Mile sur mera tumhara - 3 in Marathi Short Stories by Harshada Shimpi books and stories PDF | मिले सूर मेरा तुम्हारा - 3

Featured Books
Categories
Share

मिले सूर मेरा तुम्हारा - 3



असेच दिवस जात होते आणि एक दिवस निनाद लवकर घरी आला. आला तसा फक्त तो फ्रेश झाला असेल नसेल तसाच cot वर झोपला. आधी वृंदाला वाटलं की तो थकला असेल. मग तिनेही त्याला आवाज दिला नाही. ती स्वयंपाकाला लागली. तिने अगदी साधं जेवण बनवलं होतं. वरण-भात , चपाती आणि मेथीची भाजी. जेवण तयार झालं तशी तिने पानं वाढली आणि निनादला आवाज दिला. पण तो जागचा हलला नाही. तिने पुन्हा आवाज दिला. “निनादऽऽ..” पण काहिच प्रतिक्रीया नाही. शेवटी तिने त्याच्या हाताला हात लावून त्याला उठवायचा प्रयत्न केला. आणि वृंदाला निनादचा हात गरम लागला. तिने लगेच त्याच्या कपाळावर हात ठेवला. निनाद तापाने फणफणत होता. तिने त्याला बळजबरीने उठवले. तो अर्धवट शुद्धीत होता. मग वृंदाने त्याला थोडे खायला लावले. निनाद नाहीच म्हणत होता. पण वृंदाने त्याला चांगलेच दटावले. त्याचं खाऊन झाल्यावर तिने त्याला एक क्रोसीन ची गोळी दिली. निनाद ने गोळी घेतली. कपडे बदलले आणि तो पुन्हा झोपला. वृंदाने तिचं जेवण उरकलं. आणि सगळं आवरून काढा बनवायला गैस वर ठेवला. पुन्हा येऊन निनादच्या कपाळाला हात लावून बघितलं. अंग तितकंच तापलेलं होतं.
वृंदा मुंबईत रुळायला अजून नवीनंच होती. तिला दवाखाना, डॉक्टर यांची एवढी माहिती नव्हती. आजुबाजूला अजून एवढी ओळख झाली नव्हती. सगळे आपापले दार लावून बसत. तशी धिराची होती ती. तिने ठरवलं की सकाळपर्यंत वाट बघू. नाहीच उतरला ताप तर शेजारी डॉक्टर विषयी चौकशी करु. विचारातंच होती की तिच्या लक्षात आलं की काढा तयार झाला आहे. तिने तो कपात गाळला आणि निनादला उठवायला आली. तो बिचारा कण्हत होता. त्याचं सगळं अंग ठणकत होतं. निनाद अंग आकसून झोपला होता. कदाचित त्याला थंडी वाजत असेल असे वाटून तिने कप तिथेच टिपॉय वर ठेवला आणि आतून एक जाडजूड blanket घेऊन आली. ते तिने त्याच्या अंगावर टाकलं. तसं निनाद अजुनंच थरथर कापू लागला. त्याने वृंदाचा हात घट्ट पकडला. वृंदाने प्रयत्नपूर्वक त्याचा हात सोडवला. त्याला उठवले आणि काढा प्यायला लावला. काढा पिऊन तो पुन्हा झोपला. वृंदा रात्रभर त्याच्या उशाशी बसुन राहिली. आणि थंड पाण्याच्या पट्टया त्याच्या कपाळावर ठेवत राहिली. पहाटे उशिरा कधीतरी तिला झोप लागली.
सकाळी उठायला तिला थोडा उशिरंच झाला. बघते तर निनाद जागेवर नव्हता. तिने आत डोकावून पाहिले तर तो office ला जाण्याची तयारी करत होता. न रहावून शेवटी ती म्हणाली, “ एवढं urgent आहे का ऑफिसला जाणं? डॉक्टर कडे गेलो असतो.”
“माझी मीटिंग आहे. आणि तुला काय करायचंय मी काहीही करेन…तू..”,वाक्य पूर्ण होण्याआधीच तो बेडवर चक्कर येऊन पडला.
