(आपण मागच्या भागात पाहिलं की, सगळंच अजयच्या मनासारखं घडत होतं. तो खुप खुश होता. त्याला काही झोप लागत नव्हती. सारखा राधिकाचाच चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता... विचार करता करता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. इथे राधिकाची पण काही वेगळी परिस्थिती नव्हती. तिलाही अजयचा विचार करता करता खुप उशीरा झोप लागली...
आता पुढे...)
अजय आणि राधिका दोघेही एकमेकांवर प्रेम करतात हे आता सर्व शिक्षकांना कळलं होतं... अधून मधून राधिका नसताना सगळे शिक्षक अजयला राधिकाच्या नावाने चिडवत बसायचे...
निलेश सर- "काय अजय, मग कधी विचारतोस राधिकाला लग्नाविषयी..." अजय फक्त गालातल्या गालातच हसत होता. 😊😊
सरीता बाई- "त्याला काही विचारलं की फक्त हसतच बसणार बस..." त्या हसतच म्हणाल्या. 😁😁
अंजली बाई- "हो ना... अरे विचारून टाक लवकरात लवकर... आम्हाला पण तुमच्या लग्नाचे लाडू खायला मिळतील..." तसे सगळे शिक्षक हसू लागले. 😁😁
निलेश सर- "आणि राधिकाही तुझ्यावर प्रेम करते... ती तुझ्या बोलण्याची वाट बघते... की तू कधी विचारशील ते..."
अजय- "हो विचारेन, पण अर्चूला येऊ द्या आधी, ती आली की लगेच विचारून टाकेन, ती असली की मला थोडी हिम्मत येईल ना..." 😊😁😁
निलेश सर- "बघितलंत बाई, प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी बहिणीला सोबत घेऊन चाललाय..." तसे सगळेच हसू लागले... 😁😁😀
अंजली बाई- "हो ना... ते सांगतात ना "तुम आगे बढो हम कपडा संभालते है" असाच काही तरी विचार असेल अजयचा... म्हणजे तीला विचारल्यावर राधिकाने जर याला मारलं तर कोणीतरी त्याला सोडवायला नको का...?" तसे सगळे शिक्षक जोरजोरात हसू लागले...😅😅😅😅😂😂 असे सगळे शिक्षक अजयला नेहमीच चिडवत बसायचे...
आज राधिकालाही थोडी उशीराच जाग आली. ती पटापट शाळेत जायची तयारी करू लागली.
राधिकाची आई- "राधिका ए राधिका, अगं तयारी झाली का तुझी...? बाहेर ये पटकन."
राधिका- "हो येते..." आतमधून आवाज आला. थोड्या वेळाने राधिका बाहेर आली आणि म्हणाली.
"काय गं आई... काय झालं बोल लवकर, मला उशीर होतोय शाळेत जायला..."
आई- "अगं हो सांगते बस दोन मिनिटं, तुझा टिफीन घेऊन येते आणि हा आधी चहा नाश्ता करून घे... राधी थोडी लवकर उठत जा गं... रोज उठायला उशीर करतेस आणि मग घाईघाई करत शाळेत जातेस..."
राधिका- "हो गं उद्यापासून नक्की सकाळी लवकर उठत जाईन..."
आई- "हो, रोजच असं बोलत असतेस तू..."
हे ऐकून राधिका गप्पच बसली आणि तिने चुपचाप चहा नाश्ता संपवला. आईने तिला टिफीन आणून दिला.
राधिका- "आई बोल, काय बोलत होतीस...?"
आई- "हो बोलते पण चिडू नकोस तू... मी काय बोलते ते आधी शांतपणे ऐकून घे आणि काय ते नंतर बोल..."
राधिका- "आई काय ते लवकर बोल, आधीच मला उशीर होतोय... नाहीतर आपण रात्री बोलूया का...?"
