ही एक काल्पनिक कथा आहे. याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही.
'ये वादा रहा सनम' एक अनोखी कहानी. एक प्रेम करायला शिकवणारी कथा. एक अशी कथा ज्यात रहस्य आहे प्रेम आहे शोध आहे आणि एक वचन सुद्धा आहे धर्तीवर परत परत जन्म घेण्याचं.
हिमालय पर्वतावर...
महादेव ध्यानस्थ बसलेले असताना पार्वती माता येतात आणि महादेवांना विचारतात.
पार्वती माता: "स्वामी. तुम्ही खूपच चिंतेत दिसताय. मी तुमच्या चिंतेच कारण समजू शकते का?" आपले डोळे उघडत महादेव आपल्या चिंतेच कारण सांगू लागतात.
महादेव: "प्रिये. मी चिंतेत आहे ते धर्तीवर पसरलेल्या आतंकामुळे. ही तीच धरती आहे जिला कधी काळी आपण स्वर्ग म्हणायचो बघ आज त्याच धर्तीची काय अवस्था झाली आहे."
पार्वती माता: "स्वामी. मग यावर काहीच उपाय नाहीये का? तुम्ही तर देवधी देव आहात न तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही."
महादेव: "देवी. हे खरं आहे पण शेवटी माझ्यावरही बंधने ही आहेतच. जो पर्यंत खरी वेळ येत नाही तो पर्यंत मी काहीच करू शकत नाही. फक्त एवढंच सांगू शकतो जे विधिलिखित आहे ते झाल्या शिवाय राहणार नाही."
पार्वती माता: "मग नाथ. तोपर्यंत धर्तीवरील मनुष्याच काय? हे असंच चालु राहणार का?"
महादेव: "नाही प्रिये. जेव्हा जेव्हा या धर्तीवर संकट येईल तेव्हा तेव्हा या धर्तीला वाचवायला मी अवतार घेईन आणि आता ती वेळ आली आहे. पण यासाठी तुला माझा वियोग सहन करावा लागेल प्रिये. कारण यावेळी माझा अवतार न मनुष्य रुपात असेल न प्राणी रुपात तर या धर्तीवर मी स्वयंभू शिवलिंगाच्या रुपात असेल.
यावेळी माझं दर्शन घेण्यासाठी भाविकांना खूप कष्ट सोसावे लागतील आणि हीच त्यांच्या भक्तीची खरी परीक्षा असेल. जो निष्ठावंत असेल त्याला माझं सहज दर्शन होईल पण जो भक्तीमध्ये चुकेल तो कष्ट सहन करेल."
हे ऐकल्यावर पार्वती माता काही क्षण गप्पच होतात. त्यांना काय बोलाव हेच सुचत नाही. तेव्हा महादेवच त्यांना भानावर आणत विचारतात.
महादेव: "देवी. काय झालं? एवढी काळजी का करत आहात? अहो तुम्ही जगतमता आहात तुम्हीच जर अस करू लागलात तर ह्या सर्व सामान्य लोकांनी कुणाकडे पाहायचं. हा ही काळ जाईल."
पार्वती माता: "मान्य सर्व मान्य पण नाथ. मी सुद्धा एक स्त्री आहे मी तुमचा विरह कसा सहन करू. आपले स्वयंभू शिवलिंग कुठे स्थापित होणार आहे ते तरी मला सांगा."
आपल्या जागेवरून उठत महादेव बोलतात.
महादेव: "देवी. ते शक्य नाही. जगाच्या कल्याणासाठी आपल्याला एकमेकांपासून दूर रहावच लागेल हे विधिलिखित आहे. मात्र एक वेळ अशी येईल की मी तुमच्या समोर असेन आणि तीच आपली धर्तीवरची पहिली भेट असेल पण यासाठी देखील तुम्हाला वाट पाहावी लागेल. आहे का तुमची तयारी."
पार्वती माता आपल्या मनावर दगड ठेऊन म्हणतात.
पार्वती माता: "ठीक आहे नाथ. माझी तयारी आहे मी तुमची अर्धांगिनी आहे म्हणून तुमचं कार्य हे माझं देखील कार्य आहे आणि तुमच्या या कार्यात जर माझा हा असा हिस्सा असेल तर मला मंजूर आहे." दोघ एकमेकांशी संवाद साधत आपले हात एकमेकांच्या हातात घेत स्वतः मध्ये हरवून जातात. तेवढ्यात तिथे नागराजांचा पुत्र नागसेन आणि नागवंती दोघ येतात.
नागसेन: "महादेव आपण बोलावलं होतं आम्हाला?"
भानावर येत महादेव म्हणतात.
महादेव: "नागसेन आमची अवतार कार्याची वेळ आता जवळ आली आहे. पण आम्ही मनुष्यरूपात किंवा प्राणीरुपात अवतार घेणार नाही. तर एका निर्मनुष्य ठिकाणी स्वयंभू स्थापित होणार आहोत. म्हणून आमच्या शिवलिंगाचे तुम्ही दोघ रक्षक असावेत अशी आमची इच्छा आहे."
नागसेन काही बोलणार तेवढ्यात नागवंती बोलते.
नागवंती: "महादेव. हे तर आमचं दोघांचं भाग्य आहे. मला माहित आहे धर्तीवर पाऊल ठेवायची संधी हजारो लाखोंमधून काही भाग्यवंतांनाच मिळते. आणि त्यातूनही तुम्ही आमचे आराध्य. धर्तीसारख्या पावन ठिकाणी तुमची भक्ती करायची यापेक्षा दुसरं सुख काय असेल आमच्यासाठी. आम्ही तयार आहोत."
सगळे तिच्याकडे बघतच राहतात आणि हसू लागतात. नागवंती लाजते आणि आपली मान खाली घालते.
मग येतो तो दिवस...
माधवगडच जंगल...
पूर्ण जंगलात दिव्या प्रकाश पसरतो आणि महादेवांचे एक तेजस्वी सुंदर मंदिर प्रगट होते. मंदिरावर सुशोभित असलेला कळस मंदिराची आणखीनच भव्यता वाढवत असतो. आणि बाजूला दिमाखात बसलेले दोन विशालकाय सर्प मंदिराची शोभा वाढवत असतात.
वर्तमान काळात...
वेळ सकाळी सात वाजताची...
हिमालय निवास...
ऋषिकेश ची खोली..
ऋषीकेश अचानक खडबडून जागा होतो. एसीतही त्याला दरदरून घाम फुटलेला असतो. त्याच्या कपाळावरील घामाच्या धारा स्पष्ट जाणवत असतात.
ऋषिकेश आपल्या कपाळावरच्या घामाच्या धारा पुसत पुसत विचार करू लागतो. आणि मनाशीच पुटपुटतो.
ऋषिकेश(विचार करत): "कोण आहेत ही दोघ? काय संबंध आहे ह्यांच्याशी माझा? मला अस का वाटत मी ह्यांना ओळखतो? आणि ते मंदिर. छे! मला काहीच कळत नाहीये." अस म्हणत ऋषीकेश काही वेळ डोक्याला हात लावून बसतो.
क्रमशः