं वजन होतं.
एकदा कबीरला मनात चाललेली ही घालमेल बोलून दाखवावी हे तिच्या मनात आलं.तो ही शांत नव्हताच पण त्याला तो सहजपणा कायम ठेवायचा होता कारण समोर उभी असणारी ती कुणाचं तरी प्रेम होती. पण आता हे ‘निघूया’ ऐकल्यावर तो जरा अस्वस्थ झाला आल्यापासून घेतलेलं सहजपणाचं बेयरिंग गळून पडायला लागलं ’शेवटची भेट’ ह्या शब्दातली खोल गहिरी जाणीव त्याच्यापर्यंत पोहचली आणि त्याला काही सुचेनासं झालं.
‘तुला इतकं बेचैन होण्याचं काहीच कारण नाही..हे असंच तर असणार होतं ना? याचा शेवट हाच आहे ना? मग ही बैचेनी का? उठ तुझ्या वाटेला लाग.प्रवास इतकाच होता.सोबत एवढीच होती.’
त्याचं मन त्याला पुन्हा पुन्हा बजावत होतं.त्याचे ओठ कोरडे पडले.
“मी ड्रोप केलेलं चालेल तुला,शेवटचं ? प्लीज!!”
‘शेवटची भेट जरावेळाने शेवटची व्हावी’ हा विचार करत तो त्याचाही नकळत खाली मान घालून घाबरतच म्हणाला.
ती काहीच बोलली नाही अगदी शांत होती.जरा वेळ असाच गेला.
“गाडी कुठे पार्क केलीय तू”
त्याच्याकडे न बघता ती म्हणाली,त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आलं.
*******
रत्यावर वाहनांची वर्दळ वाढली होती,गाड्यांचे, हॉर्नचे आवाज वातावरणात भरून होते. गाडी निघाली.दोघेही शांत होते.
शांततेची देखील एक वेगळीच वाचता न येणारी पण अनुभवता येणारी अबोल लिपी असते ती वाचायचा प्रयत्न ते करत होते. त्याच्या गाडीमधला किंगफिशरचा चार्म हळुवार हेलकावे खात होता...”
“हा माझा होल्सियन टाईम आहे का?” एवढंच तिच्या मनात आलं ती घाबरली.
“सखी एरी आली पिया बिन,
सखी कलन परत मोहे घडी पलछिन छीन ..
जब से पिया परदेस सिधारे,
रतिया गुजारू में तारे गिन गिन ...”
त्याची प्ले लिस्ट चालू होती.
तिने गाण्याबद्दल विचारण्यासाठी त्याच्याकडे बघितलं.त्याने ते जाणलं.
“आब्दा परवीन यांच्या आवाजातलं आहे, राग यमन...ह्या बंदिशीचा अर्थ नाही माहित मला.”
तो आवंढा गिळत एवढंच बोलला.ती डोळे मिटून ऐकत होती.
‘जब से पिया परदेस सिधारे...............’
“कदाचित तो दूर देशी असेल आणि त्याच्या विरहात ती म्हणत असावी,तो निघून तर गेलाय पण सोबत काय घेऊन गेला हे त्याच्या गावी ही नसेल. तिला मात्र कळणार नाहीये की एक एक क्षण ती कसा त्याच्याशिवाय काढणार आहे? चांदणं मोजून रात्र निघूनही जाईल पण तू आठवत राहशील कायम. असा काहीसा अर्थ असेल ह्या बंदिशचा ..”
ती बोलत होती,तिचे डोळे भरून आले.तिने ते कुशलतेने पुसून घेतले.त्याने काहीच प्रत्युतर दिलं नाही.म्युझिक प्लेयरच ऑफ केला. तिच्या ह्या बोलण्याची त्याला मनस्वी भीती वाटली.
रस्ता मागे पडत होता तसा त्याच्या मनाचा गुंता वाढत होता.