आई- "नको आताच बोलते मी... ते... काल तू शाळेत गेली होती तेव्हा तुझी कुसुम आत्या आली होती घरी... म्हणजे ती तुझ्या बाबांना बघायला आली होती... पण ती विचारत होती की..."
तसं राधिकाने आईचं बोलणं मध्येच थांबवलं आणि ती चिडूनच म्हणाली.
राधिका- "आलं माझ्या लक्षात ती इथे का आली असेल ते...? बाबांच्या आजाराचं निमित्त करून ती वेगळ्याच कारणासाठी इथे आली होती. आई, पुन्हा ह्या घरात तीचा विषय नकोय मला... कळलं तुला..."
आई- "अगं, ऐकुन तर घेशील का माझं एकदा..."
राधिका- "आई, उशीर होतोय मला आता, मी निघतेय..."
राधिका तिचा टिफीन, बॅग घेऊन ती तिच्या बाबांजवळ गेली. बरेच दिवस झाले राधिकाच्या बाबांची तब्येत बरी नव्हती. त्यांना आजारामुळे खुपच अशक्तपणा आला होता. ते घरीच झोपून राहत होते. राधिकाने बाबांच्या गळ्याला, डोक्याला हात लावून बघितला.
राधिका- "बाबा, थोडा ताप आहे तुम्हाला. चहा नाश्ता करून घ्या आणि औषधं घ्या लगेच."
बाबा- "अगं आता थोडं बरं वाटतंय मला... अशक्तपणा आहे अंगात म्हणून थोडं अंग गरम लागतंय... बाकी काही नाही..."
राधिका- "बरं... बाबा तुम्ही आता आराम करा. मी निघते आता शाळेत जायला... काही हवं असेल तर आईला आवाज द्या... आणि जास्तच काही प्रॉब्लेम वाटला तर फोन करा मला."
बाबा- "अगं पोरी माझी काळजी नको करूस तू. मी एकदम ठिक आहे. तुझ्यासारखी पोरगी असेल तर मला काळजी करण्याचे कारण काय, नाही का... मी होईन बरा. आणि तू व्यवस्थित जा आणि स्वतःची काळजी घे बरं का..."
राधिका- "हो बाबा मी जाईन व्यवस्थित. आईऽऽऽ... बाबांची काळजी घे गं आणि काही वाटलंच तर फोन कर मला." ती जाता जाता आईला म्हणाली. तीने रूममध्ये डोकावून पाहिलं तर मीरा, मेघा, सोनाली तिघी पण अभ्यास करत बसल्या होत्या. राधिका त्यांना म्हणाली.
"तुमचा अभ्यास झाला की आईला मदत करा कामात कळलं का... बाबांची पण तब्येत ठीक नाही."
मेघा- "हो ताई झालंच आमचं आता... जातो आम्ही आईला मदत करायला..."
राधिका- "बरं... आणि बाबांची काळजी घ्या बरं का..."
मीरा- "हो ताई, आहोत आम्ही, तू काळजी नको करूस."
एवढं बोलून राधिका शाळेत निघून गेली.
आईने राधिकाच्या बाबांना चहा आणि नाश्ता दिला... थोड्या वेळात त्यांना औषध देऊन आराम करायला सांगितले.
आई- "तुम्ही आराम करा... मी कामं आवरून घेते, काही लागलं तर आवाज द्या मला..."
बाबा- "सरू... (राधिकाची आई सरस्वती ऊर्फ सरू) बस थोडा वेळ, मला बोलायचं आहे तुझ्याशी... कामं काय होतच राहतील ती" आई खाली बसली.
आई- "मला माहिती आहे, तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे ते...?"
बाबा- "काय गं काय बोलत होतीस तू कुसुमबद्दल ? ऐकलय मी तुमचं दोघींचं बोलणं. आणि तूला शेवटचं सांगतो मी परत त्या कुसुमला इथे उभं नाही करायचं... समजलं तुला... नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल सांगून ठेवतो."