वृंदा धावत त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला बेडवर नीट झोपवले. मग किचन मध्ये जाऊन ग्लास मध्ये पाणी घेऊन आली. त्याच्या चेह-यावर पाणी शिंपडले तसा तो थोडा शुद्धीवर आला. तिने मग त्याला थोडे गरम पाणी पाजले. आणि थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली,”अजुनही जायचंय का ऑफिसला?”
यावर तो जरा नरमला. त्याने काही उत्तर दिले नाही. तसाच बेडवर पडून राहीला. मग वृंदाने उठून तिचं सगळं आवरलं. आणि शेजारी जाऊन त्या मावशींना जवळपास कुठे दवाखाना आहे का ते विचारुन आली. थोडं ५ मिनटं दूर एक खाजगी छोटा दवाखाना आहे असं तिला कळलं. तिने थोडा हलका असा नाश्ता बनवला. निनाद ला थोडं खायला लावलं. स्वत:ही खाल्लं. मग जरा बळजबरीनेच त्याला दवखान्यात घेऊन गेली. तो डॉक्टर प्रशांत चितळे यांचा खासगी दवाखाना होता. त्यांनी निनाद ला तपासून viral infection आहे असं सांगितलं. मग काही गोळ्या -औषधं लिहून दिली. आणि एक इंजेक्शन दिलं. डॉक्टर ची fees देऊन आणि मेडिकल शॉप मधून गोळ्या घेऊन दोघं घरी आले.
नाश्ता झाला होता त्यामुळे वृंदाने त्याला लगेच गोळ्या घ्यायला सांगितल्या. निनादने मग मुकाट्याने कसलेही आढेवेढे न घेता त्या घेतल्या. मग शांतपणे आतल्या खोलीत बेडवर झोपला. ब-याच वेळाने त्याला जाग आली. तर वृंदा काही काम करत होती. त्याला आता पहिल्या पेक्षा बरे वाटत होते. त्याने बाजूलाच पडलेला मोबाइल घेतला आणि not feeling well. Can’t come today असा टीम मेंबर ला मेसेज केला.
बेडवर पडल्या पडल्या त्याच्याही नकळत तो वृंदाच्या हालचाली टिपत होता. ती घरातलं आवरतही होती आणि काही वेळाने त्याचा ताप सुद्धा बघत होती. मध्येच त्याला भाताची पेज, साधी खिचडी असं करुन आणत होती. संध्याकाळ पर्यंत त्याला बरं वाटू लागलं. वृंदाने केलेली सेवा बघून नाही म्हटलं तरी त्याला चांगलं वाटत होतं. मनात तिच्याविषयी असलेला राग काही प्रमाणात कमी झाला होता. २-३ दिवसांत त्याच्या तब्येतीत बराच फरक पडला. थोडा अशक्तपणा होता. पण तोही हळूहळू कमी होत होता.
ऑफिस पुन्हा सुरु झालं. नेहमीचं रूटीन. आता तो ब-यापैकी वृंदाशी बोलू लागला होता. इतकंही नाही पण यामुळे तिलाही चांगलं वाटत होतं.
आठवड्याची सुट्टी होती. निनाद आज घरी होता. काही काम नाही म्हणून आरामात hall मध्ये पेपर वाचत बसला होता. वृंदा घरात साफसफाई करत होती. तिने fan साफ केले. कपाट, पलंग साफ केलं. बिचारी एकटी सगळं करत होती. निनाद तिला मदत करायचा विचार करत होता. पण जागचा काही उठला नाही. इकडे वृंदाने बरसचं सगळं साफ केलं आणि तिच्या लक्षात आलं की कपाटाच्या वर बरीच धुळ आहे. आणि तिकडे ठेवलेल्या बॅगा खुपंच जड आहेत आणि तिचा हात तिकडे पोहोचत नाहिये. तिला एका क्षणासाठी वाटलं की निनादला आवाज द्यावा. मग उगीचंच कशाला? असंही वाटून गेलं.
तिने एक स्टूल घेतला. एका हातात झाडू. ती त्या स्टूलवर चढली आणि एका हाताने बॅग ओढू लागली. बॅग काही जागची हलत नव्हती. तिने हातातला झाडू खाली जमिनीवर टाकला. त्या आवाजाने निनाद बेडरुममध्ये आला. आणि वृंदा चा खटाटोप बघू लागला. एखाद्याने लगेच पुढे होऊन तिला मदत केली असती. पण हा पठ्ठ्या नुसताच बघत बसला.
