२२)हत्तीखोयाळ भ्रमंती...
दोन दिवसांच्या अनुभवापोटी त्या धनगराची मला चांगलीच अनुभूती आली होती.ज्यामुळे आज तरी मला त्याला न्यावेसे वाटले नाही.कारण एकटा मधूमामा माझ्यासाठी प्राणदाता होता हे मी केव्हाच ओळखलं होतं.त्यामुळे आज आम्ही दोघेच निघायचं ठरवलं होतं. तसं पण जंगलाच्या आत तर जायचं नव्हतंच.गडाच्या मागच्या बाजूला पायथ्याशीच जायचं होतं.त्यामुळे आज सकाळी तयारी करून जरा गडाच्याच रस्त्याने निघालो होतो.तिथून अर्ध्या रस्त्यातून जंगलात प्रवेश केला.
झुडूपी जंगलातून जाताना पायथ्याशी एक नाला लागला.ज्यात बऱ्याच प्रमाणात अभ्रकांची संख्या होती.सहज एक दगड उचलला आणि बॅगेत टाकला.आणि परत एकदा ते प्रवास शूरू झालं.. निशानांचे निरीक्षण करणे,विष्ठेचे परीक्षण करणे,कधी नागमोडी,तर कधी आडीमोडी अशा पद्धतीचे प्रवास चालू होते.चालताना मी कित्येकदा मागेच असायचो.मग काहीवेळा धावावं लागायचं.
मला वाटलं ते स्थळ जवळ असेल पण तितक्याच अंतरा अंतराने आम्ही चालत होतो.मधूमामा मोकळी जागा दिसली की एकवार पेरजागडाकडे बघत आणि मग परत चालायला लागत.त्यांच्या मागोमाग चालत मी पण जायचो.मध्येच रस्ता चुकला म्हणून मधू मामाजी माझी मस्करी करायचे.मी फक्त माना डोलावत होतो आणि अचानक अंगावरून काहीतरी गेल्याचं जाणवलं म्हणून इकडे तिकडे बघू लागलो.मी थकलोय असे समजून मग मामाजी पण जवळ येऊन बसले.
आम्ही जिथे बसून होतो.हत्तीखोयाळ तिथून अजून दोन ते तीन किलोमीटर होतं.आणि आता तर फक्त चढाई होती.डोंगर केव्हाचाच झाडाच्या आड लपला होता.पण इतक्यात आजूबाजूला काहीतरी कुजल्याचा, सडल्याचा दुर्गंध यायला लागला होता.तोच दुर्गंध मधूमामाजीला पण यायला लागला होता.म्हणून ते आजूबाजूच्या परिसरात फिरून पाहत होते.
जंगल भागात असणाऱ्यांना ही एक चेतावणी असते.जेव्हा कधी ही दुर्गंधी आपल्या जवळपास असते, तेव्हा जवळच कुठेतरी वाघ दडून बसलेला असतो.त्यामुळे बरेच शिकारी या दुर्गंधी पासून स्वतःला जपण्याचा प्रयत्न करतात.आणि सहसा त्यापासून वेगळं होण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतात.प्रत्येकात असलेल्या कमीमध्ये या वाघात असलेली ही कमी.कारण एक वेळेस तो स्वतःच्या पायाचा आवाज लपवू शकतो पण स्वतःच्या येण्याचा सुवास नाही.
बरंच बघितल्यावर जवळपास असं काहीच दिसलं नसल्यामुळे मधू मामाजी मग म्हणाले...चल निघुयात..कारण इथून त्याचंच राज्य आहे..तर असेल फिरत जवळपास...
इतक्याने बरं होतं की चढाई चढताना फक्त दगडांच्या सऱ्या होत्या.उंच झाडांमुळे बऱ्याच प्रमाणात दूरवरचा परिसर दिसून यायचा.त्यामुळे जनावरांची तेव्हढी भिती वाटत नव्हती.आणि सांगायचं राहिलं तर दुपारची सगळी जनावरे पाण्याच्या शोधार्थ पाण्याच्या जवळपास असतात.पायथ्याशी असेलच तर वाघ,अस्वल किंवा रानडुकरे असतात.