आई- "आता दारात आलेल्या माणसाला हाकलून लावायचं का...? कुसुमताई आणि तुम्ही दोघे सख्खे बहिण भाऊ... पण जसे जन्माचे वैरी दोघे. झालं ते झालं आता... आता तिचा राग राग करून काही फायदा आहे का ? कशाला ते जूने मुडदे उखडून काढायचे...?"
बाबा- "कशाला म्हणजे ? आणि राग येणारच मला तिचा... कशी वागलंय ती माझ्यासोबत, मी ते कधीच विसरणार नाही समजलं का... तीला माझी बहीण बोलायला पण मला लाज वाटतेय, अशी कोणती बहीण वागते का तिच्या लहान भावासोबत...? मी मान्य करतो लहानपणीच आईबाबा वारले तेव्हापासून तिनेच मला लहानाचं मोठं केलं... माझी काळजी घेतली. माझं लग्न लावून दिलं... पण त्याबदल्यात आपल्याच शेतात नोकरासारखं राबराब राबवलंय तीने मला. पण तरीही मी तिच्याकडे कधीच तक्रार केली नाही.
पण आपलं लग्न झाल्यानंतर तूला तरी तिने नीट वागवायला हवं होतं ना... तुझे किती हाल केले गं तिने... तुला शेतात काम करायला लावायची, घरातली सगळी कामं एकटीला करायला लावायची, स्वयंपाक वेळेवर झाला नाही की तूला नाही नाही ते बोलायची, शिवीगाळ करायची. आणि स्वतः मात्र महाराणीसारखी बसून राहायची... आणि तूला फक्त हुकुम सोडायची. लाज कशी वाटली नाही तीला असं वागायला. तू काय काय करणार होतीस गं एकटी...? शेतातली कामं करणार, घरातली कामं करणार की आपल्या पोरींना सांभाळणार... विसरलीस का तू सगळं...?
तुझी आणि पोरींची अवस्था बघून मला रडायला यायचं गं... आपल्याच माणसांशी इतकं निर्दयी कोणी वागते का...? सख्खी बहीण असून सावत्र असल्यासारखं वागवलं तिने मला... सावत्र भाऊबहिण पण इतके वाईट वागत नसतील एकमेकांशी... माझ्यासोबत तुझे आणि पोरींचे पण हाल... तेच तुमचे हाल बघवत नव्हते मला... म्हणून मी तिथून घर सोडून तुम्हाला इथे घेऊन आलो... आज माझे आईबाबा जीवंत असते तर आपल्यावर अशी वेळ आली नसती..."
बोलता बोलता बाबांच्या डोळ्यात पाणी आलं.
आईचे पण अश्रू अनावर झाले... त्यांनी साडीच्या पदराने आपले डोळे पुसले. आणि आई मुसमुसतच म्हणाली.
आई- "सगळं आठवण आहे मला, काही विसरली नाही मी. पण काय करायचं सांगा... आपल्या नशिबात होते ते वाईट दिवस निघून गेले... आता होतंय ना सगळं नीट, मग का जूनी दुश्मनी पकडून ठेवायची... जाऊ द्या आता ते... त्यांनाच त्यांच्या वागण्याचा आता पश्चात्ताप होतोय, असं त्याच म्हणत होत्या."
बाबा- "हो का...? पश्चात्ताप...?" बाबा हसतच म्हणाले.
"पश्चात्ताप कशाशी खातात हे तरी ठाऊक आहे का तीला...? पश्चाताप म्हणे... इथे राहायला आल्यावर पण किती संकटे आली आपल्यावर, किती त्रास झाला आपल्याला... तेव्हा नाही आली लहान भावाची आठवण तिला...? पश्चात्ताप करणार्यातली बाई नाही ती. तीला माणसांची किंमत नाही... ती फक्त पैशाला महत्त्व देतेय... मी चांगलं ओळखतो तिला..."