‘आपण गुंतलोय हिच्यात,खरं सांगायचं तर तिच्याशिवाय काही सुचत नाहीये पण ह्या फिलिंग्ज आपल्या पुरताय,पण ऋतुजा? ही तर आपल्यात गुंतत नाहीये ना? अगदी नादान आहे ती.आपण तिला इंफ्ल्युयन्स तर करत नाही आहोत नकळतपणे? यांच्या प्रेमामध्ये तर नाही आलोय? ही माझ्यासाठी इमोशनल तर नाही झालीय ना?असं झालं तर मी माफ नाही करू शकणार स्वतःला. तिला हे मृगजळ आहे हे समजावून द्यावं लागेल...आत्ताच.”
जरा वेळाने तिच्या रूमसमोर गाडी थांबली.
“सगळं घेतलं ना व्यवस्थित? वेंधळेपणा करू नको.”बऱ्याच वेळाने तो काही बोलला होता. तिने फक्त मान डोलावली.
त्याने मनाची तयारी केली,तिला असं गोंधळात टाकून त्याला जायचं नव्हतं.
“ऋतुजा शांतपणे ऐक, शेवटची भेट आहे म्हणून सांगतोय. मी तुला त्या रात्री पहिल्यांदा पाहिलं नव्हतं,तु पहिल्यांदा दिसली ते कारंजाच्या पाण्याचे तुषार अंगावर घेत आपल्याच मस्तीत, आनंदात असतांना. दोन्ही हात पसरवून त्या थेंबांना कवेत घ्यायचा वेडा हट्ट करत होतीस. त्या कारंज्याच्या छोट्याश्या पावसात भिजतांना जो निरागसपणा तुझ्या चेहऱ्यावर होता,समुद्राची गाज कानांत नाहीतर श्वासात भरून घेण्याची तुझी जी धडपड चालू होती, चेहऱ्यावर जी निरागसता होती ती इतकी सहज आणि नॅचरल होती की तितकं प्युअर आणि रॉ ह्या जगात काही आहे ह्यावर विश्वास बसायला काही क्षण गेले होते.मी तिथेच होतो शेजारच्या रिसोर्टच्या बाल्कनीत.तो क्षण टिपावा म्हणून मोबाईल घ्यायला आत गेलो तोपर्यंत तू निघून गेलीस.तुला कधी आठवायचं म्हटलं की तेच रूप आठवतं.तू अशीच रहा.बालिश,चंचल.आणि थोडी वेडू!
‘हेच योग्य, हे अयोग्य,असंच वागायला पाहिजे तसं नको..जगाची ही आखीव-रेखीव मोजपट्टी तुझ्यासाठी नाहीये... कधीकधी काय होतं ना ऋतुजा आपल्याला खूप सुंदर स्वप्न पडतं,आपण ते जगायला सुरुवात करतो,रमून जातो पण एका क्षणी आपल्याला हलकी जाग येते आणि कळतं हे जे काही खूप आवडतंय हे स्वप्नय आणि ज्या क्षणी कळतं हे स्वप्न आहे तेव्हाच खरंतर ते विरून गेलेलं असतं आणि समोर असतं ते आपलं वास्तव.
नंतर कितीदा ते स्वप्न पुन्हा पुन्हा बघयचा प्रयत्न केला तरी ते दिसत नाही फक्त एक गोड आठवण बनून मनाच्या कोपऱ्यात राहतं...वेळ जातो तसं विसरून देखील जातो आपण ...तश्या स्वप्नांना एवढं मनावर घ्यायचं नसतं...!
Like एखाद्या long journey मध्ये थोडा विसाव्यासारखं आपण भेटलो असं समज.ती भेट म्हणजे ते गोड स्वप्न होतं पण वेद तुझं वास्तव आहे. तू ते स्वतः निवडलं आहे तुझ्यासाठी.
प्रवासात आपल्यात जे झालं त्याला तुझ्या दुखावलेल्या,अस्थिर मनाची पार्श्वभूमी होती,तू कुठेतरी वेदच्या वागण्याने दुखावली गेली होतीस,त्या रात्री तुझी ड्रीमडेट फेल झाली ती नाराजी कुठेतरी दडली असेल आणि अजूनही काही मला माहित नसणारे कारणं असतील पण एक लक्षात घे त्या जवळीकमध्ये प्रेम नव्हतं,lust तर मुळीच नव्हती..जे होतं त्या फिलिंगला कदाचित काहीच नाव नाहीये म्हणून तू गोंधळली आहेस. प्रत्येक नात्याला,फिलिंगला नाव असावं असा आपला हट्ट असतो आणि ते सापडलं नाही की आपली घालमेल होते,चूक बरोबर हा वाद सुरू होतो...प्रत्येक फिलींगला नाव असणं तेवढं गरजेचं नाही ती फक्त शुद्ध आणि सेल्फलेस असणं महत्वाचं.