चढाई करताना आज त्यांच्या चालीने चालायचं ठरवलं.कारण मधू मामाजी अगदी त्या जनावरांच्या चालीने चालायचे.त्यामुळे त्यांना फार प्रमाणात दम येत नव्हते.आणि नजर अशी तीक्ष्ण असायची, की सहज कोणत्या बाजूने जायला रस्ता मिळेल, हे अगदी मिनिटभर उभे राहिले तरी ठरवून टाकत.त्यामुळे मला त्यांचं भारी कौतुक वाटायचं.
आता मोठ्या दगडांची बैठक यायला शुरुवात झाली होती.ज्यामुळे पलीकडे काही बसून तर नसेल ना, अशी भिती मनात संचार करायची.बरेचदा त्या दगडांच्या कप्प्यातून काही साप वगैरे निघतो का? असं वाटायचं.गडावरील एखादे दगड घरांगळले की ते दगड पायथ्याशी लोळण घेत खाली यायचे.ज्यात बऱ्याच प्रमाणात झाडे मोडून पडायची.त्यामुळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या दोनशे ते तीनशे मीटर पर्यंत बऱ्याच प्रमाणात विरळ झाडे होती.
आम्ही गडाच्या अर्ध्या पाऊण टप्प्यावर आलो होतो.पण त्या भयाण शांततेत सुद्धा वाळलेल्या पानांचा भयानक आवाज येत होता.नुकतेच आम्ही पेरजागडाच्या पायथ्याशी पोचलो होतो.हा आवाज कसला येतोय? म्हणून मधू मामाजी उंच दगडांवर उभे होऊन समोर बघू लागले, तेव्हा कळले की रानडुकरांचा कळप पायथ्याशी वावरत आहे.हळूच मला म्हणाले...म्हणून मघाशी तो दुर्गंध येत होता.कारण इथे तो रानडुकरासाठी वावरत होता..मग आता जायचं कसं?
"थांबुयात थोडावेळ...ती थोडी समोर उतरली की निघुयात.."
तसं आम्ही जिथे बसून होतो.तिथून थोड्याफार प्रमाणात हत्तीखोयाळ दिसत होता.तरी अजून पाच ते दहा मीटर ची चढाई होती.ती उभाट अशी होती.पाय घसरला की सरळ खाली पसरला.एक नजर खालून मी पेरजागडाकडे टाकली.डोळ्यांसमोर विशाल दगडाची रचना अशी दिसून येत होती.ती भयाण दगडे आणि जागोजागी असलेली भुयारे.चित्रविचित्र कडा,आणि प्रत्येक दगडांची ती रचना.सगळं कसं पुन्हा एकदा अद्भुत वाटत होतं.पावसाचं संपूर्ण पाणी झरोख्यातून दगडांद्वारे पाझरत असल्यामुळे बऱ्याच जागी काळपट दगडे झाली होती.
त्या डुकरांचं पण काही समजत नव्हतं.काय बघत होते? काय खात होते?पण मध्येच आवाज करत काहीतरी पायाने खोदल्यासारखं करत होते.आणि जिथे तिथे हुंदडत होते.जवळपास एखादं तास झालं असेल ती गडाच्या दुसऱ्या टोकाला गेली.आणि आम्ही मग जाण्यासाठी तयार झालो.
मधूमामाजी पायथ्याशी एका दगडावर सिगरेट पित बसले.आणि मी हळुहळू गड चढू लागलो.एक एक पाऊल सांभाळून टाकावे लागत होते.कारण पावसामुळे गडावरील दगडे घरांगळून तिथे साचले होते.आणि शिवाय पकडायला कशाचाच आधार नव्हता.त्यामुळे दोन्ही हात टेकत मी सावधानतेने चढण्याचा प्रयत्न करत होतो.
काही वेळाने चढाईचा भाग संपला आणि गडावरील दगडांचा आधार मिळाला, ज्याच्या साहाय्याने मी दगडांचा आधार घेत त्या हत्तीखोयाळच्या पायथ्याशी आलो.आता इथून वाट निरूंद होती.दोन्ही बाजूला गडाची दगडे एखाद्या भिंतीसारखी उंचच उंच गेली होती.वर बघण्यासाठी मान अशी उंचच उंच जात होती.अगदी वाटेवरच दोन प्रचंड दगडे आली होती.कदाचित गडावरूनच ती घरंगळून आले असेल असे वाटत होते.आणि ती अश्या पद्धतीने वाटेत होती की त्यावरून चढता सुद्धा येत नव्हते.