आई- "अहो पण, कुसुम ताईंच्या नवर्याने आपल्याला पैशांची मदत केली होती ना... आपलं हे घर बांधण्यासाठी पैसे दिले होते ना... मग त्या पैशांचं काय...? आपल्याला ते पैसे परत करावे लागतील ना..."
बाबा- "काय म्हणालीस तू...? भाऊजींनी आपल्याला उसने पैसे दिले होते... आणि हे तुला कुसुम ताई बोलली असेल नाही का...?
आई- "हो, त्यादिवशी घरी आल्या होत्या, तेव्हा बोलल्या मला त्या..."
बाबा- "भाऊजींनी आपल्याला पैसे दिले होते, पण ते उसने दिले नव्हते... शेतात तू आणि मी राबराब राबले होते, आणि शेतमाल विकला होता... त्यांतून आपल्याच कमाईचे पैसे भाऊजींनी आपल्याला दिले होते... ही गोष्ट त्यांनी कुसुम ताईला पण सांगितली होती, आता ते पण पैसे तीला परत करायचे का...? पैसा आणि फक्त पैसा दिसतोय तीला, इथे भाऊ आजारी आहे, त्याचं काही नाही तीला... भाऊजी होते म्हणून त्यांनी पैसे दिले नाहीतर ते पण मिळाले नसते...
खुप चांगले होते ग ते... आज ते जीवंत असते... पण माझी बहीण तर खरी पण तीच्या पैशाच्या लोभापाई तीने नवर्यावर पण व्यवस्थित उपचार नाही केले... आणि भावजींना कायमचं या जगातून उठवलं तिने... इतकी निष्ठूर आणि निर्दयी माणसं आहेत ती... आयुष्यभर फक्त पैसा पैसा करत बसली बस... आणि आता ती आणि तीचा तो वाया गेलेला पोरगा सगळं घरदार, शेतजमीन सर्व बळकावून त्यांवर सापासारखी कुंडली मारून बसलेत... आणि आता तर मला त्यांतलं काहीच नको. माझ्या बायको, पोरींसाठी मी माझ्या कष्टाने थोडंफार केलंय, त्यांतच मी सुखी आणि समाधानी आहे बस..." ते हात जोडतच चिडूनच म्हणाले.
आई- "बरोबर आहे तुमचं... नकोय आपल्याला काही त्यांतलं... आपण थोडक्यातच सुखी, समाधानी आहोत बस..."
बाबा- "आता परत तिच्याशी आपल्याला संबंध वाढवायचे नाहीत कळलं ना... कारण ती आता इथे का आणि कशासाठी येतेय... ते पण आलंय माझ्या लक्षात..." ते राधिकाच्या आईकडे बघतच म्हणाले.
आई- "हो तेच, माझ्यापण लक्षात आलंय ते..."
बाबा- "आता ती परत आली ना की मी बोलतो तिच्याशी, तू आमच्यामध्ये अजिबात पडू नकोस... जे काही बोलायचं आहे ते स्पष्टच बोलेन मी तिच्याशी..."
ते चिडूनच बोलत होते. बोलता बोलता त्यांना एकदम खोकल्याचा उमाळा आला, ते जोरजोरात खोकू लागले... राधिकाच्या आईने पटकन त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्यांना प्यायला पाणी दिले. पाणी पिऊन त्यांना थोडं बरं वाटलं...
आई- "अहो, तुम्ही नका त्रास करून घेऊ स्वतःला... असं काही होणार नाही. आता झोपा, आराम करा तुम्ही, मी पण थोडी कामं आवरून घेते..."
बाबा झोपले आणि आई काम करायला निघून गेली...
मेघा, मीरा, सोनाली पण तीघीही आईची मदत करायला निघून आल्या.
आई- "काय गं पोरींनो अभ्यास झाला का तुमचा...?"
मेघा- "हो झाला..."
आई- "आणि आता परीक्षा पण जवळ आल्यांत, नीट अभ्यास करा... नुसत्याच भांडत नका बसू दोघीही."
आईचं बोलणं ऐकून सोनाली हसू लागली.
