PREMTARANG - EKA PREMACHI MANRANGI KAHANI - 2 in Marathi Fiction Stories by भावना विनेश भुतल books and stories PDF | प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 2

Featured Books
Categories
Share

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 2

बी स्ट्रॉंग. मेघनाच्या आठवणीने अस्वस्थ असणाऱ्या राघवला त्याच्या डॅडच्या ह्या दोन शब्दांचाच काहीसा आधार होता.

ऑफिसमध्ये जायचय ह्या विचाराने राघवच मन आज कुठेच लागत नव्हतं. त्यात आज खुप महिन्यांनी त्याचं मेघनासोबत ऑफिसमधील मिटिंग दरम्यान इंटरेक्शन होणार होतं. आजचा दिवस कसा जाईल ह्याचा विचार करत राघव आरश्यात बघत आपल्या केसांवर हेअरब्रश फिरवत होता. केस विंचरून होताच हेअरब्रश नेहमी प्रमाणे बेडवर फेकत तो ब्रेकफास्ट करायला निघून गेला.

“डॅड येतो रे”, डॅडला आवाज देत राघव घाईघाईतच घराबाहेर पडला.

डॅडने बाहेर येऊन बघितले तर प्लेटमधला नाश्ता तसाच होता.

“हे राघवबेटा. बेस्ट ऑफ लक. बी स्ट्रॉंग. बाय”, बाल्कनीतून नेहमीप्रमाणे राघवला हात दाखवतच त्याचा डॅड म्हणाला.

“लव्ह यू, बाय.” एक गोड स्माईल ओठांवर आणत, डॅडला बाय करत त्याने डोक्यावर हेल्मेट चढविले आणि तो ऑफिसमध्ये निघून गेला.

ऑफिसमध्ये मीटिंगची तयारी सुरू होती, पण राघवची नजर एकसारखी मेघनाच्या डेस्कवर फिरत होती. ती अजुन तरी ऑफिसमध्ये आलेली दिसत नव्हती.

तोच मेघना येतेय ह्याची चाहुल राघवला लागली. तिने पायात घातलेल्या उंच टाचांच्या हिलच्या आवाजाने संपुर्ण फ्लोरची शांतता भंग होत होती. येणाऱ्या आवाजासोबत राघवच्या हृदयाची धडधड सुद्धा अचानक वाढायला लागली. राघव तिरक्या नजरेने तिच्या पायातील ते उंच हिल बघू लागला.

पुन्हा काल अर्धवट राहून गेलेला कॉलेजचा तो क्षण त्याला आठवला.

श्रीला पकडण्यासाठी राघव त्याच्यामागे पळत होता.

“श्री थांबना”, राघव पळतच श्रीला आवाज देत बोलला.

पण श्री त्याच्या हाताला कसला लागतोय आणि श्रीला पकडल्याशिवाय आपला राघव कसला ऐकतोय. श्रीसुद्धा मुद्दाम मेघनाच्या भोवती प्रदक्षिणा घालत होता.

“काय चाललंय तुमचं? आम्हाला जाऊ द्या बघू”, मेघना थोडी इरिटेट होत श्रीला म्हणाली.

पण राघवचं लक्ष श्रीच्या हालचालींवर होतं.

तेवढ्यात मेघनाने जियाकडे पाहीले, तर ती राघवकडे एकटक बघण्यात हरवून गेली होती. मेघनाने तिच्या खांद्यावर आपला खांदा मारत तिला तंद्रीतून बाहेर काढलं व इशाऱ्यानेच ‘कुठे बघतेयस’ असे विचारले. जियाने आपली मान नकारार्थी हलवत ‘कुठे नाही’ असे मेघनाला इशाऱ्यामध्येच सांगितले.

“चल इथून”, असे म्हणत मेघना नेहमीप्रमाणे चिडचिड करत जियाला तिथून ओढतच घेऊन जात असताना तिने पायात घातलेल्या उंच हिल्समुळे तोल जाऊन तिचा पाय पावसामुळे रस्त्यात पाण्याने तुडूंब भरलेल्या खड्यात गेला. पण जियाचा हात पकडत तिने स्वतःला कसबस सावरणार पण 'हिच्या सोबत मीसुद्धा पडेन' असा विचार मनात आणत जिया मेघनापासून थोडी लांब झाली आणि मेघनाचा तोल गेलाच..