मी कसंतरी प्रयत्न केला आणि त्यावर चढलो.जसजसं त्या दगडांवर चढू लागलो.अगदी तस तसं त्या गुहेचं द्वार मला दिसू लागलं होतं. दगडांवरून वर आल्यावर मी मधूमामाकडे बघितलं,तर पायथ्यावर बसलेले ते अगदी छोटेसे फुलपाखरू असल्यासारखे दिसत होते.त्या दगडांवर एक बराच मोठा वृक्ष कोसळून पडला होता.आणि वर असणाऱ्या झाडांचा सगळा पालापाचोळा त्या हत्तीखोयाळ मध्येच साचायचा.ज्यामुळे तिथली दगडे पूर्णपणे झाकून गेली होती.अगदी पायाखाली एखादी गादी अंथरल्यागत पाय तिथे रुजायचे.
मी जरा सावरत सावरत गुहेच्या तोंडाशी गेलो.तर असंख्य प्रमाणात चमगादडांचा झुंड त्या गुहेच्या आत शिरला.ज्यामुळे मी थोडं घाबरल्यासारखा झालो.गुहेचा तोंड इतका विशाल होता की सहज माणूस उभा होऊन आत जाता येईल.त्याप्रमाणे मी मोबाईलची टॉर्च लावली आणि गुहेच्या आत प्रवेश केला.
अंधारमय काळोख जसा उजेडाच्या स्वाधीन होत गेला.तसतसे चमगादडे आणखी आणखी आत जाऊ लागले.कालांतराने गुहा पण आतून निरुंद होत गेली.मी जाऊ लागलो आतमध्ये.जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत.आतमध्ये एक शांततेचा सन्ना टा पसरला होता.फक्त आवाज येत होता तो चमगादडांच्या फडफडण्याचा.तरी वाट मात्र संपत नव्हती.समोर ती गुहा एकदम रांगुन जाता येईल एवढंच अंतर दाखवत होती.जवळपास मी पाच ते सात मीटर आतपर्यंत गेलो होतो.अजून जाता येईल ह्या प्रयत्नात मी चालतच राहिलो, पण ती गुहा समोरून बंद झाली होती.तिथून ती वरच्या बाजूस निघाली होती.तिथेही वर जाता आलं असतं. पण आधीच भरपूर वेळ झाली असल्या कारणाने, मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला.
इतकं मात्र कळलं होतं, की बावन्न खोल्या आहेत की नाही ते माहीत नाही पण ती गुहा मात्र वरच्या दिशेला जात होती.जी निश्चितच कुठेतरी निघत असेल.मनात असा विचार करत मी गुहेच्या बाहेर आलो.कपाळावरचा घाम पुसला.तितक्यात मधूमामाजी मला आवाज देताना दिसले.मी काही फोटोज् घेतले आणि उतरायला लागलो.
अचानक मला कुणी तरी बघतोय असा आभास झाला. खरंतर हत्तीखोयाळची गुहा ही गडावर जाणाऱ्या वाटेवरून दिसत नव्हती.पण खाली उतरताना अलगद त्या कड्यावर लक्ष गेली.कुणीतरी तिथून मला बघत आहे असं वाटलं.आणि परत एकदा तिकडे बघितलं तर काहीच नव्हतं.कदाचित आभास असेल असे समजून मी उतरू लागलो.पण वारंवार माझी नजर त्या कड्यावरच जात होती.पायथ्याशी सिगरेट पित असलेले मधूमामाजी काय बघतेस? म्हणून खुणावू लागले.आणि मी काही नाही असं म्हणून चालू लागलो.
जाताना एकच विचार येत होता.की हो न हो नक्कीच तिथे काहीतरी दडलंय.जवळच कसलीतरी शिळ कानात गुंजत होती.आणि मन त्या गुहेत अडकल्यासारखे वाटत होते. राहून राहून तोच विचार मनात साचत होता, की आपण अर्धवट ती गोष्ट सोडली आहे.काय असेल त्या गुहेच्या उराशी हाच एक प्रश्न मला सतावत चालला होता.