मीरा- "मी नाही भांडत कळलं ना आई... ही मेघूच भांडत असते सारखी माझ्याशी..."
मेघा- "हो का... सुरूवात तर तुच करतेस आधी भांडणाची."
मीरा- "हो का... मी करते सुरूवात... आणि कळ कोण काढते गं भांडणाची...?"
अशा दोघी परत भांडू लागल्या. आईने दोघींचेही कान धरले...
आई- "अगं पोरींनो, तुम्हाला मी आताच सांगितलं की भांडू नका... आणि परत सुरुवात केली तुम्ही भांडायला, सुधरणार नाहीत तुम्ही कधी."
"आई गं आई, कान दुखतोय सोड ना", दोघीही ओरडू लागल्या. सोनाली त्यांना बघून हसत होती.
आई- "सोडते, पण दोघींनीही चुपचाप कामं उरका आणि आपापल्या तयारीला लागा कळलं... परत भांडायला सुरुवात केली ना तर पाठीत धपाटे देईन दोघींच्या पण..."
तशा दोघीही निमुटपणे काम करू लागल्या...
राधिकापण शाळेत आली होती... बाबा आजारी पडल्यापासून शाळेतले सगळेच शिक्षक तिच्या बाबांच्या तब्येतीची काळजीने चौकशी करत होते...
अंजली बाई- "राधिका, तुझ्या बाबांची तब्येत कशी आहे आता...?"
राधिका- "तशी बरी आहे आता त्यांची तब्येत, पण अशक्तपणा खुप जाणवतोय त्यांना..."
निलेश सर- "थोडा अशक्तपणा वाटेलच त्यांना, इतके दिवस आजारामुळे त्यांच्या पोटात व्यवस्थित अन्न नाही ना... म्हणून थोडा अशक्तपणा जाणवेलच त्यांना..."
अजय- "राधिका आणि तसंच काही प्रॉब्लेम वाटला तर रात्री अपरात्री कधीही फोन कर आम्हाला येऊ आम्ही..."
निलेश सर- "हो राधिका, अजय अगदी बरोबर बोलतोय, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत... तू एकटी आहेस असं समजू नकोस स्वतःला कळलं का...?"
राधिका- "तुम्ही सगळे असं बोलताय ना तरी मला तुमच्या बोलण्याचाही आधार वाटतोय..."
सरीता बाई- "अगदी खरंय राधिका तुझं... आपण दुःखात असतो, तेव्हा आपल्या माणसांचे आपुलकीचे दोन शब्दही आपल्याला खुप आधार देऊन जातात."
अंजली बाई- "अगदी बरोबर बोललात बघा तुम्ही..."
असंच सगळ्यांचं बोलणं चालू होतं... थोड्या वेळाने अजय म्हणाला.
अजय- "राधिका, आता तुझी मैत्रीण पण येईल परत..."
राधिका- "हो ना... तिची रजा पण खुप लवकर संपल्यासारखी वाटली एकदम..."
अजय- "रोज बोलत असतात फोनवर दोघी पण तासनतास... मग काय वाटणार आहे वेळेचं..." तो हसतच म्हणाला. तसं राधिका आणि इतर शिक्षकही हसू लागले.😊😊
अंजली बाई- "हो ना..., पण राधिका अगदी बरोबरच बोलतेय अजय... कसे पटापट दिवस निघून गेले काही कळलं पण नाही.... कधी पासून जाॅईन होणार आहे अर्चना...आणि बाळ कसं आहे तिचं...?"
अजय- "आता या सोमवार पासूनच जाॅईन होईल ती. आणि दोघंही एकदम टकाटक आहेत..." तो हसतच म्हणाला.
"असू दे दोघेही टकाटकच असू दे", सरीता बाई पण हसतच म्हणाल्या.
अशाच सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या.
क्रमशः-
💕🌹@Ritu Patil 🌹💕
💕💕 प्रेमगंध... 💕💕
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
------------------------------------------------------------