“आई गं”, मेघना कण्हत दोन्ही हातांनी आपला उजवा पायाला धरत तिथे रस्त्यातच बसुन राहिली.

तिच्या अश्या कळवळण्याने राघवच्या हृदयाचं अगदी पाणी पाणी झालं.

इथे कॉलेजबाहेर असणाऱ्या घोळक्याने आत्तापर्यंत तिच्यावर हसणं चालू देखील केलं होतं.

राघवने अपराधी नजरेने तिच्याजवळ जात आपला हात तिच्यासमोर धरत तिला उठवण्याचा प्रयत्न केला. पण मेघना रागातच त्याच्याकडे बघत होती. तोच जियाने स्वत:चा हात मेघनासमोर धरत तिला उठविले. मेघना एका पायाने लंगडत तिथून जाऊ लागली.

“माझी बाईक आहे. मी सोडतो तुला हवंतर. म्हणजे तुझ्या पायाला लागलंयना म्हणून बोलतोय. प्लिज”, राघव रिक्वेस्ट करतच मेघनाला म्हणाला.

"ऑटो", असा आवाज देत, थांबलेल्या ऑटोत बसून ती जियाबरोबर निघून गेली.

राघव तिथे उभं राहून मेघनाला जाताना पाहत राहीला. आपल्यामुळे आज मेघना हर्ट झाली ह्या विचाराने राघवला रात्रभर झोप लागली नाही. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो आणि मेघनाला भेटतोय असं झालं होतं त्याला.

नेहमीपेक्षा थोडं लवकर तयार होऊन राघवने श्रीच्या घराजवळ आपला मोर्चा वळविला. त्याच्या घराजवळ पोहचताच राघव मोठंमोठयाने हॉर्न वाजवू लागला.

रोज राघवला उठवायला येणारा श्री आज बाइकच्या हॉर्नमुळे उठून बाल्कनीत डोळे चोळत आला आणि पाहतो तर खाली राघव कॉलेजसाठी तयार होऊन त्याला न्यायला आला होता.

"आत्ताशी आठच वाजतायत मित्रा", श्री शॉक होत त्याला म्हणाला.

"मला घड्याळ कळतरे मित्रा. लवकर ये बघू खाली", राघव बाईकवर बसून मोठ्याने ओरडतच श्रीला म्हणाला.

‘प्रेमात हा पडलाय आणि झोप माझी उडवतोय’ असे श्री मनात पुटपुटत फ्रेश व्हायला निघून गेला.

दोघेही कॉलेजमध्ये आले आणि वर्गात येऊन बसले. राघवची नजर एकसारखी मेघनाला शोधत होती.

तेवढ्यात राघवची नजर दरवाजाकडे गेली आणि तिथेच थबकली.

कालसारखेच आज ही तिचे केस वाऱ्याच्या झुळुकेसोबत उडत होते. कालपेक्षाही आज मेघना जास्त सुंदर दिसत होती. तिला पाहून राघवच्या ह्रदयात वेगळच गाणं वाजत होतं.

♫ आँखें तेरी, कितनी हसीं
के इनका आशिक़, मैं बन गया हूँ
मुझको बसा ले, इनमें तू♫

जुल्फें तेरी, इतनी घनी
देख के इनको, ये सोचता हूँ
साये में इनके मैं जियूं♫

त्या कल्पनेत तो हरवून गेला असताना, मेघना जियाचा आधार घेत लंगडत आपल्या जागेवर येऊन बसलीसुद्धा.

तिला पाहून वर्गात काहीजणाचं कालच्या प्रसंगावरुन कुजबूज आणि हसणं सुरू होतं. इतक्यात तिचे लक्ष राघवकडे गेलं आणि ती रागात त्याच्याकडे पाहू लागली.

राघव अपराधी नजरेने आपले दोन्ही हात कानाला लावत तिच्याकडे पाहू लागला. पण नाक मुरडत मेघनाने तोंड फिरविले. इतक्यात सर वर्गात आले.

सरांचे लेक्चर सुरू होऊन संपले तरी राघव मेघनाकडेच बघत होता. श्रीने दोघांकडे एकवार नजर फिरवली.

"कठीण आहे रे तुझं", तिचा तो राग बघुन श्री डोक्यावर हात मारत राघवला म्हणाला.