माझ्या मनातलं गुपीत कदाचित मधू मामाजीला कळलेलं असावं.पण त्यांनी त्या बाबतीत माझ्याशी कसलीच विचार सरणा केली नाही.पण त्यांचं एक निराळं चक्र होतं.चेहऱ्याने तसे कधी दाखवत नसले तरी विचारांची शीला त्यांची उच्च होती.एव्हाना मी घरी पोहचलो होतोच.पण मन माझं अजूनही तिथेच अडकले होते.एक आनंदही होता आणि एक शंकाही.पण आता गडाची काय व्याख्या आहे.हे जाणून घ्यायचं होतं.म्हणून मग मी थोडी धावपळ करायचं ठरवलं.
अचानक लक्षात आलं की एकदा बघितलेली वाट मी कधीच विसरत नाही.त्यामुळे कधीतरी मी एकटाच जाणार अशी उत्साहाची शक्ती अंगात संचारत होती.आणि गडाविषयी काही माहिती गोळा करायची असेल तर ती गावातून होईल असं तर वाटत नव्हतं.कारण कुणालाही विचारावं तर फक्त गडाच्या हसण्याचा आणि रडण्याचा सांगत असतात.एखादं गड हसणं रडणं ऐकून प्रतिक्रिया देणं ही काही सहजासहजी होणारी गोष्ट नव्हती.त्यामुळे त्याचं काय प्रती कारण आहे ही जाणून घ्यायची माझी बऱ्याच प्रमाणात उत्कंठा होती.
त्या गडासाठी मी त्याच्या ट्रस्टींना तसं बघलं.पण त्यांच्या लेखनात किंवा निदर्शनात अशी एकही गोष्ट मला आढळली नाही जी माझ्या अस्तित्वाशी निगडित असेल. खरं तर गड हे निसर्गाची देण असते.पृथ्वीच्या भूगर्भातून होणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेका मुळे होणारी पर्वताची रचना, आपण भूगोलात वाचतच असतो.या गडाची रचना सुद्धा तशीच असेल असं वाटत होतं.आणि शोधमोहीमची जर गोष्ट निघाली, तर सगळ्यांच्या तोंडून फक्त टोंगरे महाराजांचं नाव निघत होतं.त्यामुळे सगळ्यात आधी त्यांनाच गाठायचे ठरवलं.
त्यासंबंधी मी गावात विचारपूस करून त्यांचा पत्ता घेतला.आणि सोनापुरवरून थोड्या अवधीसाठी निरोप घेतला. तसं त्याप्रमाणे मी वेळ न दवडता रामगिरी पर्वतावर महाराजांना भेटायला गेलो.त्यांनी त्यांच्या शिष्याचे जे नंबर दिले होते त्यांचं पण शोध करत करत मी ती कहाणी शोधण्याचा प्रयत्न करत होतो.जी आजपर्यंत प्रत्येकजण अर्धवट स्वरूपात सांगत होता.जवळपास चार ते पाच लोकांजवळ येरझारा मारली, तेव्हा मला त्या गडाबद्दल ती कहाणी ऐकायला मिळाली.
कारण टोंगरे महाराजांच्या नंतरही कुणी एक महाराज होते त्या गडावर.ज्यांचं काही कालावधीतच निधन झालं.आणि टोंगरे महाराजांना ज्या रहस्याची माहिती होती.जाण्याआधी त्यांनी ती त्यांना देऊ केली होती.पण त्यांच्या निधनानंतर ती सगळी माहिती लुप्त होऊन गेली होती.जी कदाचित कुणाकडेच नव्हती.
आणि त्याच शोधासाठी जवळपास मी कितीतरी आटोकाट प्रयत्न केला.शेवटी जे मिळवायचं होतं ते मिळवण्याचा आनंद चेहऱ्यावर उमटत नव्हता.कारण मृत्यू कशामुळे आपल्यावर हवी झालंय.फक्त ते मला जाणून घ्यायचे होते. ज्याचं कारण फक्त आणि फक्त पेरजागडच सांगू शकत होता.जे आभासी वास्तव्य मला येत होते.ज्यात त्या गुहेचा अंत होता.ज्यात माझ्या मृत्यूचे रहस्य लोप पावले होते.ज्यात माझ्या चार मित्रांनी जीवदान केलं होतं.ज्यात मी पण एक ठोकळा होऊन मृत्यूच्या स्वाधीन होणार होतो.