तुझं प्रेम वेद आहे आणि मला प्रेम कधी होणार नाही,नेव्हर!
मी मित्र असू शकतो,होल्सियन डे सांगणारा तत्वज्ञ असू शकतो किंवा फिशलव्हवर मार्गदर्शन करणारा तुझा वाटाड्या ..गाईड you know ते असू शकतो.”
“म्हणजे मितवा ?" तिला एकदम ते पेज आठवलं,त्याची लय साधत ती हळुवारपणे म्हणाली.
“टिपिकल निब्बी ,जोश्यांच्या स्वप्नीलची फॅन दिसतेय.
अगदी बरोबर....... 'मितवा!'
‘मी फक्त तुझा मितवा असू शकतो ऋतुजा प्रेम नाही..’
किंवा अजून व्यापक म्हणायचं तर सहेला….!
तुझ्या मुळात चंचल,बालिश असलेल्या मनाचा तळ माझ्या अश्या अचानक येण्याने ढवळून निघाला पण तुझं प्रेम वेद आहे आणि मला वाटतं तू त्याला अजूनही तो प्रवास उलगडून सांगितला नसेल तर लगेच सांग.... सहेला कन्सेप्ट सांगायला जाशील तर रायटर आहे म्हणून कदाचित समजून देखील घेईल आणि नाही समजली तर चूक झाली, तू मान्य केली ह्या बेसिसवर तरी तो माफ करेल.
ऋतुजा आयुष्यात बऱ्याच टप्प्यांवर समजगैरसमज होतात, विश्वासाची कसोटी लागते, तुलाही त्याला त्याची स्पेस द्यावी लागेल, त्याच्याही आयुष्यातला काही चुका,काही कॉन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. शेवटी थोडं दुःख तर प्रत्येक रिलेशनशिपमध्ये आहे, आपल्याला फक्त ती एक व्यक्ती शोधायची असते जिच्यासाठी हे सगळं सहन करणं सार्थकी लागतं.
जी व्यक्ती तुला मिळाली आहे.वेद आणि तू ,तुम्ही दोघं खूप लकी आहात आणि एकमेकांसाठीच बनलेले आहात, ..हसत रहा, नेहमी प्रेमात रहा आणि हो माझा नंबर डिलीट करून टाक कायमचा. कॉललिस्ट मध्ये नको, मला आठवणीत राहू दे !! ”
ती मन लावून त्याला ऐकत होती,त्याचा प्रत्येक शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करत होती,रिलेशनशिपमध्ये कुठे काय चुकलं याचा ताळमेळ लावत होती. तिने भरून आलेले डोळे पुसले स्वतःवर हसत त्याला thanks म्हणाली,तिला असं निवळलेलं बघून तो समाधानाने हसला.
ती खाली उतरली.तिला गुडबाय म्हणायला तो ही बाहेर आला.
“चल....आता खऱ्या अर्थाने ही भेट शेवटची झाली,a pefect closure. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली.Now I will be back to my NERD life..work work work repeat..” छानसं हसून तो म्हणाला.
“कबीर...कधी..” ती काहीतरी विचारायला अधीर झाली होती.
“Statue!!” तिच्या चेहऱ्याकडे निर्विकारपणे पाहिलं,डोळ्यांमध्ये न बघता फक्त डोळ्यांकडे पाहिलं आणि वळला, गाडीत बसला.ती शांत उभी होती.गाडी थोडी मागे होत,वळून निघून गेली.ती अजूनही शांत उभी होती.
“तू move म्हणायचं विसरलास कबीर.”
तिचे डोळे काठोकाठ भरले,पापण्यांचा भार पडला आणि थेंबानी गालावर यायला सुरुवात केली.
#क्रमशः
©हर्षदा