वृंदा काही टिपिकल साडीत वावरणारी मुलगी नव्हती. सडपातळ नसली तरी जाड़जूड देखिल नव्हती. मध्यम बांध्याची आणि मध्यम शरीर असलेली सामान्य मुलगी होती ती. तिने एक long cotton चा निळ्या रंगाचा स्कर्ट आणि त्याला साजेसा सफेद रंगाचा शर्ट घातला होता. त्यावर त्याला साजेशा बांगड्या. धुळ तोंडात जाऊ नये म्हणून चेह-यभोवती स्कार्फ गुंडाळला होता.तिचे दोन्ही हात धुळीने माखले होते. ती बॅग स्वत:जवळ ओढत असतानाच तिच्या तोंडावरचा स्कार्फ सैल झाला. त्याला नीट करायला तिने हाताचा कोपरा तोंडाला लावला. आणि स्कार्फ अलगद सरळ करायचा प्रयत्न करु लागली. तेवढयात अर्धवट बाहेर आलेल्या बॅगेचं वजन एकाच हातावर आलं. बॅग आणि स्कार्फ सांभाळायच्या नादात तिचा भार स्टूलवर एकाच बाजूला आला. आणि स्टूल सरकला तशी ती एकदम खाली कोसळली. तेवढ्यात भानावर येत निनाद ने त्याच्याही नकळत तिला झेलले.
तिला काही क्षण कळलंच नाही काय झालं ते. वृंदाने डोळे घट्ट मिटलेले होते. निनाद एकटक तिच्याकडे बघत होता. पुढच्याच क्षणी तिने डोळे उघडले तसे भानावर येऊन त्याने तिला खाली उतरवले. ती नुसती एकदा त्याच्याकडे आणि एकदा अर्धवट बाहेर आलेल्या बॅगेकडे बघत होती. तिने अर्धवट सुटलेला स्कार्फ बाजूला केला. निनाद तसाच उभा होता. असेच काही क्षण गेले असतील नसतील की त्याने अचानक वृंदाला घट्ट मिठी मारली. तिलाही काही कळले नाही. पण त्या अचानक मारलेल्या मिठीमुळे नाही म्हटलं तरी वृंदा जरा सुखावली. जितक्या आवेगाने निनाद ने तिला मिठी मारली होती, तितक्याच जलद गतीने पुढच्या क्षणी त्याने ती सोडवून घेतली. आणि तडक माघारी फिरून hall मध्ये येऊन बसला.
वृंदाला कळलेच नाही की नेमके काय झाले. कसं react व्हावं. इकडे निनाद ला आपण काय करुन बसलो याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर दोघे एकमेकांसमोर जाणं शक्य तेवढं टाळत होते.
लग्न होऊन आता सहा महिने झाले होते. वृंदाला जवळंच एका कंपनीत accountant चा जॉब मिळाला होता. आता दोघांचं routine सुरु झालं. निनाद तिला आधी ऑफिस ला drop करायचा आणि मग पुढे त्याच्या office ला जायचा. नेहमी नेहमी त्याला त्रास नको म्हणून वृंदा ऑफिस च्या बसने ये जा करु लागली.
एकदा office मध्ये खूप काम होतं. सगळं संपवता संपवता ८ वाजले. Office ची शेवटची बस ७.१५ ची होती. ती निघाली तेव्हा बाहेरची रहदारी बरीच कमी झाली होती. झपझप चालत वृंदा जवळंच असलेल्या बस स्टॉप वर आली. बराच वेळ झाला पण बस आली नव्हती. मधुनंच रस्त्याच्या पलिकडून एक दारुडा माणूस तिला बघत काहितरी मोठ्याने बडबडत पलिकडे निघून गेला. त्यामुळे तिला दरदरून घाम फुटला. कधी एकदा बस येतेय असे तिला वाटले.
इकडे निनाद घरी पोचला तर दाराला कुलूप. एरवी तर वृंदा लवकर येते. मग आज काय झालं? त्याने तिला call केला.
“Hello वृंदा.. कुठे आहेस तू?”