राघव तिची माफी मागण्यासाठी मेघनाच्या सारखा अवतीभोवती फिरत असतो. पण मेघनाचा राग शांत करण्यासाठी ती एकटी त्याला भेटतंच नसते आणि भेटणार तरी कशी? जेव्हा बघावं तेव्हा ती जिया मेघनाबरोबर च्युईगमसारखी चिकटलेली. तिच्यामुळे माफी मागायचं तर दूरच राहील पण आपल्या मनातल्या भावना बाजूला ठेवून मेघनाशी साधी मैत्रीसुद्धा त्याला करता येत नव्हती.

पण म्हणतात ना, 'भगवान के घर देर है अंधेर नही'

कॉलेजमध्ये पिकनिकचे वारे वाहू लागले. ह्यावेळेला स्पॉट एखादे हिलस्टेशन होतं. सगळे विद्यार्थी एक्साइटेड होते. सोने पे सुहागा म्हणजे ऐनवेळेला जियाला तिच्या एका लांबच्या चुलत भावाच्या लग्नाला जावे लागले आणि हे तिने लास्ट मुमेंट मध्ये सांगितल्यामुळे मेघनाला तिचे ट्रीप मधून नाव वगळता आले नाही.

हीच ती वेळ आणि हाच क्षण होता, राघवला मेघनाच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा.

खूप मज्जामस्ती करत सगळेजण ट्रीपला निघाले. राघवने प्रवासात मेघनाशी खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण मेघना त्याला भाव देत नव्हती.

तिथे पोहोचल्यावर सगळ्यांची राहण्याची व्यवस्था टेंटमध्ये करण्यात आली होती. एका टेंटमध्ये दोघेजण. अशाप्रकारे त्या मैदानासारख्या पठारावर सगळ्यांचे टेंट लागले. मेघना तिच्या वर्गातली नेहा नावाच्या एका मुलीबरोबर टेंट शेअर करणार होती. सगळ्यांचे खाणेपिणे झाल्यावर रात्री लेटनाइट कॅम्पफायर आणि त्याचबरोबर सिंगिंग आणि डांसिंगचा प्रोग्राम ठरला. शिक्षकांनी काहीवेळ मुलांबरोबर एन्जॉय केले आणि ते झोपायला निघून गेले. श्रीला ह्या सगळ्यात इंटेरेस्ट नव्हता त्यामुळे तो आधीच त्याच्या काही दुसऱ्या मित्रांबरोबर असाच आजूबाजूला हिंडायला निघून गेला.

राघवला विचारून ही काही फायदा नव्हता हे त्याला माहीत होते. पण जाताना तो त्याला सांगून गेला.

गाणे, डान्स याने मैफिल रंगली होती. अंताक्षरीसाठी दोन गट पाडण्यात आले. राघव आणि मेघना वेगवेगळ्या गटात होते. काही गाणी गाऊन झाल्यानंतर राघवच्या टीमवर ‘न' हे अक्षर आले.

मग काय?? राघवने मेघनाला इम्प्रेस करण्यासाठी गिटार हातात घेतली आणि एक सुंदर गाणे गायला सुरुवातसुद्धा केली.

♫♫नीले नीले अम्बर पर, चाँद जब आये

प्यार बरसाए, हमको तरसाये♫♫

सगळेजण अगदी त्या गाण्यात मंत्रमुग्ध झाले. राघवचा आवाज खूपच छान होता. कधी नव्हे ते मेघनासुद्धा गालातल्या गालात हसली. हे पाहून राघव अजून जोशात गाणं गाऊ लागला. इतक्यात कोणीतरी त्याला नाचण्यासाठी उठविले. तो नाचण्यात गुंग झाला आणि तेवढ्यातंच मेघनाला जियाचा फोन आला.

पण सगळ्यांच्या आवाजामुळे मेघनाला जियाचा आवाज ऐकू येत नव्हता. म्हणून ती चालत चालत टेंटपासून बरीच लांब निघून आली. त्यामुळे राघव आणि मेघनाची चुकामुक झाली. गाणं संपल्यावर राघव मेघनाला शोधू लागला. त्याला वाटलं ती टेंटमध्ये असेल म्हणून तो तिथे गेला तर तिथेही ती नव्हती. तेव्हा त्याने मध्येच भेटलेल्या एक वर्गमित्राला विचारले असता, मेघना ह्या दिशेने जाताना दिसली असे त्याला कळले. तो त्या दिशेने जाऊ लागला.