“Hello हा मी बस स्टॉप वर आहे. बसची वाट बघतेय.”
“आता कोणती बस मिळणार आहे तुला?”, निनाद ने घड्याळात पाहिले. ८:४५ झाले होते. त्याने तिला पुन्हा विचारले, “कुठे आहे बस स्टॉप? सांग मला. मी येतो.”
“ऑफिस जवळ ‘शांतीनगर’ नावाचा बस स्टॉप आहे तिकडे आहे मी.”
“ok. पोचतो मी.”
साधारण २० मिनटांत निनाद तिकडे आला. त्याला बघून तिच्या जीवात जीव आला. तो आला तसा वृंदा त्याच्या मागे बाइक वर जाऊन बसली. निनादने आरशातून तिला नीट बघितले. तिला आलेल्या घामावरुन त्याला कळले की ही खुप घाबरली आहे. घरी पोचल्यावर ती fresh होऊन स्वयंपाकाला लागली. तसं त्याने म्हटलं,
“स्वयंपाक करु नको.”
“का?”
“मी parcel आणतो.”
“किती उशिर झालाय. आणि बाहेरचं पचत नाही ना तुला. मी करते पटकन.”
असं म्हणून तिने वरण भाताचा कुकर लावला. पटकन कणिक मळली. निनाद पण तिला मदत करायला आला. तिला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने गवार बटाट्या ची भाजी केली. तिने पोळया करायला घेतल्या तेवढ्यात त्याने वरणाला फोडणी दिली. दोघं जेवायला बसले. बराच वेळ कोणी काही बोलत नव्हतं. मग निनाद थोडा नाराजीने म्हणाला, “ उशिर होणार होता तर एक call करायला काय झालेलं?”
“मला वाटलं येईल बस. आणि कशाला उगीच तुला त्रास…”,असं म्हणून तिने मान खाली घालून हातातला घास तोंडात टाकला.
“काही झालं असतं म्हणजे?”
“Sorry..”
“Next time उशिर होणार असेल तर तसं सांगत जा. मी घ्यायला येईन.”
“हो.”, वृंदाने म्हटलं.
नंतर दोघांनी मिळून किचन आवरलं. वृंदा बेडरूममध्ये झोपायला गेली. आणि निनाद बाहेर cot वर झोपला. तेव्हापासून उशिर होणार असेल तर वृंदा निनादला फोन करु लागली.
असं सगळं चालू असताना एक दिवस वृंदाला निशाचा फोन आला.
“बाबांना admit केलेय. तू लवकर ये इकडे.”
“काय झालं बाबांना?”,वृंदाने काळजीने विचारलं.
“डॉक्टर म्हणाले त्यांचा bp लो झालाय. आई खुप रडतेय. म्हणून त्यांनी कोणा मोठ्याला बोलवायला सांगितलं.”,हुंद्के देत निशा म्हणाली.
“ठिक आहे. मी येते. तू रडू नको. आईची काळजी घे.”, वृंदा तिला धीर देत म्हणाली.
नेमकं यावेळी वृंदा office मध्ये होती. तिने सुट्टीचा अर्ज टाकला. घरी आली आणि लगेच निनाद ला फोन केला.
“ Hello निनाद मला पुण्याला जावं लागतंय. बाबांची तब्येत खराब झालेय. त्यांना admit केलेय.”,तिने एका दमात सगळं सांगून दिलं.
“एकटी जाऊ नकोस. थोडं थांब. मी येतो. आपण सोबत जाऊ.”, निनाद तिला सांत्वना देत म्हणाला.
एक तासाने निनाद घरी आला. तोपर्यंत वृंदाने सामान भरुन ठेवलं होतं. थोडयाच वेळात ते दोघे पुण्याला जायला निघाले. रात्री उशिर झाल्याने घरी जाण्यापेक्षा हॉस्पिटलला जाणं त्यांना बरोबर वाटलं.
समोर आई आणि निशा दिसले. त्यांनी वृंदाला बघितलं तशा त्या तिच्या गळ्यात पडून रडू लागल्या. वृंदाने त्यांना थोपटलं आणि एका बाकावर बसवलं.
त्यानंतर निनाद आणि वृंदा डॉक्टर ला भेटले.

©हर्षदा शिंपी-बागुल