मेघना जियाशी बोलत जिथे थांबली होती तिथेच वर्गातील काही टारगट मुलं चोरून ड्रिंक करत होती. त्यांना चांगलीच चढली होती. त्यांनी मेघनाचा आवाज ऐकल्यावर त्यांच्यातील पाशवी वृत्ती जागून ते ३-४ जण मेघनाजवळ येऊ लागले. मेघना स्वत:ला वाचविण्यासाठी जिवाच्या आकांताने पळू लागली. इतक्यात ती राघवला येऊन धडकली आणि त्याला पाहताच तिने राघवला गच्च मिठी मारली. राघव मेघनाला काही विचारणार इतक्यात तिच्या पाठून येणारे ३-४ जण त्याला दिसले आणि त्यांना पाहून त्याला जे समजायचे होते ते राघव समजला आणि त्वेषाने तो त्यांच्यावर तुटून पडला. झटापटीचा आवाज ऐकून तिथेच आसपास असलेले श्री आणि त्याचे मित्रही तिथे आले. त्यांनी सुद्धा राघवबरोबर मिळून त्या ३-४ जणांना खूप चोप दिला आणि ह्यांच्यामुळे मेघनाची नाचक्की होऊ नये आणि बाकीच्यांची पिकनिकची मजा खराब होऊ नये म्हणून एकाने हळूच शिक्षकांजवळ जाऊन त्या ३-४ जणांची तक्रार केली.

शिक्षकांनी त्या सर्वांना रस्टीकेट केले आणि टेंटमध्ये जायला सांगितले. त्यांना इतका चोप बसला होता की, सकाळपर्यंत ते काही जागेवरून हलू शकत नव्हते. तरी त्यांच्यावर रात्रभर पहारा करण्याची जवाबदारी श्री आणि त्याच्या मित्रांनी घेतली.

ह्यासगळ्या प्रकरणात मेघना खूप घाबरली होती. राघव मेघनाला घेऊन तिच्या टेंटमध्ये गेला. तिने अजूनही राघवचा हात घट्ट पकडला होता. तो तिला समजावत होता "मेघना, काही नाही झालं बाळा. सगळं ठीक आहे. ते तुला पुन्हा हात लावायची हिम्मत नाही करणार. मी आहे ना"

राघवने खूप मुश्किलीने रागावर नियंत्रण ठेवले होते. त्याने तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवून तिला धीर दिला. रात्रभर तो तिच्या बाजूला बसून होता. फक्त तिला बघत.

पहाटेपर्यंत गाण्याचे आणि डान्सचे आवाज येत होते. पहाटे कधीतरी राघवचा डोळा लागला. पण जेव्हा मेघना त्याच्या अंगावर चादर घालत होती तेव्हा त्याला अचानक जाग आली. मेघना आता बऱ्यापैकी फ्रेश दिसत होती.

तिने खूप मनापासून राघवचे आभार मानले आणि तिने त्याला समजायला चूकी केली असे ती म्हणाली. त्याचबरोबर त्याच दिवशी तिने त्याच्यासमोर मैत्रीसाठी हात पुढे केला.

राघवनेही मैत्रीचा स्वीकार केला.

दुसऱ्यादिवशी सगळेच आपापल्या घरी परत जायला निघाले. बसमध्ये सगळ्यांच मोठं मोठ्याने गाणी बोलणं, नाचण, दंगा मस्ती करणं चालू होतं. आदल्या दिवशीच्या झालेल्या जागरणाने राघवला बसमध्ये डुलकी लागली. तर मेघना घडलेल्या प्रकाराने शांत बसून होती. पण ती एकटक राघवच्या निरागस चेहऱ्याकडे बघत होती. काल घाबरलेल्या स्थितीत तिने त्याला मारलेली मिठी तिला सारखी आठवत होती.

इतक्यात अचानक राघवला जाग आली आणि त्याचे लक्ष मेघनाकडे गेले तर मेघना थोडीशी बावरली आणि केसांची बट मागे टाकत खिडकीबाहेर बघू लागली. काहीवेळाने पुन्हा तिरक्या नजरेने तिने राघवकडे बघण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो तिच्याकडेच बघतोय असं तिला जाणवलं आणि ती गालातल्या गालात हसली.

इथूनच खरी सुरुवात झाली राघ-मेघ ह्यांच्या प्रेमकहाणीची.

(ती कशी हे पाहुयात ‘प्रेमतरंग’ कथेच्या पुढील भागात. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)